मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे चित्रा पालेकर लिखित ‘तर… अशी सारी गंमत’ हे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने पुस्तकातील संपादित अंश…

शाळा संपल्यावर मी सेंट झेवियर्स कॉलेज निवडलं ते मुख्यत: टेबलटेनिससाठी. पहिल्या वर्षात अभ्यासाच्या बाबतीत दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. अतिरिक्त भाषा म्हणून मराठीऐवजी मी हट्टाने इंग्रजी निवडली होती. वर्षभराच्या निबंधांत व परीक्षेत ‘कथीड्रल’सारख्या प्रतिष्ठित इंग्रजी शाळेतल्या मुलांहून इंग्रजीत अधिक मार्क मिळवल्याने मी स्वत:वर फारच खूश झाले. त्यात भर पडली मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष परीक्षेच्या निकालाची! त्यावर्षी विद्यापीठाच्या संपूर्ण कलाशाखेतून मी पहिल्या वर्गात प्रथम क्रमांक मिळवला.

आदल्या वर्षी मला एक खूप मोठा धक्का बसला होता. शाळेत पहिली ते अकरावी पहिला नंबर कधीच चुकला नसल्याने बोर्डात नंबरात येईल, अशी माझी अपेक्षा होती, पण शाळेतल्या शाळेतदेखील मी पहिली आले नाही. एक एक मार्क कमी पडून चक्क तिसरी आले. ‘‘पहिल्या तिसांत नाही तर नाही, पण तुला राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली की!’’ म्हणत घरच्यांनी समजूत काढली तरीही रडरड रडले. हळूहळू सावरले खरी, पण आयुष्यात प्रथमच आत्मविश्वासाला खोलवर तडा गेला होता.

मजा करत असताना अचानक आतून कळ येई. वेळ संपली तरी पेपर लिहून संपता संपत नाहीये… मी रस्त्यावरून धावत बसमधून उभ्या उभ्या प्रवास करत तो लिहित आहे, अशी दु:स्वप्नं पडत. मात्र विद्यापीठाच्या निकालानंतर तडा सांधला गेला. आत्मविश्वास पुन्हा उसळी मारून वर आला. त्या काळी कला शाखेत दुसऱ्या वर्षीच्या (इंटरमिजिएटच्या) परीक्षेत पहिला वर्ग मिळवणं सोपं नव्हतं. मी ते आव्हान स्वीकारलं आणि निदान त्या वर्षापुरते इतर छंद बाजूला सारून केवळ अभ्यास व मॅचेसवर लक्ष केंद्रित करायचा निश्चय केला. पण बलटेनिस मोसमाच्या ऐन मध्यावर काही विचित्रच घडायला लागलं.

मॅच पाचव्या गेमपर्यंत लांबली की मला धाप लागे… गळून गेल्यासारखं वाटे. ही गोष्ट मी आम्मा, आन्नूपासून लपवली. मॅच हरल्यावर अशी कारणं देणं म्हणजे रडीचा डावखेळल्यासारखं! पुढे सहामाहीच्या वेळी अतिशय थकवा आल्याने प्रत्येक पेपरात शेवटच्या एक-दोन प्रश्नांची उत्तरं मी थातूरमातूरच लिहिली. मार्क कमी पडले, हे घरी सांगितलं नाही. माझ्यावर विश्वास असल्यामुळे कुणी विचारलं नाही. प्रिलिमच्या परीक्षेत मात्र अघटित घडलं. प्रश्नपत्रिका वाचल्यावर पूर्णपणे ब्लँक झाल्याने मी सर्वच्या सर्व पेपर चक्क कोरे दिले. अर्थात हेदेखील मी गुपित ठेवलं होतं, पण झाडून सगळ्या पेपरात केवळ सिंगल डिजिट मार्क मिळाल्यावर प्राध्यापकांनी ते मुख्याध्यापक फादर जॉन व उपमुख्याध्यापक फादर मासिया यांच्या कानावर घातलं.

