मी‘राहिले दूर घर माझे’ हे नाटक लिहिलं त्याला आता २० र्वष होत आली. अलीकडेच मुंबई विद्यापीठात मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात या नाटकाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने नाटकावर बोलण्यासाठी दोन-चार कॉलेजांत जाण्याचा योग आला. मी हे नाटक का लिहिलं, कसं लिहिलं, हे जाणून घेण्याची विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. अलीकडच्या विद्यार्थ्यांना मागे घडून गेलेल्या गोष्टींत किंवा इतिहासात फारसा रस नसतो. तर फाळणी आणि त्यानंतर वारंवार होणाऱ्या दंगलींमागची कारणं, त्यामागचं राजकारण माहीत नसलेल्या या मुलांना हे फाळणीचं, दंगलीचं नाटक कसं उलगडून दाखवायचं, हा मोठाच प्रश्न होता. मी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत हे २० वर्षांपूर्वीचं नाटक उसवून बघितलं आणि काही नव्या गोष्टी हाती लागल्या.
मी चौऱ्याहत्तरच्या सुमारास नाटक करायला सुरुवात केली. मी लिहीत होतो आणि स्वत:च त्याचे प्रयोग ‘थिएटर’ या संस्थेतर्फे छबिलदास शाळेत करत होतो. छबिलदासशी संबंधित आम्ही सगळेच वेगळ्या नाटकाने झपाटले गेले होतो. जुनं नाकारून नवीन नाटक शोधत होतो. फक्त वरवरची गोष्ट सांगू पाहणारं व्यावसायिक नाटक आम्हाला फारसं आवडत नसे.
सगळं व्यवस्थित चालू आहे असं वाटत असतानाच आसपास काही वेगळ्या, अॅब्सर्ड गोष्टी घडत होत्या. रथयात्रा निघाल्या होत्या. पौराणिक नाटकातला पोशाख चढवलेले नेते हातात तलवार घेऊन रथात बसून निघालेत असे फोटो वर्तमानपत्रांतून छापून येत होते. यातून काय निष्पन्न होईल याचा नेमका अंदाज येत नव्हता. ज्यांना आला होता, ते बोलत नव्हते. पुढे बाबरी मशीद पाडली गेली. बातमी ऐकून छातीत धस्स् झालं. आता काहीतरी भयंकर घडेल असं वाटायला लागलं.
आम्हाला दंगलींचा अनुभव होता. परंतु ही दंगल त्याहून वेगळी होती. बऱ्याच दिवसांपासून दंगलीची संहिता लिहिली जात होती. नीट तालमीही झाल्या होत्या. आता रस्त्यावर दंगलीचा खेळ सुरू होता. उन्माद पसरला होता. तालमींचा आपल्याला अंदाज आला नाही, आपण काही करू शकलो नाही, ही भावना मनाला छळत होती. सारेच हताश, हतबल झाले होते. भयाने, रागाने, संशयाने, नैराश्याने आतून पोखरायला सुरुवात केली होती. लिहिण्याची गरज वाटत होती. बाहेर दंगल सुरू होती, आणि मी घरात बसून लिहीत होतो. काही पात्रं, काही संवाद, काही घटना असं तुकडय़ा-तुकडय़ांत सुचत होतं. पण त्या तुकडय़ांचं नाटक होत नव्हतं. मग नाटक लिहायचा नाद मी सोडला. पण आसपास काहीतरी भयंकर घडलंय आणि आपल्याला साधं लिहिताही आलं नाही, ही जाणीव मला सतत टोचत राहिली.
पुढे सारं शांत झालं असं वाटत असतानाच बॉम्बस्फोट झाले. त्याच्याही म्हणे तालमी चालल्या होत्या. पण त्या कुणाच्या लक्षात आल्या नाहीत. उद्विग्नता आली. आपल्याला यावर काही लिहिता येत नाही, आणि लिहिलं तरी त्याचा काही उपयोग नाही असं वाटून मी नाटक, लेखन सगळं थांबवून टाकलं. कुठे तालीम चालली आहे असं दिसलं तरी भीती वाटायला लागली.
अचानक एक दिवस वामन केंद्रेचा फोन आला. एका नाटकाचं वाचन व्हायचं आहे असं तो म्हणाला. मी नाटक सोडल्याचं त्याला सांगितलं तरी तो आग्रह करत राहिला. म्हणून गुंतायचं नाही असं ठरवून गेलो. वाचनाला दोघे-चौघे जमले होते. असगर वजाहत यांच्या ‘जिस लाहौर नहीं देख्या..’ या हिंदी नाटकाचं वाचन सुरू होतं. हे नाटक सत्तेचाळीस साली देशाची फाळणी झाली त्या घटनेवर आधारित होतं.
