रघुनंदन गोखले
तोंडावर लगाम नसणारा, पत्रकारांना भरपूर बातमीखाद्य पुरवणारा पोरगेलेसा बुद्धिबळपटू बॉबी जगज्जेतेपदासाठी निवडला गेला आणि जागतिक संघटनेनं त्याला वयाच्या १५ व्या वर्षीच ग्रँडमास्टर हा किताब देऊ केला. १९० बुद्धय़ांक असलेल्या या मुलाला शाळेत शिकण्यासारखे काही आहे, असे वाटतच नव्हते. थेट जगज्जेतेपदासाठीच्या स्पर्धावर बहिष्कार टाकण्याचे पाऊल उचलणाऱ्या या अवलियाच्या विचित्र चरित्रनाटय़ाचा दुसरा अंक..
मागच्या लेखात आपण पाहिलं की, मॉस्कोच्या सेंट्रल चेस क्लबमध्ये धमाल करून बॉबीनं सोव्हियत संघराज्याच्या अधिकाऱ्यांना गांगरवून टाकलं होतं. मॉस्कोमध्ये येऊन त्यांच्या तोंडावर त्यांना ‘रशियन डुक्कर’ म्हणणारा पहिल्यांदाच भेटला असेल. तोही अमेरिकन आणि अल्पवयीन! युगोस्लाव्ह अधिकारी मध्ये पडले नसते तर मोठा राजनैतिक प्रसंग उद्भवला असता. पोटरेरोमधील इंटर झोनल स्पर्धेत अमेरिकन बुद्धिबळ संघटनेनं बॉबीच्या मदतीला (की त्यानं जास्त काही राजनैतिक गडबडी करू नयेत म्हणून) विल्यम लोम्बार्डी याला पाठवलं होतं. लोम्बार्डी बॉबी फिशरचा जवळजवळ समवयीन होता आणि नंतर (बॉबीच्या सहवासात शांत आणि संयमी राहण्याच्या तालिमीमुळे!) चर्चमध्ये पाद्री झाला. १९७२ साली स्पास्कीवरील जगज्जेतेपदाच्या स्पर्धेदरम्यानही लोम्बार्डी बॉबीचा सहाय्यक होता.
फटकळतेचं दर्शन
बॉबीच्या तोंडाला लगाम नव्हता, त्यामुळे तो पत्रकारांचा लाडका होता. नेहमी पत्रकारांना काहीना काही मालमसाला पुरवण्यात बॉबी पुढे असे; मात्र स्पर्धेच्या मध्ये तो काहीही बोलत नसे. स्पर्धेआधी त्याला विचारण्यात आलं की, तू जगज्जेतेपदाच्या पुढच्या पायरीवर जाशील का? त्यावर तो म्हणाला होता, त्याला खात्रीच आहे की त्याला काहीही अडचण येणार नाही. पत्रकारांनी त्याला विचारलं, ‘‘असं कसं म्हणतोस?’’ त्यावरच्या बॉबीच्या उत्तरानं पोटरेरोचं शांत वातावरण ढवळून निघालं होतं. बॉबी म्हणाला होता, ‘‘येथे काही चांगले ग्रॅण्डमास्टर्स आहेत, त्यांच्याशी मी बरोबरी करीन. पण येथे अर्धा डझन बकरे आहेत, त्यांना मी कच्चं खाईन. मग झालो की मी वरच्या स्पर्धेसाठी पात्र!’’ त्याच्या या अशा वक्तव्यामुळे एकमेकांविषयी (वरकरणी तरी) अदबीनं बोलणाऱ्या बुद्धिबळ खेळाडूंमध्ये खळबळ नाही उडाली तरच नवल.
हेही वाचा >>> चौसष्ट घरांच्या गोष्टी: विक्षिप्त ‘कळा’वंत..
माजी आव्हानवीर डेव्हीड ब्रॉन्स्टाइन एक लेखक म्हणून आणि एक चांगला माणूस म्हणून प्रसिद्ध होता. त्यानं बॉबीविषयी पोटरेरोहून काही मार्मिक टिप्पण्या केल्या होत्या. ‘‘या मुलाला पाहिलं की हा इतका सुंदर कसा खेळू शकतो हेच कळत नाही. पण नंतर लक्षात येतं की आपण एका अतिशय प्रतिभावान बुद्धिबळपटूला बघत आहोत.’’ बॉबी जगज्जेतेपदासाठी निवडला गेला आणि जागतिक संघटनेनं त्याला वयाच्या १५ व्या वर्षीच ग्रँडमास्टर हा किताब देऊ केला.
