रेखा देशपांडे

अमृता प्रीतम..

Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
interesting facts about formation of the himalayas
कुतूहल : हिमालयाची निर्मिती
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Shakambhari Navratri festival of Tuljabhavani Devi begins in dharashiv
आई राजा उदोऽऽ उदोऽऽच्या गजरात घटस्थापना, तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ
तर्कतीर्थ विचार: तर्कतीर्थांचे वेदाध्ययन
Threat to bar owner Chikhli , Chikhli bar Loot ,
बुलढाणा : रात्रीची वेळ; बार मालकाच्या गळ्याला चाकू लावला अन…
Loksatta lokrang Love Pictures Poet Relationship PWD Engineer
अन्यथा.. स्नेहचित्रे : अजंठ्याची पुसट रेषा…

अग्नी आणि पहाटेच्या कोवळ्या, अलवार दंवबिंदूंचं एक अजब रसायन. तिच्या कविता, कथा-कादंबऱ्यांचं गारूड आजही रसिकमनांवरून उतरलेलं नाही. तसंच तिचं वादळी आयुष्यही! कविता जगणं म्हणजे काय, लेखणीची किंमत चुकवणं म्हणजे काय, हे तिनं आपल्या अवघ्या अस्तित्वानं सिद्ध केलं. रूढार्थानं स्त्रीवाद नाकारणाऱ्या अमृतानं अखंडपणे ‘माणूस’कीचा जप केला. उपजत बंडखोर वृत्ती, तीव्र सामाजिक भान आणि रोमँटिसिझम यांचं जगावेगळं अद्भुत अद्वैत तिच्या साहित्यात आणि जगण्यातही आढळतं. अमृता प्रीतमच्या जन्मशताब्दी निमित्तानं या अक्षय प्रणयिनीची गाथा पुन:पुन्हा आळवली जाईल, हे नि:संशय!

रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या एका कवितेत नवजात अर्भकाचं वर्णन ‘तू चिरप्राचीन’ आणि ‘तू चिरनूतन’ असं केलं आहे. सजीवांचं युग सुरू झालं तेव्हापासून जन्म हे घटित अस्तित्वात आहे आणि प्रत्येक नवजात जीव हा कायम नवाच असतो. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात जन्मलेल्या अमृता प्रीतमला आज एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातदेखील असंच चिरनूतनत्व बहाल करायचा मोह होतोय.

अमृता प्रीतमनं कविता लिहिल्या, कथा लिहिल्या. आठवणी- स्वत:च्या आणि जगभरात भेटलेल्या माणसांच्या- लिहिल्या. तिच्या लेखणीतून जशा तिच्या व्यक्तिगत व्यथा झरल्या तशाच समाजाविषयीच्या तिच्या चिंताही उमटल्या. तिची बंडखोरी उमटली तशीच जगरहाटीपुढे झालेली अगतिकताही प्रेमवेदना बनून उतरली. तिच्या अस्तित्वात असे किती परस्परविरोध जाणवतात. आणि त्याचवेळी त्या सर्वाचेच एकमेकांशी जुळलेले सूरही तिच्या लेखनातून ऐकू येतात.

अमृतानं पहिली बंडखोरी केली ती थेट ईश्वराशी! वयाच्या अकराव्या वर्षी. माझ्या आईला वाचव म्हणून ईश्वरापाशी केलेली प्रार्थनाच जेव्हा त्यानं ऐकली नाही, तेव्हाच तिची खात्री झाली.. ईश्वर नाही. त्या कोवळ्या वयात तिनं आपल्या अध्यात्मरंगी रंगलेल्या वडिलांशी वाद घातला. सक्ती करण्यात आली तेव्हा तिनं हात जोडले, पण प्रार्थनेऐवजी मनात म्हणाली, ‘‘नाही करणार प्रार्थना. काय कराल?’’ आणि असं म्हणताना तिनं विधींचं फोलपणसुद्धा मनोमन अधोरेखित करून टाकलं. डोळे मिटून प्रार्थना करायच्याऐवजी ती स्वप्नं पाहायला लागली. ती स्वप्नं तिच्या कवितेच्या रूपात कागदावर उतरू लागली. तिनं दुसरी बंडखोरी केली ती आईच्या पश्चात तिचा सांभाळ करणारी आजी घरात ‘खालच्या जाती’च्या माणसांसाठी वेगळी भांडी ठेवायची, त्याविरोधात. त्याच भांडय़ांतून खायचा-प्यायचा हट्ट करून तिनं आजीची वर्णव्यवस्था मोडून काढली. लहानपणीच आई-वडिलांनी ठरवलेलं लग्न झालं १६ व्या वर्षी.. दोन मुलंही झाली; म्हणजे अमृता चारचौघींसारखी संसाराला लागली असं नव्हतं. लौकिकार्थानं सुख कमी नव्हतं, पण अंतर्यामी अमृता एकाकीच होती. ते एकाकी अस्वस्थपण कागदावर उतरत राहिलं.

..आणि त्या कवितेच्या विश्वात तिला तिचा साहीर भेटला. एकीकडे तिचं बंडखोर लेखन न रुचल्यानं तत्कालीन समाजानं तिच्यावर तोंडसुखही घेतलं आणि दुसरीकडे तीच बाहेरच्या जगात पंजाबची वाणी म्हणून मान्यता पावली. पंजाबी साहित्याला तिनं जागतिक साहित्याच्या नकाशावर नेऊन ठेवलं. स्त्री म्हणून स्वत:च्या शर्तीवर जगण्याचा तिचा हट्ट, त्याचा लेखनातूनही केलेला पुरस्कार, ‘पिंजर’, ‘कर्मोवाली’, ‘एक थी अनीता’, ‘दो औरतें’.. कुणी तिला स्त्रीवादी म्हणून लेबलही लावतील; परंतु अमृताच्या साहित्यावर असं कोणतं लेबल लावण्यापेक्षा हे समजून घेतलेलं बरं, की तिच्या लेखनाचा आणि जीवनाचाही स्थायीभाव रोमँटिसिझम हाच राहिला आहे आणि समाज-विचार त्या संवेदनेचा भाग बनून तिच्या साहित्यात उतरतो. एकदा कम्युनिस्ट ब्लॉकमधल्याच एका देशात तिनं जेव्हा तिची कविता वाचली तेव्हा दुसरा एक कवी म्हणाला, ‘‘मनापासून धन्यवाद. तुमची कविता ‘कविता’ आहे, समाजवादी कविता नाही!’’ १९४८ साली फाळणीग्रस्त पंजाबच्या लेकींचं दु:ख तिच्या लेखणीतून व्यक्त झालं ते थेट हीर-रांझाच्या प्रेमाला सूफी अध्यात्माचा रंग चढवणाऱ्या वारिसशाहलाच जाब विचारत..

‘अज अक्खा वारिसशाह नू कितों कबरा विच्चू बोल,

ते आज किताबे-इश्क दा कोई अगला वरका खोल।

इक रोई धी पंजाब दी तू लिख लिख मारे बैन

ये अज लख्खा धीयाँ रोंदियाँ तैनूं वारिसशाह नू कैन?’

कबरीत चिरनिद्रा घेत पहुडलेल्या वारिसशाहला ती म्हणते- ‘पंजाबची एक लेक रडली तर तू महाकाव्य लिहिलंस. आज पंजाबच्या सगळ्या लेकी रडताहेत. आता तुझ्या इश्काच्या ग्रंथात पुढचं पान लिहायची वेळ आली आहे.’

‘कभी मैं दीवारों में चिनी जाती हूँ

कभी बिस्तर में..

क्या औरत का बदन के अलावा

कोई वतन नहीं होता?’

फाळणी ते शाहबानो.. काळाचा विस्तार व्यापून राहिलेली स्त्रीची परवड हा तिच्या चिंतनाचा विषय सतत राहिला..

‘बोलो, क्यों जीतकर भी हार जाती है

शाहबानो हर बार?’

‘पिंजर’ या कथेत फाळणीग्रस्त पुरोचं उद्ध्वस्त होणं चितारून ती थांबली नाही. पळवून नेल्या गेलेल्या पुरोला बापानं आपलं दार बंद केलं. पण भावजयीवर (जी कधीकाळी तिची नणंद होणार होती.) तसाच प्रसंग गुदरल्यावर पुरोनं तिला पुन्हा आपल्या माणसांत नेऊन सोडण्यासाठी जिवाचं रान केलं आणि भावाला बजावलं- तिला कायम सन्मानानंच वागवण्याविषयी.

१९७०-८० च्या दशकांत पेटलेल्या पंजाबचं वास्तव मांडताना ती म्हणाली-

‘खमुदा मेरे आँगन की खम्ैर करे..

आज हीर और राँझे की भैंसें रोने लगीं

कि आज जब मैं दोहने लगी

तो गगरी खून से भर गई..’

तिच्या रोमँटिसिझमचं, वास्तवदर्शी स्वप्नवादाचं, मिथकांमध्ये वास्तवाचे पडसाद ऐकण्याच्या क्षमतेचं वर्णन ‘सिमटे तो दिले-आशिक, फैले तो जम्माना’ असंच करावं लागेल.

