अरुंधती देवस्थळे

शैली हीच स्वत:ची स्वाक्षरी मानणारे शिल्प-चित्रकार अमेडेव मोडीलियानी म्हणायचे, ‘तो पेंटरच नव्हे, ज्याला आपली सही चित्रावर करावी लागते.’ हे वाचलं आणि जामिनी रॉय आठवले. त्यांचे सगळ्याच सजीवांसाठी असणारे मत्स्याकृती डोळे व अर्धगोलाकृती चेहरे आणि अर्दी व मिनरल रंगांचं पॅलेट पाहताच हे चित्र त्यांचंच आहे हे ताबडतोब लक्षात येतं. तसंच मोडीलियानींचे र्सीअलिस्टिक लंबगोलाकृती चेहरे, विशाल कोरे डोळे- अनेकदा त्यात फक्त निळाई तरंगणारी, लांब माना, लांब, सरळ नाकं आणि छोटय़ाशा जिवणीची शिल्पं आणि चित्रांमधून कॉम्पोझिशनचं कौशल्य दाखवून देणारे, पाहताक्षणी ओळख पटणारे! जेमतेम ३५ वर्षांचं आयुष्य लाभलेले बोहेमियन वृत्तीचे मोडीलियानी आयुष्यभर नियतीशी झगडत राहिले.. ग्रीक शोकांतिकेच्या नायकासारखे!

Murder accused nabbed after 15 years
पत्नीची हत्या, फरार पतीला १५ वर्षांनी अटक
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Marathi actress Tejashri Pradhan talk about social media
“फक्त हे मृगजळासारखं…”, सोशल मीडियाबाबत तेजश्री प्रधानने मांडलं मत; तरुणपिढीला सल्ला देत म्हणाली, “आपण आयुष्यात…”
Madhuri Dixit recalls when her 2 year old son stood up against bully
‘तुला माहितीये का मी कोण आहे?’ माधुरी दीक्षितचा अडीच वर्षांचा मुलगा ‘त्या’ला नडलेला; अभिनेत्री म्हणाली, “अरिनला धक्का…”
balveer fame dev joshi got engaged
गणरायाच्या साक्षीने नवीन सुरुवात! २४ वर्षीय अभिनेत्याने उरकला साखरपुडा, नेपाळमधील मंदिरातून शेअर केला होणाऱ्या पत्नीबरोबरचा फोटो
Girlfriend murder boyfriend, Pimpri-Chinchwad, murder ,
पिंपरी-चिंचवड: प्रेयसीने मित्रांच्या मदतीने प्रियकराची केली हत्या; प्रियकर निघाला ‘बीड’चा!
Baramati Murder case
निर्दयी बाप! अभ्यास करत नाही म्हणून केली ९ वर्षाच्या लेकाची हत्या, बारामतीमधील धक्कादायक घटना
devendra fadnavis shares his first reaction after watching kangana ranaut film
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहिला कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’! अभिनेत्रीचं कौतुक करत म्हणाले, “इंदिरा गांधी यांची भूमिका…”

आयुष्यात न एकही धड सोलो तसंच एकही चित्र ३०० फ्रँक्सपलीकडे न गेलेलं असा मोडीलियानी हा एकमेव चित्रकार असावा, ज्याची किंमत अलीकडेच सदबीच्या लिलावात १७०.४ मिलियन डॉलर्सची बोली गाठणारी ठरली. आज जगातील अनेक नामवंत कलासंग्रहालयांत त्यांची उपस्थिती आवर्जून सुनिश्चित केली जाताना दिसते. मोडीलियानींना कधी त्यांच्या कलेचं चीज झालेलं बघण्याचं सुख लाभलं नाही. आयुष्यभर दारिद्रय़ त्यांना अक्षरश: गांजत राहिलं. जिवंतपणी त्यांच्या कलेपेक्षा दुर्गुणांचीच चर्चा जास्त झाली. ते प्रतिकूलतेशी झुंजत, स्वत्व न हरवता जगत राहिले- अगदी शेवटच्या क्षणापर्यंत!

अमेडेव मोडीलियानी (१८८४-१९२०) यांचा जन्म इटलीतल्या लिवोर्नो गावातला. सधन, सुसंस्कृत ज्यू कुटुंब. वडील व्यापारी. आई शाळेत शिक्षिका. विचारसरणी डावीकडे झुकणारी. मुलांच्या  बालपणी वडिलांना व्यापारात फटका बसला आणि कुटुंब विपन्नावस्थेकडे घसरत गेलं. त्यातून मोडीलियानी नाजूक प्रकृतीचे. दहा वर्षांचे असतानाच टी. बी. झालेला. आर्थिक ओढाताणीसाठी आपल्याला दोषी मानणाऱ्या वडिलांनी स्वत:ला कुटुंबातून वजा केलं. चौदाव्या वर्षी टायफॉइडच्या ग्लानीत असतानाही अमेडेवने आईकडे फ्लोरेन्सला नेऊन सुप्रसिद्ध पलाझो पित्तीमधल्या आर्ट गॅलरीज् आणि उफीझीत जाऊन इटालियन रेनासान्सच्या लिओनार्दो द विंची, टीशन वगैरे चित्रकारांची चित्रं दाखव असा हट्ट  धरला होता. तो तिने पुरवलाही. लिवोर्नोच्या एका आर्ट गॅलरीत त्याला त्यांची एक झलक पाहायला मिळाली होती आणि त्यांच्याकडे मन ओढ घेत होतं. आपला हा मुलगा कदाचित पुढे एक कलाकार होईल अशी नोंद आईने डायरीत त्याच्या किशोरवयातच केली होती.

हेही वाचा>>> अभिजात : मीटीओरा धरती आणि आकाश यामधलं शिल्पकाय?

सुरुवातीला पायाभूत कलेचं शिक्षण लिवोर्नोत घेतल्यावर आर्थिक स्थिती हलाखीची असूनही मोडीलियानींना त्यांच्या इच्छेनुसार फ्लोरेन्सच्या ‘लिबेरा दी न्यूडो’ या न्यूड्स शिकवणाऱ्या कला विद्यालयात शिकायला पाठवण्यात आलं. पुढे त्यांनी व्हेनिसच्या प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या कला अकादमीत पुढलं शिक्षण घेतलं. या काळात त्यांनी एखाद्या नवयुवकाला आयुष्याबद्दलचा जो जोश असावा तसा जोश दर्शवणारं पत्र लिवोर्नोच्या मित्राला लिहिलं होतं- ‘मनात असेल ते स्पष्टपणे बोलून दाखवायचं आणि पुढे जात राहायचं. ज्याच्या मनात नवनवीन महत्त्वाकांक्षा उसळत नाहीत, स्वत:मध्ये काहीतरी नवं घडतंय हे जाणवत नाही तो माणूसच नव्हे!’ मनात खूप हुरुप आणि आत्मविश्वास घेऊन वयाच्या विसाव्या वर्षी आगगाडीने ते पॅरिसला आले. अंगावर बऱ्यापैकी सूट आणि सामानात होता डांटेचा एक ग्रंथ, व्हित्तोर कार्पाचिओच्या ‘दी टू कोर्टेसान्स’ या चित्राची एक छोटीशी प्रतिकृती, पॉल सेझाँच्या ‘बॉय इन ए रेड व्हेस्ट’ची त्यांना अतिशय प्रिय असणारी प्रतिकृती आणि आईने ‘सांभाळून वापर बरं का!’ म्हणून साठवून दिलेले गुजाऱ्यापुरते पैसे. मनात नित्शेचं एक वाक्य कोरलं गेलं होतं- ‘कलाकार असलेल्या व्यक्तीचं घर फक्त पॅरिसच असू शकतं.. युरोपमध्ये इतरत्र कुठेही नाही.’ पॅरिसमध्ये त्यांना रेन्वा, गोगँ, देगा, मातीस या नाव कमावलेल्या ज्येष्ठांचं  आणि पिकासो या साधारण समवयस्क मंडळींचं काम बघायला मिळालं. आणि त्याबरोबरच आफ्रिकन लोककला- विशेषत: मुखवटे आणि त्यामागचे नाटय़मय ते आध्यात्मिक संदर्भ ओळखीचे झाले. पॅरिसला आल्यानंतरच्या काळातलं जरा खरबरीतपणे वापरलेलं करडय़ा, हिरव्या रंगांचं पॅलेट ही एक्स्प्रेशनिस्ट मित्रांची देणगी असावी. मुळातली इटालियन रेनासन्सची अभिजातता आणि आधुनिकतेतले हे प्रभाव याचा मिलाफ मोडीलियानीमध्ये दिसतो. अभावितपणे ते परंपरा आणि आवां गार्द कलेमधली कडी बनले. त्या काळात पॅरिसमधलं मद्यपान आणि वेश्यागमन यांचंही आकर्षण होतं. कडकीमुळे मोडीलियानींना जेवणाची भ्रांत मिटवण्यासाठी रेखाटनं किंवा चित्रं काढून विकावी लागत. कुठल्याशा रेस्तराँमध्ये बसून ते येणाऱ्या- जाणाऱ्यांना त्यांची चित्रं काढून देत आणि त्या बदल्यात काही नाणी किंवा खाद्यपदार्थ मागत. आपण मूळचे इथले नाही, कॅथॉलिक फ्रान्समध्ये बाहेरून आलेले एक कफल्लक ज्यू आहोत, ही भावनाही त्यांना टोचणी लावणारी होती. स्त्रियांच्या बाबतीतही ते विक्षिप्तच होते, तरी त्यांना मैत्रिणींची कमी नसे. अनेकदा भाडं थकल्याने खोलीचे मालक बाहेर हाकलत. एकाने तर त्यांना घराबाहेर काढून थकलेल्या भाडेवसुलीसाठी त्यांचे कॅनव्हास काढून घेऊन त्याचे तुकडे फाटक्या गादीला ठिगळांसाठी वापरले होते. केवळ पोटपाणी सांभाळायलादेखील त्यांना अनेक खटपटी कराव्या लागत. पॉल अलेक्झाण्डर नावाचा एक शल्यचिकित्सक त्यांच्याकडून १०-२० फ्रँक्सना चित्रे विकत घेई आणि विके. तो पुढे आर्ट डिलर झाला. अनेक चित्रं त्याच्याकडे पडून राहत. त्यामुळे जरा बरी ऑफर आल्यास मोडीलियानींना ती परत घेऊन विकण्याची मुभा असे. पिकासोशी मोडीलियानींची ‘लव्ह-हेट’ प्रकारची मैत्री होती. एकदा भणंग मोडीलियानींचं अव्यवहारीपण सुधारावं म्हणून ते त्यांना प्रशस्त बंगल्यात ऐषारामात राहणाऱ्या रेन्वाकडे घेऊन गेले होते. यशाने असं जीवन शक्य होतं कलाकाराला, हे दाखवावं म्हणून. पण मोडीलियानींवर त्याचा अपेक्षित परिणाम न झाल्याने पिकासोंनी विकत घेतलेल्या त्यांच्या चित्रावर भराभर रंग लावून आपलं एक चित्र रंगवून टाकलं होतं. तंगीतही वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांचे कपडे सुरुचीपूर्ण असत.. अगदी पिकासोंना हेवा वाटण्यासारखे. पिकासोंनी त्यांच्या कपडय़ांच्या निवडीबद्दल प्रशंसात्मक लिहिलं होतं.

हेही वाचा >>> अभिजात : कलाविष्कारातील अष्टपैलुत्व नतालिया गोंचारोवा

पॅरिसमधल्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक हेड्सची शिल्पं केली. लाकूड आणि बांधकामात वापरल्या जाण्यामुळे सहज मिळू शकणाऱ्या लाइम स्टोनमधली. १९१२ च्या सलों ऑटोममधल्या प्रदर्शनात त्यांनी आपली ही शिल्पं मांडली होती, पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. लांब मान, लंबगोल चेहरा, जरा जास्तच लांब तरतरीत नाक, विशाल डोळे, मिटलेले नाजूक ओठ अशी चित्रांची वैशिष्टय़ं असलेली शिल्पं.. पण त्याचं मोल करणारा  कोणी जोहरी का नसावा? त्यांनी शिल्पांचा नाद सोडला आणि ते फक्त पेंटिंग्ज करू लागले. कारण दगडाचं ड्रीिलग करताना जे सूक्ष्म कण आणि धूळ नाकाद्वारे फुप्फुसात जात असे त्याचा त्यांना त्रास होऊ लागला होता. ती शिल्पं त्यांनी आपल्या स्टुडिओत नेऊन मेणबत्तीच्या स्टॅन्डसारखी वापरली. त्यांच्या मृत्यूनंतर मित्रांनी ताब्यात घेतलेली ती उपेक्षित शिल्पं आता मोमा आणि स्मिथसोनीयनमध्ये लावली गेली आहेत.

१९१६ मध्ये सुदैवाने त्यांना लिओपॉल्ड झोब्रॉव्हस्की हा पोलिश आर्ट डीलर भेटला. त्याने मोडीलियानींना घरदार देऊन, प्राथमिक गरजांची सोय करून पेंटिंगचं सामान पुरवलं आणि न्यूड्स करायचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्यांनी मोठीथोरली न्यूड्स केली.. जास्तच भरलेल्या अंगाची. या मालिकेचा सोलो त्यांनी आयोजित करताना प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी एक लांब-रुंद न्यूड खिडकीच्या फ्रेममध्ये लावलं होतं. त्यावर पोलिसांनी अश्लीलतेचा आरोप करून ते चित्र उतरवायला लावलं. नंतर चार-आठ दिवसांनी प्रदर्शन परत सुरू झालं. पण हा अनुभव मोडीलियानींना निराश करणारा ठरला. पुढे अगदी १९५० मध्ये न्यू यॉर्कच्या गुगेनहाईम कलासंग्रहालयाने एका ‘रिक्लायिनग न्यूड’चं पिक्चर पोस्टकार्ड बनवलं तर त्याच्या वापरावर न्यू यॉर्कच्या टपाल खात्याने बंदी घातली आणि त्यानंतर काहीच वर्षांनी याच न्यू यॉर्कमधल्या मोमा संग्रहालयाने मोडीलियानींची ही चित्रं नऊ आकडी अमेरिकन डॉलर्स किमतीला विकत घेतली आणि त्यांचा एक खास शो आयोजित केला.

१९१७ मध्ये त्यांच्या आयुष्यात जीन हेबुटर्न ही एका भल्या घरातली कला शिकणारी मुलगी आली. तिने मात्र कुटुंबाचा प्रखर विरोध सोसून मोडीलियानींवर जिवापाड प्रेम केलं. दोघांना एक मुलगी झाली. आणि पुढल्याच वर्षी ती परत गर्भवती झाली. त्याने १९१९ मध्ये तिच्या काढलेल्या ‘जीन हेबुटर्न सीटेड इन फ्रंट ऑफ द डोअर’ (१२९.५ ७ ८१.५) या सुंदर ऑइल ऑन कॅनव्हासमध्येही टिपिकल एक्स्प्रेशनिस्टिक रंगसंगती, सुरुचीपूर्ण पोशाख आणि जीनच्या काळ्या मखमली स्कर्टला अक्षरश: मखमली फील दिलाय. पण जीनची देहबोली थकलेली, क्लांत मुद्रा, डोळ्यांत बुब्बुळेच नसल्याने चेहऱ्यावर आलेली भावहीन उदासी. कुपोषण आणि न्यूमोनियाने १९२० मध्ये मोडीलियानींचा बळी घेतला. गर्भारपणाच्या नवव्या महिन्यात असलेल्या जीनने त्याच्या दुसऱ्याच दिवशी शोकाकुल अवस्थेत पाचव्या मजल्याच्या खिडकीतून उडी घेऊन जीव दिला. जीन आणि मोडीलियानींच्या अंत्ययात्रेत पिकासो, ब्रांकुसी, लेजर वगैरे कलाकारही जड मनाने सामील झाले होते. जीनने कबरीतही त्याची साथ निभावली. रंगांच्या दुनियेत मोनोक्रोमॅटिक शोकांतिका ही एकच असावी.

arundhati.deosthale@gmail.com

Story img Loader