प्रशांत कुलकर्णी
prashantcartoonist@gmail.com
जगभरातले अफलातून व्यंगचित्रकार, त्यांच्या कलाकृती, त्यांनी निर्माण केलेलं हास्य, त्यांनी केलेलं राजकीय, सामाजिक किंवा जीवनविषयक भाष्य आणि त्यासंदर्भातील काही अद्भुत, मजेशीर गोष्टी कथन करणारं सदर..
‘व्यंगचित्र’ या माध्यमाविषयी जाणत्या लोकांमध्ये कुतूहल आहे, हे नक्की. व्यंगचित्र म्हणजे पटकन् आकर्षून घेणारे चित्र. कारण ते नेहमीपेक्षा वेगळ्या, विनोदी पद्धतीने रेखाटलेलं असतं. आणि त्यासोबतीने एखादा विचार- तोही अर्थातच इतरांपेक्षा वेगळा असतो.. विनोदी असतो. म्हणूनच व्यंगचित्रे लक्ष वेधून घेतात.. आणि घेतातच. याचं मूळ कारण म्हणजे माणसाला हसायला, आनंदी राहायला आवडतं. जाहिरातींतील व्यंगचित्रे, वर्तमानपत्रांतील राजकीय- सामाजिक भाष्य करणारी व्यंगचित्रे, वर्तमानपत्रांमधल्या कॉमिक स्ट्रिप्स, दिवाळी अंकांमधल्या हास्यचित्र मालिका हे सगळे प्रकार पटकन् लक्ष वेधून घेतातच. पण या प्रत्येक व्यंगचित्राचा उद्देश मात्र अर्थातच वेगवेगळा असतो. वर्तमानपत्रांमध्ये पॉकेट कार्टून किंवा मोठी राजकीय व्यंगचित्रे ही पत्रकारितेची कर्तव्ये बजावतात. कॉमिक स्ट्रिप्स निरागस मनोरंजन करतात. दिवाळी अंकांतील हास्यचित्रांचा आवाका मात्र थोडा अधिक विस्तारणारा आहे. निखळ हसू आणणारे हास्यचित्र यापासून ते प्रचंड आशय व्यक्त करणारे, शाश्वत सत्य सांगणारे गंभीर हास्यचित्र असा तो मोठा झोका असतो. जाहिरातीतल्या व्यंगचित्रांचा मात्र ‘वस्तू विकणं’ हाच अर्थात अखेरचा उद्देश असतो. या सर्वाबद्दल रसिकांमध्ये असलेलं कुतूहल हे अनेक प्रकारे व्यक्त होत असतं. व्यंगचित्र म्हणजे काय? त्याचा उद्देश काय? ते कसं काढतात? कशाने कशावर- म्हणजे डायरेक्ट कागदावर की कॉम्प्युटरवर? वगैरे वगैरे.. ते पटकन् हसू आणणारं असावं का? त्यात उत्तम चित्रकलेचा वाटा किती? वगैरेबद्दल उंच भुवया करून अनेक रसिक उत्सुकतेनं प्रश्न विचारतात तेव्हा लक्षात येतं, याविषयी आपल्याला जेवढी माहिती आहे, निदान तेवढी तरी शेअर करावी. कारण व्यंगचित्र या माध्यमाची चर्चा होणं हे समाजामध्ये मोकळेपणा असल्याचं, वातावरण सहिष्णु असल्याचं आणि समाज बुद्धिवादी आणि कलासाक्षर होत असल्याचं लक्षण आहे. कारण ही कला निव्वळ हसण्यावारी नेण्यासारखी नक्कीच नाहीये. आणि फक्त हसणं एवढंच त्याचं प्रयोजनही नाहीये.
व्यंगचित्रकार कसा असतो, हा फार अवघड आणि कॉम्प्लेक्स प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तरही तसंच आहे. राज्यकर्त्यांना सत्य सांगणारे निर्भय पत्रकार, जीवनावर भाष्य करणारे प्रतिभावंत साहित्यिक, रेषांबद्दल तासन् तास विचार करणारे आणि मग ती उमटवणारे चित्रकार, जीवनातील विसंगती क्षणात ओळखणारे तरल बुद्धीचे विनोदकार, दृष्टिभ्रम करून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर झटकन् हसू पेरणारे विदूषक या साऱ्यांचे मिश्रण म्हणजे व्यंगचित्रकार असं मला वाटतं. अर्थात प्रत्येक व्यंगचित्रकारामध्ये वरील साऱ्यांचं मिश्रण कमी-अधिक प्रमाणात असेल; पण ते असेल हे मात्र नक्की! व्यंगचित्रकलेच्या या साऱ्या गुणांची चर्चा करण्यासाठी आणि केवळ मराठीतीलच नव्हे, तर देशातील आणि परदेशातील अनेक व्यंगचित्रकारांची कला समजून घेण्याचा प्रयत्न हा या लेखमालेचा उद्देश आहे.
कारण संगीत, शब्द यांपेक्षा आदिमानवाला गुहेत पहिल्यांदा चित्र काढण्याची, रेघोटय़ा काढण्याची प्रेरणा झाली. प्रत्येक लहान मूल हे या स्वयंप्रेरणेनं घरातल्या भिंतीवर, जमिनीवर रेघोटय़ा मारून आपण कधीतरी आदिमानव होतो याची जाणीव करून देत असतं. (पुढे शिक्षण देऊन आपण त्याला बिघडवतो, ती गोष्ट वेगळी.) आणि ते मूल आनंदाने हसतही असतं. (या पृथ्वीतलावर फक्त माणसालाच हसण्याची कला लाभली आहे किंवा वरदान मिळालं आहे असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे). यामुळेच चित्रकला आणि हास्य या आदिमानवाच्या दोन मूळ प्रेरणा लक्षात ठेवून आपण नव्यानं या कलाप्रकाराकडे पाहू या.. त्याची ओळख करून घेऊ या. हे सगळं सांगत असताना माझी स्थिती ही सोबतच्या व्यंगचित्रातल्या बिचाऱ्या माणसासारखी झाली आहे. (चित्रकार एडगर वॉल्टर- दि वॉटर कॅरियर) व्यंगचित्रकलेच्या विशाल सरोवरातील पाण्याचा नमुना आणून दाखवायला माझ्याकडे फक्त चाळणीच आहे, त्याला मी तरी काय करणार! असो!!
सोबतचे हे जे दुसरे चित्र आहे, ते नॉर्मन रॉकवेल या विख्यात अमेरिकन व्यंगचित्रकाराचं आहे. (प्रकाशक : ताशे) या चित्रकाराचं चित्र पाहून तो फोटो आहे की पेंटिंग, असा प्रश्न पडतो- इतकं हुबेहूब त्याचं चित्रण आणि रंगसंगती असते. कितीतरी पेंटिंग्जच्या खाली त्याची सही बघितल्यानंतरच कळतं की हे पेंटिंग आहे. ‘अमेरिकन जीवनाचा दृश्य इतिहास लिहिणारा चित्रकार’असंही रॉकवेल यांना संबोधलं जातं. एक मात्र खरं, की त्यांची चित्रं रूढार्थानं व्यंगचित्रं नाहीयेत. अमेरिकन माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील काही प्रसंग रॉकवेल यांनी काही साप्ताहिकांच्या मुखपृष्ठासाठी चित्रित केले आणि ते इतके जिवंत साकारले, की फोटोचा भास व्हावा! त्या चित्रांतील माणसांच्या चेहऱ्यावरील हावभाव बारकाईने पाहिल्यानंतर मात्र या पेंटिंग्जना व्यंगचित्रकलेचा स्पर्श झाल्याचं लक्षात येतं. या परिसस्पर्शानं रॉकवेल यांची ही नर्मविनोदी पेंटिंग्ज हसऱ्या चेहऱ्यानं आपण पुन्हा पुन्हा पाहतो. रॉकवेल यांच्या चित्रातील विनोद हा सांगता येत नाही; तर तो बघावा लागतो आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी तो सावकाश, चवीचवीने बघावा लागतो, हीच रॉकवेल यांची ताकद आहे. आणि खरं पाहिलं तर तेच व्यंगचित्रकलेचं सामर्थ्य आहे.
व्यंगचित्रकाराला जे दिसतं- म्हणजे विसंगती वगैरे- ते इतरांना का दिसत नाही, असा प्रश्न वाचक विचारतात तेव्हा- व्यंगचित्रकाराकडे असलेला हा सोबत दाखवलेला चष्मा- हे त्याचं उत्तर आहे. (व्यंगचित्रकार वसंत सरवटे, ‘ललित’- १९७५). हा चष्मा बाजारात कुठंही कोणालाही मिळू शकतो. मात्र, तुम्ही हा चष्मा घातलेला असेल तरच तो तुम्हाला दिसेल, ही त्यामागची मेख आहे! तर रॉकवेल वरील चित्रात स्वत:चं पोट्र्रेट काढत आहेत. त्यासाठी ते त्यांच्या चष्म्यातून स्वत:कडे आरशात बघत आहेत. पण प्रत्यक्ष पोट्र्रेटमध्ये मात्र हा चष्मा नाहीये!! हीच या कलाप्रकारातली एक वेगळी गंमत आहे.. विचार करायला उद्युक्त करणारी!
तर या अनुषंगानं असेच काही जगभरातले अफलातून व्यंगचित्रकार, त्यांच्या कलाकृती, त्यांनी निर्माण केलेलं हास्य, त्यांनी केलेलं राजकीय, सामाजिक किंवा जीवनविषयक भाष्य आणि त्यासंदर्भातील काही अद्भुत, मजेशीर गोष्टी आपण या सदरातून जाणून घेऊ या.