शाळेला रामराम
पोटरेरोपर्यंत बॉबी फिशर हा सरळसाधे कपडे घालायचा. साधी पॅण्ट आणि त्यावर स्वेटर असा त्याचा पोशाख असायचा. पण पाल बेन्को या हंगेरियन/ अमेरिकन ग्रॅण्डमास्टरला बघून त्यानंही महागडे सूट वापरण्यास सुरुवात केली. अमेरिकेत परत आल्यावर १९० बुद्धय़ांक
(I Q) असणाऱ्या बॉबीनं पहिली गोष्ट काय केली असेल तर शाळेला रामराम ठोकला. ‘त्यांच्याकडे मला शिकवण्यासारखे काहीही नाही,’ असं कारण त्यानं दिलं आणि तेही खरं होतं म्हणा. कारण त्याला ध्यास होता तो फक्त बुद्धिबळाचा! बुद्धिबळाचं चांगलं साहित्य रशियन भाषेत आहे आणि त्यांना हरवायचं असेल तर आपल्याला त्यांची भाषा शिकली पाहिजे असं त्याचं मत होतं. त्यानं रशियन भोषेपाठोपाठ अनेक भाषाही शिकायला सुरुवात केली.
मिखाइल ताल या जगज्जेत्यानं बॉबीच्या बुद्धिबळ अभ्यासाविषयी एक गोष्ट सांगितली आहे. त्यानं विचारलं, ‘‘बॉबी, तुझं सोव्हियत महिला विजेत्या लारिसा वोल्पर्टच्या खेळाविषयी काय मत आहे?’’ तालला वाटलं होतं की बॉबी म्हणेल, ‘‘ही कोण?’’ पण बॉबी म्हणाला, ‘‘लारिसा अतिसावध खेळते. त्यापेक्षा मला लेनिनग्राड विजेत्या डिमीट्रीयवाचा खेळ आवडतो.’’ आता तालला आश्चर्याचा धक्का बसला. या मुलाला सोव्हियत महिलांचे डाव बघायला वेळ कुठून मिळतो तेच त्याला कळेना! तालला कल्पना नव्हती की केवळ मॉस्कोवरून प्रसारित नव्हे तर रशियन भाषेतील सर्व बुद्धिबळ मासिके/ साप्ताहिके बॉबी कोळून पितो.
बुद्धिबळ प्रेम
१९६० साली पूर्व जर्मनीमधील लिपझिग या गावी ऑलिम्पियाड झालं. अमेरिकन चेस फाऊंडेशन या संस्थेचा अमेरिकन बुद्धिबळावर ताबा होता. रेजिना फिशरला असं वाटलं की, सॅम रेशेव्हस्कीला फाऊंडेशन सर्व मदत करते, पण आपल्या मुलाला नाही. त्यावेळी आपल्या मुलासाठी बॉबीच्या आईनं व्हाईट हाऊससमोर पाच तास धरणं धरलं होतं. लिपझिगला बॉबी पहिल्या पटावर खेळला. अमेरिकन संघाला रौप्य पदक मिळालं तर बॉबीला वैयक्तिक कांस्य!
हेही वाचा >>> चौसष्ट घरांच्या गोष्टी : बुद्धिबळ पर्यटन..
