डॉ. आशुतोष जावडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ashudentist@gmail.com
गायक महेश काळे यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांचं ‘हे सुरांनो चंद्र व्हा..’ हे गाणं अलीकडेच फ्युजनमध्ये पेश केलं. त्या गाण्यावर बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या गाण्याचा आणि त्यातील फ्युजनचा रोखठोक परामर्श..
पूर्वीही हे घडत आलेलं आहेच. पण गेल्या वीस-तीस वर्षांत जसं जग जवळ यायला लागलं, तसं प्रत्येक प्रांतागणिक असलेलं संगीतही एकमेकांच्या अधिक जवळ यायला लागलं, अधिक मिळूनमिसळून नांदायला शिकलं असं कुणी म्हटलं तर ते अचूक आहेच. जॉन कॉनेल यांच्या एका शोधनिबंधाचं नाव आहे : World Music : Deterritorializing place and identity. हे शीर्षकही पुरेसं बोलकं आहे. स्थल-पुराण असतं तसं स्थल-संगीत असतंच. त्यातलं ‘स्थल’ हे आता पूर्वीसारखं अचल, दृढ राहिलेलं नाही. सगळे जगाचे वारे तिथे येतात आणि तिथला सुगंधही जगभर जातो. मग अनुष्का शंकरची सतार स्पॅनिश गिटार्ससोबत स्वरांचं महाजाल लीलया उत्पन्न करते. लोकसंगीत रॉक संगीताला येऊन पुन्हा नव्याने भिडतं आणि फोक-रॉक प्रचलित होतं. ‘अव्हेट ब्रदर्स’सारखे कंपू दोन भिन्न जातकुळीच्या संगीतप्रकारांना समजून घेऊन केवळ चूष म्हणून नव्हे, तर काळाचा आंतरिक निर्मितीवर पडलेला पडसाद जाणून एकत्र आणतात. अगदी फार पूर्वीही उदाहरणार्थ, ‘मेरा नाम चीन ची चू’सारख्या गाण्यात जॅझ आणि भारतीय संगीताचा उपजत गोडवा गीता दत्तने किती सहज एकवटला होता. ‘ओ बाबूजी मं और आप’ म्हणताना तिचा आवाज भारतीय अंगभूत गोडवा घेऊन आला तरी पुढे ‘वा वा’ म्हणताना ती थेट जॅझ गायकी अनुसरते. दुर्दैवाने महेश काळे यांनी ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या गाण्याचं जे काही केलं आहे त्यामध्ये अशी कुठलीच समज आणि अंगभूत उमज नाही! एवढंच नव्हे, तर मूळ गाण्याचा अधिक्षेप ठरावा असं काहीसं त्यांनी निर्मिलेलं त्याचं नवं स्वरूप आहे. आणि ते त्यांच्या अनेक चाहत्यांना आवडलं असलं, तरी अनेकांना अजिबात आवडलेलं नाही, हे सोशल मीडियामुळे लगेचच कळतं आहे. सध्याच्या काळात रसिकांची पसंती आणि नापसंती ही लगेच आणि स्पष्ट शब्दांत कळते. नुसती शब्दांद्वारे नव्हे, तर मिम्सद्वारे आणि विनोदांद्वारेही. एवढे मिम्स या घटनेवर मी पाहतो आहे! लक्ष्मीकांत बेर्डे घाबरून ‘महेश.. महेश’ असं ओरडतो आहे आणि त्याच्या छातीवर तात्या विंचू जो बसला आहे तो महेश काळेचा चेहरा घेऊन! ‘ओम फट् स्वाहा’ म्हणायची जणू त्याला गरजच नाही. हे नवं ‘हे सुरांनो..’चं आक्रमक व्हर्जन म्हटलं की झालं! त्यातल्या विनोदाला मी हसतो आहे. पण मग मी याही प्रतिक्रिया वाचतो आहे.. कुणी लिहितंय : ‘तुम्ही आम्हाला स्वर्गीय आनंद दिला आहे या नव्या प्रयोगाद्वारे.’ किंवा एक फॅन लिहिते आहे : ‘महेशजी, तुम्ही जगातलं सर्वात उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहात. आणि या प्रयोगाने तुम्ही ज्या सोनेरी आठवणी आम्हाला दिल्या आहेत त्याला तोड नाही!’ मग मागून कुणी टिंगल करत म्हणतो आहे : ‘गिटार काळजात घुसली!’ किंवा ‘हे मक्यांनो पॉपकोर्न व्हा!’ बापरे! काय वाटत असेल कलाकाराला असं उलटसुलट वाचून? महेश काळ्यांचं मला माहीत नाही, पण एखादा संवेदनशील कलाकार नवीन प्रयोग करायलाच घाबरेल पुढे. एखादा मस्तीत हे सगळं नजरेआड करेल. एखादा बनेल कलाकार हे सगळं मनापासून एन्जॉय करेल, कारण इंग्रजीत म्हणतात तसं Any publicity is good publicity! पण प्रसिद्धी आणि विनोद, टीका, कौतुकाच्या पुढे जाऊन या घटनेकडे अशासाठी बघायला हवं, की ती मुख्य वाहिनीवर मेन स्ट्रीममधल्या प्रसिद्ध कलाकाराने सादर केलेली कृती असल्याने त्याची बरी-वाईट नक्कल पुढे होत राहणार. गल्लोगल्लीच्या संगीताच्या क्लासेसमध्ये मुलांना ‘हे चांगलं आहे, असं आपणही करावं’ असं वाटणार. मी चार-पाच वेळा तो व्हिडीओ बघितला, पण मला तरी व्यक्तिश: तो आवडला नाही. कारण त्यातलं संगीतच हरवलं आहे. मला तर फक्त गोंगाट ऐकू आला. रॉक संगीताचं, ड्रम्स आणि सिम्बलचं मला वावडं नाही, हे ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीतलं ‘लयपश्चिमा’ हे सदर वाचलेल्या (आणि नंतर कार्यक्रम बघितलेल्या!) अनेकांना पुरतं ठाऊक आहे. इथे रॉकची एनर्जी गायकाला आणि कोरसला अजिबात पकडता आलेली नाही. रॉकमधलं जे बंडखोर संवेदन आहे, तेही या आवाजात नाही. नुसता जाड आवाज काढून रेटून गायलं तर ते संवेदन येत नाही. आणि मग त्या मूळ गाण्याची जी नजाकत आहे, जो गोडवा आहे, जे अभिजात माधुर्य आहे, ते तर संपूर्ण गायकीमध्ये लोपच पावलेलं आहे. खेरीज मधेच ‘मायरे’ आणि ‘खेळ मांडला’ हे शब्द का येतात, हेच मला कळलेलं नाही. महेश काळे आणि वाहिनी किंवा जे कुणी याचे सर्जक आहेत त्यांना नक्की काय करायचं होतं? रिमिक्स, मॅशअप, फ्युजन का नुसतं रिअरेंजिंग? (कारण या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.) का काहीच कन्सेप्ट नव्हती डोक्यात पक्की आणि सहज प्रयोग करून सगळे गात, वाजवत गेले? तसंही करायला हरकत नाही, पण मग पुढे तात्या विंचूचे मिम्स पडणार फेसबुकवर! गराज बँड्स असेच अनेकदा सहज, निर्हेतुक गिग करतात. पण मग ते ‘कोल्डप्ले’ होत नाहीत! खरं सांगायचं तर इतकं निर्हेतुकपणे आणि कॅज्युअली संगीताचं प्रायोगिकरण करता येत नाही आणि करूही नये. माझा तरुण मित्र सौरभ खोत आणि मी यावर नुकतंच बोलत होतो. तेव्हा तो पटकन् बोलताना म्हणाला, ‘‘आशुदा, दोन निष्कर्ष : १. नवतेच्या नावाखाली पाश्चात्त्य झूल पांघरण्याचा भावहीन अट्टहास. २. अभिषेकीबुवांच्या स्वरांचं आपल्या मनातलं अढळ स्थान उद्धृत होणं! विशीच्या जोशापलीकडे त्याच्या त्या बोलण्यात पुष्कळ तथ्य आहे हे मला मान्य करावं लागलं. अभिषेकीबुवा अधिक आठवले हे खरंच! मग मी थेट पं. सत्यशील देशपांडे यांच्याशीच फोनवर बोललो. त्या संभाषणातलेही दोन मुद्दे महत्त्वाचे होते. पंडितजी म्हणाले, ‘‘आपण समूहगानापासून आत्यंतिक वैयक्तिक संगीताकडे ऑलरेडी आलेलो आहोत. ते आपलं वैशिष्टय़ आहे. अभिव्यक्ती तिथे उत्तुंग होते. अशा प्रयोगामध्ये कोरस घेऊन, अनेक वाद्ये घेऊन आपण पुन्हा मागे का चाललो आहोत?’’ मी एकाग्र होऊन ऐकत होतो. त्या व्हिडीओमध्ये अस्थायी वाजणारे जे सिम्बल आणि ड्रम्स आहेत, त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘‘जगाच्या पाठीवर फक्त उत्तर भारतीय तालव्यवस्थेत आवर्तनाचे पहिला व दुसरा असे दोन भाग असतात, ज्याला खाली- भरी म्हणतात. यामुळेच मुखडा घेऊन समेवर येणारी ही युनिक व्यवस्था आहे. हे आपल्या संगीताचे वैभव आहे. आपण ड्रम्सवादकाला आपल्या पद्धतीने का वाजवायला सांगू नये? फ्युजनमध्येही आपण ड्रम्स पाश्चात्त्य तालपद्धतीने का वाजवून घेतो? इथेही तसाच गोंधळ आहे.’’ पं. सत्यशील देशपांडे यांचे हे दोन्ही विचार इतके मूलभूत आहेत, की त्यावर अधिक काही न लिहिता मी ते विचारार्थ वाचकांसमोर ठेवतो आहे आत्ता फक्त.
माझा फ्युजनला अजिबातच विरोध नाही. मी बॉलीवूड संगीताचा(देखील) चाहता आहे. आणि आपलं बॉलीवूड संगीत म्हणजे फ्युजन आणि फ्युजनच! संगीतकारांच्या जोडय़ाच बघा : शंकर महादेवन यांचं अभिजात कर्नाटकी संगीत आणि एहसान लॉय यांचे ड्रम्स व गिटार! विशाल दादलानी यांचा समूर्त रॉक आणि शेखरची भारतीय शास्त्रीय संगीताची नजाकत. या सगळ्यांनी सहेतुकपणे, विचारपूर्वक, शांतपणे काम करत जगभरातील संगीत आपल्या संगीताशी माधुर्य न घालवता जोडलेलं आहे. माधुर्य घालवणारे प्रयोग करायलाही माझी हरकत नाही. नामदेव ढसाळांच्या कविता घ्या आणि कडकड वाजणाऱ्या इलेक्ट्रिक गिटारवर सूरबद्ध करत आक्रमकतेने गा! (पण बोरकरांना मात्र अॅकॉस्टिक गिटार हवी.) आणि ‘हे सुरांनो..’ म्हणताना मागून मधेच ‘खेळ मांडला’ असे शब्द तर अजिबातच यायला नकोत. शब्दांचा इतका अधिक्षेप कुठल्याच गायकाने करू नये. कुसुमाग्रजांनी लिहिलं आहे बाबा हे गाणं! सांगीतिक प्रयोग करताना शब्दांची बूज न राखणं हे एका व्यापक स्तरावर संगीत क्षेत्रातले अनेकजण साहित्याकडे ज्या नजरेनं दुय्यमत्व देत बघतात, त्याचंच लघुरूप आहे. महेश काळे यांचा हा व्हिडीओ हे एक निमित्त. एकूणात आपल्या समाजात जे सांस्कृतिक पातळीवर अनेक बदल रसिक-कलाकार संवादात होत आहेत त्याकडेही मला या लेखाच्या निमित्ताने लक्ष वेधावंसं वाटतं. तो संवाद थेट होतो आहे. त्यात खुलेपणा आहे आणि एकूण गोंधळ नाही. फ्युजनची भारतीयांना सवय आहे. पण आम्ही मॅक्डोनाल्डलाही आलू टिक्की बर्गर करायला लावलं! स्थानिक दुराभिमान नसावा; पण जी त्या समूहाची, संस्कृतीची निजखूण आहे ती फ्युजनमध्ये हरवू नये. ती निजखूण हरवली की जणू अकाउंट हॅक होतं. महेश काळे यांच्या फ्युजनमध्ये जे कन्फ्युजन आहे ते नेमकं हेच!