अडकीत जाऊ खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
भुलोजीला लेक झाला
नाव ठेवा दत्ता
अडकीत जाऊ खिडकीत जाऊ
खिडकीत होती टिपरी
भुलोजीला लेक झाली
नाव ठेवा झिपरी
वर्षांनुवर्ष.. किती तरी वर्षांपासून हे गाणे आम्ही ऐकतो आहोत. ही त्या काळची कविताच. जन्मल्यावर गाण्यांनी स्वागत. मेल्यानंतरही ‘राम नाम सत है..’ असे तालात म्हणत पोचवायचे. मधल्या काळात अंगाई यायची. विहिणीच्या पंक्तीत गाणी गायची. जात्यावर ओव्या म्हणायच्या. शेतकऱ्यांनी तिफनीची आरती म्हणायची. भाताची लावणी करताना समूहस्वरात गाणे म्हणायचे. आदिवासींनीही गाणी रचायची आणि ढोल, तारपा या वाद्यांसमवेत नाचत गाणी म्हणायची. रचनाकार माहीत नसलेली कोळीगीते. याचा अर्थ असा होत नाही का, की माणूस २०१३ इसवी सनातला असो की हजार वर्षांपूर्वीचा तो गाण्याशिवाय (इतरही कलांशिवाय) जगू शकत नव्हता? केशवसुत म्हणतात की, ‘गाण्याने श्रम वाटतात हलके, हेही नसे थोडके.’ हेही एक कारण असेल किंवा गाण्यामुळे जगण्यात आनंद निर्माण होत असेल पण या निर्मितीचा संबंध दु:खाशी जोडण्यात आला. आपल्याला हसण्यापेक्षा रडण्याचं कौतुक जास्त. मग थोर लोकांनी सांगितले की, सुखात्मिकेपोक्षा शोकात्मिका श्रेष्ठ. मग क्रौंच पक्ष्याला मारलेला बाण आणि कवीने उच्चारलेला शोकपूर्ण श्लोक यांचे उदाहरण, ‘दु:खातूनच काव्याचा जन्म’ असे प्रतिपादन करणाऱ्यांना बळ देणारे ठरले. मला सहज एक वाक्य, रेक्स हॅरिसन या प्रसिद्ध अभिनेत्याने म्हटलेले आठवते. तसे ते नाटकासंदर्भात होते तरीही (कधी काळी आपल्याकडे नाटक आणि काव्य यांचे एकरूपत्व साकार होत असे, असेही आठवले.) हे रेक्स हॅरिसन तेच असावेत, ज्यांनी ‘क्लिओपात्रा’ या चित्रपटात एलिझाबेथ टेलर आणि रिचर्ड बर्टन यांच्याबरोबर सीझरची भूमिका वठविली होती. त्यांचे ‘गंभीर आणि गमतीदार’ उद्गार असे- ‘Any fool can play a tragedy, but comedy is dam serious business.’ तर असो. या पाश्र्वभूमीमुळे कवी दु:खी राहायला लागले. दु:ख नसेल तर निर्माण करायला लागले. खरा पेच पुढे होता. दु:खाची कविता कशी करायची?
मुक्तछंदाचा पुरस्कार कवी अनिल, वा. ना. देशपांडे, शरच्चंद्र मुक्तिबोध यांनी प्रामुख्याने केला. तशी कविताही लिहिली. बदलते जग, बदलता काळ यांची आव्हाने प्रचलित आणि पारंपरिक वृत्तांना आणि छंदांना पेलणार नाहीत, असेही त्यांना वाटले. तरीही त्यांनी कवितेचे गद्य होऊ दिले नाही किंवा ती गद्यप्राय होऊ दिली नाही. मुक्तिबोधांचा महापुरासारख्या प्रवाहाने रोंरावत येणारा मुक्तछंद वाचला की, याचा प्रत्यय येतो. पण या मुक्तछंदाला प्रतिष्ठा मिळाल्याचा एक विपरीत परिणाम असा झाला की, कवींना कविता लिहिणे सोपे वाटू लागले. गद्यातला आडवा मजकूर उभा केला की झाली कविता, असे अनेकांना वाटू लागले. खरे तर अधिक स्वातंत्र्यानंतर अधिक जबाबदारी येते, हे भान सुटले आणि शब्दांचा वारेमाप वापर सुरू झाला. ज्यांना छंद, वृत्त, लय, ताल, अनुप्रास, यमक यांची जाण आहे, त्यांचा मुक्तछंदसुद्धा आखीव, रेखीव, बांधीव असतो. आजकाल तर कवी मुक्तछंदातही लिहीत नाहीत; ते छंदमुक्त लिहितात.
छंद काय आणि मुक्तछंद काय- याचे मनोहारी रूप पाहायचे असेल तर कवींनी (यात कवयित्रीही आल्या बरं का!) इंदिरा संतांची कविता वाचावी, अभ्यासावी.
या मुक्तछंदाची सुरुवात होईपर्यंत मराठी कविता वृत्तात, छंदात, गीतांच्या आकारातच लिहिली जात होती. (पुढेही, म्हणजे पुढील काळात मुक्तछंद लिहिणाऱ्या कवींनी गाणी, गजल, अभंग लिहिलेच. आपला आशय गडद करण्यासाठी ‘ही ओसपणाची कोसच्या कोस पसरलेली वाळू कुणाची’ असे लिहिताना अनुप्रासाचा उपयोग करून ध्वनी आणि दृश्यात्मक परिणाम साधला.) कोणीही गाण्याला विरोध केला नाही. काही अतिरेकी साहित्यप्रांतातही आहेत. आजकालच्या भाषेत त्यांना ‘टगे’ असेही म्हणता येईल. भा. रा. तांबे, बा. भ. बोरकर, ग. दि. माडगूळकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, सुरेश भट, शाहीर अमरशेख, गवाणकर, शाहीर साबळे यांनी लिहिलेली गाणी वाचली आणि ऐकली तर ‘सामार्थ्यांचा स्वर’ जाणवतो (बालकवींचे ‘गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी’ हे अर्धे राहिलेले गीत वाचले तरी ‘पूर्णत्वा’चा प्रत्यय येतो.).
कधी कधी तर असे वाटते की, या कवींचे एखादे गीत निवडून एका पारडय़ात टाकले आणि छंदमुक्त कविता लिहिणाऱ्या चार उच्छृंखल कवींचे चार संग्रह जरी दुसऱ्या पारडय़ात टाकले तरी गीताचे पारडे जड ठरेल.
मग विचार येतो की, गीत आणि कविता यांत तर-तमभाव करायला सुरुवात केव्हापासून झाली असावी? बहुतेक तेव्हापासून- सिनेमात गाणी लिहिणे सुरू झाले तेव्हापासून. ज्या गाण्यात, कवी आत्म-भावाने नसतो आणि मागणीनुसार पुरवठा करतो. खुद्द कवींनाही असे वाटते का? मंगेश पाडगावकर आणि शांताबाई शेळके यांनी आपली सुंदर नादमधुर आणि रसाळ गीते त्यांच्या कवितासंग्रहात समाविष्ट केली नाहीत. गीतांची वेगळी पुस्तके काढली.
