प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
काही वर्षांपूर्वी कलाक्षेत्रात जागतिक स्तरावर एक नवा इतिहास घडला होता. एक उद्योगपती गुरू श्रीवास्तव यांनी जागतिक कीर्तीचे भारतीय चित्रकार एम. एफ. हुसेन यांची आगामी १०० चित्रे विकत घेतली असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. बरेच कलाव्यापारी या क्षेत्रात व्यवसाय करतात. किंबहुना, आज तेच जास्त प्रमाणावर या क्षेत्रात आढळून येतात. एक गुंतवणूक म्हणून ते कलेकडे पाहतात आणि या व्यवसायात प्रचंड पैशांची उलाढाल होत असते. यांना त्या चित्रकाराविषयी ना आपुलकी असते, ना त्यांच्या कलेचे मोल. असते ती फक्त त्यावरील सहीला असलेली किंमत व तिचे जागतिक पातळीवरील स्थान! बाजारात खणखणणाऱ्या कलाकाराच्या नावाचा वापर त्यांना करायचा असतो. फारच कमी संग्राहक असे दिसतील, की जे कलाकृतीचा दर्जा, तिच्या प्रेमामुळे अशा कलाकृती विकत घेऊन त्यांचा संग्रह करतात. अशा कलाकृतींना प्राणापलीकडे जपून रसिकांनाही त्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी त्या प्रदर्शितही करतात.
१९४० च्या आसपास मुंबईत आलेले इंडो-फार्मा वर्क्सचे इम्यॅन्युअल स्लेजिंगर हे पहिले समकालीन भारतीय कलेचे संग्राहक म्हणून ओळखले जातात. त्या काळात चित्रकलेने झपाटलेले तरुण चित्रकार रझा, हुसेन, आरा, सूझा, गाडे, बाक्रे यांना त्यांनी बरेच प्रोत्साहन दिले. त्यांना युरोपातील आधुनिक चित्रशैलीची ओळख करून दिली. त्यांच्या चित्रांचा संग्रह केला. पण यामध्ये त्यांचा केवळ चित्रं खरेदी करणे हा हेतू नसून त्यांना एक दर्जा त्यांनी मिळवून दिला. ही परंपरा पुढे चालू ठेवली कलासंग्राहक जहांगीर निकोल्सन यांनी!
कलाक्षेत्रात ‘जंगू’ या लाडक्या नावाने परिचित असलेले जहांगीर निकोल्सन यांचा जन्म १९१५ मधला. त्यांनी चार्टर्ड अकाऊंटंटचे शिक्षण घेतले होते. त्यांच्या कुटुंबाचा कच्च्या कापसाचा व्यवसाय होता. त्यांचे बालपण महात्मा गांधींच्या असहकार चळवळीच्या सान्निध्यात गेले. लहानपणापासूनच त्यांना छायाचित्रणाची गोडी होती व निसर्गाची ओढ होती. त्यांचे मन कलासक्त होते. १९६७ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले. पत्नीच्या निधनाचा त्यांच्या मनावर मोठा आघात झाला. त्यांच्या जीवनात एक प्रचंड पोकळी निर्माण झाली. कधीही न भरून येणाऱ्या जखमेने ते दु:खी झाले. ते सौंदर्य उपासक असल्याने या काळात त्यांचा दृक् कलेकडचा ओढा वाढला. जहांगीर, ताज व पंडोल कलादालनांत ते वारंवार जाऊ लागले. तेथे त्यांच्या कलाकारांशी भेटीगाठी होऊ लागल्या. भारतीय कलाशैलीचा अभ्यास होऊ लागला. ते रोटरी क्लबचे सदस्य असल्याने दर महिन्यात ताजमहाल हॉटेलमध्ये त्यांची बैठक होत असे. बैठक संपताच खाली असलेल्या ताज आर्ट गॅलरीत जहांगीर जात. असेच एक दिवस ते ताज कलादालनात गेले असता तरुण चित्रकार शरद वायकुळ यांचे चित्रप्रदर्शन तिथे सुरू होते. त्यांना त्यांचे एक निसर्गचित्र अत्यंत भावले. त्याची किंमत होती सहाशे रुपये. पण त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. त्यांनी चित्रकाराला विचारले, ‘‘मला हे पाचशे रुपयांना द्याल का?’’ वायकुळ यांनी क्षणभर त्यांच्याकडे पाहिले व होकार दिला. १९६८ मध्ये जहांगीर निकोल्सन यांनी खरेदी केलेली ती पहिली कलाकृती! चित्रामध्ये कधीही ‘बार्गेनिंग’ करू नये, या मताचे ते होते. त्यानंतर कधीही त्यांनी चेकशिवाय चित्रांची किंमत दिली नाही. स्वत:ला त्यांनी हा नियमच घालून घेतला.
येथून पुढे जहांगीर यांची कलाकृतींमधील आस्था वाढीस लागली. त्याची ज्योत प्रथम पेटवली ती हुसेन यांनी. त्यांच्याशी संबंध आल्यावर ते जहांगीर यांच्या संग्रहात आले. नंतर अकबर पदमसी, तय्यब मेहता, वासुदेव गायतोंडे हेही दाखल झाले. त्यानंतर राम कुमार, क्रिशन खन्ना, रझा ही मंडळी सत्तरीच्या दशकाच्या प्रारंभी आली. त्याचवेळी लक्ष्मण श्रेष्ठा अन् त्यांची पत्नी सुनीता श्रेष्ठा यांच्याही चित्रांनी त्यांच्या संग्रहात वर्णी लावली. १९७० च्या सुमारास त्यांची थोर संग्राहक बिल चौधरींशी भेट झाली आणि त्यांनी कलाक्षेत्रात खोलवर शिरून कसा विचार करायचा, याचे धडे त्यांना दिले. चित्र कसे पाहावे, त्यातील मर्म कसे जाणावे याची ओळख जहांगीरना त्यांच्यामुळे झाली. यातूनच त्यांना कलाकृतीचा दर्जा ओळखून त्यातून आनंद घेता येऊ लागला. निरनिराळी चित्रे पाहून, त्यातील नेमके गुण हेरण्यास त्यांनी सुरुवात केली. चित्रांमधून दर्जेदार चित्राची निवड करणे त्यांच्या हातचा मळ झाला. त्यांनी अनेक चित्रे जमवली. त्यामध्ये अंबादास, सुलतान अली, बेंद्रे, मोहन सामंत, हेब्बर आणि अँजोली इला मेनन हे प्रतिभाशाली कलाकार होते. त्यांचा चित्रसंग्रह एक दर्जेदार कलासंग्रह म्हणून ओळखला जाऊ लागला. चित्रकलेतील ‘मास्टर’ मानले गेलेले, तसेच नवोदित कलाकार या सर्वानाच तो प्रेरणादायी ठरला. लक्ष्मण श्रेष्ठा यांच्या अमूर्त शैलीशी त्यांचा संपर्क आला तेव्हा त्यांच्या शैलीला त्यांनी दाद दिली. शिवाय गणेश पायन, भूपेन खक्कर, अतुल-अंजु दोडिया हेदेखील त्यांचे आवडते चित्रकार. या सर्वाची चित्रे त्यांच्या संग्रहात आली. त्यांच्या संग्रहात गेल्या शतकातील रवींद्रनाथ टागोर, जेमिनी रॉय यांच्यापासून ते अँजोली इला मेनन, नलिनी मालानी यांच्यासह सर्वच श्रेष्ठ कलाकारांनी हजेरी लावली आहे.
चित्रसंग्रहासोबतच जहांगीर यांनी शिल्पकलेलाही न्याय दिला. त्यांनी ज्येष्ठ अन् श्रेष्ठ शिल्पकारांची शिल्पे जमवण्यास आरंभ केला. शंखो चौधरी, दासगुप्ता, बिमल दास, नारायण, मणिनारायणन, बी. विठ्ठल, आदी दावियरवाला, पिलू पोचखानवाला, रमेश पटेरीया, नागजी पटेल, चिंतामणी कार आणि इतर काही शिल्पकारांच्या कलाकृती त्यांनी जमवल्या. याशिवाय काश्मीर व अन्य ठिकाणच्या मार्बल व लाकूड या माध्यमांतील कलाकृतीही त्यांच्या संग्रहालयात सामील झाल्या. आज कलेला उत्तम गुंतवणूक म्हणून जो भाव येत आहे त्याबद्दल ते म्हणतात, ‘याचा पुढे फायदा होईल वा न होईल, हे बरोबर की चूक, हे हिशेब मी कधीच केले नाहीत. ‘कलेसाठी कला’ हेच माझे तत्त्वज्ञान असून उत्तमोत्तम कलाकृतींचा संग्रह करणे हे माझे ध्येय आहे!’
१९७० मध्ये नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट (JNAF)च्या विनंतीवरून जहांगीर निकोल्सन यांनी आपल्या अमूल्य चित्रसंग्रहाचा काही भाग त्यांना दिला. तेथे आधुनिक कलादालन उभारले गेले. कलाप्रेमी जे. आर. डी. टाटा यांनी या कलादालनाला ‘जहांगीर निकोल्सन म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट’ हे नाव दिले. आज त्यांच्या नावाचे हे कलादालन समृद्धपणे उभे आहे.
कलाक्षेत्रात होणाऱ्या बदलांप्रमाणे जहांगीर यांच्या संग्रहात अमूल्य भर पडत होती. भारतीय कलाशैलीचा प्रवास व प्रगतीच्या खुणांची ओळख हा त्यांचा मानस होता. आपल्यामागे भारतीय रसिकांना या संग्रहाचा आनंद घेता यावा म्हणून कलासंग्रहालय उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भूखंड द्यावा यासाठी त्यांची धडपड सुरू होती. केकू गांधीही त्यांना मदत करीत होते.
त्या काळात आम्ही सर्व मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कलादालनाच्या सल्लागार समितीवर होतो. जहांगीर निकोल्सनदेखील होते. चेहऱ्यावरून किंचितसे कठोर वाटणारे, काहीसे ठेंगणे, बहुधा बुशशर्ट व पॅंटमध्ये असलेले जहांगीर ऊर्फ ‘जंगू’ एकदा का कोणाच्या सहवासात आले की त्याला ते क्षणार्धात आपलासा करीत. समितीच्या बैठकीत कलादालनातील प्रदर्शनासाठी आलेल्या अर्जाची छाननी करून कोणाला संधी द्यायची ते ठरवताना केवळ जुजबी बोलून एखाद्याला नाकारणे त्यांना कधीच मंजूर नसे. प्रत्येकाला नाकारताना योग्य कारणे द्यावीत, शिवाय त्यासाठी एक नियमावली करावी असा त्यांचा आग्रह असे. या समितीमध्ये केकू गांधी, जहांगीर साबावाला, अकबर पदमसी, दादीबा पंडोल, प्रफुल्ला डहाणूकर, जया बच्चन, टीना अंबानी आदी मंडळी होती. आणि एकदा का जंगू यांचा बैठकीत प्रवेश झाला की वातावरण एकदम जिवंत अन् प्रफुल्लित होत असे. बैठक संपल्यावर निरनिराळ्या विषयांवर गप्पा होत. मग कधीतरी त्यांच्या कलादालनाचा विषयही निघत असे. पण क्रिकेट, नाटक, चित्रपट यांना भरभरून प्रोत्साहन देणाऱ्या महाराष्ट्र शासनाने कधीच या कलादालनासाठी भूखंड दिला नाही. जहांगीर निकोल्सन यांचे हे स्वप्न साकारण्यापूर्वीच ३१ ऑक्टोबर २००१ रोजी मॉरिशस येथे निधन झाले. चित्रकलेचा एक सच्चा कैवारी गेला.. आपल्यामागे एक प्रचंड असा कलासंग्रह मागे ठेवून!
आपल्यामागे आपला हा जिवापाड जपलेला संग्रह कशा तऱ्हेने सांभाळला जावा याची व्यवस्था त्यांनी आपल्या इच्छापत्रात करून ठेवली होती. आपला मानसपुत्र सायरस गझदर व कैवान कल्याणीवाला यांच्यावर या संग्रहाची काळजी घेण्याची व तो जनतेच्या अवलोकनार्थ प्रदर्शित करण्याची जबाबदारी त्यांनी टाकली. त्यांच्या निधनानंतर भारतीय आधुनिक कलेतील ज्ञान, त्याची समज, उकल आणि त्यातून मिळणारा आनंद प्रतीत व्हावा यासाठी रसिकांना कलासाक्षर करण्यासाठी ‘जहांगीर निकोल्सन आर्ट फाऊंडेशन’ (खठआ) ही संस्था स्थापन करण्यात आली. आज या संस्थेतर्फे जहांगीर यांच्या अमूल्य चित्रांचे संवर्धन, दस्तावेजीकरण केले जाते. याशिवाय आधुनिक कला- इतिहासातील महत्त्वाच्या टप्प्यांवरील प्रगती, चित्रप्रबोधनासाठी ज्ञानकेंद्र, शैक्षणिक व संशोधनात्मक कार्य असे विविध उपक्रमदेखील पुढे सुरू करण्यात येणार आहेत.
जहांगीर निकोल्सन यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा सर्व चित्रसंग्रह छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे काही वर्षांच्या लीजवर देण्यात आला आहे. या वस्तुसंग्रहालयाने स्वतंत्र विंग तयार करून ‘जहांगीर निकोल्सन आर्ट फौंडेशन’ या नावाने आधुनिक चित्रकलेसाठी एक खास विभाग तयार करून तेथे ही चित्रे प्रदर्शित केली आहेत. आज अनेक कलारसिक त्याचा आस्वाद घेत आहेत. जहांगीर निकोल्सन ऊर्फ कलाक्षेत्रातील लाडक्या ‘जंगू’चे हे महाराष्ट्रावर उपकार आहेत!
rajapost@gmail.com