प्रशांत कुलकर्णी prashantcartoonist@gmail.com
जगातल्या प्रत्येक क्षेत्रांत आणि त्यातही सर्जनशील क्षेत्रात महिलांचा प्रभाव पुरुषांच्या बरोबरीनं असताना व्यंगचित्रकलेमध्ये महिला फारशा का दिसत नाहीत, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. अर्थातच याचं उत्तर खुद्द महिला किंवा समाजशास्त्रज्ञ अथवा मानसशास्त्रज्ञच देऊ शकतील. संख्येच्या बाबतीत महिला व्यंगचित्रकारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, हे खरंय. पण जगातल्या काही महिलांनी मात्र दर्जाच्या बाबतीत याही क्षेत्रात आपला प्रभाव पाडून हेही क्षेत्र आम्हाला वर्ज्य नाही हे दाखवून दिलंय.
एका मुलीला चित्रकलेमध्ये- आणि त्यातही व्यंगचित्रकलेमध्ये खूपच रस होता. तिची इच्छा होती की आपण कॉमिक्स बनवावीत. छोटय़ा छोटय़ा गोष्टी रचून त्या कॉमिक्सच्या माध्यमातून लोकांना सांगाव्यात. तिने तशी पात्रं व गोष्ट तयार केली आणि त्यातले काही नमुने घेऊन एका सिंडिकेटकडे ती गेली. हे सिंडिकेटवाले एकाच वेळी अनेक भाषांमध्ये आणि वर्तमानपत्रांमध्ये किंवा नियतकालिकांमध्ये तुमची व्यंगचित्रं छापून आणू शकतात. म्हणजे तुम्हाला एका चित्राचे अनेक वाचक आणि प्रचंड पैसे मिळू शकतात. त्यामुळे या सिंडिकेटवाल्यांचा प्रभाव भरपूर असतो. तर त्या मुलीला या सिंडिकेटवाल्यांनी काही सूचना केल्या. त्यांनी असं सांगितलं की, ‘तुमच्या चित्रांमध्ये एक जो बंडखोर दरोडेखोर आहे तो बदला. त्याच्याऐवजी दुसरं कुणीतरी घ्या. आणि मुख्य म्हणजे तुमचं नाव बदला. कारण कॉमिक्स स्ट्रिपसाठी बाईचं नाव आम्हाला ठीक वाटत नाही!!’ त्यानंतर त्या बिचाऱ्या मुलीनं ती व्यक्तिरेखा बदलून तिथे एक भटक्या पत्रकार निर्माण केला आणि स्वत:चं नाव जे डेलिया असं होतं, ते बदलून ‘डेल’ असं केलं. (कसं छान पुरुषी नाव वाटतं, नाही का!)
यथावकाश ‘ब्रँड स्टार, रिपोर्टर’ ही डेल मेसिक या व्यंगचित्रकर्तीची कॉमिक्स प्रसिद्ध झाली. ती लोकप्रियही झाली आणि २५० वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होऊ लागली. हे उदाहरण अमेरिकेतील आहे. ६०-७० वर्षांपूर्वीचं. डेल मेसिक १९८२ मध्ये निवृत्त झाल्या असल्या तरी त्यांची ही कॉमिक स्ट्रिप पुढंही ३०-४० वर्ष विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होत होती.
बऱ्याच कॉमिक्स स्ट्रिप्ससाठी लेखक आणि व्यंगचित्रकार हे वेगवेगळे असतात. दोघं मिळून एक कॉमिक स्ट्रिप रचतात. पण डेल मेसिक स्वत:च या कॉमिक्सची लेखिका व व्यंगचित्रकार होत्या. या पार्श्वभूमीवर ७० वर्ष ही स्ट्रिप प्रसिद्ध होणं ही फार मोठी गोष्ट आहे. अमेरिकेतल्या या महिला (!) व्यंगचित्रकाराला रसिकांनी दिलेला हा मानाचा मुजराच म्हणावा लागेल !
सिग्ने विल्किन्सन या आणखी एक अमेरिकन व्यंगचित्रकार. संपादकीय व्यंगचित्रांसाठी असलेला अत्यंत प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला व्यंगचित्रकार आहेत. त्यांचं हे सोबतचं व्यंगचित्र स्त्री-पुरुष वेतनातील असमानता या विषयावरचं भेदक भाष्य म्हणावं लागेल. भाष्य, रेखाटन आणि विनोद अशा सर्वच कसोटय़ांवर हे चित्र उत्तम आहे. बायकांना राजकारण, समाजकारण कळतं का? समजतं का? उमजतं का? आणि त्यावर भाष्य वगैरे करता येतं का? असे टिपिकल पुरुषी वृत्तीचे प्रश्न जे विचारतात त्यांना या बाईचं सोबतचं चित्र म्हणजे सणसणीत थप्पड आहे. सुरुवातीला त्या पत्रकार म्हणून अनेक वर्तमानपत्रांमध्ये काम करत होत्या. पण कला आणि राजकारण या दोन्हीमध्ये त्यांना रस असल्यानं आपला कल व्यंगचित्रांकडे आहे हे त्यांना जाणवलं आणि त्यांनी राजकीय व्यंगचित्रांबरोबरच सामाजिक व्यंगचित्रं काढायला सुरुवात केली.
अमेरिकेमध्ये ज्या काही तुरळक महिला फक्त राजकीय व्यंगचित्रं काढतात, त्यापैकी लिसा या महत्त्वाच्या व्यंगचित्रकार आहेत. रिपब्लिकन पक्षाला त्यांची सहानुभूती आहे. अमेरिकेतल्या १०० दैनिकांतून त्यांची व्यंगचित्रं नियमित प्रसिद्ध होत असतात. उत्तम अर्कचित्र, विनोदी पद्धतीने केलेली विषयाची मांडणी, सुखद रंगसंगती आणि नेमकं भाष्य ही त्यांच्या व्यंगचित्रांची वैशिष्टय़ं सांगता येतील. नासाला मिळणाऱ्या निधीत कपात झाल्यावर त्यांनी ‘अंतराळात भरकटलेला नासाचा अंतराळवीर’ हे एक खूप प्रभावी चित्र काढलं होतं. डेमोक्रॅटिक राज्यात राहून लीसा त्यांच्यावर टीका करणारी व्यंगचित्रं काढतात. यावरून त्यांच्यावर शाब्दिक हल्ले किंवा त्यांना ट्रोल केलं गेलंय का? असं विचारल्यावर त्या म्हणतात, ‘‘मी बऱ्याच वेळेला ‘हेट स्पीच’कडे दुर्लक्ष करते. कारण गरम डोक्याच्या वाचकांशी संवाद अशक्य असतो. पण अर्थातच कौतुक करणारे वाचकही भरपूर आहेत. अनेक महिला व्यंगचित्रकारांकडे राजकीय व्यंगचित्र काढण्याची क्षमता आहे. पण या क्षेत्रातील अनिश्चितता पाहता त्यांना डिस्ने स्टुडिओत काम करणं अधिक सुरक्षित वाटत असावं,’’ असं निरीक्षण त्या नोंदवतात.
लिझा डोनेली या आणखीन एक महत्त्वाच्या व्यंगचित्रकार. लहानपणी लिझा यांच्या आईने त्यांना व्यंगचित्रांची भरपूर पुस्तकं आणून दिली. त्यातून तिला काहीतरी वेगळी दृष्टी मिळत गेली. मुख्य म्हणजे तिच्या पालकांनी मुलांना वाढवताना मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव केला नाही. त्यामुळेच कालांतरानं लिझा या ‘न्यू यॉर्कर’ या अत्यंत प्रतिष्ठित मासिकाच्या महत्त्वाच्या व्यंगचित्रकार ठरल्या. त्यांच्या व्यंगचित्रांत कौटुंबिक विषय असतात. त्यात अर्थातच प्रियकर-प्रेयसी, शाळा, घरातले प्रसंग, लहान मुलं, आई-वडील अशा अनेक विषयांनी त्यांची व्यंगचित्रं खुलत असतात. त्यांतले प्रसंग कधी बाजारपेठेत, कधी हॉटेलच्या रूममध्ये, कधी घरी, तर कधी एखाद्या कॅफेमध्ये घडत असतात. काही उदाहरणं द्यायची तर- एका व्यंगचित्रात नवरा-बायको दोघंही बाहेर जाण्याच्या तयारीत दाखवली आहेत. बायको बराच वेळ मेकअप करून आरशासमोर बसली आहे. नवरा अर्थातच वैतागलेला आणि थोडा गबाळा! हे खरं तर सर्वसाधारण दृश्य आहे. पण लिझाची कॉमेंट जबरदस्त आहे आणि ती टिपिकल अमेरिकन आहे. बायको आरशात बघून म्हणते, ‘‘मला वाटतं, मी तुझ्याशिवाय अधिक चांगली दिसेन.’’
अशी अनेक खुसखुशीत व्यंगचित्रं त्यांनी काढली आहेत. अमेरिकेतल्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अनेक व्यासपीठांमध्ये लिझा डोनेली यांनी व्यंगचित्रांसंदर्भात व्याख्यानंही दिली आहेत.
जगभरातल्या या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील राजकीय व्यंगचित्रकारितेतील प्रमुख नाव येतं ते म्हणजे माया कामत यांचं (१९५१- २००१)! मायाचा जन्म मुंबईचा. नायक कुटुंबातला. तिचे वडील मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर होते. लग्नानंतर बंगलोरमध्ये स्थायिक झालेल्या माया कामत यांनी छंद म्हणून पेंटिंग्ज करायला सुरुवात केली. पण एके दिवशी एका कॅनेडियन व्यंगचित्रकाराचा संग्रह पाहून व्यंगचित्रं काढण्याची प्रेरणा किंवा ऊर्मी त्यांच्यामध्ये निर्माण झाली. ऑगस्ट ८५ मध्ये त्यांनी कॉमिक्स स्ट्रिप सुरू केली. घरगुती विषय व प्रसंग आणि नर्मविनोद यामुळे ती लोकप्रिय झाली. नंतर अनेक इंग्रजी वृत्तपत्रांसाठी रोज सामाजिक विषयांवर पॉकेट कार्टून्स काढणं त्यांनी सुरू केलं. पण राजकीय व्यंगचित्रं काढण्याची परवानगी मात्र त्यांना व्यवस्थापनाकडून मिळाली नाही याचं शल्य त्यांना सदैव होतं.
पण पुढे १९९७ मध्ये ‘द एशियन एज’ या वृत्तपत्रामध्ये त्या राजकीय व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाल्या. वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर त्यांचं राजकीय व्यंगचित्र छापलं जाऊ लागल्याचं समाधान आणि आनंद त्यांना मिळू लागला. रेखाटनाची आणि विनोदाची स्वतंत्र शैली त्यांनी निर्माण केली. कुणाचाही प्रभाव त्यांच्या चित्रांवर दिसत नाही. मात्र, त्यांच्या चित्रात राजकीय भाष्य आणि विनोद हे दोन्ही एकमेकांसोबत राहिले, हे विशेष आहे. त्यांनी काढलेल्या हजारो पॉकेट कार्टून्समधील काही नमुने पाहिले तरी त्यांच्या शैलीची कल्पना येईल. उदाहरणार्थ, तोटय़ातील सार्वजनिक उद्योगामधील कर्मचारी आनंदानं म्हणतोय, ‘जगण्यासाठी मला काही काम करावं लागत नाही! मी पब्लिक सेक्टरमध्ये नोकरी करतोय!’ ‘समान नागरी कायदा जरूर असावा! पण स्त्रियावगळता तो सर्वाना लागू असावा!!’ असंही काही पुरुष खाजगीमध्ये बोलताना त्यांनी एका चित्रात दाखवलं आहे. लोकशाही म्हणजे काय? विशेषत: भारतीय लोकशाही म्हणजे काय? यावरचं त्यांचं हे सोबतचं चित्र असंच विलक्षण बोलकं आहे. या अशा असंख्य व्यंगचित्रांतून माया कामत आपलं या क्षेत्रातील प्रभुत्व सिद्ध करतात!!