कविवर्य शंकर वैद्य येत्या १५ जूनला ८५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. गेली सहा-सात दशकं एका आंतरिक ऊर्मीनं त्यांनी कवितालेखन केलेलं आहे. कवितेनंच त्यांची दीर्घकाळ साथसंगत केली आहे. आणि यापुढंही कवितेचाच हात हाती धरून त्यांची वाटचाल होत राहणार आहे..
कविता करता येणं हे कवी-कवयित्रींना लाभलेलं दैवी वरदान आहे असं नेहमी मला वाटत आलंय. शंकर वैद्य सरांच्या बाबतीत बोलायचं तर भूपाळी कशी म्हणावी, दिंडी कशी वाचावी, शार्दुलविक्रिडित म्हणताना काय दक्षता घ्यावी, याचं शिक्षण त्यांनी शालेय जीवनातच मिळवलं होतं. एवढंच नव्हे तर संत-पंत काव्याचाही परिचय त्यांना या काळातच झाला. त्यामुळेच सर्व तऱ्हेचे काव्यरस शोषून घेत त्यांची स्वत:ची, स्वजाणिवेची कविता प्रकटली आणि ती रसिकमान्यही झाली.
शंकर वैद्य यांचा जन्म १५ जून १९२८ चा! त्यांचं बालपण गेलं ते ओतूर या गावी! घर गावाच्या उत्तर टोकाला. अडीच मजली, सात खणी घर. घराभोवती भरपूर झाडी! कडुनिंब. चिंच. कवठी. बोरी. फुलांनी सदैव टवटवलेला प्राजक्त. घराच्या मागल्या अंगणात बहरलेला जाईचा मांडव. घरापासून आंबराईही लांब नव्हती. झाडाफुलांच्या या सहवासात शंकर वैद्यांचं बालपण आणि किशोरपणीचा काळ गेला. मात्र, नंतरच्या काळात त्यांचं विश्व बदललं आणि विविध अनुभवांचं जग त्यांना बिलगू लागलं. बालपणी ज्या निसर्गावर त्यांनी प्रेम केलं, त्याची छाया त्यांना लाभली. हा निसर्गच त्यांच्या कवितांना पोषक ठरला.
ओतूर सोडून १९४१ साली माध्यमिक शिक्षण घेण्याकरिता ते जुन्नरला आले. जुन्नरचं वातावरण एकदम वेगळं. शिवाजीमहाराजांचा जन्म झालेला शिवनेरी किल्ला गावापासून अगदी जवळ. जाता-येता तो सहज दिसे. तेव्हा सारं वातावरण पारतंत्र्याच्या जाणिवेनं झाकोळलेलं होतं. बेचाळीस साल उजाडलं. क्रांतीचं वारं वाहू लागलं.
एकदा बालदिनी पोवाडे म्हणण्याचं काम छोटय़ा शंकरकडे आलं. त्यावेळी कौतुक म्हणून कवितांचं पुस्तक त्यांना बक्षीस मिळालं. त्यांना खूप आनंद झाला. त्यातल्या कविता आंतरिक ओढीनं त्यांनी वाचल्या. त्यातून आणि घेतलेल्या अनुभवांतून त्यांच्या मनात कवितेची पाऊलवाट तयार झाली. त्या वाटेवरून चालताना शब्दांतून त्यांना दृश्यं दिसू लागली. प्रत्येक कविता वेगवेगळ्या स्वभावाची, रंगाची आहे असं त्यांना वाटू लागलं. ‘वन सुगंधित झाले’ ही रे. टिळकांची कविता चालीवर म्हणताना टिळकांच्या नावामागे ‘रे.’ असं छापलेलं असे. ‘रे’ म्हणजे काय, हे किशोरवयातल्या शंकरला समजत नव्हतं. कुणाला विचारावं, तर त्याबद्दल सांगण्याएवढं प्रौढ त्यांच्या आसपास कुणीच नव्हतं.
ओतूर गावात ठिकठिकाणी अनेक लहान-मोठी मंदिरं होती. तेव्हा गावातल्या मंडळींत भक्तिभाव भरपूर होता. विविध भाववृत्ती जागृत करण्याची मंत्रशक्ती भोवतीच्या परिसरात होती.
कपर्दिकेश्वर हे शंकराचं सुंदर देऊळ त्यांच्या घरापासून फारसं लांब नव्हतं. या मंदिरात ते अनेकदा जाऊन निवांतपणे बसत. अर्थात या शंकर मंदिराशी असलेली त्यांची जवळीक व त्यांचं नाव हा निव्वळ योगायोगच! रे. टिळकांच्या फुलांशी जुळलेली शंकर वैद्यांची मैत्री अबाधित होती. पण नंतर ती काहीशी मागे पडली. आता शिवाजी, तानाजी, बाजीप्रभू, खंडो बल्लाळ हे ऐतिहासिक महापुरुष त्यांच्या मनात वावरू लागले होते. त्यांच्यावरही वैद्यांनी कविता लिहिल्या. खरं पाहता त्यांच्या कवी म्हणून घडणीचा हा काळ होता. त्यांच्या कवितांना नवनवे धुमारे फुटू लागले होते. याच सुमारास ‘आला क्षण, गेला क्षण’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह आला. शंकर वैद्यांचा हा कथासंग्रह प्रारंभीच्या काळातला. तो बराचसा अलक्षित राहिला. नंतर कवितेनं त्यांना झपाटून टाकलं. त्यात कथा बहुधा पुढं वाहून गेली असावी. त्यांच्या लेखनात आईला अनन्यसाधारण स्थान आहे. ते लिहितात, ‘आईला प्रत्येक सकाळचा सूर्य नवा दिसायचा. नव्या उत्साहाने तिची नजर घरभर फिरत असायची. तुळशीची रोपे नि फुलझाडे लावण्याचा तिचा उत्साह अमाप. सुकलेल्या झाडाखाली तिची अखंड हालचाल सुरू असायची. ती डोळे मिटून देवासमोर बसायची तेव्हा तिने सारे आयुष्यच घेतलेले असते ओंजळीत.’
ते पुढे लिहितात, ‘दरम्यान, स्वप्नांचा एक मौसम माझ्या वाटचालीत येऊन गेला. सर्व प्रकारची स्वप्ने होती. रंगीत, चमत्कारिक, गमतीदार, सुंदर, भीतीयुक्त- अशी संमिश्र. त्यात कविता लपली होती. ती खुणावत होती. एकदा आई स्वप्नात आली. माझी आई पाच फूट, दोन इंच होती. पण स्वप्नात ती आठ फूट दिसत होती. फुलांची लांब, उंच माळ तिच्या हातात तरंगत होती. ती आईच्या मृत्यूची चाहूल होती. ते स्वप्नही कवितेत आले.’
आई दिसली, उभी उंच सरस्वती
देवळातल्या चाफ्याची उंच माळ तिच्या हाती
हात वर धरलेले, तरी माळ रुळे पायी
अधांतरी चांदण्यात, तशी ती चालत जाई..
आईवरच्या या कवितेत हृदयाला स्पर्श करण्याची ताकद किती उत्कटतेनं प्रकट झाली आहे!
कुठल्याही एकाच भाववृत्तीत कवी सहसा रमत नाही. तो वेगवेगळे मूड्स पकडत असतो. यादृष्टीनं सरांच्या तीन कवितांचे दाखले मुद्दाम इथं देतो.
एका वृद्ध दाम्पत्याच्या मुरलेल्या प्रेमाची छोटीशी कविता अशी-
आता डोईवरी केस लागले पिकाया,
एक बरे आता तिला कमी लागले दिसाया
आता बोलताना येतो कंप आवाजाला,
एक बरे तिला कमी येते ऐकायला
थरथरे माझा हात काम करताना,
तिला वाटे धांदलीचा स्वभावच जुना
अजूनही मला दिसते ती सुंदर,
काय फसवितो चष्म्याचा नंबर!
* * *
अभ्रं आभाळात आली
तुटे मिठीतले ऊन
खेळ उधळला अर्धा
नदीतीरी मी विषण्ण
कसा जांभूळ तरूला
आला उत्फुल्ल बहर
उजाडल्या गोकुळात
टाहो फोडताहे मोर!
* * *
एक एक दार बंद
एक एक चेहरा
होय पाठमोरा
अस्तावर भिजलेला
चंद्र उभा मावळता
झाडीतून झरणारा
तम उरला मजपुरता
गळलेल्या पर्णातून दूर निघे वारा
एक एक दार बंद
जुळवियली मी नाती
जीव ओतुनी जगती
ओघळून दंव सारे
वेल सुकी ये हाती
काय सुकत जायाचा बहर असा सारा
एक एक दार बंद
पटल्या ना काहि खुणा
शब्द कुठे जाइ उणा
नजरा जुळल्या न कुठे
स्वार्थ कुठे होइ उणा
तुटल्या वाटांवर मन घालि येरजारा!
एक एक दार बंद..
या कवितेत कमालीचं कारुण्य आहे. कविता वाचताना काही काळ मन गहिवरल्याशिवाय राहत नाही.
१९४६ साली शंकर वैद्य मॅट्रिक झाले आणि ओतूर-जुन्नर सोडून महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. इथं साहित्याच्या एका नव्या सृष्टीत त्यांनी प्रवेश केला होता. पुण्यात शिकत असतानाच शेतकी खात्यात त्यांनी सात वर्षे नोकरी केली. त्यावेळी- कवी गिरीश आपल्याला भेटतील का? त्यांना भेटायचे तर कसे भेटावे, असे विचार त्यांच्या मनात तरंगत होते. आणि अचानक एकदा त्यांच्या भेटीचा योग जुळून आला. एक दिवस ऑफिस सुटल्यावर शंकर वैद्य सायकलवरून घरी निघाले होते. रस्त्यातला टांगा थांबला की त्यांची सायकलही थांबे. टांग्यातील गृहस्थ वैद्यांकडे पाहून हसले. त्यांनी हात हलवला. ते होते कवी गिरीश! रविकिरण मंडळाच्या एका कार्यक्रमात त्यांनी कवी गिरीशांना पाहिले होते. टांगा सुरू झाला. त्यांनी विचारलं, ‘शिकता की नाही? तरुण आहात. शिका.’
‘एम. ए. करतोय!’  वैद्य म्हणाले.
‘काय नंबर?’ त्यांनी विचारले.
‘एकशे तीस!’
‘लकी नंबर!’
आणि त्यांचा टांगा वळला. रस्ते वेगळे झाले. ते विचार करू लागले- ‘लकी नंबर का म्हणाले असतील ते?’ लवकरच एम. ए.चा निकाल लागला. त्यांना पारितोषिक मिळाले होते. परीक्षक गिरीशच होते. त्या लकी नंबरचा आता त्यांना उलगडा झाला!
आणि काही दिवसांत त्यांना एक पत्र आले- ‘येऊन भेटा.’ खाली सही- य. दि. पेंढरकर! कवी यशवंत यांचे ते पत्र होते. त्यावेळी शंकर वैद्यांची एक कविता प्रसिद्ध झाली होती. एका बाईने एक लहान मूल चोरले. जिने चोरले ती ते मूल आपलेच आहे म्हणत होती. जन्मदात्री आई तर ते मूल आपले म्हणून अर्थात भांडणारच! भांडण न्यायालयात गेले. निकाल देताना न्यायमूर्ती म्हणाले, ‘आपण मूल अर्धे-अर्धे कापू. एक भाग या आईचा, दुसरा दुसऱ्या आईचा!’ त्यावर जन्मदात्री आई म्हणाली, ‘नका, कापू नका. मूल त्या बाईकडेच राहू दे.’ ही सर्वपरिचित कथा! त्यावर वैद्यांनी कविता रचली होती. ती ‘ज्ञानप्रकाश’मध्ये प्रसिद्ध झाली होती. कवी यशवंतांनी बहुधा तो अंक वाचला असावा. तो वाचूनच त्यांनी शंकर वैद्यांना पत्र पाठवले असावे. वैद्य भेटायला गेले. या ज्येष्ठ कवीबरोबर वैद्यांचा असा अकल्पितपणे प्रत्यक्ष परिचय झाला. चहाबरोबर गप्पाही रंगल्या. रविकिरण मंडळातल्या दोन रवींशी झालेल्या या परिचयाने शंकर वैद्य सुखावून गेले. पुढे हा परिचय आणखीन दृढ झाला.
त्यानंतरचा काळ हा मर्ढेकरांच्या कवितांचा होता.
‘या गंगेमधी गगन वितळले
शुभाशुभाचा फिटे किनारा! ’
किंवा-
‘आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातक चोचीने
प्यावा वर्षांऋतु तरी’
अशा त्यांच्या कविता वाचकांच्या जिभेवर घोळू लागल्या होत्या. एक नवे युग मोठय़ा प्रभावाने पुढे सरकत आहे हे शंकर वैद्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. नवकाव्य, नवकथा, वास्तववादी-अतिवास्तववादी कविता असे शब्द सतत उच्चारले जाऊ लागले होते. या सर्व मंथनातून त्यांची कवितांकडे पाहण्याची दृष्टीही बदलत गेली. खुद्द वैद्यांची कविताही बदलू लागली. इतकी, की २००० पर्यंत त्यांनी ज्या कविता लिहिल्या होत्या, त्यातील चार-सहा कविता सोडता बाकीच्या सर्व कविता त्यांनी बाद केल्या.