त्या दोघांनी माझ्या आईवडिलांना ताबडतोब भेटण्यासाठी बोलावलं आणि माझं गुपित फुटलं! माझा प्रिलिम्समधला पराक्रम ऐकल्यास आम्मा-आन्नू माझ्यावर वैतागतील; माझ्याविषयी निराश होतील, अशी माझी खात्री होती. पण तसं झालं नाही. ते ताबडतोब मला डॉ. अनुपम देसाई नामक मोठ्या डॉक्टरांपाशी घेऊन गेले. डॉक्टरांनी माझी तपासणी करून गोळ्या दिल्या आणि जणू जादू झाली. त्या गोळ्या घेतल्यावर माझा अशक्तपणा नाहीसाच झाला. दोन महिन्यांच्या आत मी इंटरची अंतिम परीक्षा दिली… पूर्वीप्रमाणे हसतखेळत… मजेत! महिनोन् महिने सतावत राहिलेली चिंता नाहीशी झाली… भीती दूर पळाली. मी ब्लँक झाले? कोरे पेपर दिले? हॅ, केवळ स्वप्न होतं ते… दु:स्वप्न!! परीक्षा संपल्याच्या दुसऱ्या दिवशी आम्मा मला पुन्हा डॉक्टर देसाईंना भेटायला घेऊन गेली.

वाटलं, थँक्यू म्हणायला असेल. पण या वेळी त्यांच्या कन्सल्टिंग रूमऐवजी नायर हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागात भेटलो. खरं तर त्याचवेळी मला काही कमी-जास्त असल्याची शंका यायला हवी होती. पण मी आपली पेपर चांगले गेल्याच्या खुशीत मश्गूल! मी डॉक्टरांशी छान गप्पा मारल्या पण त्यांनी निरनिराळ्या तपासण्या करायला लावल्यावर ‘‘त्या का करायच्या, मला काय झालंय?’’ असे साधे प्रश्न काही मी विचारले नाहीत. जेव्हा त्यांनी माझ्या शरीराचा वरचा भाग उघडा करायला लावून छातीची तपासणी केली व समवेत असलेल्या विद्यार्थ्यांना काही समजावलं, तेव्हा मला जराही संकोच वाटला नाही.

जणू मी आणि माझं शरीर या दोन वेगवेगळ्या गोष्टी होत्या!! यानंतर अनेक अनपेक्षित गोष्टी ‘फास्ट मोशन’मध्ये घडल्या. डॉ. देसाईंनी आम्हाला त्यावेळचे अत्यंत नामांकित सर्जन डॉ. के. एन. दस्तुर यांच्याकडे पाठवलं, ज्यांनी मला तपासून ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, स्वत: तातडीने फोन करून मरिन लाइन्सजवळच्या बाच्छा नर्सिंग होममध्ये सगळी व्यवस्था केली. हे रामायण घडलं, ३० एप्रिलच्या संध्याकाळी. एक मेला माझी स्वारी इस्पितळात भरती झाली. दोन मेला माझ्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हे सर्व होत असताना आम्मा, आन्नू, काका तसंच पुण्यातून धावत आलेले मामा-मामी, आजी ही कुटुंबातली मोठी माणसं अतिशय तणावाखाली आहेत, हे मला स्पष्ट दिसत होतं. शस्त्रक्रिया इतक्या तातडीने करावी लागतेय त्या अर्थी ती साधीसुधी नाही, हे मला जाणवलं होतं.

पण आश्चर्याची गोष्ट अशी की मला भीतीचा स्पर्शही झाला नाही. ‘‘मला छान धडधाकट वाटत असताना अचानक हे हार्ट ऑपरेशन कुठून उपटलं?’’ असा साधा प्रश्न मी आम्माला विचारल्याचंही आठवत नाही. खरं सांगते, माझ्या त्यावेळच्या वागण्याचं, मानसिकतेचं कोडं मला अजूनही पूर्णपणे उलगडलेलं नाही. माझी तब्येत ठणठणीत आहे, असा माझा खरोखर विश्वास होता की मी ‘डिनायल’मध्ये जाऊन सत्याचा सामना करण्याचं टाळत होते? माझं वागणं अत्यंत अप्रगल्भतेतून उद्भवलं होतं की माझ्या प्रचंड जीवन-लालसेतून? ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर काही दिवसांनी मला सांगण्यात आलं, की माझ्या हृदयाच्या एका वाल्वमध्ये जन्मापासूनच दोष होता.

पण मूल मोठं होत असताना हा दोष आपोआप नाहीसा होऊ शकतो, त्यामुळे डॉक्टरांनी आईवडिलांना मी मोठी होईस्तोवर सावध राहून वाट पाहण्याचा सल्ला दिला होता. कदाचित माझ्या नैसर्गिक स्वभावावर दडपण येऊ नये, यासाठी आईवडिलांनी मला त्याचा सुगावा लागू दिला नसावा. असो. अर्थात, ही माहिती कळल्यावरही ऑपरेशनच्या काळातल्या माझ्या वागण्यात फरक पडला नाही. त्यावेळी भूत, भविष्य कशाचाही विचार न करता मी केवळ पुढ्यात येणारा क्षण जगत होते, हे नक्की. जे जे घडत होतं, ते ते मी मस्त एन्जॉय करत होते.‘पडू आजारी, मौज हीच वाटे भारी’ या बालपणीच्या कवितेतल्यासारखं!

या शस्त्रक्रियेचे माझ्यावर निरनिराळ्या प्रकारचे ठसे उमटले. आदल्या वर्षापर्यंत माझे केस बऱ्यापैकी लांब होते. दोन घट्ट वेण्या घालून मी अगदी बावळट दिसते, अशी माझी पक्की धारणा असली तरी आम्माला केस कापणं पसंत नाही हे माहीत असल्याने मी घरी कधी तो विषय काढला नाही. पहिल्या वर्षाच्या कॉलेज कॅम्पला गेले असता अचानक क्रांतीची स्फूर्ती येऊन मी एका ख्रिाश्चन मैत्रिणीकरवी माझ्या वेण्या उडवून टाकल्या. परतल्यावर बॉबकट पाहून आम्मा तर नाराज झालीच, पण माझ्या स्मार्टनेसमध्येही फरक पडला नाही.

ऑपरेशननंतर मात्र जखमेत केस जाण्याचा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांनी केस बारीक करण्याचा सल्ला दिला व आम्माने बँडेज कापायची कात्री घेऊन माझे केस स्वत: भादरले. त्या वेळी अनेकांनी मी स्मार्ट दिसते, म्हटलं. बहुधा मी आजारी असल्यामुळे! पण ते खरं मानून मी जी ती हेअरस्टाइल ठेवली, ती आजपर्यंत. नर्सिंग होममधल्या वास्तव्यातच माझा एकोणिसावा वाढदिवस साजरा झाला; इंटरचा रिझल्ट आला; एका टक्क्याने फर्स्ट क्लास गेला म्हणून मी टिपं गाळली आणि उदासीन अवस्थेत हॉस्पिटलच्या कॉटवर पडल्या पडल्या बी.ए.चा फॉर्म भरला. इकॉनॉमिक्स, मॅथेमॅटिक्ससाठी! पुढे जेव्हा या विषयांत करीअर करण्यात रस वाटेना, तेव्हा या निर्णयाचं खापर मी मनातल्या मनात त्यावेळच्या शारीरिक तथा मानसिक अवस्थेवर फोडलं. पण आता वाटतं, त्यात फारसं तथ्य नव्हतं.

कला शाखेतल्या मुलांनी ‘इको’ घ्यायची फॅशन तोवर सुरू झाली होती व मी त्यावेळी स्वत:ला नि:संशय स्कॉलर मानत असल्याने, जरी अतिशय धडधाकट असते तरी तोच निर्णय घेतला असता… अधिक जोशात! हेही असो. अपेक्षेपेक्षा लवकर जखम भरून आल्याने माझ्यातल्या नैसर्गिक ऊर्जेचं डॉक्टरांनी भरभरून कौतुक केलं व महिनाभर हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावर बरी असल्याचं सर्टिफिकेट देऊन घरी बोळवण केली. मात्र माझ्यावर बरीच बंधनंही घालण्यात आली- पुढचा एक महिना कॉलेजला जायचं नाही; दोन महिने जिन्यावरून चढ-उतार करायचे नाही, वर्षभर शारीरिक ताण पडेल अशी कुठलीही अॅक्टिव्हिटी करायची नाही इत्यादी. या बंधनांमुळे माझं आयुष्य लवकरच काय वळण घेणार आहे, याची पुसटशीसुद्धा कल्पना आम्हा कुणाला नव्हती.

Story img Loader