प्र. सु. हिरुरकर
एकीकडे व्याघ्र प्रकल्पांतील वाघांची वाढती संख्या व त्याच्या परिणामी बहरलेले व्याघ्र पर्यटन, तर दुसरीकडे जंगलाबाहेर पडून वाघांचे माणसे व गुराढोरांवर होणारे हल्ले, रस्ते ओलांडताना होणारे त्यांचे अपघात आणि शिकारी.. विसंगतीने व्यापलेले हे चित्र अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे. २१ मार्च रोजीच्या जागतिक वन्यदिनानिमित्ताने या समस्येचा ऊहापोह करणारा विशेष लेख..
जगात पर्यटन उद्योगाने जवळपास गेल्या दोन दशकांपासून चांगली भरारी घेतली आहे. जसजशी आर्थिक सुबत्ता वाढत आहे, तसतसे पर्यटन उद्योग आणि त्याचे स्वरूपही बदलत आहे. भारतात अलीकडे ऐतिहासिक स्थळांपेक्षा जंगलातील व्याघ्र पर्यटनाकडे पर्यटकांचा जास्त ओढा असल्याचे दिसून येते. जगभरातही हेच चित्र आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून वाघ बघायचा तर महाराष्ट्रातील एकमेव हमखास ठिकाण म्हणजे ‘ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प’! ‘ताडोबा’ हे नाव सध्या देश-विदेशात चच्रेत आहे. पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर दिवस-रात्र चालणाऱ्या व्याघ्र पर्यटन व्यवसायाने वन खात्याला सुगीचे दिवस आणले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र, व्याघ्र पर्यटनातील ही वाढ जितकी चांगली, तेवढीच ती वाघांच्या नैसर्गिक वर्तणुकीवर वाईट परिणाम करणारी ठरते की काय, अशी शंका येणेही क्रमप्राप्त होय. जंगल म्हणजे केवळ वाघच आहे का? .. नक्कीच नाही. जंगलातील प्रत्येक सजीव, त्यांचे रंगरूप आणि त्यांच्या जीवनाचे रहस्य काहीसे अनाकलनीय असले तरीही सततच्या प्रयत्नांनी ते जाणून घेता येऊ शकते. मग एखाद्या वन्यजीवाचा अभ्यास करता करता आयुष्यही अपुरं वाटू लागतं.
आज भारतात १०५ राष्ट्रीय उद्याने, ५० व्याघ्र प्रकल्प, तर ७०० हून अधिक अभयारण्ये आहेत. महाराष्ट्राचाच विचार केला तर पेंच, ताडोबा, गुगामल, नवेगावबांध, चांदोली व संजय गांधी उद्यान अशी सहा राष्ट्रीय उद्याने आहेत. राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आणि ४७ अभयारण्ये आणि चार वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्रे आहेत. यातील सगळ्या व्याघ्र प्रकल्पांत कमी-जास्त प्रमाणात व्याघ्र पर्यटन सुरू आहे. तथापि व्याघ्र पर्यटनात महाराष्ट्रात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने साऱ्या जगाचे लक्ष वेधले आहे. येथे मोठय़ा प्रमाणात बहरलेल्या पर्यटनावरून हे सहजी लक्षात येते. गेल्या पाच-सात वर्षांपासून ताडोबा-अंधारीत एकाच वेळी वाघाला पाहण्यासाठी आणि त्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उडणारी झुंबड पाहता हे ध्यानात येते. मात्र, अशावेळी जंगलाचा राजा असलेल्या वाघाची होणारी स्थिती पाहून त्याची काहीशी कींव केल्याशिवाय राहवत नाही.
येथे येणाऱ्या बहुतांश पर्यटकांना भरपूर प्रमाणात व्याघ्रदर्शन झाल्याने ते अति उत्साहित होतात, सुखावून जातात. शंभर-दीडशे फुटांपासून ते अवघ्या आठ-दहा फुटांपर्यंतसुद्धा वाघ दिसून येतो. काही वेळा तर पर्यटकांच्या जिप्सीला खेटून जाणारे वाघही आढळून येत असल्याने ते माणसाळलेत की काय, अशीही शंका मनाला चाटून जाते.
मॅट हेवर्ड आणि गिना हेवर्ड यांनी आफ्रिकेतील अति वन-पर्यटनामुळे सिंहांच्या मानसिक-शारीरिक स्थितीवर काय परिणाम होतात, यासंबंधात २००८ साली केलेल्या संशोधनात माणसाच्या सततच्या सहवासामुळे सिंह प्रचंड तणावात असल्याचे आढळून आले. त्यातून सिंहांच्या उभे राहणे, बसणे यांपासून ते त्याच्या झोपण्या-उठण्यापर्यंत सर्वच गोष्टींवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यांच्या प्रजननक्षमतेवर आणि छाव्यासोबतच्या त्यांच्या सहवासावरसुद्धा प्रतिकूल परिणाम झाला. तसेच त्यांच्या हृदयाची स्पंदने वाढणे, अस्वस्थ होणे, शारीरिक ऊर्जा कमी झाल्याने चपळता कमी होणे आदी लक्षणेही त्यांच्यात आढळून आली. याशिवाय, हे सिंह त्यांचे नैसर्गिक जगणेच विसरून गेल्याची नोंद या संशोधनात आहे.
ताडोबा-अंधारी प्रकल्पात एकूण ८६ वाघ आहेत. वाघांच्या अस्तित्वाच्या घनतेनुसार एका नर वाघाला जवळपास ३० ते ४० चौ. कि. मी. एवढे वनक्षेत्र हवे असताना या प्रकल्पात मात्र वाघांच्या अस्तित्वाची घनता १०० चौरस कि. मी.मध्ये ५.८२ वाघ एवढी झाली आहे. याचा अर्थ ताडोबा-अंधारी प्रकल्पात आवश्यकतेपेक्षा वाघांची संख्या वाढत चालली असून, ही बाब जंगलाच्या आणि पर्यावरणाच्या संतुलनाकरिता अपचनासारखी ठरते आहे, तशीच ती दूरगामी परिणाम करणारीही आहे. कारण हळूहळू याचे दुष्परिणामही जाणवू लागले आहेत. आवश्यक घनतेपेक्षा जास्त वाघ झाल्याने पर्यटकांना व्याघ्रदर्शनाची पर्वणी आणि पर्यटनाचा धंदा फोफावत असला तरी ही बाब वाघांच्या नैसर्गिक अधिवासाला घातक ठरू शकते. त्यामुळे अधिवासाकरता दोन वाघांमध्ये भांडण होऊन एकाचा मृत्यू होण्याचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच दोन वाघांच्या भांडणात जखमी झालेला आणि हरलेला वाघ शिकार करण्यायोग्य स्थितीत न राहिल्याने असे वाघ बाहेरच्या वनक्षेत्रात वा वनक्षेत्रालगतच्या गावांत जाऊन गुरेढोरे व माणसांवर हल्ले करताना आढळून येत आहेत. वाघ-अस्वलांच्या या हल्ल्यांतून मानव आणि वन्यप्राणी यांत संघर्ष वाढल्याचे चंद्रपूर जिल्ह्य़ात दिसून येत आहे. भविष्यात त्यास अधिक भयावह स्वरूप येऊ शकते. कारण गेल्या ऑक्टोबरमध्ये वरोरा भागातील वाघिणीच्या तीन- साडेतीन वर्षे वयाच्या एका पिल्लाची आईपासून ताटातूट होऊन ती भरकटल्याने वर्धा-अमरावती जिल्ह्य़ांत प्रवेश करून तिने दोन माणसांचे आणि सहा गुराढोरांचे बळी घेतले आणि ती मोर्शीमाग्रे मध्य प्रदेशात निघून गेली. ही बाब नक्कीच चिंतित करणारी आहे. पांढरकवडातील १३ माणसांचे बळी घेणारी नरभक्षक अवनी वाघीण हेही याचेच उदाहरण!
गतवर्षी देशात ९९ वाघ व ४७३ बिबटय़ांचा मृत्यू झाला. त्यापैकी महाराष्ट्रात २० वाघांचा मृत्यू झाला असून, देशात वाघांच्या मृत्यूमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्य़ात मानव-वन्यजीव संघर्षांत गेल्या वर्षांत २७ जणांचा बळी गेला. २०१७ मध्ये एकटय़ा चंद्रपूर जिल्ह्य़ात सहा वाघांचा मृत्यू झाला असून, ताडोबा-अंधारी प्रकल्पात तीन वाघ मृत्युमुखी पडले. तसेच सुमारे १५ दिवसांतून एकदा तरी रस्ता ओलांडताना
बिबटे, अस्वल, सांबर, चितळ, रानडुक्कर आदी वन्यजीव वाहन अपघातात मरण पावतात असे आढळून आले आहे. ताडोबा-अंधारी प्रकल्पात वाघांना मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले खाद्य- म्हणजेच इतर तृणभक्ष्यी प्राण्यांची संख्या येथे भरपूर प्रमाणात असावी. त्यामुळे वाघांना पोट भरण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नसावेत. या कारणाने येथील वाघांची प्रजननक्षमताही वाढली आहे. म्हणूनच पर्यटकांना एकाच वेळी एखादी वाघीण चार-पाच पिल्लांचा सांभाळ करतानाही दिसून येते. एवढेच नव्हे तर गेल्या जून महिन्यात सुनील देशमुख हा माझा निसर्गसखा ताडोबा सफारीवर गेला असता त्याला तब्बल ११ वाघांचे दर्शन झाले! वन-व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही बाब भूषणावह असली तरी अस्तित्वात असलेल्या वनक्षेत्रावर ही वाढती संख्या हळूहळू ताण वाढवणारी ठरू शकते. क्षमतेपेक्षा जास्त झालेल्या ताडोबा-अंधारीतील वाघांमुळे पर्यटकांना कधी कधी एकाच दिवशी अनेक वाघांचे दर्शन घडणे, पर्यटकांनी गच्च भरलेल्या अनेक वाहनांनी वाघाला घेरणे, वाघाने गाडीजवळ येऊन गाडीला स्पर्श करण्यामुळे दिवस-रात्र व्याघ्र पर्यटनाचा
उद्योग जोमात फुलतो आहे. मात्र, त्यामुळे वाघांच्या नैसर्गिक सवयींत बदल होणे ही गंभीर बाब आहे.
