नरेंद्र भिडे narendra@narendrabhide.com
हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध वादक आणि आणि अतिशय विद्वान संगीत संयोजक केरसी लॉर्ड यांनी एका मराठी संगीततज्ज्ञ मित्राशी संपर्क साधला. ते म्हणाले की, ‘मला एका गाण्याकरता एक विशिष्ट इफेक्ट हवा आहे आणि तो इलेक्ट्रॉनिक पद्धतीने Oscillators चा वापर करून आपल्याला काढायला लागेल.’ ‘परिचय’ या चित्रपटातील ‘सारे के सारे’ या प्रसिद्ध गीताकरीता या ध्वनीचा वापर केला गेला. केरसी लॉर्ड यांचा हा मराठमोळा मित्र होता प्रसिद्ध संगीतकार दत्ता डावजेकर. त्यांच्यामध्ये ही इलेक्ट्रॉनिक्सची आवड कुठून निर्माण झाली हे एक आश्चर्यच आहे. पण डावजेकर यांची एकूण संगीत कारकीर्द बघितली की आपल्याला त्यात काहीच नवल वाटणार नाही. कारण अशा आव्हानात्मक गोष्टी करून पाहणे आणि त्या यशस्वी करून दाखवणे याचे अनेक दाखले त्यांच्या रचनांमधून आपल्याला पदोपदी आढळतात. तोच डावजेकर यांचा सगळ्यात उठून दिसणारा गुण आहे आणि त्यामुळेच त्यांना मराठी संगीतात एक अढळपद प्राप्त झाले आहे.
बऱ्याच वेळा असं दिसतं की संगीतकार त्यांचं एखादं गाणं लोकप्रिय झालं की त्या फॉम्र्युलाचा वापर करून इतर गाणी करायला लागतात. हा यशस्वी होण्याचा सगळ्यात सुरक्षित मार्ग आहे हे निश्चित, पण काही संगीतकार असे असतात की त्यांना प्रत्येक गाण्यामध्ये काहीतरी अनोखे किंवा अतरंगी केल्याशिवाय चनच पडत नाही. बहुधा रात्रीची झोपच लागत नसावी. आपले प्रत्येक गाणे किंवा कलाकृती हे काहीतरी वेगळे सांगणारीच हवी, असा ध्यासच घेतलेले अत्यंत प्रतिभावान आणि सर्जनशील संगीतकार म्हणून दत्ता डावजेकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
खूप लहानपणी आपला आणि डावजेकर यांचा संबंध येतो तो ‘शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा’ या गाण्याच्या निमित्ताने. बालगीतामध्येही त्यातील बालसुलभता हरवू न देता अत्यंत वेगळ्या स्वराकृतींचा वापर डावजेकर यांनी फार अप्रतिम पद्धतीने या गाण्यात केला आहे. ही प्रयोग करण्याची वृत्ती डावजेकर यांनी त्यांच्या सर्व गाण्यांत वापरलेली दिसते. अगदी एखादे गाणेसुद्धा याला अपवाद नाही. काही प्रयोग फसले असतील नक्कीच, पण डावजेकर यांना काहीही फरक पडत नाही. सदैव काहीतरी नवनवीन करून स्वत:ला कायम ताजंतवानं ठेवण्याची ही कसरत डावजेकर यांच्याइतकी फार कमी संगीतकारांनी केलेली दिसते.
डावजेकर यांचे वडील बाबुराव डावजेकर हे उत्तम तालवादक होते आणि त्या काळच्या संगीत नाटकांत तबला वाजवायचे अशी माहिती मिळते. शांता आपटे यांच्या मफिलींमधून डावजेकर हे साथीदार म्हणून भारतभर फिरले. त्यानंतर त्यांनी सी. रामचंद्र आणि चित्रगुप्त यांना संगीत संयोजनात मदत केली. चित्रगुप्त यांच्या पुढील पिढीने म्हणजे आनंद-मिलिंद या संगीतकार द्वयीनेसुद्धा कायम डावजेकर यांचे मार्गदर्शन घेतले. या सगळ्या अनुभवांचा अत्यंत भ्रमरवृत्तीने आस्वाद घेतल्याशिवाय डावजेकर यांचे संगीत जसे घडले तसे घडले नसते एवढे मात्र खात्रीने सांगता येईल. डावजेकरांना शास्त्रीय संगीताची तालीम कितपत मिळाली होती याविषयी शंका आहे, पण त्यांच्यातील सदैव जागे असलेले कुतूहल त्यांना विविध प्रकारचं संगीत आणि विविध प्रकारची वाद्ये यांच्याशी मत्री करायला भाग पाडत होतं हे उघड आहे. लताजींच्या पहिल्या काही गाण्यांपैकी एक ‘तुज स्वप्नी पाहिले रे गोपाला’ हे गाणं तसं म्हटलं तर दरबारी रागावर आधारित आहे, पण दरबारी रागातील खास स्वराकृती ज्या आपल्याला हमखास ऐकायला मिळतातच, त्यांचा वापर मात्र डावजेकर टाळताना दिसतात. असं अजून एक अत्यंत मधुर गाणं आहे. आशाजींनी गायलेले ‘कुणि बाई गुणगुणले.’ जोगकंस आणि चंद्रकंस या रागांमध्ये फुलत जाणारी चाल अंतऱ्यामध्ये एक अतिशय सुंदर वळण घेऊन संपूर्ण मालकंस या रागात विहार करत परत पूर्वपदावर येते. ‘पाहू रे किती वाट’ या चित्रपटातील ‘आसावल्या मनाला’ या गीतातसुद्धा तोडीचा वापर केला आहे. पण अचानक शुद्ध धवत अशा चित्तवेधक पद्धतीने येतो की ऐकणारा चक्रावून जातो. तोच प्रकार आपल्याला ‘घरास माझ्या परतुनी आले, आठवणींनो उघडा डोळे’ या गाण्यात दिसतो. शास्त्रीय संगीतातील रागांमधील ठरावीक phrases वापरून त्यांचा श्रोत्यांवर मारा करणे या वाटेला डावजेकर कधीच गेलेले दिसत नाहीत. त्या काळातील संगीतकारांवर आपण रोज ऐकत असलेल्या शास्त्रीय आणि नाटय़संगीताचा प्रभाव पडणे हे स्वाभाविकच होते, पण तरीही त्या सर्वातून डावजेकर मात्र सुटलेले दिसतात. अलिप्त दिसतात. संगीतातले नियम वारंवार मोडूनही त्याच्यातल्या रसनिष्पत्तीला कुठेही इजा न पोचवता एक अप्रतिम रचना उभी करणे ही किमया डावजेकर अनेकदा करतात. यासाठी लागणारे धर्य त्यांच्याठायी इतके ठासून भरलेले आहे की त्याचा आजसुद्धा हेवा वाटतो.
डावजेकर यांच्या गाण्यात अजून एक गोष्ट अत्यंत ठळकपणे जाणवते, ती म्हणजे त्यातील वाद्यवृंदाचा केलेला वापर. सी. रामचंद्र यांचा सहवास असेल किंवा अजून काही असेल, पण त्यांच्या म्युझिक Pieces मध्ये एक अत्यंत उठावदार असा हार्मनीचा आणि Bass Line चा वापर ऐकू येतो. त्यांची गाणी जरी मराठी असली तरी बरेचदा त्याच्यातील वाद्यवृंदामुळे ती समकालीन हिंदी चित्रपट संगीताशी कुठेतरी नाळ जोडणारी वाटतात. लताजींनी गायलेलं ‘चांदणे फुलले माझ्या मनी’ ऐका. तसेच लताजींनी गायलेलं अजून एक अप्रतिम गाणं आहे- ‘मंदिरी शिवभूषण येतील.’ हे ‘थोरातांची कमळा’ या चित्रपटातील गाणं अतिशय सुंदर अशा जागांनी नटलेलं आहे. ही दोन्ही गाणी खास डावजेकरी वळणाची आहेत. डावजेकर यांना सतार हे वाद्य खूप प्रिय असावं असं सारखं जाणवतं. बहुतेक ७० ते ७५ टक्के गाण्यांमध्ये त्यांनी सतार वापरलेली आहेच. त्याचप्रमाणे Mandolin आणि त्या जातीच्या तंतुवाद्यांचा उपयोग हासुद्धा भरपूर केलेला आढळतो. ‘नको मारूस हाक’ या गाण्यामध्ये त्यांनी गिटारचा वापरसुद्धा खूप प्रभावीपणे केलेला आहे. एकंदरच डावजेकर यांच्या गाण्यांमध्ये हार्मनीचा खूप अभ्यास दिसून येतो. समकालीन मराठी संगीतकार हे जास्त melody किंवा गाण्याच्या मूळ चालीत रमलेले दिसतात, पण त्याचबरोबर गाण्याच्या technical आणि orchestration अंगांबाबत डावजेकरांच्या ठायी असलेली जागरूकता ही खूप क्रांतिकारक वाटते.
यामध्ये मराठी चित्रपट संगीतातील मलाचा दगड म्हणता येईल असे एक गाणं म्हणजे ‘पाठलाग’ या चित्रपटातील ‘या डोळ्यांची दोन पाखरे.’ हे सर्व दृष्टीने एक Trendsetter गाणे म्हणावे लागेल. एक गिटार, एक Electric Organ आणि Trunpet अशी इनमीनतीन वाद्ये सोडली तर या गाण्यात काहीही नाही. पण तरीही हार्मनीचा केलेला अत्यंत अप्रतिम वापर हा समकालीन इतर गाण्यांमध्ये दिसत नाही. त्याचप्रमाणे Trunpet सारखे वाद्य या पद्धतीने मराठी संगीतात त्या काळी कुठेच वापरलेले नाही. या तीन वाद्यांचा वापर आणि त्याचबरोबर एक अस्वस्थ करणारी चाल याचा संगम होऊन जे गूढरम्य वातावरण निर्माण झाले आहे त्याला खरोखरच तोड नाही. स्वराकृतींप्रमाणेच तालाशी केलेले मनोरंजक खेळ हे डावजेकर यांचं एक नजरेआड न होऊ शकणारं कौशल्य आहे आणि त्याचा प्रत्यय बऱ्याच गाण्यांमध्ये येतो. प्रत्यक्ष कुठल्याही चर्मवाद्याचा वापर न करता केवळ Guitar आणि Piano यांच्यावर अप्रतिम तालबद्ध गाणी होऊ शकतात हे डावजेकर यांनी सिद्ध केले आहे. ‘प्रीती प्रीती सारे म्हणती’ हे गाणे किंवा ‘शब्द शब्द जुळवुनी’ किंवा Waltz चा वापर करून रचलेले ‘एक होता चिमणा’ ही उदाहरणे फार ठळकपणे समोर येतात. आणि तालातसुद्धा विविध प्रकारचे Patterns वापरून गाणी तयार करण्याचे कसब डावजेकर यांच्याकडे खूपच आहे. ‘आसावरी’ या नाटकातील बाबूजींनी गायलेले ‘छेडिली आसावरी’ हे गाणे त्यातील केवळ ठेक्याकरता ऐकावे असेच आहे. ‘गंगा आली रे अंगणी’, ‘टकटक नजर’, ‘मला ओ म्हंत्यात लवंगी मिरची’, ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘नको रे बोलूस माझ्याशी’ ही गाणी त्याच्यातील तालसंयोजनाकरता पुन: पुन्हा आस्वाद घेण्याजोगीच आहेत. ‘संथ वाहते कृष्णामाई’ या अजून एक Milestone गाण्यातील तबल्याची Exit हीसुद्धा डावजेकर यांच्या काहीतरी वेगळेपण हे जपलेच पाहिजे या आग्रही वृत्तीचा परिपाक आहे.
डावजेकर यांनी विविध संगीताचे प्रकार अत्यंत सहजपणे हाताळले. त्यात शास्त्रीय वळणाची गाणी आहेत. बालगीते आहेत. लता राव यांसारख्या गायिकेच्या तोंडी सुंदर कोळीगीते आणि लोकगीते आहेत. कुठलाच प्रकार त्यांनी वापरायचा शिल्लक ठेवला नाही आणि कायम ते प्रयोगच करत राहिले. बाबूजी किंवा पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या इतकी गाणी त्यांनी कदाचित केली नसतील. पण वर म्हटल्याप्रमाणे, त्यांचं प्रत्येक गाणं हे संगीताच्या अभ्यासकाला काहीतरी देऊनच जातं. लता मंगेशकर हे नाव हिंदीत आणि मराठीत पहिल्यांदा डावजेकर यांच्या गाण्यामुळे लोकांना माहीत झालं. ही डावजेकर यांनी आपल्याला दिलेली एक अमूल्य भेट आहेच. पण त्याहीपुढे जाऊन सतत नवनवीन करण्याचा ध्यास बाळगणे ही शिकवण त्यांनी आमच्यासारख्या संगीतकारांच्या पुढच्या पिढीला दिली. मराठी संगीतातील डावजेकर यांचे योगदान हे त्यामुळे खूप श्रेष्ठ दर्जाचं आणि प्रेरणादायी ठरतं. त्यांची गाणी कायम प्रोत्साहित करतात. कायम नवीन करण्याची ऊर्जा देतात. डावजेकरांचं हे खूप मोठं ऋण मराठी संगीतकलेवर आहे आणि कायम राहील.