नंदन होडावडेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान देशी माध्यमांच्या तीन प्रहरी वृत्तधारा मोसमी पावसाच्या वेगाहून अधिक जोमाने भारताच्या कानाकोपऱ्यांत व्यापत होत्या. चर्चा-विनोद-गप्पांमध्ये या दौऱ्यातील भल्या-बुऱ्या गोष्टींचा, मुलाखतींचा, छायाचित्रांचा, भाषणांचा सर्व वकुबात परामर्श घेतला जात होता. पण तिथे स्थायिक असलेल्या पूर्णपणे अमेरिकी-भारतीय तरुणाईने या दौऱ्याकडे कसे पाहिले.. ऐंशीच्या दशकात ज्ञानश्रीमंतीच्या बळावर तिथे पोहोचलेल्या पिढीशी त्याबाबत कशी चर्चा केली, त्याचा एक देशीभाषी नमुना..
‘‘पुढच्या वर्षी मोदीच येतोय बघा निवडून.’’ ग्रिलवरचं मक्याचं कणीस योग्य तेवढं भाजलं गेल्याची खात्री करून घेतल्यावर देशमुख म्हणाले.
दक्षिण कॅलिफोर्नियातल्या एका टुमदार उपनगरात, सरत्या उन्हाळी संध्याकाळी गावातली काही मराठी मंडळी त्यांच्या घरी बार्बेक्यूला जमली होती. जून महिना संपत आला की अमेरिकेतील देशी मंडळींना बार्बेक्यूचे वेध लागतात. कंपनीने फुकट वाटलेला टीशर्ट आणि हाफ प्यँट अशा गणवेशात ठिकठिकाणी, कुणाच्या तरी बॅकयार्डात देशी अंकल मग बार्बेक्यूला एकत्र जमतात. या महिन्यात मुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्टी असते. बास्केटबॉल आणि अमेरिकन फुटबॉल या खेळांचे सीझन अनुक्रमे संपलेले आणि चालू व्हायचे असतात; आयपीएलही थंडावलेले असते – परिणामी अशा बार्बेक्यूंच्या चर्चेला राजकारण हा साऱ्याच अर्थानी जिव्हाळय़ाचा विषय असतो.
त्यातच अलीकडे भारताच्या पंतप्रधानांनी जो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा बहुचर्चित दौरा केला, त्याचे पडसाद आमच्या देशी – विशेषत: महाराष्ट्रीय मंडळींत उमटले नसते तरच नवल!
या बार्बेक्यूचे यजमान ‘डॅश’ देशमुख हे सत्तर-ऐशीच्या दशकात अमेरिकेत आलेल्या मराठी पिढीचे प्रतिनिधी. माणूस जितका कामाला वाघ तितकाच ‘एक्स्ट्राकरिक्युलर’ बाबींत हौशी! त्यांनीच या लहानशा गावात प्रथम ‘महाराष्ट्र मंडळा’ची स्थापना केली आणि आता मंडळाच्या शंभरच्या वर सदस्यांमध्ये देशमुख घराण्यातल्या तिन्ही पिढय़ा हौसेने सामील होतात! (अगदी अलीकडे, म्हणजे गेल्या दहा-बारा वर्षांत या शहरात आलेली तरुण मराठी मंडळी देशमुखांना गमतीने ‘मेफ्लॉवर जनरेशन’ म्हणतात!)
‘‘हम्म!’’ असं नॉन-कमिटल उत्तर देत देशपांडे देशमुखांना सामील झाले. देशपांडे हे देशमुखांपेक्षा वीसेक वर्षांनी लहान. ‘आयटी’चा राजमार्ग हमरस्ता होण्यापूर्वी जी काही नावाजलेल्या कॉलेजांतील पहिल्या नंबरांच्या इंजिनीयरांची पिढी नव्वदच्या दशकात दाखल झाली त्यातलेच देशपांडे एक. ‘आयआयटी’ मुंबईत असताना साम्यवादी विचारांनी भारावून जाऊन ग्रामीण भागात त्यांनी काही काळ समाजसेवाही केली होती; पण त्यांच्या अण्णांनी कानउघडणी करून हे चुकलं कोकरू तलासरीहून टेक्ससकडे वळवलं होतं.
‘‘ते निवडणुकांचं सोडा हो!’’ चिकन विंग्जच्या हाडांपासून कौशल्याने मांसाला मुक्ती देत देशपांडे म्हणाले, ‘‘दौऱ्याचं बोला. बिलियन्स ऑफ डॉलर्सची कॉन्ट्रॅक्टं केली जनरल अॅटॉमिक्ससोबत. त्याआधी एअर इंडियाने शेकडो महागडी विमानंही घेऊन ठेवलीत बोईंगकडून. अमेरिकेला फायदाच फायदा.’’
‘‘होतोय तर होऊ दे की.’’ आता देशमाने रिंगणात उतरले. त्यांनी काही काळ ‘जनरल अॅटॉमिक्स’मध्ये नोकरी केली होती, त्यामुळे त्या कंपनीबद्दल अर्धापाव उणा शब्दही त्यांना खटकत असे. ‘‘रशियाकडूनही आपण महागडी एस-४०० मिसाईल सिस्टीम्स घेतली होतीच. आपले शेजारीच असे नग आहेत की एवढी जय्यत तयारी हवीच!’’
‘‘पण नुसतं शस्त्रास्त्रंच असं नाही, रखडलेलं व्हिसा स्टॅम्पिंगही आता अमेरिकेतल्या अमेरिकतच करता येईल,’’ देव म्हणाला. मास्टर्ससाठी अमेरिकेत येऊन आणि देवचा ‘डेव्ह’ होऊन आता सोळा वर्ष होतील, पण अद्याप ग्रीन कार्डाची तारीख ‘करंट’ व्हायची काही चिन्हं नाहीत. एच-१ रिन्यू करायला जे सव्यापसव्य करावं लागायचं ते वाचलं तरी मोदींचा दौरा डेव्हच्या दृष्टीने सफळ संपूर्णच!
‘‘कुणाचं काय तर कुणाचं काय!’’
धर्माचा हा उद्गार ऐकून मी चमकलो. धर्मा देशमुख हा ‘मेफ्लॉवर’ देशमुखांचा नातू – अमेरिकेत जन्मलेली आणि वाढलेली देशमुखांची पहिलीच पिढी. त्याला उत्तम मराठी बोलता येतं हे माहीत असलं, तरी अशी नेमक्या वेळी चपखल म्हण सुचलेली पाहून मला किंचित आश्चर्यच वाटलं. ते हेरून पण विशीच्या वयाला न शोभेल अशा पोक्तपणाने त्याकडे सराईत दुर्लक्ष करून तो म्हणाला, ‘‘तुला माहितीच आहे – आमच्या घरी भारतीय आणि अमेरिकन राजकारणावर गरमागरम चर्चा कायमच होत असतात. मी ‘इंटरनॅशनल अफेअर्स’ हे मेजर निवडलं याचं बहुतेक हे एक कारण असू शकेल.’’
धर्माने एक तर डॉक्टर व्हावं नाही तर इंजिनीयर अशा सरधोपट अपेक्षांना सुरुंग लावत त्याने अलीकडेच ‘इंटरनॅशनल अफेअर्स’मध्ये डिग्री मिळवली होती. भरीस भर म्हणजे, प्रतिष्ठेच्या अशा ‘फुलब्राईट शोधशिष्यवृत्ती’साठीही त्याची निवड झाली होती. अमेरिकास्थित भारतीय जनतेचा इतका डोळस, जाणता आणि तरुण प्रतिनिधी तर शोधून सापडला नसता!
तिकडे ‘मेफ्लॉवर’ देशमुखांच्या दुसऱ्या स्कॉचने तळ गाठला होता आणि भारताच्या हितासाठी बायडेनपेक्षा ट्रम्पतात्याच कसे फायद्याचे आहेत, हे ते ठासून सांगत होते. डेव्ह वयाचा आदर अधिक इमिग्रेशन वर्णव्यवस्थेतील सर्वात खालचं स्थान या दुहेरी दडपणामुळे गप्प होता; पण आयआयटीयन देशपांडे मात्र देशमुखांचा समर्थ प्रतिवाद करत होते.
