रघुनंदन गोखले

बुद्धिबळात आतापर्यंत जे जे महान खेळाडू झाले त्यामध्ये गॅरी कास्पारोव्हचा क्रमांक बहुतेक लोक पहिला किंवा दुसरा सांगतात. किमान पहिल्या तीन क्रमांकांत गॅरी असतोच. याचे कारण म्हणजे त्याचा अत्युच्च दर्जाचा खेळ.  येत्या आठवडय़ात साठी पार करणारा गॅरी कास्पारोव्ह किती महान आहे, हे त्याच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची विस्ताराने ओळख करून घेतल्यानंतर पटेल..

Aries To Pisces Horoscope Today in Marathi
२६ डिसेंबर पंचांग: शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी १२ पैकी ‘या’ राशींना लक्ष्मीकृपेने मिळेल मेहनतीचे फळ; तुमच्या कुंडलीत धन की कष्ट?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Surya Nakshatra Gochar 2024
२९ डिसेंबरपासून मिळणार छप्परफाड पैसा! सूर्यदेवाच्या कृपेने चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब
shukra gochar 2025 | venus transit in meen
Shukra Gochar: २०२५ सुरु होताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? शुक्राच्या आशीर्वादाने होऊ शकतो प्रचंड धनलाभ
Dommaraju Gukesh Ding Liren World Chess Championship Match Entertainment news
दक्षिणी दिग्विजयाचा अर्थ…
loksatta lokrang Andhra Pradesh and Telangana have a rich tradition of chess
आदर्श घ्यावा असा…
Director and artist Pravin Tarde gifted novel Fakira to Gautami Patil
दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी गौतमी पाटील यांना ‘फकिरा’ कादंबरी दिली भेट
History of Geography How Big is the Universe
भूगोलाचा इतिहास: विश्वाचा आकार केवढा?

गॅरी कास्पारोव्ह उत्तम बुद्धिबळ खेळाडू आहेच; पण तो सोव्हिएत आणि रशियन शिक्षण क्षेत्रातील एक तज्ज्ञदेखील आहे. तो ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या प्रख्यात दैनिकाचा एक स्तंभलेखक राहिला आहे. शेअर बाजारातल्या घडामोडींवर त्याचे बारीक लक्ष असते आणि त्यावर अमेरिकी टेलिव्हिजनवरच्या त्याच्या मुलाखती खुसखुशीत असत.  याव्यतिरिक्त गॅरी कास्पारोव्हला लोकशाहीविषयी खास आस्था आहे. अनेक युरोपीय भाषा अवगत असणाऱ्या गॅरीने रशियात एक लोकशाहीवादी पक्षदेखील काढला होता; पण पुतिनच्या दडपशाहीपुढे त्याचा निभाव लागला नाही आणि अनेक दिवस तुरुंगात काढल्यानंतर त्याने रशियातून आपले चंबूगवाळे आवरले. पुढे अमेरिकेत आश्रय घेतला. ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’च्या  भेटीदरम्यान मी त्याला विचारले होते की, ‘‘सारी सुखे पायाशी लोळण घेत असताना तुला राजकारणाची कल्पना (खरे तर अवदसा!) कशी आठवली?’’ गॅरी म्हणाला, ‘‘आता माझ्या लोकांना लोकशाही मिळवून द्यायची या कल्पनेने मी पछाडलेला आहे.’’

अनातोली कार्पोवला हरवून पहिल्यांदा जगज्जेता बनल्यावर गॅरीला रत्नजडित चषक मिळाला होता. अनेकांना माहिती नसेल की गॅरीने त्याचा लिलाव केला आणि आलेली सगळी रक्कम त्याने चेर्नोबिल अणुस्फोटातील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी दान केली. लिलावात तो चषक विकत घेणारी व्यक्ती होती किरसान इल्युमजिनॉव्ह. हेच पुढे जागतिक बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष झालेले राजकारणी. अझरबैजान आणि अर्मेनियामध्ये दंगली झाल्या त्या वेळी गॅरीने विमान भाडय़ाने घेऊन आपला प्रशिक्षक साखारोव्ह याच्या कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवले होते.

गॅरी कास्पारोव्ह हे काही त्याचे मूळ नाव नव्हतेच. त्याचे नाव होते हॅरी वाईनस्टाईन. वडील कीम वाईनस्टाईन हे ज्यू आणि आई क्लारा आर्मेनियन. (गॅरी आणि ज्युडीथ पोलगार या दोघांच्याही मातांची नावे क्लारा – हा मोठा योगायोग मानला पाहिजे.) ते राहत होते अझरबैजानची राजधानी बाकू येथे. कीम हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमन यांचे चाहते होते. त्यामुळे त्यांनी मुलाचे नाव हॅरी ठेवले. गॅरी एके ठिकाणी म्हणतो की, हॅरी हे नाव रशियनांमध्ये त्या काळी दुर्मीळ होते; पण हॅरी पॉटरच्या यशाने ती परिस्थिती रशियात बदलून गेली. वाईनस्टाईन हे नाव अगदीच ज्यू असल्यामुळे त्यांनी कास्पारोव्ह असे आडनाव बदलून घेतले आणि हॅरीचा गॅरी झाला.

‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीप्रमाणे सर्व अलौकिक बुद्धिमत्तेच्या लोकांना यश लहानपणीच मिळते. गॅरीपण त्याला अपवाद नव्हता. वयाच्या सातव्या वर्षी बाकूमधील पायोनियर पॅलेसमध्ये बुद्धिबळाची सुरुवात करणाऱ्या गॅरी कास्पारोव्हला त्याचे कौशल्य बघून १० व्या वर्षीच माजी जगज्जेता मिखाईल बोटिवनीकच्या ‘बोटिवनीक चेस स्कूल’ या प्रख्यात बुद्धिबळ प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षीच गॅरीने सोव्हिएत संघराज्याचे ज्युनिअर विजेतेपद मिळवले. त्या वेळी त्याने नऊ फेऱ्यांमध्ये ७ गुण मिळवले होते. गॅरी किती झपाटय़ाने प्रगती करत होता याची प्रचीती पुढच्याच वर्षी आली, कारण त्याने पुन्हा हीच स्पर्धा जिंकताना ९ फेऱ्यांत ८.५ गुण कमावले होते.

मिन्स्क या बेलारूस प्रांताच्या (आता तो देश आहे) राजधानीत १९७८ साली सोकोल्स्की स्पर्धा झाली. त्यामध्ये गॅरीला खास आमंत्रण होते आणि त्याने आयोजकांचा विश्वास सार्थ ठरवताना ही स्पर्धा जिंकून दाखविली. ३० वर्षांनंतर बोलताना गॅरी म्हणाला की, या स्पर्धेतील विजयामुळे त्याला आत्मविश्वास आला की आपण जगज्जेता बनू शकू. (आणि त्याने पुढच्या आठ वर्षांत ते शक्य करून दाखवले.) ही स्पर्धा सोव्हियत संघराज्याच्या रेटिंगसाठी होती, तिला आंतरराष्ट्रीय रेटिंगचा दर्जा नव्हता!

सध्या नुकत्याच खेळायला लागलेल्या मुलांनाही आंतरराष्ट्रीय संघटनेकडून प्रोफेसर अर्पाद इलो यांनी तयार केलेले रेटिंग मिळते; पण आपल्या वाचकांना हे माहिती नसेल की, गॅरी कास्पारोव्हच्या वयाला १५ वर्षे पूर्ण झाली तरी आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळाले नव्हते. बिचाऱ्या गॅरीला पहिले रेटिंग मिळाले तेपण अपघाताने. लालफितीने ग्रस्त असलेल्या सोव्हियत बुद्धिबळ संघटनेने मुलांची स्पर्धा समजून गॅरीला बांजा लुका या युगोस्लाव्हियात (सध्याच्या बोस्नियात) होणाऱ्या स्पर्धेत खेळण्यासाठी पाठवून दिले. खरे तर त्या स्पर्धेत सोव्हियत संघराज्यातून पळून गेलेला व्हिक्टर कोर्चनॉय खेळणार होता; पण ऐन वेळी सोव्हियत खेळाडू बहिष्कार घालतील या भीतीने आयोजकांनी त्याचे आमंत्रण रद्द केले आणि गॅरीला संधी मिळाली.

आता या पोरगेल्या खेळाडूला कुठे परत पाठवायचे म्हणून साधे आंतरराष्ट्रीय रेटिंगपण नसलेल्या गॅरी कास्पारोव्हला खेळण्याची संधी देण्यात आली आणि या पट्ठय़ाने एकावर एक विजयांची मालिकाच लावली आणि सगळय़ा ग्रॅण्डमास्टर्सना मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला. या मुलाला ग्रँडमास्टर/आंतरराष्ट्रीय मास्टर उपाधी सोडाच, पण साधे रेटिंगपण नाही. त्याने देदीप्यमान खेळ करून रेटिंग मिळवले- तेपण २५९५!! अचानक गॅरी कास्पारोव्ह जागतिक क्रमांक १५ वर विराजमान झाला. एकेका गुणाने रेटिंग वाढवण्यासाठी रक्त आटवणाऱ्या बुद्धिबळ खेळाडूंनाच या पराक्रमाची महती कळेल.

१९८० उजाडले आणि जागतिक ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धा जर्मनीमधील डॉर्टमुंड येथे होणार असल्याचे जाहीर झाले. इंग्लंडचा नायजेल शॉर्टने भाग घेण्याचे जाहीर केले आणि आता तो स्पर्धेचा विजेता ठरणार याबद्दल कोणाच्याही मनात संशय नव्हता. अचानक सोव्हियत संघराज्याकडून गॅरी कास्पारोव्हचे नाव पुढे आले आणि उत्सुकतेची लाट पसरली. आतापर्यंत पाश्चिमात्य देशांनी गॅरीला प्रत्यक्ष पाहिले नव्हते; पण त्याचे विजेच्या वेगाने येणारे हल्ले बुद्धिबळप्रेमींनी बुद्धिबळविषयक मासिकांमधून अनुभवले होते.

गॅरी आला, त्याने स्पर्धेत भाग घेतला आणि त्याने ज्युनियर जगज्जेतेपद खिशात घातले. एकदा विश्वनाथन आनंद म्हणाला होता की, ज्या वेळी तुम्ही सहज जिंकणार असे लोकांना वाटते तीच सगळय़ात कठीण वेळ असते; पण खरे विजेते अशा वेळी आपला खेळ उंचावतात आणि त्यांना विजेतेपद हुलकावणी देऊच शकत नाही. गॅरी तर अशा वेळी चित्त्याहून चपळ आणि त्याच वेळी सावजाची वाट बघणाऱ्या संयमी मगरीसारखा असायचा. एक वेळ अजगराच्या तावडीतून भक्ष्य सुटेल, पण गॅरीच्या तावडीत आलेला प्रतिस्पर्धी पूर्ण गुण दिल्याशिवाय सुटणे अशक्यच!

युरोपात होणारे माल्टा ऑलिम्पियाड १९८० हे सोव्हियत संघाची कसोटी पाहणारे होते. एक म्हणजे त्यांना हंगेरीकडून आपले हक्काचे (मानले गेलेले) सुवर्णपदक परत घ्यायचे होते. १९७६ साली इस्रायलमधील हैफा येथे झालेल्या ऑलिम्पियाडवर सोव्हियत संघराज्याने बहिष्कार टाकला होता, तर १९७८ साली ब्युनोस आइरेस येथील ऑलिम्पियाडमध्ये हंगेरीने चुरशीच्या लढतीत स्पास्की आणि पेट्रोस्यानसारखे माजी जगज्जेते असणाऱ्या सोव्हियत संघाच्या पुढे सुवर्ण पटकावले होते. अशा परिस्थितीत जगज्जेत्या कार्पोवच्या आधिपत्याखालील संघात पोरगेल्या कास्पारोव्हचा समावेश राखीव खेळाडू म्हणून केला गेला.

माल्टाला कार्पोव आजारी पडला आणि सोव्हियत संघ काळजीत पडला; परंतु सुवर्णपदक विजेत्या युरी बालाशोव्ह आणि कांस्यपदक विजेत्या गॅरी कास्पारोव्हच्या खेळामुळे सोव्हियत संघाने सुवर्णपदक मिळवले. अशा रीतीने १९८० साली कास्पारोव्हने आंतरराष्ट्रीय पदके मिळवून आपली सुरुवात जोरदार केली. पुढे होती सोव्हियत संघराज्याची अजिंक्यपद स्पर्धा! जगातील सर्वात कठीण स्पर्धा मानली जाणारी ही स्पर्धा जिंकणे हे गॅरीपुढील सर्वात मोठे आव्हान होते. १८ फेऱ्यांची सोव्हियत अजिंक्यपद स्पर्धा म्हणजे कास्पारोव्ह आणि लेव्ह साखीस या दोघांमधील शर्यत होती. साखीसने गॅरीला हरवले; पण अखेर तरुण गॅरीने साखीसला गाठले आणि संयुक्त विजेतेपदाचा तो सर्वात लहान मानकरी ठरला.

 १९८२ साली मे महिन्यात युगोस्लाव्हियात बोगोयनो या गावी एक मोठी स्पर्धा भरवण्यात आली होती. तेथे कास्पारोव्हबरोबर बोरिस स्पास्की आणि टायग्रान पेट्रोस्यान हे माजी जगज्जेतेपण खेळत होते. अशा बलाढय़ खेळाडूंच्या मांदियाळीत तरुण गॅरीने बाजी मारली. अपराजित राहून त्याने पहिला क्रमांक मिळवला. आता पुढील लक्ष्य होते ते मॉस्को येथील जागतिक स्पर्धेची निवडफेरी गाजवणे. मॉस्को इंटर झोनल स्पर्धेतून जगज्जेतेपदासाठी दोन जणांची निवड होणार होती.

आता वाचकांना वाचूनही कंटाळा आला असेल की, प्रत्येक स्पर्धा गॅरी मोठय़ा फरकाने जिंकत होता. त्याच्या प्रतिस्पर्ध्याची काय अवस्था होत असेल याचा विचार करा. गॅरी स्पर्धेला आला म्हटल्यावर प्रत्येक जण दुसऱ्या बक्षिसासाठी सज्ज होत असे. मॉस्को येथे काही वेगळे घडले नव्हते. चुरस होती ती दुसऱ्या जागेसाठी! अलेक्झांडर बेल्याव्हस्की, मिखाईल ताल आणि उल्फ अँडरसन यांच्यातील शर्यतीत बेल्याव्हस्कीने बाजी मारली आणि गॅरीबरोबर जगज्जेतेपदाच्या ‘कॅन्डिडेट’ स्पर्धेत प्रवेश केला. बॉबी फिशर १५ वर्षांचा असताना या स्पर्धेसाठी निवडला गेला होता. १९ वर्षांचा गॅरी हा त्यानंतरचा सर्वात लहान प्रतिभावान खेळाडू होता.

गॅरीच्या बुद्धिबळ जीवनाचा अध्याय एका लेखात संपविणे अशक्य आहे. अनेकांना उत्सुकता असेल की, गॅरीचा बुद्धय़ांक ( कद) काय असेल? आश्चर्याची गोष्ट म्हणे ‘देर स्पिगेल’ नावाच्या जर्मन मासिकाने गॅरीची अनेक प्रकारे चाचणी घेतली आणि त्याचा बुद्धय़ांक आला होता फक्त १३५! तरीही त्याची स्मरणशक्ती अचाट आहे, असा शेरा त्यांनी मारला होता. मॅग्नस कार्लसनचा आणि विश्वनाथन आनंदचा बुद्धय़ांक १८०/१९० आहे असे मानले जाते. तरीही गॅरी कास्पारोव्ह हा अद्वितीय खेळाडू म्हणून गणला जातो याचे कारण त्याने एकाहून एक नोंदवलेले विक्रम. ते आपण पुन्हा कधी तरी पाहू. तूर्तास आपण या महान खेळाडूला १३ एप्रिल रोजी येणाऱ्या साठाव्या वाढदिवसानिमित्त  शुभेच्छा देऊ आणि गॅरी शतायुषी होवो, अशी प्रार्थना करू.

क्रमश:

gokhale.chess@gmail.com

Story img Loader