नकळत्या वयापासून संगीत हाच श्वास अन् ध्यास कसा होत गेला, संगीतसागरातले माणिक-मोती कसे सापडत गेले, त्यातून ब्रह्मानंदी कशी टाळी लागली, याचा सुरेल प्रवास कथन करणारे सदर..
‘पाणी’ या मराठीतल्या शब्दाला संस्कृत भाषेत ‘जीवन’ असा अत्यंत समर्पक आणि अर्थपूर्ण समानार्थी शब्द आहे. खरोखरीच जिवंत राहण्याकरिता ऑक्सिजन (प्राणवायू) आणि त्याचेच संयुग असलेलं H2O म्हणजे पाणी हे जसे अनिवार्य आहे, तितकेच मला जगण्याकरिता अनिवार्य वाटत राहिले- स्वर.. संगीताचे स्वर. प्राणवायू, पाणी आणि स्वर- तिन्ही सारखेच विशुद्ध.. प्रवाही आणि जीवनदायी. जब से होश संभाले, तेव्हापासून संगीतस्वर ही माझी जगण्यातली अनिवार्य बाब होऊन गेलीय..
संगीतातल्या सप्तकातले सात शुद्ध, चार कोमल आणि एक तीव्र असे बाराही स्वर खरं तर सगळेच विशुद्ध.. पवित्र. अकोल्याला विदर्भ संगीत विद्यालयात माझ्या गुरू डॉ. शकुंतला पळसोकर यांच्याकडे गाणं शिकताना स्वरांची रागाच्या माध्यमातून नव्यानं ओळख होत गेली. पुढं अनेकानेक रागांची जानपेहचान होऊन मैत्री जडली. अशीच एक सदाबहार रागिणी भैरवी मध्यम पंचम वगळता सर्व स्वर कोमल.. तर ‘यमन’ हा एक तीव्र मध्यमाचा अपवाद वगळता शुद्ध स्वरांचा राग.
माझा एक मित्र तर गमतीनं म्हणतोच, की खरे राग फक्त दोनच- एक यमन- शुद्ध स्वरांचा; तर दुसरा भैरवी- कोमल स्वरांचा. बाकी सगळे राग म्हणजे त्यांची वेगवेगळी संयुगं.. कॉम्बिनेशन्स.
प्रतिभावंत संगीतकार गाण्याची चाल बांधताना (निष्णात पाककर्ता/ पाककर्ती जशी खाद्यपदार्थ रांधताना लसूण, हिरवी मिरची, आलं यांच्या नेमक्या प्रयोगानं चवीत जान आणते तसेच) कोमल स्वरांचा अगर कोमल स्वर बलस्थानी असणाऱ्या रागांचा अप्रतिम प्रयोग करून गाण्यात दु:ख, आर्त, करुण रसभाव आणतात.
पण कधी कधी काहींनी कोमल स्वरांचा- रागांचा भावनिर्मितीकरिता शॉर्टकट म्हणून वापर केला म्हणजे फार डोकं चालवायला नको. कोमल करुण स्वरांच्या रसात बुचकळून गाण्यात तथाकथित दु:ख, दर्द ठासून भरायचे म्हणजे सॅड साँग तयार. मराठी/ हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत एक ज्येष्ठ संगीतकार होऊन गेले. त्यांचा खाक्या काही वेगळाच होता. गीतात कुठेही- अगदी उपमेच्या निमित्तानं पावसाचा, विजेचा वा ढगांचा लखलखाट, गडगडाटाचा पुसटसा संदर्भ वा उल्लेख आला की लगेचच त्या गाण्याकरिता ‘मल्हार’ रागाच्या कुठल्यातरी प्रकाराची- म्हणजे मेघमल्हार.. गौड मल्हार.. रामदासी मल्हार अशी काहीतरी योजना करत. पुन्हा ते अभिजात भारतीय संगीताचे पुरस्कर्ते म्हणून मिरवायला मोकळे. (गीतातल्या एखाद्या कडव्यात अगर ओळीत पावसाचं सूचन असेल तर तेवढय़ा ओळीच्या स्वरावलीतून मल्हारची छाया दाखवता येते.)
मला मात्र अशा शॉर्टकट मेथडऐवजी वेगळ्या पद्धतीनं, मार्गानं हवा तो रस, रंग गाण्याच्या चालीत बांधणाऱ्या संगीतकारांची प्रतिभा मोहवीत आलीय. अगदी साधं, शुद्ध स्वरांनी सिद्ध झालेल्या राग यमनचं उदाहरण घेऊ.