फाळणीनंतर पाकिस्तानातल्या लाहोर शहरातले सगळे हिंदू निघून जातात. शहरातल्या एका मोठय़ा हवेलीत एक पंजाबी हिंदू म्हातारी तेवढी दंगलीत हरवलेल्या आपल्या मुलाची वाट बघत थांबते. ती पाकिस्तानात थांबलीय हे कुणाच्याच लक्षात येत नाही. भारतातून लाहोरमध्ये स्थलांतरित झालेल्या एका मुसलमान कुटुंबाला ही हवेली ‘अलॉट’ होते. आणि ते कुटुंब, हिंदू म्हातारी आणि परिसरातले भले, बुरे मुसलमान असा संघर्ष उभा राहतो.
मी लक्ष द्यायचं नाही म्हणता म्हणता नकळत नाटकात ओढला गेलो. मी माझ्या आत गाडून टाकलेलं र्अधकच्चं नाटक उसळून वर यायला लागलं. असगर वजाहतच्या नाटकात मला माझं नाटक दिसू लागलं. मला म्हणायचं आहे ते मला या नाटकाच्या आधारे म्हणता येईल असं वाटू लागलं. वाचन संपलं. हे नाटक मराठीत व्हायला हवं असं सगळ्यांचं मत पडलं. हे नाटक मी भाषांतरित करावं असं सगळे म्हणू लागले. मला नाही म्हणता आलं नाही.
ऑग्देन नॅश (ogden nash) नावाच्या कवीच्या कवितेतल्या दोन ओळी आठवतात..
कुणीही शाळकरी पोर मूर्खासारखं प्रेम करू शकेल
पण मित्रा, तिरस्कार करणं ही एक कला आहे..
आपल्याकडच्या अनेक कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं, इतिहास वाचताना या ओळी हमखास आठवत राहतात. आज तिरस्काराची कलाच खरी कला म्हणून मिरवते आहे. अशा वेळेला खऱ्या कलावंतांची जबाबदारी वाढते. त्यांना युद्ध सोडून पळता येत नाही.
मी ‘जिस लाहौर नहीं देख्या..’ या नाटकाचा आधार घेऊन माझं नाटक रचायला सुरुवात केली. वजाहतांच्या नाटकात जात, धर्म, भाषा, प्रदेश यापेक्षाही माणूस मोठा असतो, हा मुद्दा येत होता. मी लिहीत होतो त्या नाटकात तिरस्काराच्या आजाराने पोखरलेला, भयाने, सुडाने आंधळा झालेला आणि माणसावर प्रेम करण्याची सहज, नैसर्गिक वृत्तीही हरवून बसलेल्या आजच्या माणसाची शोकांतिका जास्त ठळक होत गेली.
हे नाटक करायचं कुठे? अशी चर्चा सुरू झाली. छबिलदास नाटय़गृहात आपल्याच विचारांच्या पाच-पन्नास मित्रांसमोर हे नाटक करण्यात काही अर्थ नव्हता. प्रत्यक्ष रस्त्यावर दंगल करणारे, त्यांना चिथावणारे, पाठबळ देणारे आणि दंगेखोरांच्या मागे मानसिकरीत्या उभे राहून त्यांना बळ देणाऱ्या असंख्यांपर्यंत हे नाटक जाणं गरजेचं होतं. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर याचा प्रयोग झाला तरच हे शक्य होतं.
आता व्यावसायिक नाटक बघणाऱ्या प्रेक्षकांच्या काही अटी असतात. त्यांना वास्तववादी (?), कौटुंबिक नाटक आवडतं. दुसऱ्याच्या घरात डोकावून बघणं आणि आमचं उत्तम चाललंय, जगण्यात कुठल्याही बदलांची गरज नाही, असं वाटायला लावणारं नाटक बघितलं की त्यांना बरं वाटतं. गुदगुल्या होतात. अशी गुदगुल्या करणारी नाटकं त्यांना चालतात. पण तुमच्या जगण्यात, दृष्टीत खोट आहे आणि त्यात मोठय़ा बदलांची गरज आहे असं सुचवून त्यांना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला की हे प्रेक्षक बिथरतात. त्यामुळे अशी नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर होत नाहीत. आणि झालीच, तरी चालत नाहीत. असो!
हे नाटक लिहिताना भाषेचा प्रॉब्लेम होता. मूळ नाटकात हिंदी, लखनौची उर्दू आणि लाहोरची पंजाबी भाषा होती. नाटकातली पात्रं हिंसकपणे धमकावत होती. पण उर्दूमुळे ते जाणवत नव्हतं. खणखणीत पंजाबीतून सतत एक प्रेमळ ओलावा झिरपत होता. हे सगळं मराठीत कसं आणायचं, ही मोठी समस्या होती.
