माधव वझे 

कमलाकर नाडकर्णी यांनी वृत्तपत्रीय नाटय़समीक्षेला प्रतिष्ठा आणि दर्जा प्राप्त करून दिला. पाच दशकांहून अधिक काळ वर्तमानपत्र आणि नियतकालिकांमधून नाटकाचे परीक्षण लिहिताना संहितेचे वाचन, नाटकाशी संबंधित अधिकचा तपशील मिळवून घणाघाती टीका किंवा तोंड फाटेस्तोवर स्तुती अशी दोन टोकांवरच नाडकर्णी यांची नाटय़समीक्षा राहिली. नाटय़समीक्षकांची पुढली पिढी त्यांनी आखून दिलेल्या वाटांचा वापर करीत बहरली. नाडकर्णीच्या लेखनात उतरलेल्या त्यांच्या कणखर व्यक्तिमत्त्वाचे स्मरण..

Snehal Tarde
“जिथे मला संधी मिळेल…”, स्नेहल तरडे म्हणाल्या, “धर्म, संस्कृती आणि त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करीन”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Diwali and Books, Book list, Diwali, Books,
पाहू, निवडू आणि वाचू आनंदे…
The Neighbour before the House films by CAMP
कलाकारण : कुठून कुठे जाणार हे इस्रायली?
article nobel prize winner south korean author han kang
विश्व साहित्याला गवसलेला नवा सूर
article about psychological effects of bossy behavior on colleagues
इतिश्री : भावनांची सर्वव्यापी जाणीव
2000-year-old underwater 'Indiana Jones' temple discovered
2,000-year-old temple:समुद्राखाली सापडलेले २००० वर्षे प्राचीन मंदिर कोणता इतिहास सांगते?
History of Ajrak
History of Ajrakh: इजिप्तपासून ते मोहेंजोदारोपर्यंत आधुनिक अजरकचा इतिहास आहे तरी किती जुना?

कमलाकर नाडकर्णीचं निधन झाल्याचं कळलं त्याक्षणी मनात आलं, साठोत्तर मराठी नाटय़समीक्षेचा खणखणीत आवाज आता यानंतर ऐकू येणार नाही. प्रत्यक्षात आणि लेखनातही. नाटय़विषयक चर्चासत्रावेळी सभागृहात पहिल्या काही ओळी सोडून कुठल्यातरी रांगेत मधोमध तो बसलेला असायचा. पण मधेच केव्हातरी त्याच्या त्या काहीशा भरड आणि  खणखणीत आवाजात तो जेव्हा एखादी शंका किंवा एखादा प्रश्न विचारायचा तेव्हा सभागृहाबाहेर असलेल्यांनाही कळायचं की कमलाकर नाडकर्णी बोलतो आहे. त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास असायचा आणि  काहीशी आक्रमकताही.

तीच गोष्ट त्याच्या नाटय़समीक्षेची. नाटय़प्रयोग पाहून त्याच्या मनावर जे काही ठसे उमटत, त्या ठशांना अनुसरत तो त्याचा अभिप्राय व्यक्त करायचा. अभिप्राय देताना कोणाचाही मुलाहिजा त्यानं  कधी ठेवला नाही. नाटककार रत्नाकर मतकरी हे त्याचे जवळचे मित्र. त्यांच्या ‘माझं काय चुकलं?’ या नाटकावर कमलाकरनं लिहिलं, ‘माझं काय चुकलं?’- तेच तर सांगतोय!’  ‘डॅम इट अनु गोरे’ नाटकाच्या समीक्षेचं उपशीर्षक होतं, ‘डॅम गेला फुटून, नाटक गेलं वाहून.’  सैद्धांतिक लिहिण्याचा त्याचा स्वभाव नव्हता आणि तसा दावा त्यानं कधी केलाही नाही. सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटरपासून ते अगदी राज्य नाटय़स्पर्धेपर्यंतचा नट, दिग्दर्शक नाटय़अनुवादक, संघटक असा प्रदीर्घ  अनुभव त्याच्या गाठीशी होता. शिवाय लहानपणापासूनच आत्तापर्यंत किती नाटकं त्यानं पाहिली त्याची गणतीच नाही. त्यामुळे रंगभूमीच्या सर्व घटकांचं सम्यक ज्ञान त्याला होतं.  

कमलाकर नाटय़समीक्षा लेखन करत आला ते ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘महानगर’, ‘सकाळ’ (मुंबई) या वृत्तपत्रांमध्ये. वर्तमानपत्राच्या वाचकांसाठी लिहायचं तर ते लेखन जसं आटोपशीर पाहिजे, तसं वाचनीयही असलं पाहिजे. म्हणूनच की  काय त्यानं वाचकांशी संवाद साधत असल्यासारखं बोली भाषेत लिहिणं पसंत केलं. आपलं लेखन क्लिष्ट, बोजड वाटणार नाही याची काळजी घेतली.  टोकाची विधानं त्याच्या समीक्षा लेखनात वारंवार येतात. अमुक एका नटाच्या अभिनयाला तोड नाही असं म्हणेल आणि दुसऱ्या एखाद्या नट-नटीला थेट मोडीत काढेल. आणि खिल्ली उडवताना हा जवळचा, तो लांबचा असा भेदभाव नाही. त्यानं ज्यांची खिल्ली उडवली  त्यांनी कमलाकरचा रंग धरला नाही. त्याची नाटय़ समीक्षा वात्रट होती, पण कधीच आचरट नव्हती.  ही त्याची शैली कमालीची लोकप्रिय झाली आणि तीच खरं तर कमलाकरची ओळख ठरली.

पण ती अपुरी ओळख आहे. त्याच्या ‘नाटकं ठेवणीतली’ (पंडित पब्लिकेशन्स, कणकवली,२०१० ), ‘महानगरी नाटकं (अक्षर प्रकाशन, मुंबई, २०१६), ‘चाकोरीतली आणि बिनचाकोरीतली नाटकी नाटकं (मनोविकास प्रकाशन, पुणे, २०१८) ह्या पुस्तकांमध्ये त्यानं वेळोवेळी जी विधानं केली आहेत, जे प्रकट चिंतन केलं आहे, ती त्याची खरी ओळख म्हणता येईल.

संतोष पवार यांचं ‘यदाकदाचित’ हे प्रहसन खूपच गाजलं. त्याचं तोंडभरून कौतुक केल्यावर कमलाकर नाडकर्णीनं म्हटलं, ‘‘फार्सिकल पद्धतीच्या नाटकाला गांभीर्याची आणि तात्पर्याची झालर कशाला?’’  – कमलाकरचं हे भाष्य आपल्या रंगभूमीच्या जुन्या  सवयीकडे लक्ष वेधतं. नाटकाचा शेवट हृदयस्पर्शी, हळवा केल्याशिवाय आपल्या नाटककारांना ते ‘नाटय़पूर्ण’ झालं आहे असं वाटत नाही आणि प्रेक्षकांनाही  त्याशिवाय चैन पडत नाही. ‘साठेचं काय करायचं?’ हे  राजीव नाईक यांचं नाटक. स्वत:चा  वकूब सामान्य असूनही यशस्वी माणसांची  केवळ हेटाळणीच नाही, तर त्यांचा मत्सर करण्याच्या मानवी स्वभावाचं विश्लेषण करणारं नाटक. त्या नाटकाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असला तरी  काहींनी त्यावर आक्षेप घेतले होते. त्या आक्षेपांना  कमलाकर नाडकर्णीनं उत्तर दिलं. .‘ केवळ फॅशन म्हणून ए.सी.च्या थंड हवेत बसून दलितांमधले उन्हाळे रंगवण्यापेक्षा, सहानुभूतीचे कढ काढण्यापेक्षा, ज्या समाजाशी आपण विशेष परिचित आहोत त्यांच्याबद्दल लिहिणं अधिक अस्सल नाही का?’ –  मध्यमवर्गीय लेखकांकडून ‘क्रांतिकारक’ लेखन होत नसल्याच्या ताक्रारीवरचं त्याचं ते उत्तर होतं. 

‘उजळल्या दिशा’ या नाटकामध्ये ‘विद्रोहाला करुणेची जोड हवी’ असा एक विचार पुन:पुन्हा पुढे आणून नाटककार सदानंद मोरे यांनी दलित जाणिवेचा मुद्दा एका व्यापक स्तरावर नेला आहे. पण त्या मुद्दय़ाची पुरेशी घुसळण नाटकामध्ये झाली नाही, असं कमलाकर नाडकर्णीला वाटलेलं दिसतं. आपली नापसंती त्यानं काहीशा तिखटपणे व्यक्त केली आहे. तो म्हणतो, ‘या नाटकात तुल्यबळ पक्षच नाहीत. आमनेसामने वाद नाहीत. त्यामुळेच हे नाटक चर्चानाटक होत नाही . हे नाटक दलितांबद्दलचं विशफुल थिंकिंग आहे. म्हणून ‘उजळल्या दिशा’ या शीर्षकाऐवजी ‘उजळाव्या दिशा’ हे शीर्षक सयुक्तिक ठरलं असतं.’

