जयंत पवार

येत्या आठवडय़ात यवतमाळ येथे होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून साहित्यातल्या महानगरीय आणि ग्रामीण संवेदनेतील भेदाभेदाची सर्वंकष चिकित्सा करणारा खास लेख..

Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड
pune pustak Mahotsav marathi news
‘पुणे पुस्तक महोत्सव’ का गाजला?
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
book review kashmir under 370 a personal history by j and ks former director general of police
बुकमार्क : काश्मीरचे भूतभविष्य…
भूगोलाचा इतिहास : प्रतिभेचा कालजयी आविष्कार – आर्यभटीय

‘तुमच्या लेखनात महानगरीय संवेदना दिसते बरं का!’ असं म्हणणारा आम वाचक सहसा कोणी मला भेटलेला नाही. क्वचित कोणी भेटला, तर तो भाषेचा प्राध्यापक किंवा समीक्षक असतो. त्याची नजर मी समजून घेतो, घेऊ शकतो. पण निखळ वाचक असं म्हणू लागला की मी सावध होतो. कारण तो माझं लेखन आवडलं की आवडलं नाही, यावर बोलण्याचं शिताफीने टाळून मला एका कप्प्यात ढकलतो आहे असे सिग्नल्स मला येऊ लागतात. माझ्या कल्पनेप्रमाणे सर्वसामान्य वाचकाला अमुक लेखक ग्रामीण संवेदनेचा आहे, तमुक महानगरीय संवेदनेचा आहे आणि फलाणा लेखक आदिवासी संवेदनेचा आहे म्हणून तो महत्त्वाचा आहे असं काही वाटत नसतं. या विभाजन करणाऱ्या रेषा आहेत. आणि त्या साहित्याच्या अभ्यासाच्या सोयीसाठी कल्पिलेल्या आहेत. पण म्हणून त्या बिनमहत्त्वाच्या आहेत असं मी म्हणणार नाही. मात्र, त्या साहित्याची उंची मोजण्यासाठी कुचकामी आहेत. अर्थात त्यातून काही प्रमाणात लेखक समजून घ्यायला मदत होऊ शकेल, हे खरं आहे.

‘महानगरीय संवेदना’ म्हणजे काय, हा प्रश्न मला माझ्या लेखनाच्या मधल्या टप्प्यावर पडला- जेव्हा माझी समीक्षकांशी गाठ पडली. त्याआधी (आणि नंतरही) मला आवडणारे लेखक हे वेगवेगळ्या संवेदनांचे होते. काही तर शहरी-ग्रामीण अशा भूगोलनिष्ठ संवेदनांहून भिन्न अशा संवेदनांचे होते. मला आजही प्रश्न पडतो, जी. ए. कुलकर्णीना आपण कुठे बसवणार? चिं. त्र्यं. खानोलकरांची ‘रात्र काळी घागर काळी’ ही कादंबरी ग्रामीण संवेदनेची म्हणता येईल का? आणि ‘पाषाणपालवी’ला नागर संवेदनेची ठरवता येईल का? सदानंद रेगेंच्या कवितांतून कोणती संवेदना डोकावते? मधु मंगेश कर्णिक, रंगनाथ पठारे, भारत सासणे, राजन खान यांच्या कथा-कादंबऱ्यांना कुठं बसवावं? तरीही एक गोष्ट अनुभवाने मी जाणत होतो, की लेखक ज्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक पर्यावरणात वाढतो, राहतो, वावरतो, त्याचे गुणधर्म त्याच्या जाणिवे-नेणिवेत झिरपतात आणि त्याच्या लेखनातून पाझरतात. महानगरीय संवेदना अशीच निर्माण झाली असावी.

महानगरातला रहिवासी हा मूळचा महानगराचा नसतो. तो कुठून कुठून पोट भरण्यासाठी, नशीब आजमावण्यासाठी आपलं मूळ गाव सोडून इथे आलेला असतो. समजा, तो इथेच जन्मलेला असला, तरी त्याची जमीन बदलत असते. त्याचा रहिवास बदलत असतो. त्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी उपरा असतो. यातून येणारा परात्मभाव हे महानगरीय संवेदनेचं व्यवच्छेदक लक्षण असतं. हा परात्मभाव त्यातल्या व्याकूळतेसह पहिल्यांदा प्रभावीपणे प्रकटला तो मर्ढेकरांच्या कवितेत! ‘जगायची पण सक्ती आहे, मरायची पण सक्ती आहे’ अशा नेमक्या शब्दांत त्यांनी महानगरीय जगण्याची घालमेल मांडली. गंगाधर गाडगीळांच्या कथांमधून शहरातल्या मध्यमवर्गाचं किरटेपण दिसलं.

औद्योगिकीकरणातून नगरं जन्माला आली. आणि पुढे ही नगरं अस्ताव्यस्त वाढत गेली, फुगत गेली. त्यांची महानगरं झाली, तशी त्यांच्या सुबत्तेबरोबरच बकालीही वाढली. मध्यमवर्गाबरोबरच कष्टकरी, कामगारवर्ग वाढत गेला. मुंबई महानगरीत या वर्गाशी एकरूप झालेल्या नारायण सुर्वे आणि बाबुराव बागूल यांच्या कविता-कथांनी या वर्गाची एक वेगळी संवेदना मुखर केली. त्यात त्यांनी या माणसांच्या आशा, आकांक्षा, चिमुकली स्वप्नं आणि अपेक्षाभंगांचं गच्च भरलेलं कोठार उघडं केलं. ही माणसं सुर्वेनीच अनुवाद केलेल्या एका हिंदी कवितेत म्हटल्याप्रमाणे, ‘कुठून कुठून आली आणि ओलसर भागात वनस्पतींची मुळं रुजावीत तशी ओल धरून रूजली.’ या कामगार-कष्टकऱ्यांनी आपल्या श्रमांतून हे शहर उभं केलं. पण त्यात आपला वाटा मिळवण्यासाठी त्यांना अहर्निश झुंज द्यावी लागली. या झुंजारपणाच्या संवेदनेची किनार इथल्या वंचितांच्या इतिहासाला कायम लगडलेली राहिली. ती अण्णाभाऊ साठेंच्या शाहिरी कवनांमधून प्रकट झाली.

मराठी कवितेत महानगरीय संवेदनेची दणकट अभिव्यक्ती अरुण कोलटकर, मनोहर ओक आणि नामदेव ढसाळ या तीन मोठय़ा कवींच्या कवितांतून दिसते. तिघांनीही मुंबईवर केलेल्या कविता म्हणजे या शहरावर रचलेले सर्ग आहेत. कोलटकरांनी ‘या मुंबईनं भिकेस लावलं’ असं म्हटलंय. तर मनोहर ओक हे ‘मुंबई मुंबई, तुझ्यातून मी फाटक्या भणंगासारखा निघून जाईन’ म्हणतात. नामदेव ढसाळ ‘मुंबई, माझ्या प्रिय रांडे, तुझ्यातून मी फाटक्या भणंगासारखा निघून जाणार नाही’ असं बजावतात. या तिघांनीही हे म्हणताना मुंबईचं जे बहुपेडी रूप शब्दांत पकडलं आहे ते बघण्यासारखं आहे.

पण महानगरीय संवेदनांचा सर्वंकष आविष्कार घडवीत मुंबईचा भाष्यकार होण्याचा मान केवळ आणि केवळ भाऊ पाध्ये यांच्याकडेच जातो. मुंबईच्या अठरापगड जाती-धर्माच्या कॉस्मोपॉलिटन रूपाला गवसणी घालून तिचं अंतरंग नेमकं उलगडण्याची किमया भाऊंनी केली. इतर मध्यमवर्गीय महानगरीय साहित्यिक आणि भाऊ यांच्यात असलेला मोठा फरक म्हणजे- भाऊंनी या शहरातल्या सर्व थरांतल्या माणसांचं जगणं शारीर पातळीवर तपासलं. मनोविश्लेषणाच्या तपशिलांत न जाता माणसा-माणसामधलं नातेसंबंधांचं राजकारण, लैंगिक संबंधांमधलं राजकारण सगळे दबाव झुगारून त्यांनी थेटपणे मांडलं. निरनिराळ्या लैंगिक, सामाजिक आणि आर्थिक दबावांतून महानगरातल्या माणसांची होणारी घुसमट आणि त्यातून होणारे त्यांचे अनाकलनीय बर्ताव कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय त्यांनी मांडले. त्यांच्या ‘बगीचा’ या कथेमधला भास्कर राणे हा एके रात्री अचानक बायको-मुलं झोपलेली असताना त्यांना का पेटवून देतो, हे तुम्हाला समजूनच घ्यावं लागतं. त्याचं त्याआधीचं जगणं भाऊ ज्या पद्धतीने उभं करतात ते वाचल्यावर आपल्याला स्पष्टीकरणाची गरज वाटत नाही आणि तितकं त्राणही उरत नाही. या महानगरानेच एका अपरिहार्यपणे भास्कर राणेला त्या अमानुष कृत्यापर्यंत आणून सोडलेलं आहे. भाऊंनी महानगरीय परात्मतेतून येणाऱ्या क्रौर्य आणि वासनेचा केलेला आविष्कार अपूर्व आहे. त्यांची निवेदनशैली वेगवान आणि या शहराच्या गतीशी सुसंगत आहे.

माणसांच्या स्वभावाप्रमाणेच त्यांच्या परिसराचाही स्वभाव असतो आणि तो माणसांच्या स्वभावाप्रमाणेच बदलत असतो. मुंबई महानगराला अफाट वेग होता. पण तो सत्तर-ऐंशीच्या दशकांहून आता कित्येक पटींनी वाढला आहे. उदारीकरण आणि खाजगीकरणानंतर महानगराचा स्वभावही आरपार बदलला आहे. भाषा बदलली आहे. वेगाबरोबर अस्थिरता आली आहे. आणि अवकाश इतका संकुचित झाला आहे, की माणूस पाय ठेवून उभा आहे तितकीच त्याची जमीन खरी, तो बघतो आहे तितकंच वास्तव असावं, हे त्याने मान्य केलं आहे. आणि आत्ताचा क्षण तो मुठीत घट्ट पकडून हर्षांने किंचाळत उभा आहे. तो हर्ष खरा की खोटा? समोरचं वास्तव हे सत्य मानावं की तो आभासच आहे? हे प्रश्न खरे तर तातडीचे आहेत, पण ते कोणालाच पडलेले नाहीत. या सगळ्यामुळे कथ्य बदललेलं आहे. कथनशैली बदललेली आहे. गोष्ट एका रेषेत दिसत नाही. तिला अनेक रेषा फुटतात आणि अनुभवाचा पोत, भाषेचा आविष्कार बदलत राहतो.

माझ्या निवेदनात येणारा वेग हा माझ्या जगण्याचा आहे आणि या जगण्याला महानगरीय रेटा आहे. त्यामुळे तो महानगराचाही वेग आहे; जो माझ्या संवेदनेत झिरपला आहे असं मी मानतो. त्यामुळेच माझ्या लेखनात नकरेषीयता येते अशी माझी समजूत आहे. पण ती किती खरी आहे, असाही प्रश्न मला पडतो. उदाहरणार्थ, सतीश तांबे आणि समर खडस हे माझे दोन आवडते कथाकार आहेत. दोघांमध्येही महानगरीय संवेदना ठासून भरल्या आहेत. पण सतीश तांबेंची कथनशैली वेगवान अजिबात नाही. ते ऐसपस गप्पा मारल्यासारख्या गोष्टी सांगतात. समर खडसची कथनशैली वेगवान आहे, पण त्याच्या कथा एकरेषीय आहेत. मला वास्तव समजून घेण्यासाठी अनेकदा अतिवास्तवाचा वापर करावा लागतो. पण अनेक लेखकांनी ठोक वास्तववादाची कास गच्च पकडून ठेवली आहे आणि ते त्याची परिणामकारक मांडणी करू शकतात. त्यामुळे महानगरीय संवेदनांचा अदमास माझ्यापुरताच खरा. कारण महानगर म्हटलं म्हणजे जे एक रूप आपल्या डोळ्यांसमोर येतं, ते तसं आणि तितकंच नसतं. महानगरात असे असंख्य कप्पे आहेत, ज्यांत माणसांचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्तर वेगवेगळे आहेत. त्यांच्या बोलभाषांचे पोत वेगवेगळे आहेत. अनेक धर्म, अनेक जाती-पोटजाती, असंख्य व्यवसाय, स्थलांतर आणि भूगोलाच्या फेरजुळणीमुळे निर्माण झालेली अनेक प्रकारची नाती यांमुळे एका महानगराच्या पोटात अनेक नगरं व पोटसंस्कृत्या नांदत असतात. त्यांच्या संवेदनांचे पदर वेगवेगळे असतात आणि ते सगळे महानगरीय असतात. त्यामुळे अनेक महानगरीय लेखक एकाच वेळी परस्परांहून भिन्न प्रकारचं लेखन करत असतात. मला कथात्म वाङ्मयात गणेश मतकरी, शिल्पा कांबळे, वर्जेश सोलंकी आणि कवितेत मलिका अमरशेख, हेमंत दिवटे, मन्या जोशी हे लेखक-कवी महानगरीय जगण्याला अटीतटीने भिडताना दिसतात. पण यांच्याही अलीकडे पलीकडे मेघना पेठे, पंकज कुरुलकर, संजय भास्कर जोशी, मोनिका गजेंद्रगडकर यांच्यापासून अवधूत डोंगरे, किरण येले, प्रणव सखदेव, पंकज भोसले यांच्यापर्यंत आणि अशोक नायगावकर, सौमित्र, महेश केळूसकर ते गणेश वसईकर, फेलिक्स डिसूझा, ओंकार कुलकर्णी यांच्यापर्यंत अनेक महानगरीय लेखक-कवी वेगवेगळ्या शैलीतून आणि दृष्टीतून आविष्कार घडवत आहेत.

अर्थात चोखंदळ वाचक उत्तम साहित्याच्याच बाजूने उभा राहत असतो. मी जेव्हा राजन गवस यांची ‘ब बळीचा’ वाचतो तेव्हा त्यातली कृषीसंवेदना माझ्यात झिरपते आणि एखादं कसदार महानगरीय लेखन जेव्हा ग्रामीण वाचक मनापासून वाचतो तेव्हा त्यातली महानगरीय संवेदना त्याच्या अबोध मनात संक्रमित होत असते. शेवटी अभिव्यक्तीची अस्सलता आणि अनुभूतीची तीव्रता याच गोष्टी साहित्याच्या गुणवत्तेत महत्त्वाच्या ठरतात आणि वाचकाला व लेखकालाही श्रीमंत करत असतात.

pawarjayant6001@gmail.com

Story img Loader