१९६६ च्या हॅवाना ऑलिम्पियाडमध्ये एक असा प्रसंग घडला- ज्यामुळे सगळ्या बुद्धिबळ जगाला बॉबीच्या बुद्धिबळ प्रेमाची साक्ष पटली. अखेरची फेरी सुरू होती. पहिल्या पटावर खेळणाऱ्या बॉबीला फक्त बरोबरीची गरज होती. तिकडे सोव्हियत संघात जगज्जेता टायग्रेन पेट्रोस्यान सोप्या प्रतिस्पर्ध्याशी खेळूनही बॉबीच्या थोडाच मागे होता. रुमानियाचा युवा ग्रँडमास्टर फ्लोरियन घिओरक्यूनं पटावर चांगली खेळी करून बरोबरीचा प्रस्ताव पुढे केला. बरोबरी झाली की बॉबीचं सुवर्ण नक्की होतं, पण बॉबी म्हणाला, ‘‘अजून खूप खेळ शिल्लक आहे. खेळू या.’’ तरुण फ्लोरियननं संधीचा फायदा घेऊन डाव जिंकला आणि बॉबीचं सुवर्णपदक हुकलं. त्याबद्दल नंतर बॉबीला विचारलं असता तो म्हणाला, ‘‘सुरुवातीला बरोबरी घेणं योग्य नाही म्हणून मी खेळलो.’’ सुवर्णपदक हुकल्याचं दु:ख त्याला नव्हतं, याचं कारण त्याचं खेळावरचं प्रेम!
अन्य स्पर्धामध्ये चमक
जागतिक पातळीच्या कँडिडेट स्पर्धेत बॉबीचा पाडाव झाल्यामुळं त्यानं आता इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धावर लक्ष केंद्रित केलं. १९६० साली त्यानं अर्जेन्टिनामधील मार डेल प्लाता या गावी झालेल्या मोठय़ा स्पर्धेत भाग घेतला. बोरिस स्पास्की, स्वत: बॉबी, डेविड ब्रॉन्स्टाईन आणि आइसलँडचा ग्रँडमास्टर फ्रेडरिक ओलाफसन- जो पुढे जागतिक संघटनेचा अध्यक्ष झाला – वगळता इतकं खास कोणी नव्हतं. बॉबी आपला डाव स्पास्कीशी हरला, पण त्यानं बाकीच्यांना भरपूर चोप देऊन अखेर १५ पैकी १३.५ गुण मिळवले आणि बोरिस स्पास्कीबरोबर संयुक्त पहिला क्रमांक मिळवला. बॉबीच्या लहरीपणाचा फटका अमेरिकेतील बुद्धिबळ आयोजकांनाही बसला आहे. १९६१ मध्ये अमेरिकेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरवण्यासाठी बॉबी आणि त्याच्यापेक्षा ३२ वर्षांनी मोठा सॅम्युअल रेशेव्हस्की यांच्यामध्ये एक १६ डावांचा सामना ठरवण्यात आला. १३ डावांनंतर बॉबी ७.५ – ५.५ असा आघाडीवर असताना त्याचं आयोजकांशी भांडण झालं आणि तो सामना सोडून निघून गेला. रेशेव्हस्कीला अनपेक्षितपणे विजयी घोषित करण्यात आलं आणि त्याला विजयी वीराचं बक्षीस देण्यात आलं. पुन्हा कोणीही अमेरिकन आयोजकानं बॉबीचा सामना ठेवण्याची हिंमत केली नाही. आता वेळ आली होती १९६२ च्या आंतर झोनल स्पर्धेची! ही स्पर्धा स्टॉकहोम येथे होणार होती.
जगज्जेतेपदाच्या स्पर्धावर बहिष्कार
बॉबी १९५८ च्या पोटरेरो आंतर झोनल स्पर्धेत ६ वा आला होता. १९५८ आणि १९६२ मध्ये पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं. बॉबीनं आपला खेळ खूपच उंचावला होता. त्याची झलक संपूर्ण जगाला स्टॉकहोम येथे आली. विजयाचा धडाका लावून बॉबीनं २२ फेऱ्यांत १७.५ गुण घेत ती स्पर्धा तब्बल २.५ गुणांच्या फरकानं जिंकली. आता कुराकाओ येथे होणाऱ्या कॅन्डिडेट्स स्पर्धेत बॉबी जिंकून मिखाईल बोटिवनीकचा आव्हानवीर बनणार यात कोणालाही शंका नव्हती. पण झालं भलतंच. आठ जणांच्या या स्पर्धेत बॉबी चौथा आला. टायग्रान पेट्रोस्याननं पहिला क्रमांक पटकावत बोटिवनीकचा आव्हानवीर बनण्याचा मान मिळवला. आता मात्र बॉबी संतापला होता. त्याच्या मते, त्याच्याविरुद्ध सोव्हियत संघराज्यानं हा कट केला होता. सोव्हियत खेळाडू एकमेकांशी पटापट बरोबरी घेऊन आपली सर्व ऊर्जा राखून ठेवत असत आणि बॉबीच्या विरुद्ध वापरत असत. पुढे जाऊन बॉबी म्हणाला की, यापुढे मी जगज्जेतेपदाच्या स्पर्धाच खेळणार नाही.
