अतुल देऊळगावकर

atul.deulgaonkar@gmail.com

अवघ्या प्राणिमात्रांसाठीही पसायदान मागणारे ज्ञानेश्वर सजीव सृष्टी आणि विश्वाचे आकलन यांतला आंतरसंबंध मोठय़ा खुबीने आणि आर्ततेने सांगतात. याच जातकुळीचं, भोवतालच्या समकालीन सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक घटितांना ‘पर्यावरणीय’ परिप्रेक्ष्यात चौफेर भिडून केलेलं मुक्त चिंतन..

अखिल विश्वातील सर्व घटनांचे आकलन होईल असा एकमेव सिद्धान्त (थिअरी ऑफ एव्हरीथिंग) मांडण्यासाठी कैक वर्षांपासून अनेक जण खटाटोप करीत होते. तथापि सीमित आवाक्यामुळे त्यांना यश मिळत नव्हते. आता मात्र पृथ्वीवासीयांना भारतीय व पाश्चात्त्य, अध्यात्म व विज्ञान, महर्षी पतंजली (इ. स. पूर्व दुसऱ्या शतकातील) व अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या एकीकरणातून ‘नव-सापेक्षतावादी प्रकृती सिद्धान्त’ प्राप्त झाला आहे. सकल मानवजातीस नवी दृष्टी देणाऱ्या या सिद्धान्ताचा मथितार्थ पुढीलप्रमाणे आहे : ‘आपले आरोग्य हे आपल्याच हाती असते. चित्त हेच सर्वश्रेष्ठ मूलचालक असून, त्यात जे प्रतीत होते तसेच जग दिसत असते. पंचेंद्रियांकडून ग्रहण होणारे मिथ्या ज्ञान म्हणजे निव्वळ माया! त्या मायेपासून मुक्त झाल्यानंतरच जग स्वच्छ दिसतं. बा प्रक्रिया या गौण असतात. त्यांच्या खोलात जाणंच व्यर्थ आहे. उदा. हवा. हवेमध्ये शुद्ध व अशुद्ध, मंगळ व अमंगळ, पवित्र व अपवित्र असा भेदच अस्तित्वात नाही. चित्तामध्ये दूषितता असल्यास सभोवतालची हवा तशीच असल्याचा भ्रम होतो. चित्ती समाधान असणाऱ्या देहास कुठलाही विकार स्पर्श करूच शकत नाही. प्राप्त आहे तेच योग्य आणि तेच आपुले भाग्य असे मानल्यास आपलं आरोग्य हे उत्तम राहतं.’ कलियुगातही यच्चयावत मानवजातीला शाश्वत व चिरंतन सत्य हाती देणारा हा सिद्धान्त मागील वर्षांच्या अखेरीस प्राप्त होऊनही त्याविषयी मंथन घडत नसण्याचं कारण अल्पबुद्धीचं सार्वत्रिकीकरण हेच आहे.

भारतवर्षांतील अरण्यांना संजीवनी देऊन पर्यावरण समृद्ध करीत हवामानबदलास नामशेष करणं आणि त्याचवेळी सुवार्ताच्या प्रसारास कटिबद्ध असणारे प्रकांडपंडित व मंत्रिमहोदय प्रकाश जावडेकर हे या सिद्धांताचे शिल्पकार आहेत. त्यांनी सांप्रतच्या सत्योत्तर काळात निरामय जीवनाची गुरुकिल्लीच मनुष्याच्या हाती दिली आहे. वस्तुत: त्यामुळे भारत देशात जिकडे तिकडे चोहीकडे आनंदलहरी ओसंडून वाहणं अपेक्षित होतं. मनुष्य व जग, देह व मन, शरीर व आरोग्य, पर्यावरण व प्रदूषण या साऱ्या संकल्पनांचा पुर्नविचार करणाऱ्या या सार्वकालिक प्रमेयाकडे गांभीर्याने पाहून ते आत्मसात करणं अनिवार्य आहे. आजूबाजूस दशदिशांनी विज्ञानाचं आकलन झाल्याचं मानून काही निष्कर्ष मांडण्याची घाई सुरू आहे. त्याचं खंडन करण्यासाठी ज्ञान, विज्ञान व आत्मज्ञान यांच्या त्रिवेणी संगमातून साक्षेपी विद्वान जावडेकर यांचं हे प्रमेय निर्माण झालेलं आहे. त्यामागील पार्श्वभूमी ध्यानात घेतली तरच त्याच्या गहनतेचं आकलन होणं शक्य आहे. अन्यथा वरवर पाहता त्याचं सुलभीकरण होण्याचा धोका आहे.