एक तीव्र मध्यमाचा अपवाद वगळता सारे स्वर शुद्ध. म्हणजे पाण्यासारखे नितळ. रंग-रसहीन. पण एकेका प्रतिभावंतांनी त्यातून करुण, विरह, प्रीती, वैफल्य, समर्पण, भक्ती, चिंतन अशा विविध भावांची अशी काही उत्कट, मनभावन गीतशिल्पे साकारली आहेत, की दरवेळी ती गाणी ऐकताना त्या-त्या महान संगीतकारांना मी मनोमन सलाम करत राहतो.
प्रतिभावंत संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी कविवर्य भा. रा. तांब्यांची ‘तिन्हीसांजा सखे मिळाल्या.. देई वचन तुला’ ही प्रीतीची ग्वाही देणारी प्रेमकविता स्वरबद्ध करताना यमन रागाच्या स्वरावलीतून पक्व प्रीतीची अभिव्यक्ती किती आश्वासक, अभिजात अंदाजानं पेश केलीय! लताबाईंचा अमृतस्वर आणि साथीला तितकेच तरल अन् अलवार संतूरस्वर. विलक्षण मूड यमनातून मांडलाय हृदयनाथांनी.
कविवर्य भा. रा. तांब्यांचीच ‘नववधू प्रिया मी बावरते.. लाजते.. पुढे सरते.. फिरते’ ही नववधूच्या रूपकातून ‘बाबुल मोरा नैहर छूटो जाय’ या ठुमरीतला अध्यात्मभाव सांगणारी कविता संगीतबद्ध करताना संगीतकार वसंत प्रभूंनी पुन्हा यमनच्याच स्वरावलीतून अतिशय गोड, लडिवाळ गाण्याची अक्षय ठेव रसिकांना दिली.
महाकवी ग. दि. माडगूळकर आणि विसाव्या शतकातले मराठीतले सर्वश्रेष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्या ‘गीतरामायणा’तलं काव्यस्वराचा अद्भुत मिलाप म्हणून ओळखलं जाणारं असं गाणं ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ बाबुजींना यमनमध्येच स्वरांकित करावंसं वाटणं, हे जसं यमनचं सामथ्र्य आहे तसंच ते बाबुजींच्या अलौकिक प्रतिभेचंही!
हिंदी चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय संगीतकार म्हणून गाजलेल्या शंकर-जयकिशन या जोडगोळीनं संगीतबद्ध केलेलं ‘जंगली’ या चित्रपटातील ‘एहसान तेरा होगा मुझपर..’ हे नितांतसुंदर गाणं यमनमध्ये अप्रतिमच बांधलंय. लयीतला सुकून आणि ठेहराव.. व्हायोलिन- व्हियोला- चेलो अशी स्ट्रिंग सेक्शनच्या समृद्ध साथीनं सतारीतून उलगडणाऱ्या नाजूक स्वरावली.. आणि या सर्वावर कडी करणारा रफीसाहेबांचा मखमली स्वर..
‘चित्रलेखा’ या चित्रपटासाठी श्रेष्ठ शायर साहीरसाहेबांनी लिहिलेलं ‘मन रे तू काहे न धीर धरे’ हे सुंदर काव्य तितक्याच सुंदर, आशयघन चालीत बांधताना अभिजात संगीतकार रोशनसाहेबांनी त्यांच्या लाडक्या यमनचाच आधार घेतला. सरोद, बासरी आणि व्हायोलिन सेक्शनचा अतिशय मोजका व नेमका प्रयोग करत हिंदी चित्रपटसृष्टीतले सर्वश्रेष्ठ म्युझिक अ‍ॅरेंजर सोनिक ऊर्फ मास्टरजींनी रचलेल्या शांत, संयत स्वरावलीने स्वर-शब्दांतला आशय अधिकच गहिरा केला. रफीसाहेबांच्या गाण्याची तारीफ करायला तर माझ्याकडे खरोखरीच शब्द नाहीत.
असंच माझ्या मर्मबंधाच्या ठेवीतलं दुसरं गाणं शायर मजरुह सुलतानपुरी-रोशन या जोडीची निर्मिती आहे. ‘छुपा लो यूं दिल में प्यार मेरा.. के जैसे मंदिर में लौ दिये की’ (चित्रपट- ममता) समर्पणाच्या उत्कट भावनेनं परस्परांवरील विदग्ध प्रीतीचं पावित्र्य प्रतिभावंत रोशनसाहेबांनी यमन रागातल्या शुद्ध स्वरांतून गाण्यात अशा काही बेमिसाल अंदाजानं उतरवलंय! या गाण्याकरिता रोशनसाहेबांना लताबाईंशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नव्हता. पण त्यांनी दीदीच्या साथीला हेमंतकुमारसारख्या खर्जयुक्त गहिरा, थोडीशी नक्की (सानुनासिक) असलेल्या आवाजाची योजना करून प्रीतीची उदात्तता, पावित्र्य अधोरेखित करत गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे.
अभिजात शास्त्रीय संगीताचा आधार घेत, पण रागसंगीतातले व्याकरण, रागांचे नेमनियम यांची चौकट झुगारून देत चित्रपटातल्या गाण्याची सिच्युएशन आणि गीताचे शब्द यांचाच केवळ विचार करून अतिशय मधुर, भावोत्कट गाणी रचणारे सर्जनशील प्रतिभावंत म्हणजे संगीतकार मदनमोहनसाहेब. ‘हकीकत’ या चित्रपटासाठी उर्दूतले विख्यात शायर कैफ़ी आझमी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं ‘जरासी आहट होती है.. तो दिल बोलता है.. कही ये वो तो नहीं’ हे गीत मदनमोहनसाहेबांनी यमनच्या नेहमीच्या रागस्वरूपाची छायासुद्धा जाणवू न देता अतिशय हटके अशा मुश्कील अंदाजात स्वरबद्ध केलंय आणि लताबाईंनी तितक्याच उत्कटतेने गायलंही. विशेषत: अंतऱ्यात ‘छू गई जिस्म मेरा.. उसके दामन की हवा’ या ओळीतल्या ‘मेरा’ आणि ‘हवा’ या शब्दांच्या स्वररचनेतल्या अतिशय नाजूक हरकती लताबाईंच्या स्वरातून नायिकेच्या रोमांचित अवस्थेची अनुभूती देतात.
विविध रस-भाव गाण्यातून आविष्कृत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रतिभावंत संगीतकारांनी केलेले शुद्ध स्वरांनी युक्त यमन रागाचे विविध रंग-रसयुक्त उपयोजन आपण पाहिले. आणि शॉर्टकट मेथडनं दिवसाचे प्रहर, वर्षांतले ऋतू यांच्याशी अनुबंधित राग किंवा अशाच क्लृप्त्या वापरून संगीतनिर्मिती करणारे संगीतकार पूर्वीही होते.. आताही आहेत.
निकोलो पागानिनी (१७८२ ते १८४०) या विश्वविख्यात इटालियन व्हायोलिनवादक व संगीतकाराला कुठल्याशा गुन्ह्य़ाकरिता तत्कालीन न्यायालयानं कारावासाची शिक्षा फर्मावली. राजकृपेनं त्याला कारागृहात त्याचं लाडकं व्हायोलिन, संगीताचं नोटेशन लिहिण्याकरिता विशिष्ट कोरे कागद आणि शिसपेन्सिल नेण्याची परवानगी मिळाली. कारागृहाच्या वास्तव्यात त्यानं व्हायोलिन एकलवादनाकरिता अनेक उत्तम संगीतरचना लिहिल्या. (साहित्यात जो कविता लिहितो तो कवी; त्याचप्रमाणे पाश्चिमात्य अभिजात संगीतात जो नवी संगीतरचना स्वरलिखित करतो त्यालाच ‘संगीतकार’ म्हणून मान्यता मिळते.) शिक्षेच्या शेवटच्या दिवसांत त्याच्या व्हायोलिनच्या तीन तारा तुटल्या असता उरलेल्या एका तारेवर वाजू शकतील एवढय़ाच सुरांमध्ये निबद्ध अशी त्यानं लिहिलेली संगीतरचना सादर करण्याचे स्वप्न त्यानंतरच्या प्रत्येक सोलो व्हायोलिनवादकाने कायम पाहिले आहे.. पाहतोय.
मेइस्त्रो निकोल पागानिनीशी संबंधित ही आख्यायिका कुणातरी वादकानंच मला सांगितली. ती खरी असेल वा खोटी; पण त्याच्यातल्या अभिजात, प्रतिभावंत कलाकाराच्या प्रतिभेला त्याच्या सभोवतालच्या मर्यादा, अपुरी साधनसामग्री अशा सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीमध्येच नवसर्जनाचे आविष्कार स्फुरतात आणि अलौकिक अशा कलेची निर्मिती होते.. हे फलित मला फार महत्त्वाचं वाटतं आणि मोलाचंही…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा