‘शो मॅन’ राज कपूर यांचा आर. के. स्टुडिओ गेली ७० वष्रे मुंबईच्या चेंबूर भागात मोठय़ा दिमाखात उभा आहे. आपल्या या प्राणप्रिय कर्मभूमीला म्हणा, कलामंदिराला म्हणा, राज कपूरनं आगळं व्यक्तिमत्त्व, आगळं परिमाण दिलं. निव्वळ कामाची जागा म्हणून त्यानं आपल्या स्टुडिओकडे पाहिलं नाही. नुकताच हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबीयांनी जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने..
कोणतीही इमारत म्हणजे खरं तर दगड, विटा, सिमेंट यांच्या भिंती. मग ती शंभर मजल्यांची असो किंवा फक्त मजल्याची. ती घर किंवा वास्तू बनते तिथे राहणाऱ्या माणसामुळे. त्याच्या कर्तृत्वामुळे. ‘आर. के. स्टुडिओ’ ही वास्तू बनली राज कपूर नावाच्या चित्रचमत्कार किंवा चंदेरी चमत्कार म्हणावा अशा व्यक्तिमत्त्वामुळे. राज कपूर गेल्यानंतर ही वास्तू ‘हेरिटेज’ ठरायला हवी होती. महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यटन खात्याकडे थोडी कल्पकता असती, तर मुंबईच्या पर्यटनस्थळांमध्ये ‘आर. के.’चा (आणि दुसऱ्या ‘आर.के.’चाही म्हणजे व्ही. शांतारामांच्या ‘राजकमल’चा, मेहबूब यांच्या ‘मेहबूब स्टुडिओ’चा, गुरुदत्तच्या ‘नटराज स्टुडिओ’चा आणि बिमल रॉय यांच्या ‘मोहन स्टुडिओ’चा) समावेश करता आला असता. किंवा स्पेशल ‘बॉलीवूड टूर’ ठेवून भरपूर पैसा आणि दुवा मिळवता आला असता. असो.
‘आर. के.’ तर चित्रचाहत्यांच्या दृष्टीनं केव्हाच तीर्थस्थान बनलं होतं. चेंबूर उपनगराच्या हमरस्त्यावर मोक्याच्या जागी असल्यामुळे या चित्रमंदिराचं दर्शन सुलभ झालं होतं. प्रभादेवीवरून जात असताना भाविक सिद्धिविनायक मंदिराला हात जोडल्याशिवाय पुढे जात नाहीत. मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या चित्ररसिकालाही ‘आर. के. स्टुडिओ’चा फलक पाहिल्याखेरीज पुढे जावंसं वाटत नाही. ‘आर. के.’ हा चेंबूरच्या भौगोलिक पत्त्यामधला केवळ ‘लँडमार्क’ नाही. ‘आर.के. स्टुडिओ’ ही चेंबूरची ओळख आहे.
बांद्रा आणि ‘पाली हिल’ ही आजची बॉलीवूडची ओळख आहे. पण चेंबूर आणि तिथली मैत्री पार्क कॉलनी अन् माटुंगा व तिथली फाइव्ह गार्डन कॉलनी या बॉलीवूडच्या आद्य तारांकित वसाहती होत्या. अशोककुमार, राज कपूर, नलिनी जयवंत यांच्या वास्तव्यानं चेंबूरला ‘स्टार सबर्ब’ बनवलं. चित्रनिर्मितीचा केंद्रबिंदू दादरपासून बांद्रा, अंधेरी, सांताक्रूझ आणि गोरेगाव या पश्चिमी उपनगरांकडे सरकत गेला. त्यामुळे चेंबूर आणि माटुंगा मागे पडले. बांद्राचा उपजत झुळझुळाट, झगमगाट आणि आल्हादकता चेंबूरपाशी नाही हेही खरं. त्यामुळे अख्खं बांद्रा (पश्चिम) हे कलानगर झालं, ‘स्टार सबर्ब’ झालं. ‘मैत्री पार्क’ आणि ‘देवनार’ या चेंबूरमधल्या स्टार कॉलन्या ठरल्या. असो, पुन्हा असो.
राज कपूरचं घर आणि स्टुडिओ यांनी चेंबूरच्या ‘स्टार स्टेटस्’ची आठवण कायम ठेवली. राज कपूरप्रमाणे त्याचा स्टुडिओही वेगळा होता. १९४६ साली वयाच्या २२ व्या वर्षी नायक म्हणून पडद्यावर दिसलेला (चित्रपट : नीलकमल) राज कपूर फक्त दोनच वर्षांत १९४८ साली वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी ‘आर. के. फिल्म्स्’चा व ‘आर. के. स्टुडिओ’चा मालक झाला. हा भारतीय चित्रपटसृष्टीबरोबरच जागतिक चित्रपटाच्या इतिहासातला उच्चांक असावा. नट, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून कोणालाही एका व्यक्तीनं एवढय़ा लहान वयात ही तिहेरी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली असेल असं वाटत नाही. अनेक राज्यं, अनेक भाषा व धर्म असलेल्या आणि त्यात पुन्हा शहरी व ग्रामीण अशी विभागणी असलेल्या भारत वर्षांत जो आवडेल सर्वाना असा हिंदी चित्रपट बनवण्यासारखी कठीण गोष्ट नसेल. ती सोपी आहे असा आभास आणि दिलासा राज कपूर आणि ‘आर. के. फिल्म्स्’ यांनी निर्माण केला. हे भारतीय चित्रपटाला त्यांचं मोठं योगदान आहे. १९४८ ते १९८६-८७ पर्यंत सलग ४० वर्षे ‘आर. के. स्टुडिओ’मध्ये चित्रपटनिर्मिती झाली. या २१ चित्रपटांपैकी प्रत्येक उत्कृष्ट होता अशी अपेक्षाच व्यर्थ ठरेल; पण त्यात ‘जागते रहो’ सारखा प्रायोगिक व कलात्मक चित्रपट होता, ‘श्री ४२०’सारखी सहजसुंदर व आजही समकालीन ठरावी अशी कथा होती. ‘बॉबी’सारखा ट्रेंडसेटर होता अन् ‘जोकर’सारखा भव्य अपयशी तरीही आगळावेगळा, आत्मचरित्रात्मक चित्रपट होता, हे विसरता येणार नाही.
वास्तविक हा स्टुडिओ उभारला नसता तरी राज कपूर यशस्वी झाला असता. किंबहुना निर्मिती, दिग्दर्शन आणि स्टुडिओ मालक या वेळखाऊ, डोकंखाऊ कामांपेक्षा स्टार म्हणून त्यानं केवढी मोठी कमाई केली असती! आणि तीही सहजपणे! त्याचा देखणा चेहरा आणि निळे डोळे त्यासाठी पुरेसे होते. फक्त चेहऱ्याच्या भांडवलावर जीतेंद्र चालतो, तर राज कपूर किती चालला असता! पण मग तो राज कपूर ठरला नसता. त्याला त्याच्या मनासारखे चित्रपट घडवायचे होते आणि म्हणूनच साता जन्मांच्या सुखाचं स्टारपद उपभोगण्याऐवजी तो निर्माता अन् दिग्दर्शक बनला आणि त्याच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी त्यानं स्टुडिओ बांधला.
‘स्टुडिओ म्हणजे पांढरा हत्ती’ असं त्याचा सुपुत्र ऋषी कपूर हा स्टुडिओ विकायला काढल्यावर म्हणतो. पण १९४८ सालीसुद्धा स्टुडिओचं स्वरूप तेच होतं. स्टुडिओ चालवण्याची आर्थिक गणितं आणि चित्रपटकला यांचा मेळ बसवणं तेव्हाही कठीणच होतं. स्वत:च्या स्टुडिओत स्वत:चे चित्रपट काढण्यापेक्षा इतरांच्या चित्रपटासाठी तो भाडय़ानं देणे फायदेशीर असतं. विशेषत: राज कपूरप्रमाणे एकेक चित्रपटाला आयुष्याची दोन-तीन वर्षे बहाल करणाऱ्या नादिष्ट कलावंतासाठी चित्रपटनिर्मिती महागच असते. त्याच्या जोडीला स्टुडिओ काढणं हा खुळेपणाच वाटेल. स्टुडिओच्या पसाऱ्यात कामगारांचे महिन्याचे पगार आणि ‘मेन्टेनन्स’ची बिलं कलावंताची सर्जकता संपवायला ‘समर्थ’ असतात.
पण राज कपूरनं हे आव्हान लीलया पेललं. कसं ते तोच जाणे. त्याच्या स्वत:च्याच चित्रपटाचं काम किमान दोन वर्षे चालत असल्यामुळे इतरांचे किती चित्रपट ‘आर. के.’मध्ये होत होते, याचा अंदाज करता येत नाही. पण राज कपूरनं कोणत्याही सबबी न सांगता त्याच्या हयातभर ‘आर्के’ चालवला आणि पुण्यात ‘राजबाग’च्या रूपानं दुसरा (पण अनऑफिशियल) स्टुडिओही उभारला. ‘जोकर’साठी त्यानं ‘आर. के.’ गहाण ठेवला, पण विकला नाही आणि ‘बॉबी’च्या यशातून त्यानं तो सोडवूनही घेतला.
कदाचित त्याच्या अंगातल्या पंजाबी रक्ताची ही किमया असावी. आधीच कलावंत आणि त्यात पंजाबी म्हणजे इतरांकडे काम करणं फारसं रुचणारं नव्हतं. हा स्टुडिओ चालवण्यासाठी आणि चित्रपट काढता यावेत म्हणून राज कपूरनं ‘आर. के.’च्या बाहेर चित्रपट केले. त्यांच्यापैकी कितीतरी त्याच्या दर्जाला शोभणारे नव्हते. त्याच्यातला अभिनेता त्या चित्रपटांमध्ये दिसत नव्हता. पण स्वत:ची फिल्म कंपनी आणि स्टुडिओ चालवण्याकरिता ती ‘राजी’ खुशीनं पत्करलेली तडजोड होती.
विशेष म्हणजे, चोविसाव्या वर्षी राज कपूरपाशी स्वत:चा स्टुडिओ होता, पण मालकीचं घर नव्हतं. हिंदी चित्रपटांच्या पहिल्या तीन स्टार्समध्ये गणला जाणारा राज कपूर हे अढळपद मिळाल्यानंतरही कित्येक वर्षे भाडय़ाच्या घरामध्ये राहत होता. ते भाडय़ाचं घर म्हणजे स्टुडिओपासून जवळच असलेल्या देवनार भागातला एक आलिशान बंगला होता, ही गोष्ट वेगळी आणि राज कपूरनं त्या बंगल्याची आमिरी हवेली बनवली ती कर्तबगारीही वेगळी. सांगण्यासारखी गोष्ट ही, की राजला स्वत:चा स्टुडिओ असण्याची निकड वाटत होती, तेवढी घराची वाटत नव्हती. ‘संगम’च्या काळात राज कपूरची राजेंद्रकुमारशी गाढ मैत्री झाली. ‘सिल्व्हर ज्युबिलीकुमार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, पण फाळणीचे चटके खाल्ल्यामुळे पाय जमिनीवर असलेल्या राजेंद्रकुमारनं आग्रह धरून राज कपूरला ‘देवनार कॉटेज’ नावाचा मजलेदार इमला विकत घ्यायला लावला.
राज कपूरच्या स्टुडिओत वैविध्यसंपन्न चित्रनिर्मिती झाली, पण त्याचा ‘शोमन’चा रुबाब आणि भपका या स्टुडिओत नव्हता. वर्षांनुवर्षे होऊन या स्टुडिओवर मजले चढले नाहीत; पण ‘आर. के.’च्याच नजीकचा ‘आशा स्टुडिओ’ विकत घेऊन राज कपूरनं त्याचं ‘आर. के.’त विलीनीकरण केलं आणि ‘आर. के.’चा विस्तारही केला. तरीही त्याचं साधं घरगुती रूप कायम राहिलं. त्याचं वेगळेपण नजरेत भरायचं त्यावर कोरलेल्या ‘आर्के फिल्म्स्’च्या ट्रेडमार्कमुळे! एका हातावर सुंदर स्त्री आणि व्हॉयोलिन तोलणारा तरुण!!
१९४८ साली असं बोधचिन्ह घेणं हे धाडसच नव्हे, तर बंडखोरी होती. बाकीचे सगळे निर्माते आपापल्या चित्रसंस्थांसाठी एखाद्या देवदेवतेचं किंवा हंस, मोर, हत्ती किंवा फार तर ‘चार मीनार’सारखी वास्तू अशी बोधचिन्ह घेत होते; तेव्हा राज कपूरनं खजुराहोच्या वर्गातली ही पोझ बेधडक बोधचिन्ह म्हणून घेतली. या बोधचिन्हापाठोपाठ राजच्या चित्रपटात लगेच त्याचे पिताजी (पृथ्वीराज कपूर) शिवलिंगाची पूजा करताना दिसायचे हा खरं म्हणजे विनोद होता- नाही, राज कपूरच्या कलासक्त स्वभावातला तो विरोधाभास होता.
हे असलं बोधचिन्ह त्याच बेधडकपणानं राजनं स्टुडिओच्या दर्शनी भागातही कोरलं. पण ते कधीच अकारण धीट वा अश्लील वाटलं नाही. शिल्पच वाटलं. पुढे ते ‘आर. के. फिल्म्स्’ मधल्या देहस्वी दृश्याचं सूचक प्रतीक ठरलंही असेल, पण ‘आर. के.’ चेंबूरच्या हमरस्त्यावर असूनही कधी विरूप अथवा अस्थानी वाटलं नाही. त्यामागची सौंदर्याभिरुचीच नजरेत भरायची. इतर स्टुडिओंच्या कमानीवर रंगवलेल्या ठळक, पण ठोकळेवजा अन् बोजड नावापेक्षा ‘आर. के.’चं हे प्रथम दर्शन वेगळं वाटायचं.
पण बस्स, यापेक्षा वेगळे प्रयोग राज कपूरनं स्टुडिओच्या स्वरूपात केले नाहीत. स्टुडिओचा अंतर्गत भाग, तिथली शूटिंग स्टेजेस इतर स्टुडिओंसारखीच होती. पण मुंबईच्या इतर स्टुडिओंतली बकाली व अस्वच्छता नव्हती. स्वच्छता आणि कलेचं पावित्र्य व गांभीर्य जपणारा ‘आर. के.’सारखा दुसरा स्टुडिओ म्हणजे ‘राजकमल’. पण त्याच्यावर शांताराम बापूंच्या दराऱ्याची छाया होती. तिथलं वातावरणही ‘ऑफिस लाइक’ होतं. ‘आर. के.’वर राज कपूरच्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. या स्टुडिओत त्यानं स्वत:साठी राखून ठेवलेली ‘कॉटेज’देखील त्याच्या ‘शोमन’ व्यक्तिमत्त्वाला छेद देणारी होती. ‘राजेशाही, अगडबंब फर्निचर, पुतळे, पडदे, फुलदाण्यांनी ती भलीमोठी खोली (आजचं पेंटहाउस म्हणायला हरकत नाही) खचाखच भरलेली नव्हती. भलीमोठी, जाडजूड, भारतीय बैठक तिथे होती. राज कपूर तिथे बसत नसेच, कायम पहुडलेला असायचा, असं त्याच्या वर्तुळातले लोक सांगतात. परदेशात गेल्यावरही तिथल्या हॉटेलमध्ये पलंगावरची गादी खाली ओढून जमिनीवर झोपायचा. त्याकरिता पौंडांमध्ये आणि डॉलर्समध्ये त्यानं दंड भरला असाही किस्सा आहे. असो.
आपल्या या प्राणप्रिय कर्मभूमीला म्हणा, कलामंदिराला म्हणा, राज कपूरनं आगळं व्यक्तिमत्त्व, आगळं परिमाण दिलं. निव्वळ कामाची जागा म्हणून त्यानं आपल्या स्टुडिओकडे पाहिलं नाही. या वास्तूमध्ये त्यानं कलाक्षेत्रातले दिग्गज आणले. एम. आर. आचरेकरांसारख्या अभिजात चित्रकाराला कलादिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आणण्याचं पुण्यकार्य राज कपूरनं इथेच केलं. ‘आवारा’ मधल्या स्वप्नदृश्याचा सेट उभारला जात असताना तो दिवस-रात्र स्टुडिओमध्ये मुक्काम करत होता. अनेकदा सेटवरच, जागा मिळेल तिथे झोप घेत होता.
के. ए. अब्बास यांच्यासारखा पत्रकार-लेखकाबरोबर राज कपूरनं याच स्टुडिओतल्या आपल्या कॉटेजमध्ये बैठकी रंगवल्या आणि ‘बूटपॉलिश’, ‘अब दिल्ली दूर नही’, ‘४२०’ आणि ‘जोकर’सारखे चित्रपट इथे जन्माला आले. इंद्रराज आनंद या आणखी एका साहित्यिकाच्या उपस्थितीनं ‘आर. के.’मधली कॉटेज उजळून निघाली. सिद्धहस्त शैलेंद्रची गाणी ‘आर. के.’च्या परिसरातच उमलली.
हिंदी व पर्यायानं भारतीय चित्रपटकलासृष्टी ‘आर. के.’च्या प्रांगणात वाढली; वैभवाला पोचली, त्याबरोबरच या वास्तूला सांस्कृतिक व सामाजिक समृद्धी राज कपूरनं दिली. इथे गणपती उत्सव आणि होळी यांच्याबरोबरच १५ ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनही साजरा व्हायचा. सिनेमा आणि समाज यांचं नातं राज कपूर कधी विसरला नाही. आपल्या स्टुडिओतही त्यानं ते नातं असं जपलं.
हे नातं ‘आर. के. फिल्म्स’च्या पुढच्या पिढीला जपता आलं नाही. राज कपूरच्या हयातीत ‘बीवी ओ बीवी’ आणि ‘धरमकरम’ असे सुमार चित्रपट निघू लागले, तेव्हा ‘आर.के.’च्या पुढच्या पिढीला चित्रनिर्मितीचं शिवधनुष्य पेलणार नाही, याची पहिली चाहूल लागली. ते चित्रपट राज कपूरच्या चित्रपटांपेक्षा निराळे होते म्हणून हे घडत नव्हतं. राज कपूरचा ध्यास, त्याचं चित्रपट कलेवरचं उत्कट प्रेम, स्वर्गीय म्हणावं असं वेड (फाइन मॅडनेस) त्याची जाण, त्याचा दर्जा यातलं काहीच त्या चित्रपटांमध्ये दिसलं नाही. ‘प्रेमरोग’चा पास-सात वर्षांतच ‘प्रेमग्रंथ’ या नावानं रीमेक झाला, तेव्हा त्यावर शिक्कामोर्तब झालं.
राज कपूरच्या ज्येष्ठ वारसानं हे वेळेवर ओळखलं आणि ‘हीना’नंतर दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं नाही. (स्टुडिओचं व्यवस्थापन मात्र चोख सांभाळलं) राज कपूरच्या निधनानंतर (१९८८) एकूणच हिंदी चित्रपटनिर्मितीची गणितं पार उलटीपालटी झाली. परदेशांमध्ये अधिकाधिक चित्रणं होऊ लागली. त्यामुळे सगळ्याच स्टुडिओंमधली कामं कमी झाली हे खरं आहे. पश्चिम उपनगरांमध्ये निर्मिती केंद्र हलल्यामुळे ‘आर. के.’मध्ये शूटिंग करणं गैरसोयीचं झालं. तिथल्या बेसुमार वाहतुकीनं तीत भर घातली हेही खरं. चित्रपटांच्या जागी टीव्ही मालिका आल्या आणि त्यांना चित्रपटांइतकं भाडं देणं परवडत नव्हतं, त्यामुळे सर्वच स्टुडिओंना त्यात कपात करावी लागली. परिणामी, स्टुडिओंची कमाईच नाही, त्याचं ‘ग्लॅमर’सुद्धा ओसरलं.
ही सर्व आर्थिक टंचाई लक्षात घेतली तर ‘आर. के. स्टुडिओ’चं विसर्जन ही अनपेक्षित वा धक्कादायक गोष्ट नव्हे. बंद होणारी ‘आर. के.’ पहिलीच चित्रसंस्था नव्हे, की टाळं ठोकलं गेलेला तो पहिलाच स्टुडिओ नव्हे. काळाच्या ओघात या गोष्टी कितीही दु:खद असल्या तरी घडतच राहतात आणि राहणार. मात्र एक विसंगती लक्षात आल्यावाचून राहत नाही. तीन स्टार्स घरात असलेली ‘आर. के.’सारखी चित्रसंस्था निष्क्रिय होते, तेव्हाच यश चोप्रांचा आदित्य ‘वायआरएफ’ हा अत्याधुनिक अद्ययावत स्टुडिओ उभारतो. कारण तो स्वत: चित्रनिर्मिती करतो. कोणताही स्टुडिओ चालू राहण्यासाठी त्याच्या मालका-चालकांनी स्वत: त्याला काम पुरवायचं असतं. आदित्य चोप्रा ते करतो आहे आणि कपूर बंधूंना ते जमत नाही.
कारण त्यांच्यापाशी तशी इच्छा राहिलेली नाही. ‘हीना’चा प्रेस शो ‘आर. के.’मध्ये झाला त्याची इथे आठवण होते. नाइलाजानं त्याचा ‘प्रेस शो’ ठेवलाय असं निमंत्रितांना जाणवत होतं. राज कपूरच्या निधनानंतरचा चित्रपट म्हणून ‘प्रेस’ला बोलावलं होतं. पण त्या निमंत्रणात, स्वागतात यजमानांचं मन नव्हतं. चटावरचं श्राद्ध उरकण्याची कला त्या कार्यक्रमाला होती.
चित्रपटाच्या मध्यांतरात सर्वानी मनमोकळी वाहवा दिली, ती बहुधा अनपेक्षित असावी. चित्रपटाबद्दल आत्मविश्वास नसल्यामुळे पार्टीलासुद्धा फाटा दिला होता. पण ती नव्हती म्हणून पत्रकारांनी चित्रपटाची प्रशंसा करण्यात कसूर केली नाही म्हणून की काय, ‘शो’ संपल्यावर आयत्या वेळी ‘आर. के.’च्या कॅन्टीनमध्ये निमंत्रितांना जेवणासाठी थांबवण्यात आलं. त्याची गरज नव्हती. चित्रपट खरोखर चांगला झाला होता. परीक्षणंपण तशीच आली असती.
चित्रपटाच्या ‘पार्टी’तली भेंडय़ाची भाजी खाताना राज कपूरची अपरिहार्यपणे आठवण झाली. ‘राजबागेत’ल्या त्याच्या पाटर्य़ाचं आतिथ्य, तिथलं प्रसन्न वातावरण आठवलं. ‘आर. के.’च्या समोर उत्तमोत्तम हॉटेल्स आहेत. तिथून चांगला ‘मेनू’ मागवता आला असता. पण उत्साह नव्हता, उत्सुकता नव्हती. तो निरुत्साह पार्टीपुरता नव्हता; त्याचा संसर्ग चित्रपटनिर्मितीलाही झाला व त्यातून कधी उठताच आलं नाही. किंवा स्वत:चा आवाका ओळखून थांबण्याचा सुज्ञपणा दाखवला गेला.
‘आर. के.’चं काय, तालेवारांच्या चित्रसंस्थातलं काम असंच थांबत थांबत एक दिवस संपून गेलं. त्याबद्दल हळहळ वाटते. सहानुभूती वाटते, पण शेवटी वास्तव स्वीकारावं लागतं.
‘आर. के.’च्या बाबतीत ही भावना जास्त आहे, कारण या स्टुडिओचा मराठी चित्रपटसृष्टीशी भावबंध आहे. ‘आर. के.’ स्टुडिओची मिळालेली जमीन म्हणजे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचा राज कपूरला आशीर्वाद होता. राजनं त्यांच्या चित्रपटात केलेल्या छोटय़ाशा भूमिकेचा (चक्क वाल्मिकी!) मोबदला म्हणून भालजींनी राजला पाच हजार रुपये दिले. पृथ्वीराजजींशी निकटची मैत्री असलेल्या भालजींकडून पैसे घेणं राजला व त्याच्या पित्यालाही पटेना. अखेर भालजींच्या पुढे नमून ते घ्यावे लागले, तेव्हा त्याचा सदुपयोग जमीन घेण्यात करण्यात आला व त्यावर पुढे ‘आर. के. स्टुडिओ’ची ऐतिहासिक वास्तू उभी राहिली.
आता एकच इच्छा- ‘आर. के.’ची वास्तू जाऊन तिथे नवी इमारत नव्या रूपात उभी राहील, तिथे एखाद्या कोपऱ्यात राज कपूरची स्मृती कोणत्या ना कोणत्या रूपात जपली जावी. या वास्तूवर कुठेतरी नाव असावं.