खरे तर वैद्यांच्या कवितांचे रसिकांकडून कौतुक होत होते. चार काव्यस्पर्धातून त्यांच्या कवितांना पारितोषिके मिळाली होती. याचदरम्यान पुणे विद्यापीठात बी. ए. आणि एम. ए. परीक्षेत मराठी विभागात प्रथम आल्याबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली होती. असा सर्वत्र आनंद भरून राहिलेला असताना आपल्या कवितांवर त्यांनी कठोरपणे काट मारली.
या काळात मराठी साहित्यात काव्यविषयक जी समीक्षा होत होती तिचा काव्यविषयक दृष्टिकोन सुधारण्याच्या दृष्टीने त्यांना उपयोग झाला. शंकर वैद्यांचा पहिला कवितासंग्रह ‘कालस्वर’! त्यानंतर २७ वर्षांनी आला ‘दर्शन’! मधल्या २७ वर्षांत त्यांचा आणखीन एखादा संग्रह का आला नाही, हे समजत नाही. संग्रह निघाला नसला तरी दर्जेदार मासिकांतून व विशेषांकांतून त्यांचे कवितालेखन सुरूच होते. अनेक शासकीय समित्यांवर काव्यसमीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती होत होती. विविध काव्यसमारंभांचे ते उत्तम संचालन करीत. आकाशवाणीवरून होणारे त्यांच्या कवितावाचनाचे कार्यक्रम श्रोत्यांना मनापासून आवडत असत. एक मर्मज्ञ काव्यसमीक्षक म्हणून त्यांची प्रतिमा याच काळात उजळत होती. अनेक शासकीय, सांस्कृतिक समित्यांवर काम करण्याची संधी त्यांना वेळोवेळी सन्मानाने देण्यात आली. अशा कार्यक्रमांसाठी संस्थांना आजही त्यांचीच प्रथम आठवण येते.
कवी म्हणून ते आत्ममग्न आहेत. संयत आणि शांत आहेत. ते कधी चढा स्वर लावीत नाहीत. आपल्या कवितांची कोवळीक जपण्याचे महत्त्व त्यांना अधिक वाटते.
हे सारे मानसन्मान वाटय़ाला येत गेले तरी आत्ममग्न राहणेच त्यांना अधिक प्रिय होतं आणि आहेही. त्यांची ही एक कविता पाहा-
‘आली तुझी आठवण
आले मनी सांजावून
रानातल्या देवळात
घंटा वाजते मधून.
आली तुझी आठवण
उडे सैरभैर मन
पिसाळले वारे धावे
खोल दऱ्याखोऱ्यांतून..’
रानातल्या देवळातली घंटा ओतूरच्या कपर्दिकेश्वराच्या मंदिरातली आहे.. असावी असा त्यांना भास होतो. पिसाळलेले वारे अंगाला झोंबू लागले की ते आपण नाणेघाटात अनुभवले आहे असे त्यांना वाटते. हे सारे त्यांच्या मनात दडून राहिलेले असते आणि कवितेतून ते बाहेर पडते. वरील कवितेतील आठवणीने त्यांच्या मनाची अवस्था स्मृतीने कशी हिंदोळते आहे हे समजून येतं.
एका आंतरिक ऊर्मीने शंकर वैद्यांनी कवितालेखन केलेले आहे. रस्त्यात थांबून लिहिले आहे. जेवताना ताडकन् उठून हातात झरणी घेतली आहे. झोपेतून मधेच उठून आणि धावत्या गाडीतही कविता लिहिली आहे. कवितेने आजवर दीर्घकाळ त्यांना सोबत केली आहे. आणखीन् अनेक वर्षे ही सोबत त्यांना अशीच मिळत राहो!

Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…
Kushal Badrike and Viju Mane wished Pravin Tarde on his birthday in a funny prediction
Video: प्रवीण तरडेंसाठी कुशल बद्रिकेने लिहिलेल्या कविता ऐकून विजू माने वैतागले, म्हणाले…
Sharda Sinha, Chhath Puja songs, Bihar,
शारदा सिन्हा… छठ पूजा गीतांना अजरामर करणारी ‘बिहार कोकिळा’
Neelu Phule And Prasad Oak
“मला त्याच वेळेला ऑस्कर…”, निळू फुलेंची आठवण सांगत प्रसाद ओक म्हणाला, “त्यांनी मला फोन केला आणि…”