वसंत आबाजी डहाके
कवी सतीश काळसेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी आज- २४ जुलै रोजी ‘विस्मरणापल्याड’ हा स्मृतीग्रंथ ‘लोकवाङ्मय गृह’तर्फे प्रकाशित होत आहे. यानिमित्ताने या ग्रंथाच्या प्रस्तावनेतील संपादित अंश..
२०२१ च्या जानेवारीअखेरीस मुंबईच्या साहित्य अकादमीच्या कार्यालयात सतीशची भेट झाली होती. छान शर्ट, प्रसन्न चेहरा. पुष्कळच दिवसांनी भेट झाली होती. मलाही खूप छान वाटले होते. कामाशिवाय थोडे अवांतर बोलणे झाले. इतर कामांमुळे लवकरच तिथून निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी पनवेल रस्त्याने जाताना त्याची आठवण आली. फोन केला. तो मुंबईतच होता. त्यानंतर घरी पोचल्यानंतर अधूनमधून फोनवर बोललो. मग जुलैमध्ये अचानक सतीशच्या निधनाची दु:खद वार्ता आली. अविश्वसनीय असे काही ऐकत आहोत असे वाटले. सुन्न झालो. मग सतीशच्या भेटीचे अनेक प्रसंग आठवत राहिलो.
बहुतेक १९६७ साली आमची पहिल्यांदा भेट झाली. त्यापूर्वी पत्रव्यवहार होता. तो माझ्या ‘योगभ्रष्ट’ या दीर्घकवितेमुळे सुरू झाला होता. ६७ मध्ये मुंबईत आलो होतो. त्यावेळी सतीश आणि त्याच्यासोबत वसंत दत्तात्रेय गुर्जर, प्रदीप नेरुरकर, चंद्रकांत खोत, शरद साटम, मनोहर ओक अशा सर्वाची भेट झाली होती. मुंबईतले ते दोन-तीन दिवस मजेत गेले. १९६९ मध्ये पुन्हा मुंबईत आलो तेव्हा त्याच्या डोंबिवलीच्या घरी राहिलो. गिरगावातल्या माधवाश्रमातून काढून मला त्याने आपल्या घरी नेले. सतीश त्यावेळी काढत असलेल्या ‘फक्त’चे अंक पाहिले. ‘फक्त’च्या छापील अंकात माझ्या काही रचना नंतर त्याने छापल्या होत्या. त्याचवेळी राजा ढालेची ओळख झाली. ‘चक्रवर्ती’ दैनिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले तेव्हा मी तेथे होतो. हॉर्निमन सर्कलजवळ अनेक लोक जमले होते असे एक दृश्य नजरेसमोर आहे.
नंतरच्या काळात सतीशच्या भेटी कमी झाल्या. मुंबईत आलो की कुठेतरी भेट होत असे. १९८२ साली मुंबईत राहायला आल्यानंतर सतीशच्या अधिक भेटी होत गेल्या. ‘पीपल्स बुक हाऊस’ हे भेटीचे केंद्र होते. एल्फिन्स्टन कॉलेजपासून एशियाटिक लायब्ररी जवळ होती. त्याचप्रमाणे स्ट्रॅन्ड बुक स्टॉल आणि ‘पीपल्स’ही. त्या काळात जवळजवळ रोजच मी अशी त्रिस्थळी यात्रा करीत असे. संध्याकाळी त्याचे कामकाज झाल्यावर तो दुकानात येत असे. नवी-जुनी पुस्तके, लिहिणे-वाचणे याविषयीच्या गप्पा होत असत. ‘स्क्रीन युनिट’च्या चित्रपटांना मी जात असे त्यावेळी भेटायचो. पुढे ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’च्या निवड समितीवर आम्ही एकत्र काम केले. तीनदा उत्तराखंडच्या यात्रांना गेलो. सतीशच मार्गदर्शक होता. या यात्रांचा वृत्तांत माझ्या ‘यात्रा-अंतर्यात्रा’ या पुस्तकात आलेला आहे. सतीशमुळेच हिमालयाच्या यात्रा घडल्या. प्रकाश विश्वासरावांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या कर्नाटक आणि कोकण येथल्या सहलींमध्ये आम्ही सोबत होतो. १९९६ नंतर लोकवाङ्मय गृहाशी संबंध आला. सतीश संपादक असलेल्या ‘वाङ्मयवृत्ता’मध्ये लेखन केले. ‘वृत्तमानस’ या नावाचे एक साप्ताहिक वर्तमानपत्र निघायचे. त्यात आम्ही दोघेही सदरलेखन करायचो. त्यातल्या माझ्या लेखांची कात्रणे त्याने मला एकदा दिली होती. त्यातून माझे एक पुस्तक झाले..