याचे ताजे उदाहरण म्हणजे गेल्या नोव्हेंबरमध्ये दोन जिप्सीचालक आपल्या गाडय़ांच्या मधे आलेल्या वाघापासून अंतर कमी करत गेल्याने वाघ गोंधळला आणि पुढच्या जिप्सीमागे धावू लागला. हे कशाचे लक्षण आहे? जंगलाचा राजा असलेल्या वाघाच्या अरण्यरुदनापासून आपण काही बोध घेणार आहोत की नाही? जंगलाबाहेर पडून वाघ-अस्वलांचे माणसांवर होणारे हल्ले, रस्ते ओलांडताना त्यांचे होणारे अपघात, शिकारी आदींतून आपण काही धडे शिकणार की नाही?
येथील वाघांचे स्थलांतर त्यांची कमी संख्या असलेल्या जंगलामध्ये करावे की नाही, आणि तसे ते केले तर यशस्वी होईल का, याबाबत वन्यजीव तज्ज्ञ आणि अभ्यासकांमध्ये सकारात्मक व नकारात्मक अशी दोन भिन्न मते व्यक्त होत आहेत. मात्र, वाघांच्या वाढलेल्या संख्येमुळे चालू दशकात चंद्रपूरसोबतच संपूर्ण विदर्भात मानव-वन्यजीव संघर्षांची बीजे पसरू लागली आहेत. हे पाहता यावर गांभीर्याने विचार करून प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे. व्याघ्र पर्यटन व व्याघ्र संवर्धन यापैकी कशाची निवड करायची, हे शेवटी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापक आणि पर्यटकांनी ठरवायचे आहे. कारण एकदा पैसे मोजले की मनसोक्त पाहून घ्यावा आणि त्याच्याबद्दलचे कुतूहल संपून जावे, असा जीव वाघ हा नक्कीच नाही.
केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने दिलेल्या माहितीनुसार, देशात महिन्याला तीन वाघांचा बळी जात असून गेल्या दहा वर्षांत ३८४ वाघांची शिकार करण्यात आली. ही बाब वाघांच्या संरक्षण आणि संवर्धन मोहिमेबाबत चिंता निर्माण करणारी आहे. गेल्या २२ महिन्यांत ३३ वाघांचा बळी गेला असून त्यापैकी २२ मृत्यू हे नैसर्गिक, एक मृत्यू अपघाती, तर दहा वाघांची शिकार झाली आहे. यात सात वाघ आणि तीन वाघिणींचा समावेश आहे. अगदी अलीकडे, म्हणजे १५ नोव्हेंबरला चंद्रपूर भागात चिचपल्लीच्या जंगलात रेल्वेच्या धडकेत वाघाच्या तीन बछडय़ांचा मृत्यू झाला असून डिसेंबरच्या सुरुवातीला ताडोबा बफर झोनमध्ये भामढेळी गावालगतच्या शेतात विजेच्या तारेच्या धक्याने आणखी एका वाघाचा बळी घेतला आहे. हे असेच चालू राहणार काय?
ऑस्ट्रेलियातील जेम्स कूक विद्यापीठातील शास्त्रज्ञ बिल लॉरेन्स यांनी सांगून ठेवले आहे, की सध्या जगात केवळ चार हजार वाघ शिल्लक राहिले आहेत. २०७० सालापर्यंत पृथ्वीवरून ‘बंगाल टायगर्स’ ही वाघांची अत्यंत आकर्षक प्रजाती नष्ट होईल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या अद्भुत जीवाचे प्रमुख आश्रयस्थान असलेले सुंदरबन त्याच्या आसपास होत असलेल्या औद्योगिक विकासामुळे धोक्यात आले आहे. काही दशकांपूर्वी मोठय़ा प्रमाणात आढळणारा हा देखणा जीव आता केवळ भारत आणि बांगलादेशातील नदीखोऱ्यांतच आढळू लागला आहे. जलवायू परिवर्तन, सागरी तळ व अन्य घटकांबद्दल संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, येत्या ५० वर्षांत ‘बंगाल टायगर्स’ पृथ्वीवरून पूर्णत: नष्ट होतील. यापासून आपण काही बोध घेणार का?
ranbhul@gmail.com