विजय पाडळकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उद्या, ३० डिसेंबर रोजी श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांना जाऊन एक वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने..
जागतिक चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान मिळवणाऱ्या काही मोजक्या भारतीय दिग्दर्शकांत मृणाल सेन यांचे नाव आदराने घेतले जाते. एकीकडे अत्यंत विचारप्रवर्तक चित्रपट निर्माण करणाऱ्या मृणाल सेन यांनी ‘भुवन शोम’सारखा नितांत रमणीय भावचित्रपटदेखील दिग्दर्शित केला. ते साम्यवादी विचारसरणीचे कट्टर पुरस्कत्रे होते, तसेच साहित्य आणि संस्कृतीचे गाढे अभ्यासकदेखील होते. ते एक उत्तम लेखकही होते. त्यांनी ‘Always Being Born’ या नावाचे अप्रतिम आत्मचरित्र लिहिले आहे, तसेच चित्रपटविषयक विपुल लेखनही केले आहे.
एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले होते.. ‘‘तुमच्या पावलांच्या ठशावर पाय देत कोण तुमच्यामागून येईल?’’
त्यावर मृणालदा म्हणाले, ‘‘माझ्या पाऊलखुणाच कोठे उमटल्या आहेत? भुतांची पावले उमटत नसतात.’’ मात्र, त्यांच्या पाऊलखुणा त्यांच्या चित्रपटांच्या रूपात कायम टिकून आहेत.
मृणालदा यांना वेगवेगळ्या विषयांचे आकर्षण होते व त्यावर अतिशय वेगळ्या पद्धतीने विचार करणे हे त्यांचे वैशिष्टय़ होते. २००० साली ‘The Little Magazine’मध्ये त्यांनी ‘Our Lives, Their Lives’ या नावाचा एक लेख लिहिला होता. मिथ्यकथा आणि त्यांचे जीवनातील स्थान, मिथ्यांची बदलती रूपे यावर त्यांनी त्या छोटेखानी लेखात उत्तम टिप्पणी केली होती.
एके दिवशी मृणाल सेन त्यांच्या सुमारे सहा-सात वर्षांच्या मुलासोबत कोलकात्याच्या एका चौकात बसले होते. संध्याकाळची वेळ होती. आकाशात ढग जमा झाले होते व ते काळेभोर बनले होते. जोराचा वारा सुटला होता. अचानक एक भलीमोठी वीज आकाशाच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत जोरदार आवाज करीत चमकत गेली. ती पाहून त्यांचा मुलगा उद्गारला, ‘‘बाबा, तो पाहा, 70 mm स्क्रीन.’’
ही आठवण सांगून मृणालदा लिहितात, ‘मी चमकलो. ही प्रतिक्रिया विलक्षण होती. अशा परिस्थितीत माझ्या आजोबांनी ते या वयाचे असताना, विजेला पुराणकाळात अवतरणाऱ्या आकाशातील एका विशाल पक्ष्याची उपमा दिली असती. पण आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात माझा मुलगा या तंत्रयुगाची भाषा बोलत होता. आणि ते साहजिकच होते. एक आठवडय़ापूर्वीच मी त्याला 70 mm सिनेमा दाखवला होता. त्या अनुभवातून तो साऱ्या जगाच्या भाषेत बोलत होता. ही कुणा एका देशाची किंवा मानवसमूहाची भाषा नव्हती. माझा मुलगा त्या भाषेत बोलला आणि मला जाणवले, की जग आमच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचले आहे. मात्र, लगेचच हेही जाणवले, की जगाशी संपर्क करणारा या नात्याने मीदेखील एका चौरस्त्यावर येऊन पोहोचलो आहे.’
‘खेडय़ात राहणाऱ्या एखाद्या मुलाचे उदाहरण घेऊ. त्याने कदाचित काही सिनेमा पाहिले असतील, पण त्याने 70 mm चित्रपट पाहिलेला नसेल. अशावेळी आजच्या काळात असूनही माझ्या मुलाच्या उद्गारांचा अर्थ त्याला कळणार नाही. याचाच अर्थ- मी ज्याला जगाची भाषा म्हणत होतो, ती माझ्या देशातील बहुसंख्य माणसांना न कळणारी आहे! आजही खेडय़ातला एखादा कल्पक मुलगा वीज पाहिल्यावर जटायू किंवा गरुडाचे उदाहरण देईल. आज जरी व्हिडीओ पार्लर कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे सर्वत्र उगवलेले आहेत, तरी ही भाषा त्याला कळणारी नाहीच. मला वीज किंवा 70 mm बद्दल सांगायचे नाही. मला सांगायचे आहे की, एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून मी ज्या जनतेसमोर जातो त्यांच्यात किती मोठे अंतर पडले आहे! आणि ते वाढतेच आहे.
‘माझ्यासमोरचा प्रश्न असा आहे की, मी कुणासाठी कलाकृती निर्माण करू? शहरी लोकांसाठी की ग्रामीण जनतेसाठी? याचे एक आदर्श उत्तर असे की.. मधला एखादा मार्ग शोधून काढला पाहिजे. याचाच दुसरा अर्थ- मी तडजोड करावयास तयार झालो पाहिजे. लोकांशी संपर्क करण्यास इच्छुक कलाकार या नात्याने मला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे मोलाचे वाटते. पण या परिस्थितीत मी ते कसे करू शकणार? कलात्मक पातळीवरही यातून अनेक प्रश्न निर्माण होतात, ज्यांची उत्तरे शोधणे सोपे नाही.’
हा एक लहानसाच प्रसंग.. पण त्यामुळे मृणालदांच्या मनात विचारांची एक साखळी निर्माण झाली. त्यांना एक जुनी आठवण झाली. १९७५ साली ते आदिवासी जीवनावरील ‘मृगया’ हा चित्रपट तयार करीत होते. या चित्रपटाचा नायक मिथुन चक्रवर्ती होता. तसे हे आदिवासी विश्व त्यांच्यासाठी आणि युनिटमधील बहुतेकांसाठी नवीनच होते. जंगलाने वेढलेल्या एका गावात ते शूटिंग करीत होते. वातावरणाची ओळख व्हावी म्हणून त्यांनी साऱ्या युनिटला पाच दिवस आधीच जंगलात आणून ठेवले होते. मृणालदांनी चित्रपटाच्या नायकाला एका स्थानिक तरुणाकडून धनुर्विद्येचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली. त्याप्रमाणे त्याने पाच दिवस कसून सराव केला. शूटिंग सुरू झाल्यावर पहिला शॉट हा नायक झुडपामागे लपलेल्या हरणावर बाण मारतो असा होता. त्याप्रमाणे त्याने व्यवस्थित शॉट दिला व मृणालदाही म्हणाले.. ‘‘उत्तम.’’
‘‘नाही, हे चुकीचे आहे.’’ शूटिंग पाहण्यासाठी आलेला एक आदिवासी म्हणाला- ‘‘तुमच्या माणसाने बाण सोडण्यासाठी अंगठय़ाचा उपयोग करायला नको होता. बाणाचे त्याच्याकडचे टोक त्याने अंगठय़ाशेजारच्या दोन बोटांत पकडले पाहिजे.’’
‘‘अंगठा का नको?’’ मृणालदांनी विचारले.
‘‘कारण आम्ही एकलव्याचे वंशज आहोत.’’ तो काहीशा रागानेच म्हणाला. मृणालदा चकित झाले. हजारो वर्षांपूर्वीची महाभारतातील एकलव्य आणि द्रोणाचार्याची कथा इतक्या कालावधीनंतरही या दुर्गम भागातील अशिक्षित आदिवासी तरुणापर्यंत येऊन पोहोचली होती. त्यांना वाटले, परंपरांची मुळे किती सशक्त आणि किती खोलवर पोहोचलेली असतात!
पण खरी चकित होण्यासारखी गोष्ट तर एक वर्षांने घडली. मृणाल सेन पॅरिसला गेले असता एका मुलाखतीत त्यांनी हा किस्सा फ्रेंच प्रेक्षकांना सांगितला. सेन यांनी जेव्हा त्यांना आजच्या युगातील तरुण आणि प्राचीन मिथ्यकथा यांचा संबंध सांगितला तेव्हा तेही प्रभावित झाले. पण त्यांच्यापैकी एकजण (त्याने नंतर आपली ओळख आफ्रिकन आई आणि फ्रेंच बाप यांचा मुलगा अशी करून दिली) उठून म्हणाला की, याबाबतीत माझे मत वेगळे आहे. ‘एकलव्य-द्रोणाचार्य’ ही कहाणीच पूर्णत: खोटी असल्याचा त्याला संशय आहे. त्यावर सेन यांनी विचारले की, ‘‘तुला असे का वाटते?’’ त्याने सांगितले की, मी स्वत: एक व्यावसायिक धनुर्धर असून देशोदेशीच्या धनुर्विद्येचा खूप अभ्यास केलेला आहे. तो म्हणाला, ‘‘तुम्ही जगात कोठेही जा.. अगदी दुर्गम भागात जा. तुम्ही पाहाल की कोठेही बाण वापरणारे हे कधीच अंगठय़ाचा वापर करीत नाहीत. ते मधल्या दोन बोटांत धरूनच बाण सोडतात! मुळात हीच पद्धत रूढ असताना द्रोणाचार्यानी अंगठा मागून घेतला म्हणून भिल्ल दोन बोटांनी बाण मारू लागले, ही कथा खोटी ठरते.’’
हा प्रसंग सांगून मृणालदा लिहितात, ‘मी विचार करू लागलो.. असे जर असेल तर ही ‘बनविलेली’ गोष्ट खरी का मानली गेली? त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्याकडील एकाही अभ्यासकाने यादृष्टीने विचार का केला नाही? तिला आक्षेप का घेतला नाही?’ मृणाल सेन यांनी हा लेख लिहूनही आता सुमारे २० वर्षे झाली. बंगालमध्ये त्यानंतर या विषयावर चर्चा झाली किंवा नाही, मला ठाऊक नाही. पण महाराष्ट्रात अनेक विद्वानांनी महाभारताचा अभ्यास केलेला आहे. आदिवासी लोकांच्या चालीरीतींचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी कुणी या कथेच्या खरे-खोटेपणाविषयी किंवा शक्याशक्यतेविषयी विचार केला आहे का? या कथेला जर वास्तवाचा आधार नसेल तर ही कथा मुळात जन्मली कशी व समाजाच्या तळागाळापर्यंत झिरपत गेली कशी, याबद्दल माझ्या मनात विलक्षण कुतूहल निर्माण झाले आहे.
vvpadalkar@gmail.com