आनंद हर्डीकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अफगाणिस्तान हा भारतीय उपखंडातील एक महत्त्वाचा देश. असंख्य समस्यांनी ग्रासलेला. राजेशाहीपासून साम्यवादी एकाधिकारशाहीपर्यंत सर्व प्रकारच्या राजवटींचे दशावतार पाहिलेला. या ना त्या कारणाने गेली तीन ते चार दशके सतत आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत राहिलेला.
अशा या देशातून सोव्हिएत आक्रमक फौजेला परतवून लावण्याच्या इराद्याने उभी राहिलेली कट्टर मुजाहिदीनांची संघटना- ‘तालिबान’! इस्लाममधील ‘जिहाद’च्या संकल्पनेची झिंग चढलेल्या या फौजेला अमेरिकेने पोसले नसते तरच नवल मानावे लागले असते. रशियन कैद्यांच्या शरीराची सालडी ते जिवंत असताना सोलणाऱ्या आणि त्या सैनिकांच्या आक्रोशात आसुरी आनंद मानणाऱ्या या तालिबान्यांना एके काळी अमेरिकेने गौरवलेदेखील. तथापि, एकदा सोव्हिएत फौजा माघारी परतल्यानंतर या मुजाहिदीनांना जाणीव झाली ती अमेरिका तिच्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या रक्षणाच्या नावाखाली अफगाणिस्तानात करत असलेल्या घुसखोरीची. मग ते अमेरिकेच्या साम्राज्यवादाविरुद्धही त्याच त्वेषाने लढू लागले. अमेरिकेने लष्कर पाठवून आणि आपल्या मर्जीनुसार राज्य चालवायला तयार असणाऱ्या नेत्यांना सत्तास्थानांवर बसवून तालिबानचे आव्हान मोडून काढायचा बरीच वर्षे प्रयत्न केला, पण तो सपशेल फसला. त्या देशातून बाहेर कसे पडायचे, हा अमेरिकी प्रशासनाला भेडसावणारा एक मुख्य प्रश्न आहे. अफगाणिस्तानच्या ७० टक्के प्रदेशावर तालिबानची हुकमत तरी आहे किंवा धोक्याचे सावट तरी आहे.
अशी ही संघटना, तिची ध्येयधोरणे, तिची अंतर्गत रचना आणि सत्तासंघर्षांबद्दल आपल्याला पुरेशी माहितीच नसते. विशेषत: पाकिस्तानबरोबर या संघटनेचे नेमके संबंध कसे आहेत, याबद्दल भले भले राजकीय नेतेही अंधारात चाचपडताना दिसतात. त्या दृष्टीने अब्दुल सलाम झैफ या तालिबानी राजनैतिक अधिकाऱ्याचे आत्मकथन- ‘माझे तालिबानी दिवस!’ हे अनुवादित स्वरूपात का होईना, मराठी वाचकांना आता उपलब्ध झाले आहे. ‘माय लाइफ विथ द तालिबान’ हे मूळ इंग्रजी पुस्तक २०१० सालीच प्रसिद्ध झाले होते आणि चर्चेतही होते. डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी त्या पुस्तकाचा केलेला अनुवाद काहीसा विलंबाने का होईना प्रसिद्ध झाला, हेही नसे थोडके!
पुस्तकाच्या प्रारंभीच झैफची अवघ्या सात ओळींची, परंतु ‘स्वातंत्र्य’ आणि ‘लोकशाही’ या दोन मूल्यांच्या व्यावहारिक आविष्कारातील प्रचंड अंतर्विरोधांवर अत्यंत तीव्र, बोचरी टीका करणारी कविता वाचायला मिळते. ग्वान्टानामो तुरुंगात असताना झैफने लिहिलेल्या या कवितेचा प्रमोद जोगळेकरांनी केलेला उत्कृष्ट भावानुवाद झैफबद्दल आस्था निर्माण करतो.
पुढे मूळ पुस्तकाच्या संपादकांनी लिहिलेला प्रदीर्घ परिचयपर लेख आहे. त्यात झैफचे कंदहार शहराशी, त्या शहराचे अफगाण इतिहासाशी, त्या शहरात जन्मलेल्या तालिबान चळवळीच्या मूळच्या व नंतर बदलत गेलेल्या स्वरूपाचे त्या अभागी देशातल्या रक्तरंजित संघर्षांशी असणारे जवळचे नाते उलगडून सांगितले आहे. त्यापाठोपाठ असलेली पुस्तकातील पात्रांची यादी वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यानंतर न्यू यॉर्क विद्यापीठातील ‘आंतरराष्ट्रीय सहकार्य केंद्रा’तील एक तज्ज्ञ बार्नेट रुबिन यांची प्रस्तावना थोडक्यात झैफच्या या आत्मकथनाचे महत्त्व स्पष्ट करते. पाठोपाठ वाचायला मिळते खुद्द झैफची भूमिका. या नऊ पानी निवेदनात ज्या चार कारणांसाठी तो हे आत्मकथन लिहायला तयार झाला, त्या कारणांचे स्पष्टीकरण मिळते.
शेवटचे अनुवादकाचे छोटेसे मनोगतही महत्त्वाचे आहे. ते अशासाठी, की पुस्तकभर विखुरलेल्या असंख्य संपादकीय टिपांबद्दलचा त्यांचा दावा आणि ‘पुस्तक अद्ययावत करण्यासाठी स्वतंत्र वाचन करून पुस्तकात आवश्यक तेथे छोटे बदल केले आहेत’ असे त्यांनी केलेले विधान! अनुवादकाने परस्पर मूळ लेखक-संपादकांच्या अनुमतीशिवाय असे बदल करणे कितपत योग्य, हा मुद्दा महत्त्वाचा आहेच. परंतु डॉ. प्रमोद जोगळेकरांनी कोणत्या टिपा स्वत:च दिल्या आहेत आणि पुस्तक अद्ययावत करण्याच्या नावाखाली कोणते बदल केले आहेत, हे कुठेही स्पष्ट न केल्याने जाणकार वाचक बुचकळय़ात पडतो, हे जास्त दखलपात्र!
प्रत्यक्ष पुस्तक सुरू होण्यापूर्वी (आणि नंतर प्रत्यक्ष पुस्तकातही आणखी दोन ठिकाणी, पृष्ठ क्र. २१ व ३१ वर) अफगाणिस्तानबद्दलचे चार महत्त्वाचे नकाशे दिले आहेत. परंतु त्यांचे आवश्यक ते मराठीकरण न करताच आणि त्या नकाशांतली स्थाने, शहरे वा प्रांत दर्शवणारे शब्द इतक्या बारीक अक्षरांत छापले आहेत, की असे नकाशे पुस्तकात समाविष्ट करण्यामागचा मूळ लेखकाचा व संपादकांचा हेतूच विफल झाला आहे.
यापुढील मुख्य पुस्तकाच्या २२ प्रकरणांमध्ये झैफने अफगाणिस्तानातील संघर्षांचे असंख्य कंगोरे उलगडून दाखवले आहेत. त्या निवेदनात त्याच्या वैयक्तिक जीवनाचे उभे-आडवे धागे असे विणले गेले आहेत, की हे पुस्तक एकाच वेळी दोन स्तरांवरील घटनाचक्राचे बहुमिती चित्रण करते आहे असे आपल्याला जाणवते. आपण त्यात अधिकाधिक गुंतत जातो. असंख्य प्रसंगांतले थरारनाटय़ पोहचवण्यात अनुवादक चांगलेच यशस्वी झाले आहेत. प्रत्येक पानावरील मजकुराशी संबंधित संपादकीय टिपा त्याच पानावर तळटिपांच्या स्वरूपात वाचायला मिळत असल्यानेही वाचकांची बरीच सोय झाली आहे.
अफगाणिस्तानच्या भू-सामरिक महत्त्वामुळे गेली कित्येक दशके तो देश बडय़ा देशांच्या सत्तासंघर्षांत तर पिसला गेला आहेच; परंतु प्रत्येक सत्तांतरानंतर सत्ताधारी अफगाण नेत्यांच्या विरोधात काही अफगाण नेते उभे राहिलेच आहेत. या अंतर्गत यादवीमुळे त्या देशात निर्माण झालेली विदारक स्थिती पुस्तकभर एखाद्या पाश्र्वभूमीप्रमाणे सतत आपल्याला जाणवत राहते. अफगाणिस्तानातील परस्पर विरोधी गटांपैकी कुणाला तरी हाताशी धरून आपापले राष्ट्रीय स्वार्थाचे घोडे पुढे दामटू पाहणारे अन्य देशांचे नेते झैफच्या संतापाचे लक्ष्य बनावेत यात नवल नाही. परंतु पाकिस्तानचे लष्करशाह जनरल मुशर्रफ यांच्याबद्दल झैफने या पुस्तकात लिहिले आहे, ते अत्यंत महत्त्वाचे आहे. झैफ पाकिस्तानमध्ये तालिबानचा वकील म्हणून काम करत होता, तेव्हा त्याची मुशर्रफ यांच्याशी एकूण चार वेळा भेट झाली होती. त्या चारही भेटींचे अगदी थोडक्यात वर्णन करून झाल्यावर झैफने अवघ्या एका परिच्छेदात मुशर्रफ यांच्या हिडीस राजवटीबद्दल जी आगपाखड केली आहे, ती मुळातूनच वाचण्याजोगी आहे. ‘पाकिस्तान बीफोर एव्हरीथिंग’ या आत्मकथनपर पुस्तकात मुशर्रफ यांनी तालिबान्यांना व इतरही काही मुसलमानांना आपण कसे निर्दयपणाने वागवले, याची कबुली दिली होती. मुशर्रफ यांनी पैशाच्या मोबदल्यात अनेक अफगाण मुजाहिदीनांना अमेरिकेला विकले होते. ते लोक ग्वान्टानामोत खितपत पडले होते. त्या यमयातना भोगाव्या लागलेल्या अफगाणी कैद्यांमध्ये खुद्द अब्दुल झैफचाही समावेश होता आणि तब्बल चार वर्षांच्या तशा तुरुंगवासातून काही मित्रांच्या प्रयत्नांमुळे २००५ साली तो सुटला.
हा संदर्भ लक्षात घेतला म्हणजे २०१० साली लिहिलेल्या या आत्मकथनात झैफने ‘मुशर्रफ म्हणजे पाकिस्तानच्या इतिहासाला लागलेला काळा डाग आहे’ असे म्हटल्याबद्दल मुळीच आश्चर्य वाटत नाही. मुशर्रफना ‘इस्लामशी गद्दारी करणारा ढोंगी, क्रूर नेता’ असे म्हणणारा झैफ अमेरिकेवरील विध्वंसक हल्ल्याबद्दल चुकूनही पश्चात्ताप व्यक्त करत नाही, हेही लक्षात घेण्याजोगे आहे. इस्लामचा नारा देत पुढे सरसावणारे सर्व जण एकाच झेंडय़ाखाली एकत्र उभे ठाकत नाहीत. त्या झुंडीत अनेक जण आपापले स्वतंत्र झेंडे मिरवत पुढे घुसण्याच्या प्रयत्नात असतात, हे वास्तव झैफच्या आत्मकथनामुळेही पुन्हा प्रकर्षांने पुढे येते.
असे अनेक मुद्दे विचारासाठी समोर येत जातात आणि तालिबान हे प्रकरण कसे आणि का जगावेगळे आहे, हे हळूहळू समजू लागते. हे या आत्मकथनाचे यश आहे. पुस्तक वाचून संपवण्यापूर्वी २००९ पर्यंतचा कालक्रम सहा पानांत दिलेला आढळतो. मात्र, पाचव्या पानावर दोन आणि सहाव्या पानावर तीन वर्षांमधील घटना अगदी संक्षेपाने उल्लेखिण्यातले औचित्य लक्षात येत नाही. हमीद करझाई सरकारने घरीदारी संरक्षक कवच पुरवलेले असूनही २०१२ मध्ये झैफ ‘अमेरिकी फौजांच्या धाडीत आपण मारले जाऊ’ या भीतिपोटी मायदेश सोडून अरब अमिरातीच्या आश्रयाला का गेला, याबद्दलचा खुलासा करणारे आणि ‘आजचा अफगाणिस्तान’ या शेवटच्या प्रकरणाला २०१६-१७ पर्यंत आणून पोहचवणारे एखादे टिपण शेवटी जोडणे आवश्यक होते. निदान कालक्रम तरी त्या वर्षांपर्यंतचा द्यायला हवा होता, असे वाटते.
‘माझे तालिबानी दिवस!’- अब्दुल सलाम झैफ, अनुवाद – डॉ. प्रमोद जोगळेकर,
मेहता पब्लिशिंग हाऊस,
पृष्ठे – ३०२+ ५०, मूल्य – ३६० रुपये