२०१७ साली भारताच्या केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाने व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ‘हवेच्या प्रदूषणामुळे होणारे मृत्यू व आजार’ यांचा एक व्यापक अहवाल तयार केला होता. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या त्या अहवालानुसार, ‘भारतात दरवर्षी १२.४ लक्ष लोक प्रदूषित हवेने बळी जातात. ६ लाख ७० हजार लोकांना घराबाहेरील प्रदूषणामुळे, तर ४ लाख ८० हजार जणांना घरातील प्रदूषणामुळे मरण येतं. भारतातील प्रत्येक आठवा मृत्यू हा विषारी हवेमुळे होतो. हृदयविकाराचा वा मज्जासंस्थेचा झटका, कर्करोग, फुप्फुसाचे विकार, श्वसनयंत्रणेचे आजार यासाठी ही हवा जबाबदार आहे. प्रत्येक राज्याला पडलेला विषारी वायूंचा विळखा व त्याचे बळी वाढतच आहेत,’ असं त्यात नमूद केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने स्वच्छतेचं मापन करण्याकरिता हवेचे गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) ठरविले आहेत. ० ते ५० निर्देशांकाची हवा ही आरोग्यास अतिशय उत्तम व सुखदायी असते. ५१ ते १०० निर्देशांकाची हवा ही सामान्य असून, ती संवेदनशील व्यक्तींना त्रासदायक ठरू शकते. १०१ ते १५० गुणवत्तेच्या हवेमध्ये संवेदनशील व्यक्तीचे आजार बळावतात. १५१ ते २०० गुणवत्तेच्या अपायकारक हवेमध्ये श्वसनाचे विकार साथीसारखे पसरतात. २०१ ते ३०० निर्देशांकाची हवा ही आरोग्यास घातक असून, संवेदनशील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये आणि त्यांनी शुद्ध हवा हुंगावी. ३०१ ते ५०० निर्देशांकाची हवा ही संचारबंदी आणते. २०१९ च्या ऑक्टोबरपासून दिल्लीतील हवेचा निर्देशांक हा ९०० च्या पुढे व काही दिवशी १००० चा आकडाही पार करून गेला होता. दिल्लीतील हवा देशात आणि जगभर गाजत होती. दिल्लीत हवेच्या आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याचं मानलं जात होतं.

त्या काळातले विनोद हे त्या परिस्थितीचं एक उप-उत्पादन (बाय-प्रॉडक्ट) होतं. उदा. नखशिखान्त आच्छादन करून झाकलेल्या हिंदू व मुस्लीम मुलींची छायाचित्रं दाखवली गेली. ‘धर्माने केलेली विभागणी प्रदूषणाने मिटवून टाकली’ अशी टिप्पणी त्यावर केलेली होती. ‘स्पायडरमॅन दिल्लीत आल्यास प्राणवायूची टाकी घेऊन निघेल’, ‘छातीची धडधड वाढतेय? धापा टाकताय? डोळे भरून येताहेत? मग तुम्ही प्रेमात पडला आहात किंवा दिल्लीमध्ये आहात’ अशा तऱ्हेचे विनोद केले गेले. दिल्लीतील स्थलदर्शक फलकही ‘उजवीकडे गेल्यास फुप्फुसांचा कर्करोग, डावीकडे गेल्यास अस्थमा, सरळ गेल्यास फुप्फुसनलिकादाह (ब्राँकायटिस)’ असे असत.

हे सर्व विनोद अतिशयोक्तीपूर्ण म्हणून दूर सारणं गरजेचं होतं. पण झालं विपरीतच! शेकडो वर्ष देशावर राज्य करणाऱ्या या ऐतिहासिक महानगरीत ३०० रुपये मोजून १५ मिनिटे शुद्ध प्राणवायू प्राप्त करून घेण्यासाठी रांगा सुरू झाल्या. ‘हवा प्रदूषणाबाबतच्या सर्व कल्पना, अतिवास्तवता व अतिरंजितता वास्तवात आणण्यास दिल्ली समर्थ आहे!’ असा प्रचार व प्रसार सुरू झाला. ‘अहमदाबाद, मुंबई, पुणे अशा अनेक शहरांचा नारा ‘चलो दिल्ली’ असाच आहे.’ असंही म्हटलं जाऊ लागलं. असा मत-मतांतरांचा गलबला चालू असताना पर्यावरण विज्ञानातील अधिकारी पुरुष प्रकाश जावडेकर यांच्या मनन व चिंतनातून निरूपण सादर झालं.. ‘‘हवेचं प्रदूषण, आरोग्य व आयुष्यमान या मूलत: भिन्न बाबी असून, त्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही व तसे थेट पुरावेसुद्धा नाहीत. हवा प्रदूषणाचा बाऊ करून भयग्रस्त मनोदुर्दशेचा प्रसार करू नये,’’ असं स्पष्ट आवाहनदेखील त्यांनी जनतेच्या प्रतिनिधीगृहात केलं. २०१५ साली याच प्रतिनिधीगृहात जावडेकर महोदयांनी ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ’ व ‘चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्था’ यांच्या सर्वेक्षणातून, ‘़दिल्लीतील बालकांच्या फुप्फुसांची क्षमता ही ४३ टक्क्यांनी घटली आहे. सूक्ष्म धुलिकणांचे शरीरात प्रमाण वाढल्यास बालकांना श्वसन व हृदयविकारांचा धोका अधिक संभावतो,’ असं प्रतिपादन केलं होतं. परंतु स्वत:चं आकलन जाहीरपणे बाजूला सारण्याचं विशाल मन असल्यामुळे त्यांना नव्या सिद्धान्ताचं प्रकटन करण्यात अजिबात संकोच वाटला नाही. (टीप- धूम्रपान व कर्करोग यांचा थेट संबंध स्पष्ट नाही. ऋतुमानातील हेलकावे हे नियमित असून त्याचा हवामानबदलाशी काहीएक संबंध नाही. अमेरिकेतील अनेक वैज्ञानिकांनी असे निष्कर्ष अनेक वेळा सांगितले आहेतच.)

आचार्याच्या ज्ञानचक्षूंमुळे चित्त, प्रकृती व परिस्थिती या तिन्हींना पाचवी मिती प्राप्त झाली आहे. या नव्या प्रकाशामुळे नव्या वाटा गवसत आहेत. परंतु मळलेल्या वाटेने जाणारे दिल्लीच्या ‘हार्ट केअर फाऊंडेशन’चे अध्यक्ष व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. के. के. अग्रवाल यांच्या काही ते ध्यानी येत नव्हते. ‘अपेक्षित आयुष्यमान हेच सार्वजनिक आरोग्याच्या अवस्थेचे निर्देशक आहे. भारतातील २.५ मायक्रॉनपेक्षा लहान आकाराच्या सूक्ष्म धुलिकणांमुळे अकाली मृत्यू व अनेक विकारांचं प्रमाण वाढत आहे,’ हे पटवून देण्याचा ते प्रयत्न करीत होते.

हवा व आरोग्य यांचं गुऱ्हाळ इथेच थांबलं नाही. थेट जागतिक आरोग्य संघटनेने यात उडी घेतली. ‘‘हवेचं प्रदूषण ही सार्वजनिक आरोग्यातील मूक आणीबाणी आहे. हवेच्या प्रदूषणामुळे मृत्यू होऊ नये अशीच आमचीही इच्छा आहे. असंख्य वैज्ञानिक संशोधने व निष्कर्षांतून हवेच्या बळींची संख्या वाढत जात आहे हे सिद्ध झालेलं आहे,’’ असं त्यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये अनेक तज्ज्ञ आहेत, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून हवेतील विषारी प्रदूषकं कमी करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी असंही त्यांनी सुचवलं.

याच काळातील २०१९ च्या विस्तृत जागतिक सर्वेक्षणातून ‘हवेच्या प्रदूषणाचा प्रत्येक मानवी अवयवांवर आणि प्रत्येक पेशींवर परिणाम होतो’ असं निदर्शनास आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनादेखील हवेच्या प्रदूषणापासून होणाऱ्या परिणामांविषयी कसून अभ्यास करीत आहेत. त्यांच्यासाठी केलेल्या संशोधनातून युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ लंडनच्या डॉ. इसोबेल ब्रेथवेट यांनी ‘हवेतील प्रदूषित सूक्ष्मकण हे नाकावाटे रक्तात पसरतात, तसेच मेंदूपर्यंत पोहोचतात. परिणामी मेंदूच्या पेशींना सूज येते वा इजा होऊ शकते. संप्रेरक ग्रंथींच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो आणि मानसिक आरोग्य बिघडते. हवेचं प्रदूषण सहन करणाऱ्यांमध्ये विषण्णतेचं (डिप्रेशन) व आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे. दूषित हवेमुळे अवमनस्कता (डिमेन्शिया) व बुद्धिमांद्य येतं,’ असा निष्कर्ष सादर केला.

अशा प्रकारे जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली. दिल्ली राज्याचे प्रमुखही त्याची री ओढू लागले. तेव्हा राष्ट्राच्या आरोग्यास दिशा देणारे मंत्रिमहोदय डॉ. हर्षवर्धन यांना ‘हवा’ ही बाबसुद्धा राजकारणात यावी याचा विलक्षण खेद वाटला. तसंच मूढ नागरिकांची कींव आली. त्यांनी टिवटिव माध्यमातून रामबाण उपाय सांगूनच टाकला : ‘‘गाजर खा, गाजर! गोड गोड गाजर. जीवनसत्त्व अ, पालाश (पोटॅशियम) देणारे व ऑक्सिडीकरण रोखणारे (अँटी ऑक्सिडंट) गाजराचं सेवन केल्यास शरीरास प्रदूषणापासून होणारे अपाय होत नाहीत.’’

दरम्यानच्या काळात जावडेकर यांच्या लक्षात आलं की, त्यांना अभिप्रेत कार्यकारणभाव अजाण वैज्ञानिकांनादेखील उमजलेला नाही. दुसरीकडे राजकारणासारख्या पावन क्षेत्रात दिल्लीस्थित हवेस काळे ठरवून ते एक राजकीय हत्यार व्हावे, यामुळे तेसुद्धा अंतर्यामी व्यथित झाले. त्यांना आरोग्य संपादनासाठी आणखी एक उपाय गवसला. मस्तिष्क आणि देह यांचं अद्वैत साधण्यास संगीतोपचाराची महती गाणारी उपपत्ती विशद करण्यासाठी त्यांनीही टिवटिव माध्यम वापरलं. ‘प्रात:काली दिवसाचा आरंभ हा संगीत- श्रवणाने केल्यास आरोग्य उत्तम राहते. त्यासाठी शंकर शास्त्री यांचं ‘स्वागतम्’ हे वीणावादन ऐकावं.’ हे सूत्र ऐकून व वाचून जनसामान्यांना खडबडून जाग आली व त्यांची चित्ते स्थिरावली, प्रकृती सुधारली. आयुष्यमानात वृद्धी झाली. अशा रीतीने गुरू जावडेकर यांच्या ‘प्रकाशसूत्रां’मुळे देशवासीयांचे काळ्या हवेविषयीचे सर्व आक्षेप व भ्रम दूर झाले. प्रदूषणरूपी मायाजालातून ते मुक्त होऊन त्यांना सत्यदर्शन घडले. वैज्ञानिकांनीही वाद-संवादात हार मानून ‘हवेतील मनोरे’ बांधणं थांबवलं. एकंदरीत हवा, पाणी व अन्न यांना दूषणं देणं हे नैतिक, तात्त्विक व वैज्ञानिकदृष्टय़ा अयोग्य असल्याचं जनतेस उमजलं. या यत्नांमुळे भारत देश हा एकविसाव्या शतकात जगातील पहिलं आनंदी राष्ट्र होण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला.

पांडुरंग सदाशिव साने यांच्या ‘विश्वात शोभणारा बलसागर भारत’ व्हावा, या बहिष्कृत व भाबडय़ा कविकल्पनेस मूर्त रूपात आणण्याचं भगीरथ कार्य त्यांच्याच प्रदेशातून व्हावं, हे त्यांचं व देशवासीयांचं भाग्यच!

(ता. क.- जगातील प्राणवायू दुर्मीळ होणाऱ्या शहरांची गणना करून त्यांच्यासाठी  प्रकाश जावडेकर यांचं ‘विज्ञानातील विशिष्टाद्वैत’ आख्यान आयोजित करण्यासाठी कोटय़वधी नागरिक सध्या आग्रही आहेत.)