कमलाकर नाडकर्णी
‘लोकसत्ता’चे माजी संपादक, उर्दूचे व्यासंगी, फर्डे वक्ते, संगीत रंगभूमीच्या पुनरुज्जीवनात सिंहाचा वाटा असलेले नाटककार, चित्रपट लेखक, माजी खासदार असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले विद्याधर गोखले यांची जन्मशताब्दी ४ जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या दोन वेगळ्या पठडीतल्या नाटकांविषयी..
अण्णा गोखले एक सिद्धहस्त नाटककार. आपलं बहुतांश नाटय़कर्तृत्व त्यांनी संगीत रंगभूमीसाठी बहाल केलं. मागच्या जमान्यात मराठी रंगभूमीला सुवर्णकाळ दाखवला तो संगीत रंगभूमीने. नटांनी तिची ‘उभी मैफल’ करून टाकून तिला झोपवलं. तिला नीटनेटकं आणि जागं करायचं काम अण्णांनी एकनिष्ठतेने मनावर घेतलं आणि अखेपर्यंत त्यांनी संगीत नाटकाचा ‘नादखुळा’ सोडला नाही. स्वातंत्रोत्तर काळात व्यावसायिक संगीत नाटक जे काही नावारूपाला आलं त्याचं बरचसं श्रेय अण्णांनाच द्यावं लागेल यात शंकाच नाही.
संगीत रंगभूमीचे समालोचक आणि अभ्यासक विद्याधरीय संगीत नाटकाबद्दल उन्मेखून लिहितीलच. आज मी त्यांच्या वेगळय़ा नाटकीय वाटेचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सकृतदर्शनी वेगवेगळय़ा कारणांमुळे ते पारंपरिकेतेचे प्रेमी, रुळलेली वाट चोखाळणारे वाटू शकतील. पण पावशतकाहून अधिक काळ त्यांचा सहवास लाभलेल्या मला ते खरं कसं वाटणार?
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचं सभागृह. नाटय़विषयावरची व्याख्यानमाला. अण्णा संगीत नाटकाविषयी बोलणार याबद्दल खात्री होती. कारण तीच त्यांची ख्याती होती. मी संगीत नाटकांबाबत बराचसा अनभिज्ञच होतो, आजही आहेच. त्यामुळे आणि ऐकण्याचा कान उपजत असल्यामुळे या भाषणाला आवर्जून उपस्थित राहिलो. मी हॉलमध्ये प्रवेशलो. हॉल भरला होता. व्याख्यानाचा विषय होता- ‘रत्नाकर मतकरीं’चं नाटक ‘खोल खोल पाणी’. पौंगंडावस्थेतील मुलांची मानसिकता, त्यातून सेक्सविषयी त्यांचे होणारे गैरसमज आणि पालकांचा जुनाट दृष्टिकोन हा धाडसी आशय त्यात अत्यंत नाटय़पूर्ण रीतीने प्रभावीपणे मांडला होता. अशा या अत्याधुनिक नाटकावर वक्तव्य कुणाचं? तर कट्टर पारंपरिक समजल्या जाणाऱ्या गोखले अण्णांचं. माझ्या डोक्यात काही समेवरच येईना. जबरदस्त टीकेचे वाक्बाण ऐकण्याच्या तयारीने मी सावध राहिलो. माझ्या शेजारी बसलेल्या उत्सुक मतकरींची मन:स्थिती त्यापेक्षा वेगळी नव्हती. आणि.. अण्णांनी माझी पुरेपूर कोंडी केली! त्यांनी या नाटकाचं इतकं अभ्यासपूर्ण आणि आस्वादक विश्लेषण केलं, की त्याला तोडच नव्हती. ‘‘प्राध्यापकीय समीक्षेनेदेखील या नाटकातील वेगळेपणाची अशी निर्लेप आलोचना केली नव्हती. गौरव केला नव्हता.’’ सभेला हजर असलेल्या नाटककारांचाही अण्णांनी त्रिफळा उडवला. सांगा, कसं म्हणायचं अण्णांना प्रतिगामी! राजकारणात अण्णा कोणत्याही पक्षाचे असोत कलाकारणात मात्र ते प्रायोगिकच होते.
दादरचं छबिलदासचं नाटय़गृह हा मुंबईतला एकमेव प्रायोगिक नाटय़रंगमंच होता त्यावेळची गोष्ट. आधुनिक नाटकाचे प्रवर्तक अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं ‘संगीत सौभद्र’ नाटक म्हणजे मराठी नाटय़विश्वातील सुवर्णपान. मोराचं पीस नव्हे पिसाराच! शतक उलटून गेलं तरी सौभद्रची लज्जत आणि गानमाधुर्य किंचितही कमी झालेलं नाही. अशा या ऐतिहासिक नाटकाची महत्ता मराठीतर युवकांनाही कळावी म्हणून गोखले अण्णांनी काय करावं? छबिलदासच्या रंगमंचावर हिंदी सौभद्रचा प्रयोग घडवला. तोही रुळांचे रंगवलेले पडदे लावून! काय म्हणावं या प्रयोगाला आणि गोखले अण्णांना? कुणाला म्हणणार प्रतिगामी? या प्रयोगाची अजिबात दखल न घेणाऱ्या त्यावेळच्या कडव्या समीक्षकांना की, प्रायोगिकांना सदैव पाण्यात पाहणाऱ्यांना? की छबिलदासपर्यंत सौभद्र नेणाऱ्या अण्णांना?
‘ती फुलराणी’ हे नाटक सिद्ध
करताना पु. ल. देशपांडे यांनी ‘संतू रंगिली’ या रूपांतरित गुजराती नाटकाचा आधार घेतला होता असं म्हणतात. २९ जानेवारी १९७५ रोजी हे नाटक रंगमंचावर आलं. एक तळागाळातली मुलगी – फुले विकणारी कशी आमूलाग्र बदलते. भाषातज्ज्ञ तिचे अवघे रूप कसे पालटतो याचं मनोहारी चित्रण या नाटकात रूपांतरकाराने केलं आहे. एकूण भाषाविभ्रम आणि भाषाविकास यासाठीच हे नाटक वापरलं गेलं, असं म्हटलं तर ते गैर ठरणार नाही. पण इतकं असूनही या रूपांतरावरची पाश्चात्त्य छाप पुसली जात नाही. कारण भाषेचा तज्ज्ञ वगैरे संकल्पना आपल्याकडे अजून रुळलेल्या नाहीत. एक काल्पनिक गंमत म्हणूनच प्रेक्षक नाटकाचा आनंद लुटतात.
अण्णांचं ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ हे नाटक १९७२च्या डिसेंबरात रंगमंचावर आलं. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत यांच्यातील संघर्ष मराठीकरणात उभा केलाय. अशा मांडणीमुळे प्रेक्षकांना दोन्ही बाजांचे संगीत तर ऐकायला मिळतंच, पण शिवाय समाजातील तळाचा आणि वरचा असे दोन्ही वर्गही अधोरेखित होतात. महाराष्ट्रीयपण आपोआपच उतरते. कुठे काही चिकटवलेपण येत नाही. शिवाय वर्गसंघर्षही सहजच, स्वाभाविकपणे प्रकट होतो. रंजनाबरोबरच आशयघनताही नाटकाला लाभते. मला तर ‘सम्राज्ञी’ ही ‘फुलराणी’ पेक्षाही कांकणभर अधिकच सरस वाटते. शॉ सारख्या नाटककाराचा परिचय मराठी व्यावसायिक रंगमंचाला ‘राणी’च्या अगोदर दोन वर्षे करून देणाऱ्या नाटय़काराला पुरोगामीच म्हणावे लागणार!
‘साक्षीदार’ हे विद्याधर गोखले यांचं पहिलं नाटक. ख्यातकीर्त रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांच्या ‘विटनेस फॉर द प्रॉस्युकेशन’ या नाटकाचं हे रूपांतर. आय. एन. टी. या संस्थेनं ते सादर केलं. आत्माराम भेंडे यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकात ते स्वत: आणि आशा भेंडे नायक-नायिका होत्या. प्रमुख वकिलाच्या भूमिकेत होते नटवर्य मामा पेंडसे. त्यांचे ते दर्शन आजही स्मरणात आहे. लांब काळा कोट, पांढरी पॅन्ट, डोक्यावर पुणेरी केशरी पगडी.. मला तर इतिहासातल्या पुस्तकातल्या चित्रातले समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर आठवायचे. मराठी रंगभूमीला रहस्य नाटकाची विशेष ओळखदेखील नव्हती. तेव्हा लिहिलेलं हे नाटक. ‘साक्षीदार’ नाटक आचार्य अत्र्यांनी पाहिलं आणि त्याच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी माधव काझीची केस न्यायालयीन स्वरूपात आणली. ‘तो मी नव्हेच’ सिद्ध झालं. हे खरं असो किंवा नसो. ‘साक्षीदार’चा पहिला प्रयोग ७ फेब्रुवारी १९६० रोजी झाला, तर ‘तो मी नव्हेच’चा शुभारंभ दिल्ली येथे आयफॅक्स थिएटर येथे १९६२ रोजी झाला. थोडक्यात, मराठी रंगभूमीवरील पहिल्या न्यायालयीन नाटकाचे कर्ते विद्याधर गोखले होते हे विसरून चालणार नाही. विद्याधर गोखले यांची ही पहिलीच नाटय़कृती. प्रारंभालाच त्यांनी चाकोरी बाहेरची वाट धरली हे महत्त्वाचं.
नाटकाने गोष्टीच्या गुंत्यात न अडकता प्रेक्षकांना समग्र, उत्कट अनुभव दिला पाहिजे, असं प्रायोगिक रंगकर्मी नेहमी म्हणतात (आणि आपली कलाकृती त्यानुसार आकारास आणतात). या विधानाची प्रचीती अण्णा गोखले यांच्या संगीत-नृत्यमय ‘बावनखणी’ या नाटकातून पूर्णाशानं येते. विद्वान चित्रकार व इतिहासाचे गाढे अभ्यासक द. ग. गोडसे यांची नाटकाच्या पुस्तकाला लाभलेली ‘मला म्हणती, बावनखणी’ ही प्रस्तावना रसिकांनी मुळातूनच वाचायला हवी.
नाटकाच्या पुस्तकाच्या निवेदनात नाटककार ‘भाण’ या लोककला प्रकाराची ओळख करून दिल्यानंतर लिहितात- अशा या ‘भाण’ नामक नाटय़प्रकारावर आधारलेलं, पण बहुपात्री असलेलं हे आगळय़ा आणि वेगळय़ा धर्तीचं नाटक ‘बावनखणी.’ दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीतील उत्तर पेशवाईच्या १८०० ते १८१० या कालखंडामधील, पुण्याच्या विख्यात बावनखणीचे चार तासात जुळेल तेवढं दर्शन घडवण्याचा प्रयत्न या नाटकात केला आहे. अर्थात हे सांगोपांग दर्शन आहे असा दावा नाही.
त्या काळच्या समाजातील सुज्ञजनांची कामशक्तीकडे पाहण्याची वृत्ती विटकी नव्हती, विकृत नव्हती तर निरोगी होती. ‘काम हा शत्रू नव्हे, तर धर्म-अविरोधी काम हा रसिकत्व फुलवणारा मित्र आहे,’ अशीच त्यांची धारणा होती. म्हणूनच बावनखणीकडे ‘हीन विषयसुखाचा उकिरडा’ म्हणून ते पाहत नव्हते, तर संगीत-नृत्यदि कलांचे निधान म्हणूनच सुज्ञ सुसंकृत माणसे या गणिका-वस्तीकडे पाहत होती. ही विचारधारा या नाटकात अनुस्यूत आहे. नेहमीच्या पद्धतीचं हे सुश्लिष्ट बांधणीच्या कथानकाचं नाटक नव्हे तर १० प्रसंगांतून घडवलेलं ‘बावनखणी दर्शन’ आहे. जणू काही ‘बावनखणी’ हीच या नाटकाची नायिका आहे हे लक्षात ठेवूनच रसिकांनी या वेगळय़ा शैलीच्या नाटकाची रंगत लुटावी.
नाटककाराच्या या निवेदनावरून एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते की, आपण काय करीत आहोत याची पूर्ण जाणीव त्याला आहे. ‘माझ्या हातून हे घडलं, कसं घडलं, मला माहीत नाही’ वगैरे भोंदू भाषा तो करीत नाही.
या नाटकात वेगवेगळय़ा वृत्ती-प्रवृत्तीच्या गणिका आहेत तसे गणंगही आहेत. हो, एक इंग्रज जॉन्सनही आहे. तो पाश्चात्त्य चालीवरचे ‘मिठी मिठी नाइटिंगेल’ हे गाणं रोशनच्या नृत्याला साथ देत म्हणतो.
बावनखणीत एकल नृत्य आहे, तसंच समूह नृत्यही आहे. यातली काही पात्रे प्रेक्षकांशी थेट संवाद साधतात. वास्तूच नाटकाची व्यक्तिरेखा होऊन सूत्रधाराचं किंवा पर्यटकांच्या गाईडचं काम बजावते. या कथामुक्त नाटकाचं नेपथ्य भरतमुनींच्या नाटय़शास्त्रावर आधारलेलं होतं. ज्याचा त्या पूर्वी प्रायोगिक नाटय़दिग्दर्शिका विजया मेहता यांनी वापर केला होता. (विशाखदत्ताचे ‘मुद्राराक्षस’ आणि कालिदासांचे ‘शाकुंतल’ दोन्ही नाटय़प्रयोगांचे नेपथ्यकार व संगीतकार अनुक्रमे द. ग. गोडसे, भास्कर चंदावरकर) प्रायोगिक, लोककलांच्या मुळांचा शोध घेत होते. त्याच दरम्यान अण्णा तेच कार्य आपल्या संगीत नाटकांच्या माध्यमातून करीत होते. या सर्व वैशिष्टय़ांमुळे बावनखणी हे नाटक मला व्यावसायिक रंगभूमीवरचे प्रायोगिक नाटकच वाटते. (जसे ‘लेकुरे उदंड झाली’ आणि ‘बॅरिस्टर’)
बावनखणी नाटकाच्या पदांबद्दल आणि गाण्यांबद्दल म्या पामरें काय वदावे? ती रसाळ आहेत, मधाळ आहेत आणि घायाळ करणारी आहेत. ती नाटय़प्रवाहात मिसळतात आणि धुंदी निर्माण करतात. नाटय़ाचार्य देवल यांच्यानंतर इतकी सुबोध पदं रंगभूमीवर दुसरी निनादली नाहीत. नाटकात चावटपणा विखुरलेला आहे, पण गणिका सहवासात तो नसेल तर त्यांना गणिका कोण म्हणेल? मद्यात िझग नसेल तर ती दारू कसची? असो!
‘साक्षीदार’ हे अण्णांचं पहिलं नाटक, ‘बावनखणी’ हे अखेरचं गाजलेलं नाटक. थोडक्यात, दोन प्रयोगसदृश नाटकांच्या खांबांमध्ये व्यावसायिक संगीत नाटकांचा झुला अण्णांनी झुलत ठेवला.
अण्णांना ‘ऑथेल्लो’ नाटक संगीत स्वरूपात करायचं होतं. त्यासाठी ऑथेल्लोच्या ऑपेराचं इंग्रजी पुस्तकही मी त्यांना मिळवून दिलं होतं. नाटय़ाचार्य देवलांच्या ‘झुंझारराव’ मधील ‘चंद्रकांत राजाची कन्या’ या पंक्तींना साग्रसंगीत मैत्रिणी मिळाल्या असत्या, पण..
उत्तुंग माणसे त्यांच्या जवळ गेलो की दृष्टीबाहेर जातात. लांब गेलो की ती केवळ बाह्यकृती दिसतात. हे तसेच तर झाले नसेल ना?
अण्णांच्या नाटय़कर्तृत्वाला अभिवादन!
kamalakarn74 @gmail.com