‘‘हे एका अर्थी, अमेरिकास्थित भारतीयांच्या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबद्दलच्या मताचं एक छोटेखानी मॉडेल म्हणता येईल, नाही?’’ मी धर्माला म्हटलं. ‘‘म्हणजे, एक वर्ग मोदींच्या करिश्म्यावर आणि धडाकेबाज कार्यशैलीवर फिदा – त्यात मग रिपब्लिकन, डेमोक्रॅट, इंडिपेंडंट सगळेच आले. मोदींच्या कार्यकाळात भारतात प्रचंड प्रमाणावर घडून आलेली डिजिटल क्रांती, आर्थिक घोटाळे आणि अतिरेकी हल्ले यांची घटलेली वारंवारिता आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानची सगळय़ांच बाबतीत खालावलेली पत या भरभक्कम जमेच्या बाजू!’’
‘‘बरोबर आहे.’’ धर्मा म्हणाला. ‘‘शिवाय मोदींनी आर्थिक बाबतींत डावीकडे झुकणाऱ्या ‘मनरेगा’सारख्या सुरू ठेवलेल्या योजना, काळाची पावलं ओळखून अमेरिकेशी आपल्या सोयीप्रमाणे जुळवून घेतलेलं धोरण आणि स्वच्छ प्रतिमा, हेही आहेच.’’
‘‘आणि देशपांडय़ांसारखा दुसरा वर्ग बदललेल्या सामाजिक परिस्थितीकडे – कुणी काय खावं, नि कुणी काय खाऊ नये यांवर वाढती प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष बंधनं येण्याच्या काळात- बोट दाखवून चिंता व्यक्त करणारा,’’ त्याने बर्गरचा घास घेत दुसरी बाजू मांडली.
‘‘आणि उरलेले डेव्हसारखे काही ‘कुत्ता जाने, चमडा जाने’ असे नग.’’ मी त्याला टाळी देत म्हटलं.
‘‘अर्थात! कुठल्याही महत्त्वाच्या नेत्याबद्दल जसा सगळय़ाच प्रकारच्या मतांचा गलबला असतो- तसाच मोदींच्या बाबतीतही आहे. मग ते भारतीय भारतात राहणारे असोत वा अमेरिकेतले.’’
‘‘पण, हे फारच जनरल आणि मोघम झालं ना?’’
‘‘तसं ते असणारच. जवळपास पुण्याच्या लोकसंख्येइतके भारतीय आता अमेरिकेत राहत असावेत. त्यात डॉक्टर-इंजिनीयर आलेच; तसेच ट्रक ड्रायव्हर्स, मोटेलमालक आणि शेतकरीही आले. आपल्या कॅलिफोर्नियाच्याच सेंट्रल व्हॅलीत गेलास तर ढिगाने पहायला मिळतील! इतक्या मोठय़ा वर्गाचं मत एकसंध कसं असेल?’’ धर्मा म्हणाला.
‘‘ तेही खरंच.’’
‘‘शिवाय असं बघ. आपण काही भारतात प्रत्यक्ष नसतो, आपल्या सवडीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे जे काही पाहतो, वाचतो – त्यावरून आपलं मत बनवतो.’’
‘‘ म्हणजे, हत्ती आणि सात आंधळे यांच्या गोष्टीसारखं?’’
‘‘ हो, पण ते निदान हत्तीला चाचपडून स्पर्श तरी करू शकत होते.’’
तिकडे देशमुख वि. देशपांडे नाटय़ाचा तिसरा रंग रंगात येऊ लागला होता. देशमाने बहुधा कंटाळून मधल्यामध्ये गायब झाले होते.
‘‘तुमच्या त्या बायडेनला समाजवाद आणायचाय अमेरिकेत! इंदिरा गांधींच्या समाजवादी धोरणांना कंटाळून मी इथे आले ते काय याचसाठी?’’ डॅश देशमुख डॅशिंग मोडमध्ये येत वदते झाले!
‘‘ हा डायलॉग मी ह्या ‘मेफ्लॉवर’ जनरेशनच्या लोकांकडून इतक्यांदा ऐकलाय की, दर खेपेला मला कुणी एक डाईम दिला असता तर आत्तापर्यंत मी मिलयनेर झालो असतो.’’ धर्मा अमेरिकन म्हणीचं धर्मातर करत हसतहसत म्हणाला. ‘‘ पण आजोबांना एक कळत नाही, बायडेन असो वा मोदी – त्यांचे विरोधक लहानसहान बाबींत गुंतून पडतात – आणि इथे हे आपापल्या अजेंडय़ावरची कामं निस्तरून मोकळे!’’
‘‘म्हणजे कसं?’’
‘‘म्हणजे, ट्रम्पतात्या मेक्सिको सीमेवर भिंत बांधायला पैसे देईल म्हणून तीन-चार वर्ष बोंबलत होते. ते काही आले नाहीत. अमेरिकन तिजोरीतून पैसे घेऊनही जुन्या कुंपणाची डागडुजी करण्यापलीकडे आणि थातुरमातुर, काही ठिकाणी नवीन बांधकाम करण्यापलीकडे त्यांची मजल गेली नाही. तीच गोष्ट चीनबरोबरच्या व्यापारी तुटीची. ट्रम्पच्या काळात त्याने रोज आरडाओरड करूनही, ती कमी होण्याऐवजी उलट अधिकच वाढली. बायडेन शब्द विसरतो, वयाप्रमाणे जिने चढताना कधीतरी पडतो इत्यादी चर्चा ‘फॉक्स’ न्यूजवर सतत चालू असतात; ती पाहून आजोबापण भलतेच खूष होतात – पण त्याने इन्फ्रास्ट्रक्चर बिल आणि आपल्या मतदारांच्या अन्य मागण्या रेटल्याच की काँग्रेसमधून! मोदींचे विरोधकही त्यांच्या उच्चारांची किंवा टेलिप्रॉम्प्टरवरचा शब्द वाचताना झालेल्या गफलतीची चर्चा करत बसतात – पण तोवर मोदींनी त्यांच्या अजेंडय़ावरची कामं फत्ते केलीच ना. तुमचे या दोघांशी मतभेद असतील; पण शेवटी केलेलं काम अधिक महत्त्वाचं.’’
‘‘हम्म!’’ असं नॉन-कमिटल उत्तर पुन्हा ऐकू आलं आणि देशपांडे इतका वेळ धर्माचा युक्तिवाद ऐकत होते, हे आम्हांला तेव्हाच कळलं.
‘‘ बालादपि सुभाषितं ग्राह्यम!’’ असं खेळकरपणे हसून ते म्हणाले. ‘‘ तुझ्या बोलण्यावरून मला आमचे ‘आयआयटी’चे एक प्राध्यापक आठवले. ते शिकवायचे गणित, पण त्यांना तत्त्वज्ञानात आणि राजकारणात भयंकर रस होता! त्यांनी एकदा बोलताना नोम् चोम्स्कीचा एक मोठा इंटरेस्टिंग विचार सांगितला होता. त्याचं म्हणणं असं की, लोकांना त्यांच्या नकळत आपल्या कह्यात ठेवायचं असेल – तर त्यांच्या चर्चेचे विषय अगदी मर्यादित असतील असं बघा आणि त्या मर्यादित परिघात अगदी जोरदार चर्चा होऊ द्या! म्हणजे त्यांना वाटेल आपण काहीही बोलायला स्वतंत्र आहोत, पण प्रत्यक्षात मात्र तसं नसेल.’’
‘‘हम्म!’’ असं नॉन-कमिटल उत्तर तिसऱ्यांदा ऐकू आलं. डेव्ह, डॅश आणि धर्मा असे तिघेही आता त्यात सामील होते!
(लेखक पेशाने दूरसंचार (टेलिकॉम) अभियंता असून गेली एकवीस वर्ष सॅन डिएगो, कॅलिफोर्निया येथे वास्तव्यास आहेत. साहित्य, भाषा, राज्यशास्त्र यांची आवड. तसेच मराठी ब्लॉगविश्वातील लोकप्रिय नाव.)
nandan27@gmail.com