प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
गोमंतकाच्या भूमीने आजवर या देशाला विविध क्षेत्रांतले अनेक कलाकार दिले आहेत. अशा कलावंतांच्या मालिकेतले एक नाव म्हणजे चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर. कलावर्तुळात प्रफुल्ला डहाणूकर मोठय़ा तडफेने वावरत. मूळच्या जोशी असलेल्या प्रफुल्लाचा जन्म गोव्यातील बांदिवडे येथे १ जानेवारी १९३८ रोजी झाला. तिचं शिक्षण कला व संगीताच्या वातावरणात पार पडलं. तिला कलेची निसर्गदत्त देणगी होतीच; पण त्यास शास्त्रशुद्ध बैठक देण्यासाठी प्रफुल्लाने मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. जे. जे.मध्ये ती एक हुशार विद्यार्थिनी म्हणून गणली जाई. तिचे निर्दोष रेखाटन अन् ज्ञान यामुळे कित्येकदा वर्गात शिक्षक नसताना ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असे. चित्रकलेइतकाच तिचा अन्य सांस्कृतिक उपक्रमांमध्येही सहभाग असे.
प्रफुल्ला विद्यार्थिनी असताना ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे शेवटचे युरोपियन कला-दिग्दर्शक वाल्टर लॅंगहॅमर यांचा पगडा मुंबईच्या कलावर्तुळावर होता. एकदा जे. जे.मध्ये त्यांचे व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते. लॅंगहॅमर या नावानेच विद्यार्थी एका दडपणाखाली होते. लॅंगहॅमर यांनी आल्या आल्याच अॅप्रन चढवला. आवश्यक त्या रंगांच्या टय़ूब्ज पॅलेटवर पिळल्या. यावेळी प्रफुल्ला मॉडेल म्हणून बसण्यासाठी काही विद्यार्थिनींना गळ घालत होती. लॅंगहॅमर यांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा ते प्रफुल्लालाच म्हणाले, ‘Young girl, why don’ t you come and sit here as the model?’ अन् प्रफुल्लाला हाताला धरून त्यांनी पोट्र्रेटसाठी मॉडेल म्हणून बसवले. केवळ वीसच मिनिटे लॅंगहॅमर काम करीत होते. त्यानंतर त्यांनी प्रफुल्लाला उठण्यासाठी खूण केली. प्रफुल्ला जागेवरून उठली अन् जेव्हा तिने आपले पोट्र्रेट कॅनव्हासवर उतरलेले पाहिले तेव्हा तिच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला- ‘अरेच्चा!’ एका अद्वितीय कुंचल्याची करामत ती पाहत होती. आजही तिचे ते पोट्र्रेट जे. जे.च्या भिंतीवर पाहायला मिळते.
हेही वाचा >>> कलास्वाद : प्रतिभावंत शिल्पी
१९५५ मध्ये प्रफुल्लाने कलाशिक्षण पूर्ण केले. अंतिम परीक्षेत सर्वप्रथम येऊन अत्यंत मानाचे जे. जे.चे सुवर्णपदक तिने पटकावले. त्याच वर्षांपासून तिच्या कला-कारकीर्दीची घोडदौड सुरू झाली. १९५६ पासून सातत्याने तिने प्रदर्शने भरविण्यास सुरुवात केली. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनामध्ये तिला पोट्र्रेटचे रौप्यपदक मिळाले.
१९६१ मध्ये प्रफुल्लांना फ्रान्स सरकारने स्कॉलरशिपवर ‘इकोले दा ब्यूक आर्ट्स अँड आलतीया सेव्हन्टीन’ या संस्थेत ग्राफिक आर्ट शिकण्यासाठी पॅरिसला आमंत्रित केले. या काळात इंग्लंड, हंगेरी, जर्मनी, स्वित्र्झलड, ऑस्ट्रेलिया, जपान, पोर्तुगाल, फ्रान्समधील प्रदर्शनांमधून त्यांनी सहभाग घेतला. १९७८ मध्ये लंडनच्या ब्रिटिश हाय कमिशनने त्यांचे प्रदर्शन आयोजित करून त्यांच्या कलेचा गौरव केला.
प्रफुल्ला जोशी यांचा विवाह लेखक व उद्योजक दिलीप डहाणूकर यांच्याशी झाला व त्या प्रफुल्ला डहाणूकर झाल्या. अल्पावधीतच हे नाव कलाक्षेत्रात तळपू लागले. आरंभीच्या काळात प्रफुल्लताईंची पेंटिंग्ज ही निसर्गाशी जवळीक साधणारी होती. मात्र नंतरच्या त्यांच्या कामातून जाणवू लागली ती त्यांची तीव्रता.. जणू ती प्रफुल्लाच्या व्यक्तिमत्त्वाचा विस्तार होती. त्यातून त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोण, त्यांची तत्त्वे चित्रांमधून दिसू लागली. त्या आकाराकडून निराकाराकडे झुकत होत्या. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर पुढे ही ‘लॅंडस्केप’ न राहता ‘माइंड स्केप’ झाली. या माइंडस्केपमधून जाणवतात ते त्यांचे वेगवेगळे मूड्स व कल्पना. त्यांच्याकडून कोणतेही पेंटिंग कधीही संकल्पित केले जात नसे. त्यांच्या अंतर्मनाला जे जाणवे तेच जणू कॅनव्हासवर उतरत असे. सोबत त्यांचा आवडता राग तोडी स्वत:शी गुणगुणत त्यांचे काम चाले. चित्र-संगीताचा एक अलौकिक मिलाफच असे तो!
हेही वाचा >>> कलास्वाद : तेजोमय प्रभा : बी. प्रभा
स्वत:ची खास शैली निर्माण करणाऱ्या प्रफुल्लाताईंनी विश्वातील अवकाशाचा वेध घेण्यास आरंभ केला. त्यांना जाणवले की या विश्वामध्ये प्रचंड उलथापालथ होत असते, पण अवकाश हे चिरंतन आहे. या तत्त्वज्ञानाने, अनुभवाने प्रेरित होऊन त्यांच्या चित्रांनी आकार घेतला आणि त्यातूनच प्रफुल्लाताईंच्या ‘माइंडस्केप्स’ व ‘इटर्नल स्पेस’ या मालिका घडल्या.
वास्तववादी आकृतिबंधातील रेखाटने, निसर्गचित्रे ब्रश वापरून त्या करीत. नाईफचा वापरही त्या करीत. त्यांच्या जुन्या घराच्या भिंतीवर बाबूराव पेंटर यांनी रंगवलेले कमळावर रेलून बसलेल्या लक्ष्मीचे पेंटिंग होते. त्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी या चित्राला आधुनिक मानवी रूप दिले. त्यातून लक्ष्मीचे अमूर्त आकार निर्माण झाले व ते कॅनव्हासवर रोलरचा वापर करून त्यांनी साकारले. या अमूर्त आकारांनी त्यांनी अर्थव्यवस्थेच्या अवकाशात विखुरलेल्या मौल्यवान वस्तू रेखाटल्या व त्यातून लक्ष्मीच्या प्रतीकाचे मूलतत्त्व दर्शविले. या चित्रमालिकेला त्यांनी नाव दिले ‘इटर्नल स्पेस’! चित्रकलेच्याच नव्हे, तर कलांच्या प्रत्येक दालनामध्ये प्रफुल्लाताईंनी विश्वासाने पदार्पण केले. विशेषत: त्यांनी केलेल्या म्युरल्सचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शिवसागर इस्टेट, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, बिर्ला म्युझियम पिलानी, अमेरिकन बॅंक, कल्पतरू अशा अनेक संस्थांसाठी प्रफुल्लाताईंनी काच, सिरॅमिक, लाकूड अशा विविध माध्यमांतून म्युरल्स आविष्कृत केली.
चित्रकलेइतकेच संगीतही त्यांच्यामध्ये सामावले होते. त्यांच्या चित्रांना संगीताचा बाज होता. अनेक कलावंतांना त्यांनी मदतीचा हात दिला. वासुदेव गायतोंडे यांना चित्रकलेत, तसंच पंडित जितेंद्र अभिषेकी यांना संगीतात. जितेंद्र अभिषेकी हे आरंभीच्या काळात प्रफुल्लताईंकडेच राहत. त्यांच्या कलेच्या आंतरिक लालसेमुळे सर्वच क्षेत्रांतील कलाकार त्यांच्या सान्निध्यात आले. या सर्व बुजुर्गाचा त्यांच्या घरी राबता असे. एकीकडे किशोरी आमोणकरांचे गायन, दुसरीकडे जितेंद्र अभिषेकींचा रियाझ, तेथेच चौरसियांचे बासरीवादन आणि बाजूला प्रफुल्लाताईंचे पेंटिंग हे सर्व एकत्रच सुरू असायचे. अभिषेकींनी आपल्या पहिल्या नाटकाला येथेच चाली बांधल्या. विजया मेहता यांनी ‘रंगायन’च्या पहिल्या नाटकाची तालीम येथेच घेतली.
हेही वाचा >>> कलास्वाद : रंगसम्राट रघुवीर मुळगांवकर
प्रफुल्ला डहाणूकर हे नाव अनेक कलासंस्थांशी जुळले गेले होते. जहांगीर आर्ट गॅलरी, आर्टिस्ट सेंटर, बॉम्बे आर्ट सोसायटी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट या संस्थांची जबाबदारी त्या समर्थपणे पार पाडत. अशा संस्थांना आर्थिक मदतीची गरज भासे तेव्हा प्रफुल्लाताईंचा एक शब्द पुरेसा असे. मध्यंतरी ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’तर्फे होतकरू कला- विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिष्यवृत्ती द्यावी असा विचार पुढे आला. त्यासाठी अर्थातच पैशांचे पाठबळ हवे होते. प्रफुल्लाताईंनी ही जबाबदारी उचलली. त्यावेळी त्यांच्या नजरेसमोर आले ते चित्रकार एम. एफ. हुसेन. त्यावेळचे एक चलनी नाणे. त्यांच्याकडून पेंटिंगचे प्रात्यक्षिक करवून त्याचा लिलाव करायचा व ते पैसे शिष्यवृत्तीसाठी वापरायचे अशी ती कल्पना होती. प्रफुल्लाताईंच्या शब्दाला नकार देणे हुसेनना शक्यच नव्हते. पण सरळपणे काम केले तर ते हुसेन कसले? त्यांनीही एक अट घातली. मी पेंटिंग करेन, पण त्यासोबत पं. भीमसेन जोशींनी गायन करायला हवे! या दोन दिग्गजांना एकत्र आणून पेंटिंग व शास्त्रीय गायनाची आगळीवेगळी जुगलबंदी घडवून आणण्याचा चमत्कार केवळ प्रफुल्ला डहाणूकर याच करू जाणे. एन. सी. पी. ए.मध्ये झालेल्या या कार्यक्रमातून जमलेल्या पैशांमधून हुसेन यांच्या नावे शिष्यवृत्ती देण्याचे ठरले. पण हुसेन यांनी आपल्याला गुरुस्थानी असलेल्या चित्रकार बेंद्रे यांच्याही नावाचा अंतर्भाव त्यात केला व ‘हुसेन-बेंद्रे स्कॉलरशिप’ या नावाने ती शिष्यवृत्ती देण्यात येऊ लागली.
होतकरू कलावंतांना प्रफुल्लाताई नेहमीच मदतीचा हात देत. त्यांना गॅलरी मिळवून देणे, त्यांच्या चित्रांची विक्री करून देणे अशा अनेक गोष्टींसाठी त्या सदैव पुढे असत. अनेक होतकरूंना त्यांनी प्रकाशात आणले. गोवा कला अकादमी तसेच गोवा कॉलेज ऑफ आर्ट या संस्थांशी त्या खूप जवळून संबंधित होत्या. प्रा. दामू केंकरे यांच्यासोबत त्यांनी या संस्थेच्या उभारणीस हातभार लावला होता. त्यांच्या प्रगतीकडे त्याचे बारकाईने लक्ष असे.
प्रफुल्लाताईंचा सर्वच क्षेत्रांत वावर असल्याने असंख्य आठवणींचा खजिना त्यांच्यापाशी असे. तो खजिना रिता करताना त्यांचा उत्साह ओसंडून जात असे. त्यातून अनेक गमतीदार गोष्टी उघड होत. हुसेन-भीमसेन जोशी यांच्या चित्र-गायन जुगलबंदीच्या वेळी हुसेन यांनी या प्रसंगाचे चित्रण कोणीही करायचे नाही असे स्पष्ट सांगितले होते. केवळ त्यांचा मुलगाच ते करणार होता. प्रफुल्लताईंनी सोसायटीच्या रेकॉर्डसाठी निदान एक सीडी द्यायची विनंती त्यांना केली. त्याप्रमाणे हुसेन यांच्याकडून सीडी आलीही. काही दिवसांनी जेव्हा ती सीडी पाहिली तो काय? ती पेंटिंग-गायनाची नसून कोणत्या तरी एका लग्न समारंभाची होती.
संगीत, साहित्य, नाटक, चित्रकला अशा सर्वच क्षेत्रांत अधिकारवाणीने वावरणाऱ्या प्रफुल्लाताई एकदा बोलता बोलता मला म्हणाल्या, ‘मी आत्मचरित्र लिहायला घेतले आहे. निरनिराळ्या कला क्षेत्रातील लोकांशी संपर्क आल्यामुळे बऱ्याच आठवणी मनात आहेत. बरेचसे लिहून झाले आहे. या माझ्या आत्मचरित्राचे शीर्षकही तयार आहे.. ‘रंगानंदात रंगले मी’! प्रफुल्लाताईंचे कला व संगीताशी असलेले नाते पाहता यापेक्षा समर्पक शीर्षक आणखी कोणते असणार?
पुढे प्रफुल्लताईंची प्रत्यक्ष भेट कमी होऊ लागली. एकदा आर्टिस्ट सेंटरमध्ये त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाच्या वेळी भेट झाली. त्यानंतर चित्रकार सुहास बहुळकर यांच्या घरी ‘मास्टर स्ट्रोक्स’ या एम. आर. आचरेकरांच्या प्रदर्शनाच्या पूर्वतयारीच्या वेळी आम्ही भेटलो. नंतर नेहरू सेंटरमध्ये प्रल्हाद धोंड यांच्या निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाच्या वेळी त्यांनी मला धोंड यांच्यावर बोलण्यास सांगितले होते. आणि त्यांची शेवटची भेट झाली ती सुहास बहुळकरांच्या कन्येच्या विवाहाच्या वेळी. खूपच थकलेल्या जाणवल्या मला त्या त्यावेळी.
१ मार्च २०१४ या दिवशी माझे मित्र नरेंद्र विचारे यांचा फोन आला- ‘प्रफुल्लाताई गेल्या!’ क्षणभर सुन्नच झालो. त्या दिवशी अनेक संस्था, कला महाविद्यालये, कला विद्यार्थी, होतकरू कलावंत या सर्वाना आपण पोरके झाल्याची जाणीव झाली असेल. पण प्रफुल्लाताई गेल्या असे तरी कसे म्हणावे? त्यांच्या कलाकृतींनी त्यांना अजरामर केलेच आहे; शिवाय उदयोन्मुख कलाकारांना उत्तेजन मिळावे यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या प्रफुल्ला डहाणूकर यांचे हे मौलिक काम अविरत चालू राहावे यासाठी त्यांचे पती दिलीप डहाणूकर व अन्य काही नामवंत कलाकारांनी ‘प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाऊंडेशन’ हा ट्रस्ट उभारला आहे. प्रफुल्लताईंची काही पेंटिंग्ज व देशभरातील प्रफुल्लाच्या चाहत्या नामवंत कलाकारांनी व कला संग्राहकांनी दिलेल्या पेंटिंग्जची विक्री करून त्या रकमेतून या ट्रस्टची उभारणी झाली आहे. कलाकारांनी कलाकारांसाठी निर्माण केलेली ही संस्था असून, तिच्याद्वारे प्रफुल्लाताईंचा स्नेहाचा हात तरुण होतकरू कलाकारांच्या पाठीशी राहणार आहे. पूर्वीप्रमाणेच न थांबता, न थकता!
rajapost@gmail.com