‘सर आले धावून’ या नाटकाबद्दलचा कमलाकरचा  अभिप्राय एकाच वेळी त्याची नेमकी समज  आणि  त्याची सुप्रसिद्ध शैली यांचा मेळ म्हणता येईल. : ‘अनेक हिंदी चित्रपटांनी पिळवटून काढलेल्या या कथेच्या रूपात कसलं नावीन्य नाही की नाटय़ नाही. केवळ लोकप्रिय नटाला केंद्रस्थानी ठेवून पात्राचं रूपांतर व्यक्तिरेखेत कसं काय होणार? त्या पात्राचं स्वभावरेखाटन हवं. वेगवेगळय़ा घटनेतील त्याच्या वागण्याचं आणि कृतीचं दर्शन हवं.. केवळ शेजारच्या पात्रानं सांगितलेल्या माहितीवर नाटकातल्या व्यक्तिरेखा उभ्या राहू शकल्या असत्या तर  वृत्तपत्रातले कितीतरी वार्ताहर नाटककार होऊ शकले असते.’’

वृत्तपत्रीय नाटय़समीक्षा लिहून कमलाकर थांबला नाही. १८४३ ते १९५० या प्रदीर्घ कालावधीतल्या  विस्मरणात गेलेल्या मराठी नाटकांचा त्यानं प्रयत्नपूर्वक आणि अभ्यासपूर्ण धांडोळा घेतला. ‘नाटकं ठेवणीतली’ या त्याच्या पुस्तकात त्यानं प्रत्येक नाटकाचं आशयसूत्र सांगून त्या त्या नाटकावर  धावतं भाष्यही केलं. त्याचं हे पुस्तक म्हणजे आपल्या रंगभूमीचा एक मोठाच दस्ताऐवज ठरलं आहे. वृत्तपत्रीय नाटय़समीक्षेच्या पलिकडे जाऊन कमलाकरनं हे एक ऐतिहासिक कार्य केलं आहे. आणि त्यानं ते निखळ कर्तव्य भावनेनं केलं आहे. ते करतानाची त्याची कळकळ त्याच्या ह्या उद्गारांमध्ये कोणालाही जाणवावी. ते उद्गार असे आहेत :  ‘शालेय अभ्यासक्रमातील मराठीच्या पुस्तकात साहित्यातील अन्य प्रकारांचा जेवढा परिचय इयत्तेगणिक होत जातो तेवढा तो नाटकांचा होत नाही. कुठल्याही नाटकांना अनुदान देण्याऐवजी  अशा विधायक कार्यासाठी शासन काही साहाय्य करील तर मुळापासून काही अभिरुचीची बैठक तयार होईल..’ (नाटकं ठेवणीतली).

अत्यंत विनम्र भावानं तो या रंगभूमीच्या जगात वावरला. ‘नाटकं ठेवणीतली’ ह्या पुस्तकाच्या निमित्तानं त्याला असंख्य नाटकांच्या पुस्तकांचा शोध घ्यावा लागला. पण त्याबद्दल त्याची तक्रार नाही..  ‘पुस्तकांसाठी  मी महाराष्ट्र पालथा वगैरे घातलेला नाही किंवा पिंजूनही काढलेला नाही.’ असं खटय़ाळपणे त्यानं म्हटलं आहे. आणि हेही त्याचेच शब्द :  ‘जुन्या नव्या मान्यवर रंगकर्मीच्या मैफलीत श्रवणभक्ती करणारा आणि प्रश्नकर्ता म्हणून मी भूमिका बजावली आहे.. मी तारे तोडलेत. मला तारांगण दाखवणं मायबाप रसिकांचं काम. करावं तसं भरावं. मी तय्यार!’’

रंगभूमी हे कमलाकर नाडकर्णीच्या लेखी त्याचं प्रेयस आणि श्रेयस, दोन्ही होतं.

vazemadhav@hotmail.com