महाराष्ट्राला फाळणीचा थेट अनुभव नाही. त्यामुळे फाळणीवर मराठीत फारसं साहित्यही नाही. फाळणीनंतर माझा मामा आणि इतर काही नातेवाईक कराचीला निघून गेले. ते अधूनमधून कधीतरी भारतात येत. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आपलं गाव, मुलुख सुटल्याचा तडफडाट दिसे. पाकिस्तानात तिथल्यांनी आपल्याला स्वीकारलं नाही, आपण तिथेही एकटे, अलग पडलो, ही रुखरुख त्यांच्या बोलण्यात जाणवे.
मी दंगलीत आपलं घर, आपला गाव सोडून दुसरीकडे निघून जाणारी माणसं बघितली होती. त्या दुसऱ्या गावांत.. घरांत ही माणसं, त्यांची मुलंबाळं रुजली नाहीत. आपल्याला आपल्याच लोकांनी घालवून दिलं, हे विसरता न आलेल्यांची भकास गावं आणि उजाड कॉलन्या मी पाहिल्या आहेत. हे सगळं नाटकात झिरपलं. धर्माच्या नावानं विस्थापित होण्याचा मुद्दा ठळक होत गेला.
‘जिस लाहौर नहीं देख्या..’ हे नाटक हबीब तन्वीर यांनी श्रीराम सेंटरसाठी बसवलं होतं. ते मुक्त शैलीतलं होतं. त्यात दोन दृश्यांच्या मधे कोरसने म्हटलेली गाणी होती. अनेक स्थळं होती. असंख्य पात्रं होती. त्या प्रयोगात कणखर हिंदू म्हातारीची भूमिका एका तरुण मुलाने केली होती. (हबीब तन्वीरांवर बटरेल्ट ब्रेख्तचा प्रभाव होता.) मूळ नाटकाचा शेवट मी बदलला. त्यात लाहोरात असलेली शेवटची हिंदू व्यक्ती वारते आणि शहरात हिंदूच नसल्यामुळे स्मशानही नष्ट झालेलं! अशा वेळेला हिंदू म्हातारीला आई मानलेल्या मुसलमानांना आता काय करावं, असा पेच पडतो. मला वाटलं, अल्पसंख्याकाला मारून या पेचातून सुटका करून घेता येणार नाही. मी तिला जिवंत ठेवलं. ती आपला वारसा, अनुभव छोटय़ा तन्नोकडे सुपूर्द करते. आपला आजीचा बटवा तिच्याकडे सोपवते. तिला तिरस्कारातून मुक्त करते. जात, धर्म, प्रांत यापल्याड माणसाकडे बघण्याची एक विशाल दृष्टी देते. तिला निर्भय बनवते.
शेवटी रात्री दंगल पेटते. धर्माचा खरा अर्थ सांगू पाहणाऱ्या मौलानाचा खून होतो. हवेलीवर गुंड चालून येतात. तन्नो आणि दादी दरवाजा उघडून गुंडांना सामोरे जात असतानाच नाटक संपतं. काहींना हा शेवट रोमँटिक वाटला. पण अशा काळात दादीचा अनुभव, शहाणपण आणि छोटय़ा तन्नोची निरागसता तिरस्कार संपवेल, माणसाला माणसावर प्रेम करायला लावील, असा भरवसा बाळगायला काय हरकत आहे?
..आणि शेवटी अनेक वर्षांनंतर पाकिस्तानात छोटी निरागस मलाला तालिबान्यांना सामोरी गेलीच की नाही! असो!
हे नाटक कोण करील असं वाटत असतानाच निर्माते मोहन तोंडवळकर पुढे आले आणि ‘कलावैभव’ संस्थेतर्फे व्यावसायिक रंगभूमीवर हे नाटकं उभं राहिलं. वामन केंद्रेने भरपूर मेहनत घेऊन प्रयोग उभा केला. एरव्ही सामाजिक बांधीलकीच्या गप्पा मारणाऱ्या काही नटांना जास्त मानधन मिळण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे इच्छा असूनही या नाटकात काम करता आलं नाही. पण निर्मिती सावंत, स्वाती चिटणीस, अविनाश नारकर, डॉ. शरद भुथाडिया, श्रीकांत देसाई, मंगेश देसाई, सोनाली पंडित, राजा अबोलेसारखे कलावंत मिळाले. त्यांनी झपाटून कामं केली. आणि एक प्रभावी प्रयोग उभा राहिला. गावागावात नाटकाचे प्रयोग झाले. प्रयोग थांबू नयेत म्हणून काही सामान्य प्रेक्षकांनी स्वत:हून देणग्या आणून दिल्या. या प्रयोगाने टोचलं, खरवडलं, अस्वस्थ केलं, तरीही प्रयोग प्रेक्षकांना आवडला.
नाटकामुळे कदाचित दंगली थांबवता येणार नाहीत; पण हे नाटक बघितलेला कुणी एक उद्या दंगलीत दगड उचलताना विचार करील, दगड भिरकावणाऱ्याला थांबवेल, एवढी अपेक्षा करायला काय हरकत आहे!
-शफाअत खान shafaat21@gmail.com