मकरंद देशपांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय करावं सुचत नाहीये. याला दोन कारणं- एक म्हणजे ‘नाटकवाला’चे आता शेवटचे दोनच रविवार. आणि दुसरं-देशातल्या हल्लीच्या परिस्थितीवरचे रोजच्या वर्तमानपत्रातील मथळे. देशानं किती वेळा जळावं? देशप्रेमी कोण? जाळणारे की जाळायला कारणीभूत ठरणारे? एकशे तीस कोटी भारतवासीयांना विचार करायला लावणारे की त्यांना आधार देणारे? का फक्त आधार कार्ड देणारे? प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवणारे? देवांमध्ये श्रेष्ठ कोण सांगणारे? का? आणि असे कितीतरी प्रश्न जन्माला घालणारे?

असं म्हणतात, मनुष्य आधी हजारो वर्षे जगायचा. पण एकदा पाऊस पडला नाही तेव्हा पहिला प्रश्न पडला.. असं आधी कधी घडलं होतं का? मग दुसरा प्रश्न- असं परत कधी घडेल का? मग तिसरा प्रश्न – धान्याचा साठा करावा लागेल का? मग चौथा- पावसाचं न येणं हा मुळात किती गंभीर प्रश्न आहे? यामुळे निसर्गाचा समतोल ढळला आहे का? प्रश्न जसजसे वाढत गेले, तसतसं मनुष्याचं वय कमी होत गेलं. प्रश्न, विवंचना, चिंता मनुष्याच्या जीवनातल्या सर्वात मोठय़ा समस्या बनल्या. त्या मनुष्यच कमी करू शकतो, फक्त त्याची उत्तरंच शोधून नव्हे, तर मुळात प्रश्नच निर्माण न होऊ देता. कदाचित त्यालाच सद्सद्विवेकबुद्धी म्हणतात, असं मला वाटतं.

कुटुंबप्रमुखाची भूमिका ही सर्वात महत्त्वाची ठरते. जर त्याने पुढच्या पिढीला मागचा गुंता किंवा धूसर झालेलं सत्य, मानवी मूल्यं वेळोवेळी स्पष्ट केली नाहीत, तर त्यांनी त्यांची भूमिका पूर्णपणे साकारली नाही असं मी म्हणेन. मुलं आता मोठी झाली आहेत, कळेल त्यांचं त्यांना. हा एक दृष्टिकोन झाला. पण त्याला काय कळलंय, काय नाही कळलंय. तो बाहेरनं काय शिकलाय. त्याच्या आत किती अशांती आहे.. हे जाणून घेणं हा दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे.

‘पिताजी प्लीज’ हे नाटक मंचन करण्याचं कारण जरी एक नट असला तरीही ते लिहिण्याचे कारण- पडलेले प्रश्नच!. पिताजींनी आपल्या मुलाच्या मूलभूत प्रश्नांना उत्तरं द्यायला हवीत आणि ते देण्याआधी स्वत:च्या मनात डोकवावं आणि तिथे असलेला गोंधळ आधी सोडवावा.

पृथ्वी थिएटरला मी एकदा सहज चहा प्यायला म्हणून गेलो होतो. मला जहान (एक युवक) भेटला. मी सहजच त्याला विचारलं, ‘हल्ली काय वाचतोयस?’ तो म्हणाला, ‘तुमचं नाटक.’ मला खूप गंमत वाटली. कारण अ‍ॅक्टिंग एक्सरसाईज म्हणून त्याला मी नाटकाचा एक अंक दिला होता आणि मग विसरलोही होतो. पण तो ते वाचतोय आणि मुलाची भूमिकाही पाठ करतोय, हे ऐकून मला असं वाटलं की आता याचा बाप शोधू या. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण तो नाटकासाठीचा बाप आधीच माझ्या मनात येऊन बसला होता. मी एक मराठी चित्रपट पाहिला होता- ‘चुंबक’ नावाचा. त्यात स्वानंद किरकिरे यांनी एवढं अप्रतिम काम केलंय की, मी जो भेटेल त्याला सांगत सुटलो की या चित्रपटातील स्वानंदचा अभिनय माझ्या ऑल टाईम फेवरेटपैकी एक आहे. मी त्याला फोन करून सांगितलं की, मी त्याचा नाटकासाठी विचार करतोय!

नाटकाचं कथानक असं की, एके दिवशी सकाळी वडील आपल्या मुलाच्या बॅगेला लागलेल्या मुंग्या काढत असतात. त्या बॅगेत त्यांना अल्लाहचा तावीज, आब-ए-जमजम (मुस्लिमांसाठी पवित्र पाणी) आणि हलवा (प्रसाद) मिळतो. त्यांना असं वाटतं की आपला मुलगा काहीतरी टोकाचं करतोय. त्याची गर्लफ्रेंड मुसलमान असावी आणि हा मुसलमान होतोय किंवा व्हायचा विचार असावा!

बाप-लेकाचं नातं इतकं जवळिकीचं आहे की त्यांना वाटतं, आपण काहीतरी चुकीचं विचारलं तर मुलगा रागावेल आणि आईविना असलेल्या या बाप-लेकाच्या नात्याला तडा जाईल. विचारलं जात नाही हे बरंच होतं, कारण मुलगा ज्या मुलीला घरी घेऊन येतो तिचं नाव स्वाती असतं. ते नाव त्याच्या दिवंगत आईचं असतं. वडिलांच्या लेखी देवानं एक स्वाती नेली आणि दुसरी स्वाती घरी परत आणली. त्या स्वातीत आणि या स्वातीत काही गोष्टी सारख्याच निघतात. दोघी वयानं मोठय़ा असतात. दोघींना गझल गायला आवडतं आणि दोघीही खूप प्रेमळ असतात.

सगळं काही अगदी हवं तसं, पण त्यामागे एक.. असत्य! मुलगी खरं तर सानिया (मुसलमान) असते आणि तिला संजूने म्हणजे मुलाने स्वाती (नकळत आईचं नाव) देऊन घरी आणलेलं असतं. संजूसुद्धा सानियाच्या घरी शाहिद बनून जातो. दोघंही आपलं प्रेम जपण्यासाठी घरी खोटं बोलतात. कारण दोघांनाही खात्री असते की आपल्या घरचे आपल्या प्रेमाला सहज होकार देणार नाहीत. मग  या कथानकाचं पुढे काय होणार?

शेक्सपिअरने रोमिओ-ज्युलिएट (पण त्यात पूर्ववैमनस्य) या कारणासाठी प्रेमी-प्रेमिकेला मारलं आणि नाटकाला प्रेम शोकांतिका बनवलं. हिंदू-मुस्लीम या विषयावर केलेल्या नाटक-सिनेमात नेहमीच हिंसा बघायला मिळाली आहे आणि मला हिंसा न आणता हिंसक विचाराला, पूर्वग्रहाला मनातून काढून टाकायचं होतं, म्हणून मी लेखक म्हणून दोन गोष्टी केल्या. एकतर दिवंगत आईला विचार म्हणून जिवंत केलं. ती खरी आधुनिक विचारांची. तिच्यामुळे वडिलांचं मतपरिवर्तन होतं. दुसरी गोष्ट मी लेखक म्हणून केली ती म्हणजे, दुसऱ्या बाजूला ‘चांगलं आहे’ हा विचार आणून. जेव्हा मुलीच्या घरी सत्य कळतं तेव्हा तिचा भाऊ आपल्या बहिणीवर अशासाठी रागावतो, ‘‘तू आम्हाला अडाणी का समजलीस. तुमच्या प्रेमाला आम्ही हरकत का घेऊ?’’

‘‘जो मुलगा शाहिद बनून आमच्या घरी येतो त्याचं आमच्या मुलीवर किती प्रेम आहे, हे आम्हाला कळलंय. तुम्ही तुम्हाला पाहिजे तेव्हा, पाहिजे त्या पद्धतीनं लग्न करा आणि खूश राहा, असं तिचे अम्मी आणि अब्बा सांगतात.

हे नाटक लिहिताना मी बाप-मुलामध्ये घरात काम करणारी हिराबाई आणली. जिच्यामार्फत बाप-मुलगा आपापली भीती आणि प्रेम पोहोचवतात आणि परिस्थितीच्या गांभीर्याबरोबर हास्याचे कारंजे उडते. दिग्दर्शक म्हणून मी खालचा आणि वरचा मजला (टेरेस) दाखवणारं नेपथ्य डिझाइन केलं. टेरेसवर मुलगी स्वाती आणि त्याच्या बरोबर खाली फोटोमधील आई स्वाती आणि त्या दोघी गझल गातात. हा प्रसंग माझ्या दिग्दर्शन कारकिर्दीतील सर्वात नाजूक, कल्पक आणि सहज. रंगमंचाची सेवा केल्यानं त्यानंच सुचवलेला हा प्रसंग असं म्हणून मला याचं श्रेय रंगमंचाला द्यावंसं वाटतंय.

स्वानंद किरकिरे फक्त सुंदर गीतकार नसून प्रतिभावंत नट आहेत हे त्यांनी दाखवून दिलं. प्रेक्षक असेही म्हणाले की, वडील असे व्हायला पाहिजे या पिताजीसारखे! त्यांनी मनातला गोंधळ आणि प्रेम खूपच गोडपणे साकारलं. जहानचं हे पहिलंच नाटक, पण त्याने खूप आत्मविश्वास दाखवला आणि तो स्वानंद सरांचा मुलगा होऊन गेला. त्याने आपल्या गर्लफ्रेंड – सानियावरचं निरागस प्रेम फारच भोळेपणानं दाखवलं. आकांक्षा गाडेने सानिया साकारताना ‘स्वाती’पण आणि ‘सानिया’पण आणलं. उर्दूचा तल़फ्फ़ुज़्‍ आणि हिंदीचं उच्चारण व्यवस्थित केलं आणि परिस्थितीतील भीतीही तिनं नाटकात आणली. ती फारच छान गायलीसुद्धा! माधुरी गवळीनं हिराबाई करताना सगळ्या प्रेक्षकांना प्रत्येक प्रयोगात हसतं-खेळतं ठेवलं. मला फक्त एवढीच भीती की, तिला प्रेक्षकांनी विनोदी अभिनेत्री बनवू नये. दिवंगत आई स्नेहा मालगुंडकर या सुंदर गायिकेनं साकार केली. तिनं पहिल्यांदाच नाटकात काम केलं. तिची मंचावरील उपस्थिती, आत्मविश्वास आणि तिचं गायन.. असा तिहेरी प्रभाव तिनं पाडला. स्वानंदबरोबरचे प्रवेश तिनं खूपच चांगले केले.

ज्यांनी ज्यांनी ‘पिताजी प्लीज’ हे नाटक पाहिलं ते एवढंच म्हणाले, हे एवढय़ा ज्वलंत आणि घिस्यापिटय़ा विषयावरचं नाटक एवढं फ्रेश आणि सकारात्मक वाटतंय की, असंही नाटक होऊ शकतं असा आम्ही विचार केला नव्हता. काही प्रेक्षकांना तर हे नाटक देशाच्या प्रत्येक गावात-शहरात व्हावं असं वाटतंय.

रचिता अरोरा या नवीन संगीत दिग्दर्शिकेनं दिलेलं संगीत हे विषयाचं गांभीर्य सांगणारं, पण सकारात्मक जाणिवेचं, स्वच्छ मनाची सात्त्विकता दर्शवणारं!

‘पिताजी प्लीज’ हे नाटक जर मी लिहून मंचित केलं नसतं, तर रंगकर्मी म्हणून मी माझी भूमिका पूर्ण केली नाही असं मला सतत वाटत राहिलं असतं.

जय रंगमंच! जय सत्य!

जय वडील! जय मुलग!

mvd248@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on pitaji please hindi play natakwala article makrand deshpande abn