२४ जुलैच्या सकाळी हे सारे प्रसंग मनात उलगडत गेले.
सतीशच्या आणि माझ्या वयात फार अंतर नव्हते. आम्ही एकाच पिढीचे. त्याचे व्यक्तिमत्त्व, वागण्याची-बोलण्याची पद्धती, त्याचा स्वभाव, त्याचे ग्रंथप्रेम या गोष्टी वेगळ्या होत्या, विरळा होत्या. माणसे जोडणे ही त्याच्यातली मोठी गुणवत्ता होती. त्याच्यामुळेच माझ्या अनेक लोकांशी ओळखी झाल्या. मराठीतले कवी-लेखकच नव्हे, तर हिंदी साहित्यिकांच्या जगातही त्याचा संचार होता. जग सुंदर झाले पाहिजे, सगळ्यांना प्रेमाने एकत्र राहता आले पाहिजे अशी त्याची कामना होती आणि हे शक्य आहे असेही त्याला वाटत असे. अर्थातच आजच्या जगातल्या अनेक आपत्तींची त्याला कल्पना होती. त्याचे राजकीय, सामाजिक भान पक्के होते. त्याने लिहिले होते- ‘हे आधीचंच सुंदर असलेलं जग आहे, याहून अधिक सुंदर करायचं आहे.’
सतीशचा ग्रंथसंग्रह मोठा होता. तो ग्रंथ केवळ गोळा करीत नव्हता, त्याचे वाचन सूक्ष्म होते. गंभीर ग्रंथांप्रमाणे तो नियतकालिकांतील लेखांचेही गांभीर्याने वाचन करीत असे. मात्र एखाद्या विषयात खोल घुसून त्याचे विवरण करावे ही त्याची प्रवृत्ती नव्हती. तो उत्तमोत्तम साहित्यकृतींचा वाचक होता. एखाद् दुसऱ्या ओळीतूनही त्याने ती साहित्यकृती कशी आत्मसात केलेली आहे हे जाणवत असे. त्याला कविता उत्तम प्रकारे कळत असे. एखाद्या परिच्छेदातून हे जाणवे. पण त्याने ललित साहित्यावरही दीर्घ असे काही लिहिले नाही. त्याचे ग्रंथांविषयीचे आणि प्रवासाविषयीचे ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ व ‘पायपीट’ ही दोन्ही पुस्तके उत्तम लेखनाचा नमुना आहेत. त्याने मनावर घेतले असते तर उत्कृष्ट साहित्यकृतींचा वेध घेणारे लेख त्याला लिहिता आले असते. पण तो त्याचा स्वभाव नव्हता. त्यानेच म्हटल्याप्रमाणे, त्याच्यात संशोधनवृत्तीचा अभाव होता. त्याचे वाचन विस्कळीत होते. पण त्याच्याच मते, माणसांवर, निसर्गावर, मानवेतर चल-अचलावर, अवघ्या प्राणिमात्रांवर जीव जडला असल्याने असा विस्कळीत वाचनाचा फायदाच अधिक. त्याचे वाचन विस्कळीत, पण अफाट होते. डिसेंबर २००३ ते जानेवारी २००९ या कालावधीत त्याने लिहिलेले साठ लेख ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या पुस्तकात आहेत. त्याची मागणी एकच होती- ‘माझे मला वाचू द्यावे, ऐकू, पाहू आणि बोलू द्यावे.’ पुढे त्याने म्हटले होते- ‘लोकशाही शासन व्यवस्थेत किमान इतकी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी.’
अशी अपेक्षा आपणा सर्वाचीच असते. त्यामुळे आपण या विचाराशी सहमत होतो.
पुस्तकांविषयी आस्था असणाऱ्यांसाठी हा ग्रंथ एक मोलाचा ठेवा आहे. लेखकांविषयी अनेकांनी लिहिले आहे, सतीशने वाचकांविषयी जे लिहिले आहे ते महत्त्वाचे आहे. त्याच्या मते, वाचणाऱ्याच्या वाचनाचा त्याच्या एकूण पर्यावरणाशी संबंध असतो. त्याचा सांस्कृतिक वारसा, आर्थिक स्तर, व्यवसाय आणि वाचनाची जागा या काही महत्त्वाच्या बाबींचा प्रभाव त्याच्या वाचनावर असतो. या सबंध ग्रंथात वाचक या साहित्यव्यवहारातील महत्त्वाच्या घटकाचे स्वरूप अधोरेखित होत राहते. भारतीय साहित्यशास्त्रात जो सुहृद आहे तोच हा वाचक आहे. हा वाचक लेखकांचे ऋण फेडणारा आहे. यासंदर्भात सतीशचा एक सुंदर उतारा येथे देतो : ‘आजवर या पृथ्वीच्या पाठीवर अनंत प्रतिभावंतांनी काही बोलून ठेवले, लिहून ठेवले. त्यानंतर आणखी अनंत जिव्हांनी त्याचे जतन केले. पुढे जाऊन आणखी कित्येकांनी ते कागदावर उतरवले. छापून अनेकांना पुरवले. हा सगळा प्रवास कितीतरी दीर्घ, प्रसंगी सहनशक्तीचा अंत पाहणारा, खूप कष्टाचा असणारा आणि तरीही तो होत राहिला आहे.. तर हे असे कितीतरी कष्टांतून आपल्यापर्यंत आणणाऱ्यांचे उदंड देणे अंशत: तरी फेडावे.’
सतीश वाचता वाचता समकालीन राजकीय, सामाजिक संदर्भ देत असतो. उदाहरणार्थ, सतीश एक वाक्य लिहितो : ‘सर्व देशभरात जे काही घडत आहे ते लाजिरवाणे आणि देशाविषयी, त्याच्या भवितव्याविषयी काळजी वाटायला लावण्याजोगे आहे.’ यानंतर सतीश एक छोटी कविता देतो. ती अशी :
‘ते प्रथम कम्युनिस्टांचा वेध घेत आले
मी काही बोललो नाही
कारण मी कम्युनिस्ट नव्हतो
त्यानंतर ते कामगार कार्यकर्त्यांच्या शोधात फिरू लागले
मी मनात म्हटले, माझा कुठाय कामगार संघटनेशी संबंध
मी बोललो काहीच नाही
मग ते ज्यू वंशविच्छेदनाचे सूत्र घेऊन सर्वत्र धावू लागले
मी मनात म्हटले, मी काही ज्यू नाही
मी शांतच राहिलो
त्यानंतर ते माझाच शोध घेत आले
पण तोपर्यंत विरुद्ध आवाज
काढू शकतील असे बाकी कोणी उरलेच नव्हते’
..ही कविता देऊन सतीश म्हणतो :
ही कविता वेगवेगळ्या रूपांत आळवण्याची वेळ आपणावर येणार नाही इतकी खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यायलाच हवी.
हे सगळे वाचन चाललेले असताना आणि नव्या वाचनाची ओढ कायमच मनात असताना हा वाचक सुखदु:खाच्या, आशा-निराशेच्या प्रसंगांतूनही गेलेला असावा. आणि हे प्रसंग केवळ वैयक्तिक आयुष्यातले नसावेत याच्या अंधूक खुणा जाणवतात. ते सगळे खोल मनात ठेवून हा वाचक नव्या वाचनाकडे वळतो.
सतीशला पुस्तकांच्या वाचनाची ओढ असे, तशीच त्यांचा संग्रह करण्याचीही जबरदस्त खेच असे. यातूनच त्याचा ग्रंथसंग्रह वाढत गेला. ‘विलंबित’ या कवितासंग्रहात त्याची ‘पुस्तकांच्या संग्रहाविषयी’ ही एक अप्रतिम कविता आहे. तो म्हणतो :
‘पुस्तके म्हणाल तर तुमची असतात
पुस्तके म्हणाल तर दु:ख देतात
पुस्तके म्हणाल तर आधार देतात
पण पुस्तके कधीही नसतात
स्थावर-जंगम मालमत्तेसारखी’
या कवितेच्या शेवटी म्हटले आहे :
‘..पुस्तके भाकरीसाठी
विकता येत नाहीत.’
तो पुस्तकातले शब्द, ओळी वाचत असे, तसेच तो भूमी, रस्ते, डोंगर, नद्या वाचत असे. तो एकदा म्हणाला होता, ‘हिमालय आपल्याला बोलावतो, तेव्हा आपल्याला जावे लागते.’ हिमालयाने त्याला खूपदा बोलावले होते. मी केवळ तीनदा त्याच्या सोबत होतो. त्याचे पुस्तकांवर, हिमालयावर प्रेम होते, तसेच त्याचे सर्व माणसांवर प्रेम होते. हिमालयातल्या कष्टकरी लोकांविषयी त्याने एकदा सुनावले होते, ‘ही माणसे इतकी गरीब आहेत, पण तुमचा सुतळीचा तोडादेखील चोरीला जाणार नाही. माणसांवर विश्वास ठेवा.’
हे प्रॅक्टिकल नाही, माणसांवर विश्वास ठेवणे सोपे नाही असेच कोणीही म्हणणार. पण मला या वाक्यांतून सतीशची माणसांकडे पाहण्याची विशाल दृष्टी दिसते- जी दुर्मीळ आहे. ती कवीची दृष्टी आहे. आणि कवीची दृष्टी विशालच असते.
सतीश नि:संशय कवी होता, पण त्याने कविताही फार लिहिली नाही. ‘इंद्रियोपनिषद’, ‘साक्षात’ आणि ‘विलंबित’ हे त्याचे तीनच संग्रह आहेत. पण ती उत्तम कविता आहे. विशेषत: ‘विलंबित’मधली.
कवीला, लेखकाला कुठे शोधायचे असते? जगतानाचे त्याचे वागणे-बोलणे त्या त्या क्षणी आपण अनुभवतो, मग विसरतो, नंतर त्यांच्या केवळ प्रतिमा असतात. त्याही काही अंधूक, काही उजळ असतात. जे त्याने लिहिलेले असते त्यात तो असतोच. सतीशच्या कवितांमध्ये तो आहे.
खिन्न
‘..म्हणणं की या देशाच्या दिशांत
खिन्नता भरून आहे
तर यात अतिशयोक्तीचा आक्षेप
येऊ नये.
मी जेव्हा बोलू लागतो
तुझ्याविषयी
तेव्हा सर्वच म्हणतात
मी देशाविषयी का बोलत नाही
मी जनतेविषयी का बोलत नाही
..
आता मी तुझ्याविषयी बोलत असतो
तेव्हा खरे तर
मी या सर्वाविषयीच बोलत असतो.’
सतीश पुस्तकांविषयी लिहितानाही सर्वाविषयीच बोलत होता. कवितेत येणारे वैयक्तिक संदर्भ केवळ वैयक्तिक राहत नाहीत, किंबहुना वैयक्तिक, सामाजिक यांच्यामधल्या रेषा धूसर होऊन जातात. पांगाऱ्याचा विचार करताना हा कवी छपरांचा, फुलांचा आणि दारिद्रय़रेषेखाली माणसं कशी जगतात याचाही विचार करतो. त्याला जागोजाग उगवणारी कमळे गरिबांच्या हताश आसवांसारखी दिसतात. आपल्या भोवतीच्या प्रदेशात वावरताना हताशताही येते. ‘याही दिवसांतून’ या कवितेत सतीशने लिहिले आहे :
‘पाहिलं एसटीच्या प्रत्येक थांब्यावर
झोपलेल्या पावलांना, पाठींना, चेहऱ्यांना,
पाहिल्या दशा झालेल्या चादरीवर
दिसतायत का आपल्या घराच्या खुणा’
या कवितेच्या शेवटी सतीशने लिहिले आहे :
‘तपासला पुन्हा पुन्हा
माझ्या गतायुष्यातला हिशोब
निरर्थक’
..वैयक्तिक आणि सामाजिक यांतली सीमाच नाहीशी झालेली ही अभिव्यक्ती आहे. अस्वस्थ भोवताल अनुभवताना कधी कधी असेही वाटते-
‘आणि
कविता वापरता आलेली नाही
अजून
धारदार हत्यारासारखी..’ याची खोल जाणीवही होते. पण सतीशच्या कवितेचे पोत धारदार हत्याराचे नाही. त्याच्याच ओळी वापरून सांगायचे तर-
‘सगळ्या आयुष्यातल्या बऱ्यावाईटाचं हलाहल पचवून
त्याचं निळंशार शालीसारखं आभाळ पसरायचं होतं
सगळ्यांवर कवितांच्या ओळींतून थेट.’
सगळे हलाहल आत आहे. बाहेर निळेशार आभाळ आहे. ही सतीशची आणि त्याच्या कवितेची प्रकृती आहे. त्यामुळे त्याला माणसे जोडता आली, खूप माणसांचे प्रेम त्याला मिळाले.
‘तुम्ही मला खूपच दिलेत भरभरून
आणि अजून खूप द्याल
तुमच्या अनंत हातांनी
असे ओसंडून जाणारे आयुष्य पाहायचे
खूप बाकी आहे अजून!’
..असे म्हणणारा हा कवी आज आपल्यात नाही ही अतिशय दु:खद गोष्ट आहे.