जगभर याची प्रतिक्रिया उमटली आणि जागतिक संघटनेला नियमात बदल करावा लागला. यापुढे कॅन्डीडेट स्पर्धा या डायरेक्ट सामन्यांद्वारे घेण्याचं ठरलं. तरीही बॉबी पुढची अनेक वर्षे जगज्जेतेपदापासून दूर राहिला. कोणीतरी त्याच वेळी म्हटलं होतं, बॉबी हा स्वत:च जगज्जेतेपद आणि बॉबी यामधला अडथळा आहे. पण बॉबी इतर स्पर्धा खेळून स्वत:चं वर्चस्व सिद्ध करत होताच.
अमेरिकन स्पर्धामध्ये वर्चस्व
१९६३ साली पीआटीगोस्र्की चषक स्पर्धा लॉस अँजेलिस येथे झाली. प्रथमच टायग्रेन पेट्रोस्यानच्या रूपानं जगज्जेता अमेरिकन भूमीवर खेळणार होता. रेशेवस्की विरुद्धच्या सामन्यापासून बॉबीचा त्या आयोजकांवर राग होताच. त्यानं फक्त खेळण्यासाठी २००० डॉलरची मागणी केली. पहिलं बक्षीस ३००० डॉलर असताना बॉबीला इतकी रक्कम देण्यास नकार देण्यात आला. मग बॉबीनं मिशिगन राज्यात जाऊन वेस्टर्न ओपन स्पर्धा जिंकली. मग न्यू यॉर्क राज्याचं अजिंक्यपदही ७ पैकी ७ गुण घेऊन जिंकले. त्यानंतर बॉबी फिशर अमेरिकन अजिंक्यपद जिंकला ते ११ पैकी ११ गुण घेऊन. अखेरच्या फेरीत बॉबी होता १० पैकी १० गुणांसह आघाडीवर. त्याचा प्रतिस्पर्धी अँथोनी सैदी आपली चाल खेळून हिंडत असताना त्याला ग्रँडमास्टर लॅरी इव्हान्स भेटला. सैदीची परिस्थिती छान होती. त्यामुळे इव्हान्स त्याला म्हणाला, ‘‘बॉबीला दाखवून दे की आम्ही काही पाळण्यातील बाळं नाहीत.’’ पण दुर्दैवानं एक चुकीची खेळी सैदीच्या पराभवाला कारणीभूत ठरली आणि बॉबी ११/११ गुणांसह विजेता ठरला. तालनं आपल्या सदरात लिहिलं, ‘प्रदर्शनीय सामना जिंकल्याबद्दल बॉबीचं अभिनंदन!’ मात्र बेन्ट लार्सन म्हणाला, ‘यात काय मोठं? सगळे नवखेच तर होते.’
हेही वाचा >>> चौसष्ट घरांच्या गोष्टी : सुसानची पालकनीती
त्यानंतर १९६६/६७ सालचं अमेरिकन अजिंक्यपद जिंकून बॉबी इंटर झोनल स्पर्धेसाठी टय़ुनिशियाकडे रवाना झाला. तिथंही बॉबीनं सुरुवातीलाच विजयाचा धमाका लावून मोठी आघाडी मिळवली. दहा फेऱ्यांत बॉबी फिशर ८.५ गुणांसह आघाडीवर होता. आता बॉबीनं पुढे जास्त काही केलं नाही तरी तो जगज्जेतेपदासाठी पात्र ठरणार अशीच सर्वाची अटकळ होती. पण बॉबीचा चमत्कारिक आणि हट्टी स्वभाव मधे आला आणि बॉबी भांडण करून स्पर्धेतून बाहेर पडला. असं झालं कसं? याविषयी पुढल्या भागात.
क्रमश:gokhale.chess@gmail.com