सिद्धार्थ केळकर
क्रिकेटज्ञानामध्ये आपण जितक्या वरच्या इयत्तेत आहोत, तितकी फुटबॉलमध्ये आपली चाहते म्हणून प्रगती झालेली नाही. मने जोडणारा, माणसे जोडणारा, जग जोडणारा फुटबॉल हा खेळ त्यातल्या नायकांचे अवकाश विस्तारतो आहे. त्यासाठी त्यांची चर्चा महत्त्वाची…
असे म्हणतात, की खेळ माणसे जोडतो आणि मनेही. फुटबॉलसारखा २०० हून अधिक देशांत खेळला जाणारा खेळ तर जगही जोडतो. भारतासारख्या क्रिकेटला ‘धर्म’ मानणाऱ्या देशात फुटबॉलचे गारूड रुजायला सुरुवात झाली गेल्या दोन दशकांत. तशी फुटबॉलची भुरळ पडली होती, ती १९८६ च्या विश्वकरंडक सामन्याचा अंतिम सामना दूरदर्शनवर दाखविल्यापासून. पण खऱ्या अर्थाने ‘रसिक प्रेक्षक’ मिळाला, तो केबल टीव्हीवरून इंग्लिश प्रीमियर लीगसह अन्य युरोपीय देशांत खेळविल्या जाणाऱ्या साखळी स्पर्धा भारतात दिसायला लागल्यापासून. आता खरे तर साठच्या दशकातच भारतीय फुटबॉलने मोठा पराक्रम गाजवला होता. पण त्याची चर्चा घडायला त्या पराक्रमाचे ‘मैदान’ हे चित्रपटरूप आधी चित्रपटगृहांत आणि नंतर ओटीटी पडद्यावर यावे लागले. पी. के. बॅनर्जी, चुनी गोस्वामी आणि प्रशिक्षक एस. ए. रहीम हे आपले त्या वेळचे, सध्याच्या परिभाषेतील ‘स्टार’ खेळाडू. पण त्यांची आठवण ठसायलाही ‘गूगल सर्च’ येण्यापर्यंतची वाट पाहावी लागली. सांगण्याचा मुद्दा असा, की एकूणच भारतीयांच्या फुटबॉलवेडाचा इतिहास अगदी नजीकचा आहे आणि त्याचे वर्तमान अजूनही खेळाचे तंत्र समजून घेण्यापर्यंत गेलेले नाही, तर त्यात पराक्रम गाजविणाऱ्या नायकांच्या कौशल्यांमुळे आश्चर्यमुग्ध होण्यापर्यंतच मर्यादित आहे!
ज्यांना फुटबॉलवेडे म्हणता येईल, असे अनेकजण विश्वकरंडक स्पर्धांतील सामन्यांच्या जोडीने ‘युरो’ आणि ‘कोपा अमेरिका’ या स्पर्धाही तितक्याच तन्मयतेने पाहतात. शिवाय, ते युरोपातील सर्व साखळी स्पर्धांचे चाहते असतातच, हे वेगळे सांगायला नको. आता चाहते म्हटले की चर्चाही आलीच. पण भारतीयांच्या क्रिकेट आणि फुटबॉलवरील चर्चांमध्ये काही मूलभूत फरक आहेत. उदाहरणार्थ, क्रिकेटमध्ये आता आपण इतक्या वरच्या इयत्तेत आहोत, की फलंदाजाने काय सुंदर फटका मारला इथपर्यंत न थांबता, फलंदाज फलंदाजीसाठी तयार होताना त्याच्या बॅटची मागची बाजू ‘थर्ड-मॅन’ या क्षेत्ररक्षण स्थानाच्या कोनात असल्याने त्याचा हा उजव्या बाजूला मारलेला फटका अचूक बसणारच होता वगैरेपर्यंतच्या विश्लेषणापर्यंत जाऊन पोहोचतो. फुटबॉलमध्ये आपली चाहते म्हणूनही एवढी प्रगती झालेली नाही. म्हणूनच मग आपली चर्चा मर्यादित राहते ती अमुक एक खेळाडू फार भारी खेळतो इथपर्यंतच. पण हरकत नाही. खेळाची रुची वाढविण्यासाठी आणि मग तो रुजण्यासाठी अखेर त्यात काही नायक असावेच लागतात. विश्वकरंडक, ‘युरो’, ‘कोपा अमेरिका’ पाहत पाहत, त्यातील नायकांची चर्चा करत करतच आपण बायचुंग भुतिया आणि सुनील छेत्री या देशी नायकांपर्यंतचा प्रवास केला आहे. आणि हेच नायक निवृत्त झाल्यानंतर विश्लेषकाच्या भूमिकेत जाऊन आपले फुटबॉलचे चर्चाविश्व हळूहळू विस्तारत आहेत. म्हणूनच या विस्ताराच्या अनुषंगाने ‘युरो’ आणि ‘कोपा अमेरिका’ स्पर्धांतील नायकांच्या केवळ अप्रतिम वैयक्तिक कौशल्यांबद्दल नाही तर सध्याच्या त्यांच्या संघातील स्थानांबद्दल चर्चा करणे अधिक औचित्याचे.
हेही वाचा >>> निवडणूक निकालाच्या बोधकथा…!
मुळात ‘युरो’ आणि ‘कोपा अमेरिका’ स्पर्धांत खेळणारे बहुतांश खेळाडू युरोपातील साखळी स्पर्धांत खेळतात. त्यामुळे या दोन्ही स्पर्धा सुरू होताना, युरोपीयन साखळी स्पर्धांत चमकदार कामगिरी करणारे कोणते खेळाडू याही स्पर्धांत चमकणार अशीच उत्सुकता असते आणि ती स्वाभाविकच. या खेळाडूंमुळे ही स्पर्धा आणखी रोचक होते आणि पाहिली जाते हेही खरेच; पण पूर्ण खरे नाही. फुटबॉल हा सांघिक खेळ असल्याने जिंकायचे असेल तर योग्य ठिकाणी योग्य कौशल्ये असलेला योग्य खेळाडूच खेळवावा लागतो. एखाद्या खेळाडू्च्या मागे ‘चमकदार शैलीचा’, ‘वलयांकित’ वगैरे विशेषणे लावली जातात म्हणून तो संघात असला पाहिजे असले लाड नाहीत. युरोपीयन देशांतील संघ हे बहुतेकदा कसोशीने पाळतात आणि स्पर्धेसाठी संघाचे सर्वोत्तम मिश्रण काय असेल त्यानुसार संघ निवडतात. त्यामुळे इथे ज्या खेळाडूंचा उल्लेख होतो आहे ते माहीत असतीलच असे नाही; पण या स्पर्धांच्या निमित्ताने माहीत करून घेतले तर फुटबॉल पाहण्यातला आनंद आणखी वाढेल. तर यंदाच्या युरो स्पर्धेत एकीकडे पोर्तुगालचा प्रशिक्षक रॉबेर्तो मार्टिनेझने जुन्या जाणत्या खेळाडूंवर भर दिलेला दिसतो, तेथे दुसरीकडे इंग्लंडचा प्रशिक्षक गॅरेथ साउथगेटला इंग्लंडच्या विजयाची इमारत तरुण पायांवर उभी करायची आहे, असे त्याच्या संघनिवडीवरून जाणवते. ‘बीबीसी’ने अगदी अलीकडेच यंदाचा युरो करंडक कोणता देश जिंकणार, असे काही माजी फुटबॉलपटू आणि विश्लेषकांना विचारले होते. यंदाही इंग्लंडलाच चांगली संधी आहे, असा जवळपास प्रत्येकाचा सूर होता- त्याचे कारण संघनिवड. इंग्लंडची भिस्त तरुण पायांवर असली तरी तिशीतला कर्णधार हॅरी केन संघात आहे. कारण त्याचा गोल मारण्याचा धडाका. त्याला ‘गोल मशीन’ असेच संबोधले जाते. जर्मनीतल्या बायर्न म्युनिक क्लबकडून खेळणाऱ्या केनने या हंगामात गोलधडाका लावला होता. शिवाय, त्याचा बायर्नकडून जर्मनीत खेळण्याचा अनुभवही युरो स्पर्धेत उपयुक्त ठरू शकतो. गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डचा अनुभव कामी आला आणि विशीतले ज्युड बेलिंगहॅम, फिल फॉडेन, बुकायो साका यांची उत्तम साथ मिळाली तर इंग्लंडला यंदा संधी आहेच. पोर्तुगालने पुन्हा एकदा आपली भिस्त ख्रिास्तियानो रोनाल्डोवर ठेवली आहे. चाळिशीच्या उंबरठ्यावरील रोनाल्डो संघात का, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. पण गोल करण्याची अर्धी संधी मिळाली तरी तिचे सोने करणारा आणि सौदी अरेबियातील साखळी सामन्यांत सर्वाधिक गोल करणारा रोनाल्डो पोर्तुगालसाठी महत्त्वाचाच आहे. चाळिशीतील बचावपटू पेपेवरही पोर्तुगालने आपली भिस्त ठेवली आहे. यजमान जर्मनीला एकवीसवर्षीय जमाल मुसियाला गोलजाळ्यापर्यंत धडका मारण्यासाठी आपल्या सर्पिलाकार चालींचा किती फायदा करून देतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे. जबरदस्त क्षमता, पण परिणामकारतेत फिकट, असा सध्या थोडा मध्यलयीत असूनदेखील जमाल जर्मनीला हवा आहे, यातच त्याची संघातील अपरिहार्यता लक्षात यावी. त्याला मध्यफळीत अत्यंत हुशार अशा टोनी क्रूसची साथ मिळेल. जर्मनीने आक्रमणाचा भार मात्र तिशी ओलांडलेल्या निक्लास फुलक्रुगवर सोपवल्याचे दिसते. अर्थात, तो काय चीज आहे, हे बोरुशिया डॉर्टमंड आणि रेयाल माद्रिदमधला चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना पाहिलेल्यांना लक्षात येईल. फुलक्रुगच्या बोरुशिया डॉर्टमंडने सामना गमावला असला तरी रेयालला फुलक्रुगच्या काही अप्रतिम चालींनी घाम फोडला होता, हे खरेच. बाकी पस्तिशीतल्या थॉमस म्युलरलाही मोक्याच्या काही सामन्यांत काही वेळासाठी संधी मिळेल असे दिसते. चाली रचण्याची जबाबदारी मात्र काइ हावर्ट्झ आणि लेरॉय सानेवर असेल. गोलजाळे राखायला मॅन्युएल न्यूएर पुन्हा एकदा सज्ज आहे.
हेही वाचा >>> ‘युवराज’ ते धीरोदात्त नेता!
लिव्हरपूलकडून खेळणारे – हंगेरीचा मधल्या फळीतील डॉमिनिक सोबोझ्लाइ आणि स्कॉटलंडचा बचावपटू अँडी रॉबर्टसन हे त्यांच्या त्यांच्या संघाचे आधारस्तंभ असतील. बुंडेसलीगा स्पर्धा जिंकणाऱ्या बायेर लेव्हरकुसेन संघातील स्वित्झर्लंडचा ग्रानित क्झाहका आणि इंटर मिलानकडून खेळणारा अल्बानियाचा ख्रिाश्चान अस्लानी हेही छाप सोडण्यास आतुर आहेत. क्रोएशियाचा संघ चाणाक्ष लुका मॉड्रिचच्या चाली आणि क्रॅमरिक, पासेलिच, पेटकोविच, तसेच इवान पेरिसिचच्या आक्रमणांवर काय धमाल करतो, हेही पाहण्यासारखे असेल. आधुनिक फुटबॉलचे प्रारूप अशी ओळख असलेला आणि इटालियन असूनही ‘नम्र’ असलेला चतुर निकोलो बरेलावर इटलीची मदार आहे. फेडेरिको चिसी सोडता, इटलीच्या संघातील बाकी चेहरे नवखे आहेत. स्पेनच्या संघात चॅम्पियन्स लीग जिंकलेल्या मँचेस्टर सिटी क्लबमधील रॉड्री आणि कार्व्हायाल यांची चलती असेल. अर्थात, छोटे छोटे पास देऊन चाली तयार करण्याच्या स्पेनच्या टिकीटाका पद्धतीसाठी हे दोघेच पुरेसे नाहीत. त्यांना बेएना, पेड्रो, रुइझ आणि आक्रमण फळीतले मोराटा, दानी ओल्मो, टोरेस आदींची भक्कम साथ लागेल. डेन्मार्कचा संघ जेतेपदाच्या शर्यतीत नसतो, पण अतिशय स्पर्धात्मक खेळतो. गेल्या युरोमध्ये मैदानावरच कोसळलेला आणि नंतर अक्षरश: मरणाच्या दारातून परतलेला ख्रिाश्चन एरिक्सन यंदाही डेन्मार्कची स्फूर्ती असेल. रास्मस होइलुंडवर गोलधडाका लावण्याची आणि डॅम्सगार्ड, होयबर्ग, डोलबर्ग, ओल्सेन आदींवर त्याला साथ देण्याची जबाबदारी असेल.
यंदाच्या संभाव्य युरो विजेत्यांत फ्रान्स हा मोठा दावेदार आहे. किलियन एम्बाप्पेचा वेग आणि गोलधडाका लावण्याची क्षमता निर्विवाद आहे. त्याला पवार्ड, उपामेनाचो, कोनाटे यांच्यासारखे बचावपटू, एंगेलो कांटे, च्युआमेनी आणि ग्रीझमान यांची मध्यफळी आणि आक्रमक बुजुर्ग ऑलिव्हर जिरूसारखे खंदे खेळाडू साथ द्यायला आहेत. नेदरलंडकडे व्हर्जिल वॅन डिइक, बचावपटू असूनदेखील दोन्ही बाजूंनी आक्रमणे चढवणारे ब्लिंड आणि डम्फ्रिस, आघाडीच्या फळीत मेम्फिस डीपाय, गाक्पोच्या जोडीला गेल्या विश्वकरंडक स्पर्धेत अर्जेंटिनाला झुंजवणारा वेघोर्स्ट अशी तगडी फळी आहे. बेल्जियमच्या केव्हिन डीब्रॉयनाच्या चालींना गोलात रूपांतरित करण्यासाठी डोकु, लुकाकू किती धावतात, यावर बेल्जियमची झेप अवलंबून असेल. सर्बियाचा ड्रॅगन स्टोकोविच, स्लोव्हेनियाचा बेंजामिन सेस्को, ऑस्ट्रियाचा मार्सेल सॅबित्झर, सर्बियाचा दुसान ताडीच, रोमानियाचा निकोलाय स्टॅन्शिउ, स्लोव्हाकियाचा मिलान स्क्रिनिअर, तुर्कीयेचा आर्दा गुलर, जॉर्जियाचा ख्विचा क्वारास्तखेलिया आणि गेली युरो स्पर्धा गाजवणारा झेक प्रजासत्ताकाचा पॅट्रिक शिक यांच्या खेळाकडेही लक्ष असेल. रशियाविरुद्ध अजूनही युद्ध सुरू असल्याने युक्रेनसाठी ही स्पर्धा भावनिकही आहे. संघातील लोकप्रिय खेळाडू, चेल्सीकडून खेळणारा मिखायलो मुड्रिक संघ सहकाऱ्यांच्या साथीने आपल्या देशवासीयांना विरंगुळ्याबरोबरच प्रेरणेचे क्षण बहाल करण्यास उत्सुक असेल.
तिकडे कोपा अमेरिका स्पर्धाही केवळ अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीभोवती फिरेल असे नाही. गेल्या वेळची कोपा अमेरिका आणि नंतर विश्वकरंडक स्पर्धा जिंकून मेस्सी आता या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला अलविदा करतो का, हे स्पर्धेदरम्यानच स्पष्ट होईल. जखमी नेमारच्या अनुपस्थितीत ब्राझीलच्या उत्फुल्ल सादरीकरणाची जबाबदारी व्हिनिशियस ज्युनिअरवर असेल. रेयाल माद्रिद क्लबकडून खेळणारा उरुग्वेचा फेडेरिको वालव्हर्दीच्या खेळावरही नजरा रोखलेल्या असतील. याशिवाय अर्जेंटिनाचा अलेयांद्रो गार्नाको आणि डिबाला, इक्वेडोरचा केंड्री पेझ, अमेरिकेचा ख्रिास्तियन पुलिसिच आणि मेक्सिकोचा सँटी गेमेनेझ हे यंदा काय हवा करतात, याकडेही लक्ष असेल. कोपा अमेरिका स्पर्धा जोरात होत असली तरी ‘युरो’प्रमाणे त्याचे वैश्विक प्रसारण होत नसल्याने आणि भारतीयांसाठी सामन्यांच्या सगळ्याच वेळा अडनिड्या असल्याने त्याचा प्रेक्षकवर्ग अजूनही मर्यादित राहतो. असो.
नायकांची चर्चा करताना युरो स्पर्धेत खेळणाऱ्या स्पेनच्या संघातील १६ वर्षांच्या एका पोरसवदा खेळाडूची नोंद महत्त्वाची. त्याचे नाव आहे लामिन यमाल. पापुआ न्यू गिनी देशाची नागरिक असलेली आई आणि मूळचे मोरोक्कोचे असलेले वडील यांचा लामिन हा मुलगा स्पेनकडून खेळतो; तेव्हा युरोपातील स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून ‘राष्ट्रवादी’ होऊ पाहणारेही त्याला स्पेन जिंकावा म्हणून प्रोत्साहन देत असतात. तिकडे पोर्तुगालचा ४१ वर्षांचा पेपे हा यंदाच्या युरो स्पर्धेतील सर्वांत ज्येष्ठ खेळाडू. ब्राझीलमध्ये जन्मलेला, वाढलेला, पण पोर्तुगालकडून खेळणाऱ्या पेपेवर चाळिशीतही पोर्तुगालच्या बचावाचा भार टाकला जातो. पेपे पोर्तुगालकडून खेळायला लागला, तेव्हा लामिनचा जन्मही झाला नव्हता. या स्पर्धेत मात्र दोघे एकाच मैदानावर समोरासमोर प्रतिस्पर्धी म्हणून येऊ शकतात, ही या खेळाची कालगती आहे. नायकांची चर्चा करताना लामिन आणि पेपेची नोंद आवश्यक कारण तेच फुटबॉलचे भविष्य आहे आणि या खेळाच्या वैश्विकतेचा सांगावाही.
siddharth.kelkar@expressindia.com