मानवी मन एखाद्या खोल विहिरीसारखं असतं. त्यात उमटणारे विचारांचे तरंग तर त्याहून गहिरे. माणसाच्या मनात उठणाऱ्या विचारांचे तरंग त्याच्यावर, त्याच्या कुटुंबावर आणि एकूणच समाजावर काय काय परिणाम करतात? मुळात हे विचार येतात कुठून? त्यातले सकारात्मक अन् नकारात्मक विचार कोणते? त्यांना सुयोग्य वळण कसं लावावं? आदी प्रश्नांबद्दल मुक्त संवाद साधणारं सदर..
‘माझिया मना जरा थांब ना, पाऊली तुझ्या माझिया खुणा, तुझे चालणे अन् मला वेदना..’ मनाचं किती सुंदर वर्णन कवी सौमित्र यांनी केलंय! आशाताईंच्या तितक्याच उत्कट स्वरात ते अधिकच स्पर्शून जातं. मनात सतत विचारांचा प्रवास चालू असतो. तो काही वेळा इतका वेगात होतो की, त्यामुळेच वेदना होते. विचारांच्या मुळातूनच म्हणजे भावनांचा उगम होतो, हेच या ओळींमधून प्रतिध्वनित होताना दिसतं.
बहिणाबाईंची ‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर,’ ही कविता पहा. मनातले विचार, आवेग यावर नियंत्रण ठेवणं कसं कठीण असतं, ते त्यांनी त्यांच्या ग्रामीण ढंगात अतिशय चपखलपणे सांगितलं आहे.
हे कधी गुरासारखं वागणारं, कधी पाखरू होणारं, कधी खटय़ाळ होणारं मन आपल्याला नसतंच तर?.. तर मग खरंच आपलं ‘ढोर’ झालेलं असतं. ‘मन’ ही अशी गोष्ट आहे, जी आपल्याला, पशूंपासून मनुष्य करणारं मोठं वरदान ठरलं आहे. इतर सर्व प्राण्यांच्या मेंदूत नसणारा निओ कॉर्टेक्स हा भाग मानवी मेंदूत असतो. त्याचमुळे तर माणूस वेगळा झाला आहे. बुद्धी, विचार, तर्क यांसारखी महत्त्वाची काय्रे या भागातून होतात, म्हणूनच माणूस ‘मनुष्य’ झाला.
पण मग हे मन असतं तरी कोठे? हे मन मानवी मेंदूतील प्रीफ्रॉटल कॉर्टेक्स, िलबिक कॉर्टेक्स, हायपोथॅलॅमस हा भाग मन म्हणून कार्य करतो, असं म्हणता येईल. यातील हायपोथॅलॅमस हा भाग आपल्या भावना व विशेषत: वागणं नियंत्रित करतो. तर विचारांचं पूर्ण नियंत्रण कॉर्टेक्स या भागाकडे असतं. म्हणूनच कोणत्याही तणाव नियोजनासाठी या दोन्ही भागांवर आधारित समायोजन शैली/उपाय वापरले तर तणाव कमी करता येतो असं आढळून आलं आहे. उदा. चिंता, ताणामुळे हृदयाची धडधड, गुदमरल्यासारखं वाटणं वगरे लक्षणं कमी करण्यासाठी योगासनं, प्राणायाम, दीर्घ श्वसनाचे व्यायाम हे हायपोथॅलॅमिक उपाय आहेत, तर दृष्टिकोनात, विचारात बदल करणं हा कॉर्टिकल उपाय झाला. योग, प्राणायाम, विपश्यना, सुदर्शन क्रिया वगरे ध्यानधारणेच्या उपायांविषयी आपल्याला बरीच माहिती आहे. पण विचारांना सुयोग्य वळण लावायचं कसं, ही गोष्ट शिकणं जास्त गरजेचं आहे. आपण भारतीय भावनाप्रधान असल्याने भावनांवर, वागण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्यानधारणेच्या उपायांचं आपल्याकडे खूपच पीक आलेलं दिसतं. परंतु, या सर्वाचं मूळ ज्या विचारात असतं, ते योग्य वळणावर आणण्यासाठी प्रयत्न करणारे खूपच कमी दिसतात. त्याचबरोबर आणखी एक बाब लक्षात घेणं आवश्यक आहे ते म्हणजे वैद्यकशास्त्रीय संशोधनानुसार, या भागांचे कार्य जीवरासायनिक संप्रेरकांद्वारे (Neurotransmitters) चालतं. त्यामुळे त्यांच्या प्रमाणात, कार्यात अडथळे निर्माण झाल्यास वा कमी झाल्यास आपल्या विचार, भावना, वागणं, शारीरिक काय्रे यांवर परिणाम होताना दिसतो. हा परिणाम सुरुवातीला नियंत्रणात आणणंही गरजेचं असतं. म्हणूनच सुरुवातीच्या काळात औषधोपचार नक्कीच महत्त्वाचे असतात. किंबहुना औषधोपचार, मानसोपचाराचे हायपोथॅलॅमिक उपाय व नंतर विचारांना वळण लावण्यासाठी ‘विवेक वर्तन उपचार’ (REBT) या तिन्हीचा मेळ कुठल्याही मानसिक समस्या सोडवण्यासाठी खूपच परिणामकारक ठरतो.
आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो. अमेरिकेतील एका रुग्णालयामधील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये एक मुलगा बरेच दिवस दाखल झाला होता-नेफ्रायटीसच्या आजारासाठी, म्हणजेच किडनी विकाराच्या उपचारासाठी. दर बुधवार व रविवार मुलांना त्यांचे आई-वडील भेटायला यायचे. पण या मुलाचे आई-वडील मात्र त्याला बरेच दिवस भेटायला येत नव्हते. त्या दिवशी तर त्याचा नववा वाढदिवस होता. सर्व मुलांचे आइर्-वडील आले होते, पण याचे आई-वडील मात्र आलेच नाहीत. सलग दहा महिने अंथरुणावर तो पडून होता. सुरुवातीला आई यायची, भेटवस्तू आणायची. पण नंतर दोन महिन्यांनंतर तिचं येणं बंद झालं. वडील तर त्याला अॅडमिट केल्यापासून आलेच नव्हते. पण वाढदिवस असूनसुद्धा कोणीच आलं नाही. त्यामुळे या मुलाच्या मनात विखार निर्माण झाला. तो संतापला, उद्वेगाने ओरडू लागला. बेडच्या रेिलगवर जोरजोरात मुठी आपटायला लागला. िभतीवर डोकं आपटून घ्यायला लागला. त्यामुळे नर्स धावत आली आणि ओरडली, ‘काय हे दर बुधवार व रविवारचं तुझं नाटक? वॉर्डमधली शांतता तुझ्यामुळे भंग पावते. परत असा वागलास तर जाड सुईचं इंजेक्शन टोचीन.’ मग तो मुलगा शांत झाला. इंजेक्शनच्या भीतीमुळे गप्प पडून राहिला. त्याच्या मनात विचार आले की हे सर्व आई-वडीलांमुळेच! नऊ-दहा महिने हॉस्पिटलमध्ये पडून राहिलेल्या मुलाबद्दल काहीच कसं वाटत नाही. माझा वाढदिवस, पण लक्षात ठेवला नाही. गोष्टीच्या पुस्तकातले आई-वडील किती छान असतात, मग माझे असे का? विचार करता करता त्याला एकदम थकवा आला. निराश वाटायला लागलं. पण मनातली निराशा अशी आपणहून थोडीच जाणार होती? प्रयत्नपूर्वक हकालपट्टी केल्याशिवाय ती माझी पाठ सोडणार नाही, हे त्याला कळलं. मग ती कमी करण्यासाठी काय करता येईल, याचा तो विचार करू लागला. तो स्वत:चे विचार परत परत तपासू लागला. आई-वडील निवडणं माझ्या हातात थोडंच आहे. त्यांनी माझ्याशी कसं वागावं, हे माझ्या हातात थोडंच आहे? त्यांनी माझ्याशी प्रेमानं वागलं पाहिजे, पण मी कितीही आटापिटा केला तरी त्यांना बदलू शकणार नाही, ते बदलणार नाहीत. मी मोठा होईपर्यंत त्यांच्यावर अवलंबून राहणं मला भाग आहे. या परिस्थितीत मी काय करू शकेन? आई-वडील लक्ष देत नसले तरी मी स्वत:कडे लक्ष देऊ शकेन! अशा प्रकारे विचारांच्या मुळाशी जाऊन मग त्याचं मन शांत झालं. आई-वडीलांना बदलणं त्याच्या हातात नसलं तरी त्यांच्याबाबत कसे विचार करावेत, हे माझ्या पूर्ण हातात आहे, हा त्याला लागलेला शोध; त्याचे पाय पाळण्यात दाखवणाराच होता.
हा मुलगा म्हणजे दुसरा कोणी नाही तर सदसद्विवेकवर्तन, उपचारपद्धतीचे जनक डॉ. अल्बर्ट एलिस होय! त्यांच्या या उपचारपद्धतीच्या मांडणीमुळे विचारांना सुयोग्य वळण कसं लावायचं याची शास्त्रीय बठक निर्माण झाली. त्यामुळे मानसोपचाराच्या उपायात एक क्रांतीच झाली. आपल्यावर जे नराश्य, संताप यांसारखे नकारात्मक परिणाम होतात ते कोणत्याही घटनेमुळे घडणारे नसतात. अशा घटना अनेकांच्या बाबतीत घडतात. पण परिणाम मात्र हाच होतो, असं नाही. त्यामुळे अशा घटनेबाबत विचार करण्याची जी अनेक वर्षांपासून घडत आलेली विचारपद्धती (Belief System) असते ती जबाबदार असते. त्यामुळे ती अविवेकी असेल तर परिणाम नराश्य, क्रोधसारख्या अविवेकी, नकारात्मक भावना व वर्तनामध्ये होतो, असं डॉ. एलिस यांनी या पद्धतीबाबत सांगितलं आहे. त्यामुळे ही विचारपद्धती विवेकाकडे कशी न्यायची हे त्यांनी स्वानुभवातून निर्माण केलेल्या या उपचारपद्धतीत विशद केले आहे. आपण याचाच आधार घेऊन वेगवेगळ्या समस्या कशा सोडवायच्या ते पाहणार आहोत!
विवेकी उपाय
मानवी मन एखाद्या खोल विहिरीसारखं असतं. त्यात उमटणारे विचारांचे तरंग तर त्याहून गहिरे. माणसाच्या मनात उठणाऱ्या विचारांचे तरंग त्याच्यावर, त्याच्या कुटुंबावर आणि एकूणच समाजावर काय काय परिणाम करतात? मुळात हे विचार येतात कुठून? त्यातले सकारात्मक अन् नकारात्मक विचार कोणते? त्यांना सुयोग्य वळण कसं लावावं? आदी प्रश्नांबद्दल मुक्त संवाद साधणारं सदर..
First published on: 20-01-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व माझिया मना बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on human mind