१९४० मध्ये कइट या बलाढय़ उद्योगसमूहाचे प्रमुख थॉमस वॅटसन यांनी पुढे भविष्यात सपशेल चुकलेले एक विधान केले होते. ते म्हणजे ‘जगात फार तर पाच संगणक विकले जातील.’ त्यानंतर आज सात दशके लोटली आहेत आणि जगातील संगणकांची संख्या अब्जांत मोजली जातेय. अर्थात त्या काळातील संगणकाचे अवाढव्य स्वरूप, किंमत आणि लष्करी अथवा सरकारी जनगणना यांसारख्या प्रचंड आकडेमोडीसाठी होत असलेला त्याचा वापर तेव्हा त्यांच्यासमोर असल्याने ते विधान त्यासंदर्भातच बघितले पाहिजे.
सध्याचे संगणक काय काय करू शकतात, यापेक्षा काय करत नाहीत, हे शोधून बघावे लागेल अशीच परिस्थिती आहे. खरं तर केवळ गणिती आकडेमोड जलद आणि कमी मानवी श्रमांत व्हावी याकरता गणन यंत्राचा मोठा भाऊ अशा स्वरूपात या यंत्राची निर्मिती झाली. परंतु आज आपल्या आसपासच्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक यंत्राचा भाग/ पायाभूत असण्यापर्यंत हे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. आकडेमोड करणारे यंत्र म्हणून असणारी ओळख पुसून ते आता कुठल्याही प्रकारच्या माहितीवर ( शब्द, आकडे, चित्रे, आवाज अशा कुठल्याही स्वरूपातील माहिती) प्रक्रिया करणारे यंत्र (Data Processing Machine) झाले आहे. आवश्यक माहितीच्या आधारे शब्दश: काहीही करू शकणारे हे तंत्र खेळणी, भ्रमणध्वनीपासून ते मंगळावर सोडलेल्या यानापर्यंत कुठलीही यंत्रे चालवू शकते. आणि हाच मूलभूत फरक गणन यंत्र (Calculator) आणि संगणक यामध्ये आहे. गणन यंत्र मनुष्याला चालवावे लागते, तर संगणक ठरवून दिलेल्या आज्ञेनुसार आपले काम स्वत:च करू शकतो.
आता आपण वापरत असलेला संगणक ही जरी विसाव्या शतकातल्या तंत्रज्ञानाची देणगी असली तरी २५०० वर्षांपूर्वी वापरात आलेले तारा आणि मणी वापरून केलेले अॅबॅकस हे प्राचीन गणन यंत्र ही संगणक तंत्राची सुरुवात मानली जाते. नंतरच्या काळात यांत्रिकी गणन यंत्रे तयार होत गेली. १८८० मध्ये अमेरिकेत जनगणना होत असताना त्या काळातील यंत्रांच्या साहाय्याने मोजणी करून मिळालेल्या माहितीचे संख्याशास्त्राच्या (Statistics) आधारे पृथ:करण करायलाच सात-आठ वर्षे लागत आहेत हे लक्षात आले. म्हणजे पहिल्या जनगणनेचे विश्लेषण व्हायच्या आतच दुसऱ्या जनगणनेची वेळ आली. यावेळी हर्मन होलीयर्थने १८८९ मध्ये एक नवीन गणन यंत्र तयार केले आणि त्याला नाव दिले-‘टॅब्युलेटर’! यामुळे जनगणनेच्या विश्लेषणाचे काम फक्त सहा आठवडय़ांत झाले. या यंत्राचे वाढते उपयोग आणि मागणी लक्षात घेऊन त्याने ‘टॅब्युलेटिंग मशीन कंपनी’ ही नवीन कंपनीच तयार केली आणि १८९६ मध्ये त्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले. पुढे या कंपनीचे नाव ‘कम्प्युटिंग- टॅब्युलेटिंग- रेकॉर्डिग (उळफ) कंपनी’ असे त्याचे बारसे केले आणि १९२४ मध्ये याच कंपनीने कइट- ‘इंटरनॅशनल बिझिनेस मशीन्स’ हे नाव धारण केले.
