रविमुकुल
ज्येष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांची जन्मशताब्दी आजपासून (१० जुलै) सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आजवर अज्ञात असलेल्या त्यांच्या चित्रकारीतेच्या पैलूबद्दल..
जी. ए. चित्रकारही आहेत हे फार नंतर कळलं. जी. एं.च्या निधनानंतर आलेल्या ‘डोहकाळीमा’ या पुस्तकावर त्यांचंच एक पेंटिंग होतं, तेव्हा. कदाचित त्यांच्या हयातीत त्यांनी हे छापू दिलं नसतं. पेंटिंग चांगलं असूनही. (त्यांच्या एकूणच गूढ(रम्य) वलयात भर टाकण्यासाठी.) दोन काळ्याकभिन्न कडय़ांच्या मधोमध उतरलेली संध्याकाळ. पंख फैलावून दरीतून वर येणारी पाखरं. ही पाखरंही नेहमीसारखी लोभस नव्हेत, तर घारीसारखी. लालसर आभाळ पाण्याच्या लाटांमध्ये मिसळून गेलेलं. एरवी सूर्योदय किंवा सूर्यास्त यांची चित्रं, फोटो हे प्रेक्षणीय असतात.. सर्वानाच दृष्टिसौख्य देणारे असतात. जी. एं.चं हे पेंटिंग मात्र मनात कालवाकालव उत्पन्न करणारं, थोडंसं भयदेखील आणणारं. बारीक बारीक स्ट्रोक्सनी साकारलेलं हे पेंटिंग ऑईलमध्ये केलेलं आहे, हे पाहताक्षणीच कळत होतं.
१० जुलै २०२२ पासून जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष सुरू होत आहे. यानिमित्ताने साहित्यिक जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘चित्रकार’ या पैलूचंदेखील दर्शन रसिकांना व्हावं म्हणून जी. एं.च्या भगिनी नंदा पैठणकर यांनी त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं आहे. जी. एं.नी कॅनव्हासवर केलेली ही पेंटिंग्ज तशी आकाराने लहान आहेत. जवळपास सगळीच निसर्गचित्रं आहेत. (आणि त्यातली बहुतांश विदेशी पिक्चर पोस्टकार्डवरून केलेली असावीत.) यातलं एक लक्षवेधी पेंटिंग म्हणजे त्यांनी केलेलं ‘सेल्फ पोट्र्रेट’! इथे जी. एं.नी गॉगलऐवजी (अपरिहार्यपणे) साधा चष्मा घातला आहे. त्यामुळे त्यांचे डोळे कसे होते, याचं कुतूहल इथे शमतं.
सुरुवातीला जलरंगात चित्रं साकारणाऱ्या जी. ए. कुलकर्णीनी नंतर तैलरंग हे माध्यम निवडलं, हे खरं तर त्यांच्या एकूण अभिव्यक्तीला साजेसं, वजनदार आणि खानदानी. अर्थात त्यांनी मात्र तैलरंगाच्या या गुणविशेषांबरोबरच या माध्यमात दुरुस्तीला वाव आहे, हे मोकळेपणाने सांगून टाकलं आहे. (जी. एं.ची काही वॉटर कलरमधली चित्रं पाहता आली असती तर बरं झालं असतं.)
मराठी साहित्यिकांमध्ये व्यंकटेश माडगूळकर आणि जी. ए. कुलकर्णी हे दोन साहित्यिक चित्रकारही होते. विशेष म्हणजे तात्या माडगूळकर आणि जी. ए. या दोघांच्या चित्रांची शैली त्यांच्या त्यांच्या लेखनासारखीच असल्याचं जाणवतं. तात्या कमीत कमी शब्दांत परिणाम साधत असत. तसंच मोजक्या रेषांत त्यांचं चित्र पूर्ण होत असे. जी. एं.ची लेखनशैली मात्र तालेवार, जुन्या, घरंदाज, बारीक कलाकुसर केलेल्या महावस्त्रासारखी. जसजसं हुंगत जाऊ, तसतसं सूक्ष्म, अतिसूक्ष्म गंधाचे पदर उलगडत जाणारी. तात्यांची भाषा मात्र थेट, मातीचा करकरीत वास देणारी. त्यांची रेषाही तशीच होती. दोन-चार रेघांत ते हरणाचा वेग पकडायचे किंवा सपकन् वेटोळं काढून बगळा आत्ताआत्ताच या पाण्यात स्थिरावलाय याचा जिवंत अनुभव द्यायचे. जी. एं.नी त्यांच्या एका पत्रात ‘माडगूळकरांची कथा जिथे सुरू व्हायला पाहिजे, तिथे संपते..’ अशी तक्रार केली आहे. याचाच दुसरा अर्थ त्यांना नुसतं रेखाचित्र किंवा स्केच ही चित्राची सुरुवात वाटत असावी. बारीकबारीक अचूक तपशील भरत साकारलेलं भव्य पेंटिंग हे त्यांच्या दृष्टिकोनातून ‘पूर्ण चित्र’ असावं.
जी. एं.च्या पत्रांतून अनेक ठिकाणी चित्रांचा, शिल्पांचा उल्लेख येतो. रेम्ब्रांॅ या अभिजात पेंटरच्या चित्रामध्ये त्याने चित्रीत केलेला प्रकाश अनेकांना खुणावतो, ते त्याचे बलस्थान वाटते. जी. एं.ना मात्र रेम्ब्रॉंच्या चित्रातला काळोख आणि त्या काळोखातल्या अज्ञात व्यक्तींच्या गूढ हालचाली, त्यांचे काही संकेत दिसत राहतात. हा काळोख म्हणजे केवळ सपाट काळा नसून त्याला एक थंडगार, दीर्घ खोली आहे, हे जी. ए.अधोरेखित करतात.
शाळेत असल्यापासूनच माझं वाचन बऱ्यापैकी होतं. तरीही कॉलेजला जाईपर्यंत मी जी. ए. कुलकर्णी या लेखकाचं काही वाचलेलं नव्हतं. एकतर कुणी त्याबद्दल सांगितलं नव्हतं, त्याशिवाय इंग्रजी नाव घेतलेल्या लेखक-कवींबद्दल माझ्या मनात असलेली सूक्ष्म अढी. सिनिक, ग्रेस अशा नावांपासून मी दूरच असायचो. (‘अलोन’ या कवीच्या अप्रतिम कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ मी अगदी अलीकडेच केलं.) कुडाळचा माझा एक मित्र ‘आमचा सी. टी.’ असा खानोलकरांचा उल्लेख करायचा; ते तर मला तिडीक आणणारंच वाटे. ‘जी. ए. वाच!’ असं आमच्या (मातृभाषा तुळू असलेल्या) प्रा. बाबू उडुपीसरांनी सांगितलं आणि पुढे कित्येक वर्षे मी ‘जीए’मय होऊन गेलो. ‘काजळमाया’, ‘िपगळावेळ’, ‘इस्किलार’ आणि ‘सांजशकुन’ यांतल्या कथा माझ्या विशेष आवडीच्या. कारण त्या मला एक-एक भव्य पेंटिंग पाहत असल्याचा अनुभव द्यायच्या. ‘सांजशकुन’मधली ‘अस्तिस्तोत्र’ ही अगदी दोन-अडीच पानांची कथा तर दरवेळी वाचताना मला एखाद्या ७० एम. एम. थिएटरमध्ये मी एकटय़ाने सिनेमा पाहतो आहे असा अनुभव देते.
‘ते तुमचे जी. ए. आम्हाला कळत नाहीत..’ असं म्हणणाऱ्या अनेकांना मी जी. एं.च्या कथा वाचून दाखवल्या आहेत आणि नंतर त्यातले काही जण जी. एं.च्या बाबतीत माझ्याही पुढे गेलेले पाहिले आहेत. जी. ए. वाचायचे म्हणजे काय करायचं, याचं मला सापडलेलं सूत्र म्हणजे ‘चित्र किंवा चित्रमालिका पाहत राहायची.’ इतर लेखकांसारखं पुस्तकातल्या ओळींवरून नुसती नजर फिरवत वाचायचं नाही, तर जी. एं.च्या प्रत्येक शब्दाचा उच्चार डोक्याच्या कवटीत मोठय़ाने करत, त्याचा नाद ऐकत, मग पुढचा शब्द वाचत, संपूर्ण वाक्याचा अर्थ लक्षात घेत घेत पुढे जायचं. आणि हे एकदा साध्य झालं, की मग जी. ए. तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुम्हाला बरोबर घेऊन जातात. त्यांची अद्भुत दुनिया तुम्हाला दिसायला लागते. पुढे पुढे तर तुम्ही तिथले रहिवासीच होऊन जाता.
उदाहरणार्थ,‘ऑर्फियस’ या कथेमधली ही दोन वाक्यं- ‘परत जाण्याचा रस्ता पाण्याने निथळत असलेल्या कडय़ांमधून फिकट सापाप्रमाणे वर वर चढत गेला होता..’ (यातला ‘साप’ पोटाच्या बाजूने पाहायचा. म्हणजे मग तो रस्ता जास्त स्पष्ट दिसायला लागतो) किंवा ‘विवराच्या अगदी टोकाला असलेले तोंड लहान चांदणीसारखे दिसत होते..’ (इथे अगदी खोल तळातून मान मागे फेकून वर नजर बारीक करून पाहता आलं की झालं.) अशी अक्षरश: पदोपदी आढळणारी उदाहरणे देता येतील. वैयक्तिक खेळातल्या एखाद्या विक्रमवीराने आपलेच विक्रम पुन:पुन्हा मोडत जावेत तसे जी. ए. कुलकर्णी अशा शब्दकळेने वाचकांना निरंतर थक्क करत जातात.
गंमत म्हणजे त्यांच्या कथेतला प्रदेश, तिथली माणसं, त्यांची वाक्यरचना ही दरवेळी वेगळी प्रचीती देतात. एकदा वाचून संपत नाही ते उत्तम पुस्तक असं मला वाटतं. जी. ए. हे मराठीतले असे एक साहित्यिक आहेत.
एकदा माझ्या मित्रांना ‘ऑर्फियस’ (‘पिंगळावेळ’) ही कथा वाचून दाखवत होतो. कथा मोठीच होती. मी स्वत: तर वाचताना रंगून गेलेलो होतोच, पण सगळेच जण एकाग्रचित्ताने अधूनमधून दाद देत ऐकत होते. वातावरणात काहीतरी अद्भुत, अवर्णनीय आनंद भरून गेला होता. संगीतकार ऑर्फियस, त्याची प्रेयसी यूरिडिसी, ते खोल थंडगार पाताळापर्यंत जाणारं विवर, सर्विरस नावाचा िहस्र-मिश्र प्राणी, पाताळातले देवदेवता हे सगळे तिथेच आसपास अदृश्यरूपाने फेर धरत वावरत असल्याचा भास होत होता. जवळपास एक-दीड तास मी वाचन करत होतो. एका छान, चिरस्मरणीय अनुभवातून जातो आहोत असा भाव सर्वाच्या चेहऱ्यावर होता. अर्थात ही किमया जी. ए. या अजोड प्रतिभावंताची.
जी. ए. यांच्या ‘विदूषक’ आणि ‘ऑर्फियस’ या दोन कथा म्हणजे मला बुद्धिबळाच्या एकाच ग्रँड मास्टरने दोन्ही बाजूने खेळलेला खेळ वाटतो. बुद्धी पणाला लावून केलेली खेळी.. ही आता शेवटचीच असे आपल्याला वाटते तेव्हाच जी. ए. हा ग्रँडमास्टर पलीकडच्या बाजूला जातो आणि सांगतो, ‘नाही; अजून एक चाल आहे!’ आपण ते बुद्धिचातुर्य पाहून दिपून जातो, तोच हाच खेळाडू पुन्हा पहिल्या जागी येतो आणि आणखी एक चाल खेळतो.. आणि हा दोन्ही बाजूंनी अव्याहत चाललेला खेळ आपण थक्क होऊन पाहतच राहतो.
धारवाडसारख्या तेव्हा खूपच दूर वाटणाऱ्या अशा गावात राहणारे जी. ए. कुलकर्णी हे सुरुवातीपासूनच एक गूढ होतं. अगदी नावापासूनच! जी. ए. म्हणजे काय, हेही कित्येक दिवस लोकांना माहिती नव्हतं. गुरुनाथ आबाजी कुलकर्णी असं संपूर्ण नाव असणाऱ्या या लेखकाविषयी टप्प्याटप्प्याने माहिती येत होती. त्यांचा कुणाकुणाशी पत्रव्यवहार आहे, ते दिसतात कसे, मराठीचे लेखक असून इंग्रजीचे प्राध्यापक असल्याची माहिती, तिथल्या क्लबात नेमाने त्यांचं रमी खेळायला जाणं (आणि सोबतच्या भिडूंना जीएंच्या लेखक असण्याची सुतरामही कल्पना नसणं!) वगैरे वगैरे.
जी. एं.चं साक्षात दर्शन झालं ते इचलकरंजीला. पुलंच्या आग्रहावरून ते ‘फाय फाउंडेशन’चा पुरस्कार स्वीकारायला सदेह आले होते. तेव्हाच तो त्यांचा सुप्रसिद्ध काळा चष्मा पाहायला मिळाला. त्यांच्याबरोबरच ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनाही पुरस्कार होता. पण संपूर्ण कार्यक्रमात आणि नंतरही जी. ए. हीच एक मोठी बातमी ठरली होती. (वर्तमानपत्रांत छापून आलेला त्यांचा तो गळाबंद कोट, सुहास्य मुद्रा असा फोटो मी ‘काजळमाया’च्या अर्पणपत्रिकेखाली चिकटवून ठेवला होता.) त्यानंतर मात्र जयवंत दळवी, म. द. हातकणंगलेकर अशांच्या लेखांतून जी. एं.चं आणखीनच बुचकळ्यात पाडणारं व्यक्तिमत्त्व लोकांसमोर येत गेलं. ज्येष्ठ चित्रकार सुभाष अवचट यांनी धारवाडला जाऊन त्यांचे फोटो काढले, त्यांच्यावर एक छोटं पुस्तकही लिहिलं. (पुस्तकावर अवचट यांनी केलेलं जी. एं.चं पोट्र्रेट पुस्तकापेक्षाही जास्त लक्षात राहिलं.) साधारणपणे आम्हा चित्रकारांकडे मुखपृष्ठ/ चित्रासाठी लेखकाचं हस्तलिखित येतं. मात्र ‘मौजे’च्या श्री. पु. भागवतांनी जी. एं.च्या कथा वाचायला सुभाष अवचटांनाच खटाववाडीत बोलावून घेतलं होतं.. हेही जीएंच्या वलयात भर टाकणारं.
जी. एं.च्या दोन मावस बहिणी- प्रभावती आणि नंदा- त्यांना ‘बाबूअण्णा’ म्हणत असत. पुलंच्या बाबतीत जसं त्यांच्याशी असलेली/ नसलेली जवळीक, सलगी दाखवण्यासाठी त्यांना ‘पीएल’, ‘भाई’, ‘भाईकाका’ असं काही लोक म्हणत असत. तसं मात्र जी. एं.च्या बाबतीत कधी झालं नाही. (ते त्यांनी होऊ दिलंच नसतं.) सुनीताबाई देशपांडे यांनीदेखील लिहिलेल्या त्यांच्या प्रत्येक पत्रात जी. एं.चा उल्लेख अत्यंत आदरपूर्वकच केलेला आहे.
‘बाबूअण्णा’ अखेपर्यंत दोन बहिणींचाच राहिला.
vkravimukul@gmail.com