नंदन होडावडेकर

मार्जरी किनन रॉलिंग्जच्या ‘द इयरलिंग’ पुस्तकात (मराठीत ‘पाडस’ या शीर्षकाखाली अनुवादित) लहानग्या ज्योडीचा अल्लड निरागसतेकडून आयुष्यातल्या टक्क्याटोणप्यांची व बऱ्यावाईट गोष्टींची जाण यायला सुरुवात होऊ लागण्यापर्यंतचा प्रवास मोठ्या सहृदयपणे रेखाटला आहे. ‘द इयरलिंग’ ज्या काळात घडते, तो साधारण १८७० च्या दशकातला आहे. अमेरिकेतलं यादवी युद्ध तोवर घडून गेलं होतं आणि ‘रिकन्स्ट्रक्शन’च्या स्थिरतर युगाला सुरुवात झाली होती. सरासरी आयुर्मान जेमतेम चाळीस वर्षांचं होतं. मोठ्या प्रमाणावर घडणाऱ्या बालमृत्यूंचा या आकड्यावर प्रभाव असला, तरी सामान्य माणसाचा ग्रंथ साधारण पन्नाशी-साठीत आटोपत असे. परिणामी, बहुसंख्य लोक आपल्या आदल्या पिढीच्या हाताखाली तयार होऊन जो काही वडिलोपार्जित व्यवसाय असेल तो चालवत. ती उपजीविका पुढे चालू ठेवण्यासाठी पुढल्या पिढीची तरतूदही वेळीच होणं गरजेचं होतं. फ्लोरिडात गावाबाहेर राहणारं बॅक्स्टर कुटुंब असो वा न्यू यॉर्कसारख्या शहरात कमी पगारावर, धोकादायक परिस्थितीत, आठवड्यात सत्तर(!)हून अधिक तास काम करणारे श्रमिक असोत; वा घरातल्या कामांचा बोजा उचलणाऱ्या स्त्रिया… सामान्य माणसाचं आयुष्य हे अधिक कष्टप्रद आणि वेळखाऊ होतं. जीविकेसाठी लागणारे ‘फुर्सत के रात-दिन’ अप्राप्य होते. इच्छा असो वा नसो – पौगंडावस्था जेमतेम संपत आली की व्यक्तीला गृहस्थाश्रमात प्रवेश करणं हे भागच होतं.

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
Paaru
Video: पारू व आदित्यच्या मैत्रीत फूट पाडण्यात अनुष्का यशस्वी होणार का? पाहा ‘पारू’ मालिकेचा प्रोमो
Time Travel Movies On OTT
‘टाइम ट्रॅव्हल’वर आधारित चित्रपट पाहायला आवडतात? OTT वरील ‘हे’ सिनेमे पाहून डोकं चक्रावेल
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “जराही रोमँटिक नाहीस तू…”, तेजूच्या हळदीत तुळजा सूर्यावर रूसणार; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो पाहिलात का?
Paaru
Video: आदित्य पारूच्या प्रेमात पडणार? ‘पारू’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो

‘द इयरलिंग’मधला ज्योडीचा बाप पेनी बॅक्स्टर आपल्या मुलाला काही काळ तरी अधिक बालपण अनुभवता यावं, यासाठी जिवापाड प्रयत्न करतो – पण अखेर निसर्गाच्या आणि तत्कालीन परिस्थितीच्या ननैतिक कटू सत्यांना अखेर शरण जाणं, त्यालाही भाग पडतं.

साधारण सव्वाशे वर्षांनी त्याच देशात आणि त्याच किनाऱ्यावर घडणारी आणि ‘द इयरलिंग’ पुस्तकापेक्षाही किती तरी अधिक गाजलेली ‘फ्रेंड्स’ ही मालिका, हे वरकरणी पाहता पूर्णपणे दुसरं टोक वाटू शकेल. तिचा पहिला भाग प्रसारित झाला तो २२ सप्टेंबर १९९४ रोजी – म्हणजे तीस वर्षांपूर्वी. तत्कालीन अमेरिकेची परिस्थिती ही अगदी निराळी होती. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जगात आता एकमेव महासत्ता उरली. सत्तरीकडे झुकलेल्या जॉर्ज एच. डब्ल्यू. बुशचा पराभव होऊन जेमतेम ‘बेबी बूमर’ पिढीतल्या (दुसऱ्या महायुद्धानंतर १९४६-१९६४ या काळात जन्मलेली पिढी) बिल क्लिंटनचा नवीन चेहरा राष्ट्राध्यक्षपदी आला आणि त्याच्या नेतृत्वाखाली मध्यमवर्गाची आर्थिक भरभराट होऊ लागली. व्हिएतनाम युद्ध, सिव्हिल राईट्स चळवळ आणि वांशिक दंगली, कम्युनिझमचा वाढता प्रभाव आणि अणुयुद्धाचा संभाव्य धोका यांसारख्या जगणं आमूलाग्र बदलून टाकू शकणाऱ्या बाबी मागे पडून, काही अपवाद वगळता स्थैर्याची भावना जनसामान्यांत रुजली. संगणक आणि तंत्रज्ञान क्षेत्रांची स्तिमित करणारी प्रगती याच काळातली.

हेही वाचा >>> खालमानेतले अनलिमिटेड

बेबी बूमर्सच्या पुढची पिढी ‘जनरेशन एक्स’ (जन्मसाल : १९६५ ते १९८०) याच सुमारास वयात येऊ लागली. तुलनात्मकरीत्या संपन्न परिस्थितीत जन्मलेल्या आणि नवीन तंत्रज्ञानाशी खेळत वाढलेल्या या पिढीला करिअरकरिता अनेक निराळे पर्याय आता उपलब्ध होते. वाढलेलं आयुर्मान, रोजच्या जगण्यातील कामांची काळजी परस्पर वाहणारी यंत्रं, अर्थव्यवस्थेत खेळू लागलेला पैसा आणि एकंदरीतच आशादायक आणि उज्ज्वल भवितव्याची ग्वाही देणारं वातावरण… यांमुळे या पिढीला काहीएक अवकाश मिळाला. ‘संपलं शिक्षण की चिकट नोकरीला, कर लग्न आणि घाल जन्माला मुलं’ हे रहाटगाडगं हा एकच मार्ग नाही (‘फैज अहमद फैज’ यांचा प्रसिद्ध शेर, सर्वस्वी निराळ्या संदर्भात इथे उद्धृत करायचा तर – ‘राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा!’) याची जाणीव होऊ लागली. एका अर्थी या टप्प्याला ‘ delayed adulthood’ म्हणता येईल.

(गमतीची बाब पाहा : मराठीत ‘अकाली प्रौढत्व’ हा शब्दप्रयोग रुळलेला आहे; मात्र जे काही एकमेव आयुष्य आपल्याला मिळालं आहे, त्यात आपल्या दृष्टीने नक्की श्रेयस काय आणि प्रेयस काय याचा उलगडा होईपर्यंत जाणीवपूर्वक घेतलेला ठेहराव दर्शवायला मात्र शब्द तोकडे पडतात. सांस्कृतिक धारणांचं प्रतिबिंब भाषेत पडतं, ते असं!)

…तर या साऱ्या वातावरणाची – विशेषत: तरुण जनरेशन ‘एक्स’च्या मानसिकतेची नस ‘फ्रेंड्स’ मालिकेने अचूक पकडली. न्यू यॉर्क शहरात एकत्र आलेले, विशीच्या घरातले हे सहा मित्रमैत्रिणी. कुटुंबापासून दूर राहत, चुकतमाकत आयुष्याचे वेगवेगळे धडे गिरवताना – मग ते नोकरीधंद्यातले असोत वा वैयक्तिक नातेसंबंधांतले – असणारी एकमेकांची सोबत ही दुसऱ्या विस्तारित कुटुंबासारखीच. त्यातल्या पात्रांची ओळख वा त्यांच्या व्यक्तिरेखांचा पुढील दहा वर्षांतला प्रवास, कथानकाचा बदलत गेलेला विस्तार आणि प्रासंगिक विनोदाची उदाहरणं या गोष्टींबद्दल नव्याने शब्द खर्ची घालण्याची काहीच आवश्यकता नाही – आधी केबल टीव्हीमुळे आणि नंतर ‘नेटफ्लिक्स’सारख्या माध्यमांमुळे ‘फ्रेंड्स’ मालिका भाषेची आणि संस्कृतीची बंधनं ओलांडून अनेक देशांत पोचली आहे.

हेही वाचा >>> डेटाखोरीचे जग…

याचा अर्थ या मालिकेत त्रुटी नाहीत, असा नाही – आणि त्या नोंदण्यासाठी विचक्षण समीक्षक असणंही गरजेचं नाही. न्यू यॉर्कसारख्या अठरापगड वस्तीच्या शहरातही प्रमुख व्यक्तिरेखा झाडून श्वेतवर्णीय आहेत. त्यांना या महागड्या ठिकाणी प्रशस्त अपार्टमेंटमध्ये राहणं परवडतं, इतकंच नव्हे – तर त्यासाठी फार कामही करावं लागत नाही. मोनिकाचं घर असो वा ‘सेंट्रल पर्क’ हा हक्काने पडीक असण्याचं ठिकाण असलेला कॅफे – तिथल्या भिंतींचा, कॉफीच्या भल्यामोठ्या मगांचा वा फर्निचरचा (नारिंगी काऊच!) भडक, तजेलदार रंग आणि नैसर्गिक वाटावी अशी प्रकाशयोजना यांमुळे सतत एक उत्साही मूड मालिकेला व्यापून राहतो. सारे एकजात देखणे आणि उत्तम विनोदबुद्धी असलेले आहेत.

‘साईनफेल्ड’मधल्या व्यक्तिरेखांच्या तऱ्हेवाईक वैशिष्ट्यांमुळे जो खास विनोद निर्माण होतो, तसा विनोद या तुलनेने अधिक मुख्य प्रवाहातल्या, बेतशुद्ध पात्रांमुळे ‘फ्रेंड्स’मध्ये आढळत नाही – हमखास विनोदनिर्मितीसाठी योजलेले काही ठरावीक साचे ओळखू येतात. त्यांच्या आयुष्यात समस्या येतात, त्याही हलक्याफुलक्या रीतीने आणि त्यांचं निराकरणही बव्हंशी वीसेक मिनिटांच्या भागांत होऊन जातं. (चॅण्डलरची सदाबहार भूमिका वठवणाऱ्या मॅथ्यू पेरी या अभिनेत्याच्या प्रत्यक्ष आयुष्यातल्या दुर्दैवी घटना पाहता, हा विरोधाभास अधिक ठळकपणे जाणवतो). कथानकात व्यामिश्रता वा व्यापक सामाजिक आशय फारसा डोकावत नाही (११ सप्टेंबरला न्यू यॉर्कवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचीही दखल मालिकेत थेट न येता, सूचकपणे डोकावून जाते). ‘स्व’च्या शोधात गुंतलेल्या तरुण पिढीची ही प्रातिनिधिक कहाणी एका ढोबळ पातळीवर आहे खरी, पण ती सुबक-आक्रमक अमेरिकन मार्केटिंगच्या प्रक्रियेतून तावून-सुलाखून चकचकीत वेष्टनात आपल्यासमोर येते.

‘फ्रें ड्स’च्या काळाच्या तुलनेत (१९९४-२००४) आज पाहिलं, तर करमणुकीसाठी किती तरी नवीन आणि सुलभ पर्याय हात जोडून समोर उभे आहेत. जुने-नवे चित्रपट, अक्षरश: लक्षावधी ईबुक्स आणि ऑडिओबुक्स, क्लिकसरशी उपलब्ध असलेला सर्व प्रकारच्या संगीताचा खजिना, इन्स्टाग्राम-फेसबुक-व्हॉट्सअॅपवरची रील्स, ओटीटीवरच्या मालिका हे सारं अगदी हाताशी उपलब्ध आहे. व्हर्च्युअल रिअॅलिटीसारख्या तंत्रज्ञानामुळे व्हिडीओ आणि संगणकीय गेम्स कमालीचे वास्तववादी वाटू लागले आहेत. संख्येसोबतच दर्जाच्या दृष्टीने पाहिलं तर चित्रपटांच्या आणि मालिकांच्या विषयांचं वैविध्य, कथानकांचा आणि व्यक्तिरेखांचा पट, संगीतयोजना, चित्रीकरणाचा स्तर गेल्या काही वर्षांत कमालीचा उंचावला आहे. गेल्या वीसेक वर्षांत लोकप्रियतेची पावती मिळालेल्या अन्य अमेरिकन मालिकांच्या यादीवर नजर टाकली तर हे म्हणणं सहज पटावं! (वानगीदाखल पाहा – ‘ब्रेकिंग बॅड’, ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘सक्सेशन’, ‘हाऊस ऑफ कार्ड्स’, ‘ऑरेंज इज द न्यू ब्लॅक’, ‘मार्व्हलस मिसेस मेझल’, ‘द बेअर’, इ.) मात्र त्याचबरोबर जगणंही अधिक गुंतागुंतीचं झालेलं आहे. आजच्या अमेरिकेत जन्मलेल्या जनरेशन ‘झी’ला (जन्मसाल : १९९६ ते २०१२) ‘फ्रें ड्स’मधील पात्रांच्या तुलनेत करिअरसाठी म्हणा वा वैयक्तिक नातेसंबंधांसाठी म्हणा – ढोबळमानाने अधिक पर्याय आणि अधिक अवकाश उपलब्ध आहे, पण त्याचसोबत त्यांच्यासमोरच्या प्रश्नांची जटिलताही किती तरी अधिक आहे. वाढती स्पर्धा, नोकरीतला तणाव आणि अनिश्चितता, कृत्रिम प्रज्ञेसारख्या नवीन तंत्रज्ञानांमुळे वाढलेला बदलांचा भोवंडून टाकणारा वेग या साऱ्या गोष्टींमुळे गेल्या पिढीत, तरुण श्वेतवर्णीय अमेरिकन पुरुषाला अढळ वाटणारं शीर्षस्थान काहीसं डळमळीत भासू लागलेलं आहे. राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्याही त्याचे पडसाद पडलेले सहज दिसून येतात आणि आजच्या गुंतागुंतीच्या, बहुपर्यायी जगापेक्षा ठळक वर्गीकरण आणि ठरावीक अपेक्षा असणारं एके काळचं जग मग अधिक बरं वाटू लागतं.

आजच्या तरुण पिढीतही टिकून असलेल्या ‘फ्रें ड्स’च्या लोकप्रियतेत या नेटक्या नॉस्टॅल्जियाचा आणि इतक्या वर्षांच्या ओघात परिचित झालेले संवाद, व्यक्तिरेखांच्या लकबी आणि नर्मविनोद यांचा मोठा वाटा नक्कीच आहे. डोक्याला ताप न देणाऱ्या करमणुकीतून मिळणाऱ्या विरंगुळ्याकडे पाहून नाकं मुरडण्यात काहीच हशील नाही. मात्र, ते या मालिकेच्या दीर्घायुषी यशाचं एकमेव कारण नव्हे. (‘फ्रें ड्स’च्या अनेक भाषांत कैक भ्रष्ट आवृत्त्या निघाल्या, पण त्यातली लक्षात राहण्याजोगी नावं मोजकीच.) आज कॅफेत जेव्हा चार मित्र एकत्र येतात; तेव्हा भेटल्यानंतर दहा मिनिटांच्या आत जो तो आपापल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनमध्ये गुंगून जातो – अशा वेळी, ‘सेंट्रल पर्क’मध्ये बसून मनसोक्त गप्पा मारणाऱ्या, सुखदु:खांच्या गोष्टींची देवाणघेवाण करणाऱ्या मैत्रीचं चित्रण हवंहवंसं वाटणारं. आपल्या व्यक्तिमत्त्वाला काहीएक आकार येत असताना, जगण्यातला एक टप्पा संपून दुसऱ्याची चाहूल लागत असताना जे मैत्र ‘यथा काष्ठं च काष्ठं च’ न्यायाने आपल्यासोबत असतात, त्यांचं महत्त्व काही काळानंतर आपल्याला उमजतं- तो पडताळा पुनश्च करून देणारी ही मालिका (तिच्या मर्यादांसह) आजच्या तरुण पिढीलाही आपलीशी वाटली तर त्यात नवल नाही.

nandan27@gmail.com

(लेखक पेशाने दूरसंचार (टेलिकॉम) अभियंता असून गेली एकवीस वर्ष सॅन डिएगो, कॅलिफोर्निया येथे वास्तव्यास. साहित्य, भाषा, राज्यशास्त्र यांची आवड. तसेच मराठी ब्लॉगविश्वातील लोकप्रिय नाव.)

Story img Loader