चित्र क्र. १ मध्ये होलीयर्थने १८८९ मध्ये स्वामित्व हक्क मिळवताना सादर केलेला ‘टॅब्युलेटर’चा आराखडा दिसतो. यावेळी त्याने यंत्राला देण्याची माहिती पुरवण्यासाठी भोके पाडलेल्या कागदी पट्टय़ांचा वापर केला होता. संगणकाला माहिती पुरवण्याचे हे तंत्र अगदी विसाव्या शतकातल्या आठव्या दशकापर्यंत वापरात होते. कइट उदयाला येत असतानाच १९२५ मध्ये व्हानेवार बुश या अमेरिकन शास्त्रज्ञाने ‘डिफरन्शियल अॅनालायझर’ (चित्र क्र. २) नावाचे एक बलाढय़ गणन यंत्र तयार केले. हे सदृश (अठअछडॅ) पद्धतीने चालणारे यंत्र तारा, पट्टे, दन्तचक्रे वापरून काम करत असे. सर्व आकडे जसेच्या तसे यंत्राला पुरवले जायचे. (म्हणजे आकडय़ाच्या किमतीइतके तारेचे वेटोळे किंवा दन्तचक्राचे दाते इ.) या यंत्रात १५० मोटर आणि ३२० कि. मी. लांबीच्या तारा होत्या.
माहिती देण्याकरता पुढे वापरात आलेली द्विअंकी (Binary) पद्धत आणि बुलियन बीजगणिताचा वापर करून आधुनिक संगणक काम करू लागले. तारा, दंतचक्रे वापरून होणारी कामे आधी विद्युत् संकेत देणाऱ्या नळ्यामध्ये (Cathode Tubes) आणि नंतर अर्धवाहक वापरून बनवलेल्या इलेक्ट्रॉनिक सूक्ष्म चकत्यांमध्ये (Integrated Circuits and Microchips) होऊ लागली आणि संगणक आकाराने लहान, स्वस्त आणि वापरायला सोपा झाला.
सध्या आपण वापरत असलेल्या संगणकातील माहिती चित्र क्र. ३ मध्ये दाखवल्याप्रमाणे शब्दश: हातात मावेल अशा आकाराच्या चकत्यांवर साठवता येते; ज्यासाठी काही दशकांपूर्वी मोठय़ा खोलीत मावणाऱ्या यंत्राची गरज असे. चित्र क्र. ३ ‘अ’मध्ये दाखवलेला बोटभर आकाराचा पेन ड्राइव्ह हेही उपकरण माहिती साठवण्यासाठी वापरतात. हार्ड डिस्क संगणकात कायमस्वरूपी बसवलेली असते, तर पेन ड्राइव्ह आपण कुठेही नेऊ शकतो.
संगणक म्हणजे माहितीवर प्रक्रिया करणारे यंत्र. हा काय करतो, तर बाहेरून माहिती (Input) घेतो, आतमध्ये साठवतो (store/ memory), त्याच्यावर ठरवल्याप्रमाणे किंवा आलेल्या आदेशाप्रमाणे प्रक्रिया (process) करतो आणि अपेक्षित स्वरूपात माहिती देतो (Output). चित्र क्र. ४ मध्ये हेच आपल्याला तक्त्याच्या स्वरूपात दाखवले आहे. चित्र क्र. ५ मध्ये संगणकाचे बाह्य स्वरूप दिसते.
ही झाली संगणकाची प्राथमिक ओळख! संगणक काम करण्याकरता आवश्यक असलेल्या इतर तांत्रिक आणि व्यवस्थापन पद्धतींची माहिती घेऊ पुढच्या भागात.
-dpdeodhar@gmail.com