मराठी काव्यजगताचे हे आतील रूप गंभीरपणे न्याहाळणे हा आपल्या काव्यसंस्कृतीच्या अभ्यासाचाच एक भाग आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. याच संस्कृतीचे एक बाहय़रूप म्हणजे कविसंमेलने. नेहमीप्रमाणेच अतिरेकी गटाकडून मागणी होते की, साहित्यसंमेलनातल्या असोत की इतरत्र कुठे, पण बंद करा ही संमेलने. काही गोष्टी सुरू ठेवण्यासाठीही ‘दम’ पाहिजे. हे शक्य नसते तेव्हा ‘बंद’चा आवाज बुलंद होतो. हे खरे आहे की, समाजातील अनेक संस्था, उपक्रम यांना अवकळा आली आहे आणि त्यामध्ये अपप्रवृत्ती शिरल्या आहेत. पण त्यावर उपाय ‘बंद’ हा नाही तर विरोध, टीका, प्रयत्न हा आहे. मराठी काव्याला एक फार प्राचीन आणि समर्थ अशी मौखिक परंपरा आहे. काळ वेगळा असेल, परिस्थिती वेगळी असेल, उद्दिष्ट वेगळे असेल, पण काव्य आणि लोक, कवी आणि समाज यांच्या परस्परसंबंधाचे भान ज्ञानेश्वरांनाही होते आणि तुकारामानांही. आपण काव्य लिहीत आहोत, शब्दांची शक्ती आणि तिचा उपयोग कशासाठी करायचा आहे याची पक्की आणि नेमकी जाण त्यांना होती. ‘येणे वाग्यज्ञे तोषावे..’ वाणीचा यज्ञ मांडला आहे. बोलतो आहे. ज्ञानोबांसमोर नेवाशाच्या देवळात श्रोते म्हणून पंचक्रोशीतले, खेडय़ापाडय़ातले लोकच असतील ना? (आणि ज्ञानोबा त्या श्रोत्यांचा अनुनयही करीत असत, गोंजारीत असत, त्यांना मोठेपणाही देत असत) तुकोबा तर त्यांचे १४ टाळकरी शिष्य घेऊन अभंग ‘ऐकवत’ असत. (तुकोबा मात्र श्रोत्यांना धमकावत नसले तरी ठणकावत मात्र नक्कीच असतील.)
पुढे थोडा वातावरणातच बदल झाला. पण पंडित कवी संस्थानिकांच्या दरबारात काव्य वाचतच होते. लोक ऐकतच होते. शाहीर कवींनी तर त्यांचे काव्य थेट जनतेच्या दरबारात नेले. या शाहिरी परंपरेचा अभ्यास, संस्कृतचे अध्यक्षन, शास्त्रीय संगीत, रागांची जाणकारी आणि सामाजिक, राजकीय, भान हे सर्व विलक्षण होते. तेही ‘साग्र-संगीत’ ऐकवत होते.
पुढेही ही परंपरा कमी-जास्त प्रमाणात सुरूच राहिली. आताही सुरूच आहे. एक साधा मुद्दा आहे. कवीला वास्तवाचे भान, परिस्थितीची जाण आहे. आपल्या काव्यसंकृतीचे ज्ञान आहे का? आणि लोकांविषयी प्रेम आहे का? या महाराष्ट्रदेशी कवितासंग्रहांच्या अकराशे प्रतींची आवृत्ती खपण्यासाठी २१ वर्षे लागतात. पुस्तकांची दुकाने जिल्हय़ाच्या ठिकाणीसुद्धा अजूनही नाहीत आणि आहेत तिथे कवितासंग्रह ठेवत नाहीत. म्हणून माणसे कवीच्या तोंडून कविता ऐकवण्यासाठी येतात. त्यांच्या भावनांची कदर आपण करणार की नाही? पण  कवीने आपले इमान जपावे हेही महत्त्वाचे आहे. कविसंमेलनांसाठी (बुंदी पाडतात तसे) कविता पाडणारे कवी कोणत्या तोंडाने ‘आत्मनिष्ठे’च्या गप्पा मारतात? आणि तुकोबांचे नाव उच्चारतात? खरे तर कवीने लिहिलेली कविता कितीही गंभीर असली तरी नीट वाचली तर श्रोते ऐकतात, गंभीर होतात, नंतर चर्चाही करतात. सुर्वे, डहाके, अनिल यांच्या कविता लोक ऐकतात किंवा ऐकत होते. लोक कवितेपर्यंत येतात. तुम्ही चांगली कविता त्यांच्यापर्यंत न्यावी, ही कवीची जबाबदारी आहे. मला टी. एस. इलियट यांचे एक वचन आठवते- ‘Genuine poetry can communicate even before it is understood.’
आता काही कवी जे कविसंमेलनांकडे तुच्छतेने पाहतात आणि ज्यांना कविसंमेलनात सहभागी होण्यात कमीपणा वाटतो, त्यांनीही कधी ना कधी कविसंमेलनात सहभाग नोंदवलेलाच असतो. (काय आहे भाऊ, की मानधनाचा आकडा मोठा असेल तर तत्त्वाला मुरड घालणे चुकीचे आहे का?)
श्रोत्यांना ‘बघे’ म्हणून हिणवणे हीही एक प्रकारची वर्णव्यवस्था आहे. मग कोणी यांना ‘टगे’ म्हटले तर काय चूक? एक प्रकारचा हा फतवाच असतो. पण या थोर कवींचे काही ‘सगे’ असतात. म्हणजे टोळीचे सदस्य. यांना टोळीप्रमुखाकडून काही सवलती मिळतात, काही लाभ! हे सदस्य अंधारामध्ये पक्षांतर करतात, सकाळी परत जातात. या अनुयायी कवींना कशासाठी आधार हवासा वाटतो? स्वत:च्या कवित्वावर विश्वास नसतो का? हे कोण तर म्हणे अमक्या कवीच्या कळपातील मेंढरे! ते कोण तर म्हणे तमक्या कवीच्या गोठय़ातील गुरे! आणि ते.. ते म्हणे ढमक्या कवीच्या बाभळीवरील पाखरे!
कविसंमेलनाच्या व्यासपीठावर आजकाल विनोद आणि हास्याचा नाही तर आचरटपणाचा आणि पांचटपणाचा सुकाळ झालेला आहे. ही गोष्ट आपण हिंदीवाल्यांकडून घेतली पण त्यांच्याकडे हास्य आणि व्यंग्य यांची आणि राजकीय जाण आहे ती परंपरा मराठीत नाही.
आणखी एक गोष्ट कवीलोक आपसात कुजबुजतात की, कोणी तरी एक मुखंड पाच कवी आणि मी (पाचमध्ये एक कवयित्री, दोन गाणारे, दोन विनोदी) अशी सुपारी घेतो. मग कोण्या तरी गावात कविसंमेलन वाजवतात. मग तक्रारी आपसात सुरू होतात की, यजमानांकडून प्रमुखाने मोठ्ठी रक्कम घेतली पण आपल्याला मात्र कबूल केला तेवढा मेहनताना.. माफ करा मानधन दिले नाही. (मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही म्हणता ना.. मग हे पाहा उदाहरण.)
मराठी कविसंमेलनाचा मंच अडीच- तीन तास तऱ्हेतऱ्हेच्या सुवासांनी दरवळत असतो. ते फुलांचे सुगंध नक्कीच नसतात. एकदा मात्र मला अनेकांचे चेहरे दु:खाने पिळवटलेले दिसले. मी चौकशी केली तेव्हा कळले की, आज ‘ड्राय डे’ असल्यामुळे कविगण तहानेने व्याकूळ झालेले आहेत. पण या दु:खामुळे त्या संमेलनात त्यांच्या काव्यवाचनात आर्तता अधिकच उत्कटतेने प्रकट होत होती.
असो. अशा चार-दोन गोष्टी सोडल्या तर सुधारणेला वाव आहे. कवींनी हे ध्यानी ठेवावे की, तुमची प्रतिष्ठा तुमच्या हाती आहे. तुम्ही एका महान परंपरेचे पाईक आहात. लोक तुम्हाला ऐकायला उत्सुक आहेत, ते तुमच्या सह्य़ा घेतात, तुमच्या पायाही पडतात. त्यांचा सन्मान करा. स्वत:ला जपा.
ज्ञानपीठ विजेते ‘फिराक’ गोरखपुरींना स्वत:च्या कवित्वाचा सार्थ अभिमानही होता आणि लोक आपल्याला ऐकायला उत्सुक आहेत याची जाणीवही. ते म्हणायचे-
शाम ही से गोश-बर-आवाज है बज्मे सुखन
कुछ ‘फिराक’ अपनी सुनाओ, कुछ जमाने की कहो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा