महाराष्ट्रातील महाविद्यालयीन तरुण रंगकर्मीना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘लोकांकिका’ स्पर्धेला पाच वर्षे पूर्ण झाली.

ज्येष्ठ कवी आणि समीक्षक नीळकंठ कदम यांनी ‘लोकांकिका’ स्पर्धेच्या गेल्या पाच पर्वामध्ये प्रत्यक्ष अनुभवलेल्या गोष्टींविषयी ‘रंगवाचा’ या कणकवलीहून निघणाऱ्या नाटय़विषयक त्रमासिकात मांडलेली निरीक्षणे संपादित स्वरूपात आम्ही इथे पुनर्मुद्रित करीत आहोत..

मराठी नाटय़-परंपरेमध्ये ‘एकांकिका’ या नाटय़प्रकाराचे दालन खूपच समृद्ध आहे. साठच्या दशकात मराठीत कविता, कादंबरी, कथा आणि नाटक या वाङ्मयप्रकारांत नवनवीन आशय आणि रूपबंधांचे जसे ‘प्रयोग’ केले गेले; ज्यामधून वाङ्मयाचा या दोन्ही स्तरांवरील पस, आवाका वाढल्याचे जसे प्रत्ययाला आले, तसाच आवाका ‘एकांकिका’ या लघुतम नाटय़प्रकाराचाही वाढल्याचे प्रत्ययाला आले. नावेच नमूद करावयाची झाल्यास पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, विद्याधर पुंडलिक, रत्नाकर मतकरी, माधव आचवल, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर यांच्या पिढीने आणि नंतरच्या चं. प्र. देशपांडे, प्रेमानंद गज्वी, शफाअत खान, जयंत पवार आणि संजय पवार यांनी हा नाटय़प्रकार जाणीवपूर्वक आणि प्रयोगशीलतेचे भान ठेवून हाताळला. परिणामी एकांकिका हा नाटय़प्रकार आपल्या नाटय़-परंपरेत चांगलाच रुजला आहे. सुरुवातीच्या काळात एककेंद्री आशयसूत्र प्रकट करणाऱ्या या नाटय़प्रकारात कालानुरूप आणि आशय-आविष्काराच्या प्रभावी दाबामुळे अनेकस्तरीय आशयसूत्रे आणि मर्यादित कालावकाशात व्यापक जीवनानुभव व्यक्त होऊ लागला. एकांकिका हे केवळ पूर्ण लांबीचे नाटक लिहिण्याचा सराव करण्याचे माध्यम न राहता तो एक स्वतंत्र नाटय़प्रकार म्हणूनही अस्तित्वात आला.

अन्य साहित्यप्रकारांप्रमाणेच याही प्रकारात महाराष्ट्राच्या नागरी आणि अनागरी भागांतून अनेक एकांकिकाकार लिहिते झाले. त्यांची संख्या लक्षणीय आहे. स्वाभाविकच महानगरांमध्ये आणि अनागरी भागांतही विविध एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. यामध्ये उत्साह, उत्सव आणि प्रसिद्धीलोलुपतेचा भाग किती आणि या नाटय़प्रकाराच्या विविध शक्यता आजमावण्यासाठी जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचा भाग किती असतो, हा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरीही यातील काही स्पर्धामुळे तरुणाईच्या ऊर्जेला, तिला अभिप्रेत असलेला नाटय़ानुभव व्यक्त करण्याच्या निकडीला आणि त्यामधील प्रयोगशीलतेला रंगमंच उपलब्ध करून दिला जातो, ही आश्वासक आणि दिलासादायक बाब आहे. यातील काही महाविद्यालयीन आणि खुल्या एकांकिका स्पर्धाना गेल्या काही वर्षांत त्यांच्या सातत्यामुळे विशिष्ट प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

अशा एकांकिका स्पर्धामध्ये ‘लोकसत्ता’ने गेली पाच वर्षे सातत्याने देखण्या स्वरूपात आणि सुनियोजितपणे आयोजित केलेल्या ‘लोकांकिका स्पर्धे’ला स्वत:ची अशी खास ओळख आणि प्रतिष्ठा अल्पावधीतच प्राप्त झाली आहे. ‘लोकांकिका’ स्पर्धा महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, रत्नागिरी आणि कोल्हापूर अशा आठ केंद्रांवर तीन स्तरांवर आयोजित केली जाते. ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी या आठही केंद्रांवर ही स्पर्धा सुविहितपणे पार पाडण्यासाठी अथकपणे परिश्रम घेत असतात. एखादी विचारपूर्वक केलेली ‘कृती’ किंवा राबवावयाचा एखादा व्यापक प्रकल्प किती सुनियोजितपणे आणि सुंदररीत्या पार पाडता येतो, याचे ‘लोकांकिका’ स्पर्धा हे उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच अल्पावधीत ही स्पर्धा महाराष्ट्रातील नाटय़-परंपरेसाठीदेखील अभिमानाची बाब ठरली आहे. गेली पाच वर्षे या स्पर्धेसाठी विविध केंद्रांवर परीक्षक म्हणून आणि ठाणे व मुंबईच्या विभागीय अंतिम फेरीला तसेच महाअंतिम फेरीला प्रेक्षक म्हणून उपस्थित राहून हा अनुभव मी प्रत्यक्ष घेतलेला असल्याने ही निरीक्षणे मी जाणीवपूर्वक नोंदविलेली आहेत.

गेल्या पाच वर्षांमध्ये या स्पर्धेमध्ये सादर झालेल्या एकांकिकांमधील काही अनुभवांची सूत्ररूपाने मांडणी करावयाची झाल्यास ती अशी करता येईल : आजचे एकांकिकाकार (ज्यात महाविद्यालयीन विद्यार्थी असलेले अथवा महाविद्यालयाच्या बाहेरचे असलेले अशा दोन्हींचा समावेश होतो.) आपल्या समकालाला विविध अनुभवांद्वारे प्रक्षेपित करू पाहत आहेत. यामध्ये प्रामुख्याने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांमधील विसंगतता, विपरीतता आणि विषमतेचे, शोषणाचे अनुभव आहेत. मानवनिर्मित संकटांचे अनुभव आहेत. आजच्या तरुण पिढीला सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या नवनैतिकतेच्या प्रश्नांचे, त्यामुळे नातेसंबंधांवर येणाऱ्या ताणतणावांचे अनुभव आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक संघर्षांचा, समस्यांचा प्रत्यय देणारे अनुभव त्यांत आहेत. सामाजिक, सांस्कृतिक श्रेणीबद्ध रचनेतील तळातील माणसाच्या आणि ग्राम-संस्कृतीतील माणसाच्या वाटय़ाला येणारे दाहक जीवनानुभवही त्यात आहेत. स्त्रीच्या होणाऱ्या शोषणाचे अनुभव आहेत. धर्माध आणि मूलतत्त्ववादी प्रवृत्तींचा वाढता प्रभाव.. परिणामी ज्ञानी, विचारवंत व्यक्तींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आणि त्यांच्या जीवितालादेखील असलेल्या धोक्याचा सर्वकाळाला भेदून जाणारा अनुभव यामध्ये आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे, जागतिकीकरणामुळे निर्माण होणारे प्रश्न यात आहेत. असे विविध अनुभव या एकांकिकांमधून व्यक्त झालेले पाहावयास मिळाले.

अशा अनुभवानुरूप एकांकिकांची शैलीदेखील बदलत गेल्याचे प्रत्ययाला आले. कधी ती वैचारिक, चिंतनात्मक आणि घनगंभीर बनली, तर कधी ती खुसखुशीत, विनोदी, औपरोधिक आणि विशिष्ट प्रादेशिक बोलींचा अवलंब केलेली होती. आपल्या देशी परंपरेतील कलांचा काही एकांकिकाकारांनी अवलंब केल्याचे दिसले. नाटय़ानुभवानुरूप केलेली नेपथ्यरचना, प्रकाशयोजना, पाश्र्वसंगीत यांतदेखील कल्पकता होती. परिणामी काही एकांकिकांची दृश्यात्मकता निश्चितच प्रभावी ठरली. ही स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रयोगात सामावून घेण्यासाठी समूहाचा वापर केल्याचे काही एकांकिकांमधून दिसून आले.

अर्थात, प्रत्येक वेळी या समूहाचा वापर कल्पकतेने किंवा अर्थपूर्णतेने केला गेला होता असे मात्र नाही. हीच बाब दशावतार, कीर्तन, प्रवचन आणि अन्य साहित्यप्रकारांच्या उपयोजनाबाबत म्हणता येईल. हे देशी कलाप्रकार वापरत असताना त्यांचे उपयोजन एकांकिकेतील मूळ नाटय़ानुभव, आशयसूत्र समृद्ध व प्रभावी होण्यासाठी आणि त्याद्वारे ‘नाटय़ात्म विधान’ अधोरेखित होण्याकरिता होते किंवा नाही, याकडे मात्र संबंधित एकांकिकाकारांचे आणि सादरीकरणात सहभागी झालेल्या इतर घटकांचेदेखील दुर्लक्ष झाल्याचे दृष्टीस आले. नावीन्याच्या नावाखाली हे कलाप्रकार किंवा कवितेसारखा वाङ्मयप्रकार केवळ ‘एक चूष’ म्हणून वापरला जात नाही ना, अशी शंका येत होती. या स्पर्धेमध्ये माध्यमांतराचा प्रयोगदेखील अर्थपूर्णरीत्या केला गेला, तो निश्चितच स्वागतार्ह आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये महाअंतिम फेरीत सादर झालेल्या एकांकिकांमधून (क्वचित काही अपवाद वगळता) नवे वास्तवभान, अस्तित्वभान आणि जीवनभान, बदलत्या आणि नव्या नातेसंबंधांमधून निर्माण होणारे नवे सांस्कृतिक प्रश्न, त्यामुळे आपल्या कुटुंबसंस्थेत निर्माण होणारे पेच, तिढे, सार्वकालिक मूलभूत स्वरूपाचे अनुभव इत्यादी नाटय़ानुभव तरुणाईच्या संपूर्ण ऊर्जेसह सादर करण्यात आले. ‘लोकांकिका’ स्पर्धेचे महाविद्यालयीन रंगभूमीला हे निश्चितच योगदान आहे असे म्हणावे लागेल.

‘लोकांकिका’ स्पर्धेत नाटय़ानुभवांची आणि सादरीकरणांची विविधता असली, त्यामधून महाविद्यालयीन रंगकर्मीच्या आणि त्यांना साह्य़ करणाऱ्या अन्य रंगकर्मीच्या कल्पकतेचा, श्रमांचा प्रत्यय येत असला, तरीदेखील या स्पर्धेचा एक हितचिंतक आणि सहप्रवासी म्हणून काही सूचना कराव्याशा वाटतात. त्या अशा :

अ) महाविद्यालयाच्या संबंधित नाटय़संघाने एखाद्या एकांकिकाकाराकडून स्पर्धेची सर्व गणिते, प्रयुक्त्या लक्षात घेऊन एकांकिका लिहून घेण्यापेक्षा एखादा नाटय़ानुभव- मग तो एककेंद्री असो वा अनेकस्तरीय असो- साकार करणाऱ्या एकांकिकेची स्पर्धेसाठी निवड करावी. ब) ‘केवळ चूष’ म्हणून लोककलांचा/ अन्य साहित्यप्रकारांचा वापर करण्यापेक्षा मूळ नाटय़ानुभवाला श्रीमंत आणि समृद्ध करेल अशा प्रकारे त्यांचे संबंधित एकांकिकेत उपयोजन केले आहे किंवा नाही, हे पाहूनच एकांकिकेची निवड करावी. क) कालौघात झिजून बोथट झालेल्या नाटय़ानुभवांपेक्षा प्रयोगशील नवा आशय (क्वचित धाडसी असलेला आशय) आणि रूपबंध (फॉर्म) असलेल्या एकांकिकेच्या निवडीला प्राधान्य द्यावे. एखाद्या पारंपरिक नाटय़ानुभवाला एकांकिकाकाराने ‘नवे परिमाण’ दिले आहे का, तेही पाहावे. ड) वेळेचे बंधन काटेकोरपणे पाळावे. एकांकिका जास्तीत जास्त ३५ ते ३७ मिनिटांची असावी. सारांश- एकांकिका म्हणून दीर्घाक सादर करू नये.

इ) अन्य स्पर्धेत किंवा स्पर्धामध्ये संबंधित एकांकिका पारितोषिकपात्र ठरली असेल आणि या विशिष्ट स्पर्धेत तिला पारितोषिक मिळाले नाही, तर समाजमाध्यमांवर परीक्षकांविषयी, त्यांच्या क्षमतेविषयी चर्चा करण्यापेक्षा थेट संबंधित परीक्षकांशीच प्रयोगाच्या अपयशाविषयी चर्चा करावी. ‘लोकांकिका’ स्पर्धेचे परीक्षक अशा चच्रेला नेहमीच उत्सुक राहिले आहेत. काही परीक्षक तर एकांकिकेच्या सादरीकरणानंतर त्याच ठिकाणी संबंधित रंगकर्मीशी मोकळेपणे चर्चा करतात. शिवाय, ‘लोकसत्ता’च्या कोणत्याही संबंधित प्रतिनिधींनी परीक्षकांच्या निर्णयात कधीच हस्तक्षेप केलेला नाही, किंवा  प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे स्वत:ची मते परीक्षकांवर लादलेली नाहीत, हे या स्पर्धेचे खास वैशिष्टय़ आहे. अखेरीस एखाद्या ‘अपयशी प्रयोगा’तच भविष्यातील ‘यशस्वी प्रयोगा’ची बीजे असतात, हे लक्षात घ्यावयास हवे. ‘लोकांकिका’ स्पर्धेला एखाद्या प्रयोगाशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे ते अशाच निकोप सांस्कृतिक पर्यावरणामुळे!

ता. क. : या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक देताना आठही केंद्रांवर सादर झालेल्या एकांकिकांच्या संहिता एकत्रित मागवून आणि त्या परीक्षकांना आधी वाचायला देऊन त्यांतून सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक द्यावे; जेणेकरून उत्तम संहिता असूनही केवळ प्रयोग चांगला न झाल्याने त्या लेखकावर होणारा अन्याय दूर करता येऊ शकेल. आयोजकांनी या सूचनेची दखल घेऊन ही काहीशी तांत्रिक त्रुटी दूर करता आली तर पाहावं.