फाळणीच्याही आधीची गोष्ट. अमृताची एक कविता प्रसिद्ध झाली होती- ‘चप्पा चन्न ते मुट्ठ कु तारे साडम मल्ल बैठे आसमान..’ (चंद्राचा तुकडा आणि मूठभर ताऱ्यांनी सारं आकाश व्यापलंय.) तेव्हा पंजाबचे एक बुजुर्ग समीक्षक प्रा. तेजासिंह यांनी लिहिलं होतं की, ‘या छोटय़ाशा मुलीनं आज आपल्या साहित्याचं आकाश व्यापलंय.’ पुढे १९५० साली अमृताच्या ‘अन्नदाता’ या कवितेवर पंजाबमध्ये बंदी आली तेव्हा त्यांनीच अमृताला लिहिलं की, ‘काळाची पडणारी कुरूप पावलं पाहून धीर खचू द्यायचा नाही. तू आहेस अनंत काळासाठी. कुणा एका काळाला तुझ्या काव्याची लोकप्रियता पेलली नाही तरी पर्वा नको.’ बरोबरच होतं. अमृताची संपूर्ण कारकीर्दच विपुल आकाशाला व्यापून राहिली. आणि अनंत काळाचा प्रवास तिचा चालूच आहे अजूनही.

समाजाचा हा रोष वेगवेगळ्या प्रकारे कधी साहित्याच्या बाबतीत, तर कधी व्यक्तिगत निर्णयांच्या बाबतीत तिनं पत्करलाय. पण त्याचवेळी तिची लोकप्रियता पंजाब व्यापून पंजाबबाहेर देश-विदेश कवेत घेत चालली होती. रोष आणि प्रेम एकाच वेळी तिला लाभत होतं.

टागोर लाहोरला आले असताना चौदा-पंधरा वर्षांच्या अमृतानं त्यांच्या सांगण्यावरून आपली कविता ऐकवली- ‘मोती मिलेगा कोई अनमोल तैनूं, तोडम् के सीपियाँ फोलदा जा..’ टागोरांना पंजाबी कळली नसणार. पण अमृताच्या डोक्यावर हात ठेवून ते पाणावल्या नजरेनं हसले. एका बालकवयित्रीला टागोरांनी आशीर्वाद दिल्याची ती बातमी दुसऱ्या दिवशी ‘ट्रिब्यून’मध्ये प्रसिद्ध झाली. त्या बातमीत भविष्याचं सूचन होतं, असं पुढे १९८३ साली शांतिनिकेतननं देऊ  केलेली डी. लिट्. स्वीकारण्यासाठी अमृता गेली तेव्हा तिला जाणवलं. आपल्यामध्ये एकाच वेळी नांदणारी उदासी आणि आनंद कुठून आलाय ते तिला त्यावेळी कळलं.

परस्परविरोध असे अमृताच्या व्यक्तिमत्त्वातच रुजलेले होते. कथालेखनाच्या बाबतीत ती जे म्हणते ते याचंच प्रतीक होय. तिनं लिहिलंय, ‘किस्सा-निगारी एक ऐसी जम्मीन होती है, जहाँ अहसास की इब्तिदा अहसास की इन्तिहा को छू लेती है।’ (कथालेखन म्हणजे जाणिवांचा आरंभ जिथे जाणिवांच्या अंताला स्पर्श करतो ती जमीन होय.) कधी कधी प्रश्न पडतो- स्त्रीवादाचा पुरस्कार करणारी, समाजाची पर्वा न करता मन:पूत जगणारी अमृता कधी स्वत:शी असं का नाही म्हणू शकली, की कायम अनिर्णयाच्या अवस्थेत आणि मौनात राहणाऱ्या साहिरवरच्या प्रेमात काय म्हणून मी कैद होऊन राहायचं? बंडखोर अमृता साहिरचा जप करतच राहिली, ते का? हे तिचं कणखर हळवेपण समजून घेणं म्हणजे एक आव्हानच होय.

१९५७ साली तिच्या ‘सुनहडे’ या काव्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. घरी पत्रकारांची, प्रशंसकांची, फोटोग्राफर्सची गर्दी उसळली. आणि फोटोग्राफर्सनी कविता लिहितानाचा फोटो काढायचाय म्हणून आग्रह धरला. फोटो काढून झाल्यावर सहज अमृतानं कागद पाहिला. नकळत ती लिहीत गेली होती- ‘साहिर, साहिर, साहिर..!’

१९६० साली अमृता नकोशा विवाहबंधनातून बाहेर पडली तेव्हा परंपरावादी पंजाबी आणि भारतीय समाजालाही ती बंडखोरी न पचणारीच होती. ‘डिव्होर्स’ हा शब्द आज फारसा कुणाला धक्का देत नाही. पण ते साल होतं १९६०. मुंबईत स्थिरावलेल्या साहिरच्या आणि आपल्या दरम्यानचं ९०० मैलांचं अंतर अमृता आपल्या कवितेतल्या शब्दांनी भरून काढत होती. आणि व्यावहारिक जगाच्या शब्दांत आणि कृतीत उतरवता न येणारं तगमगतं प्रेम साहिर आपल्या गीतांमधून व्यक्त करत होता, आणि म्हणत होता-

‘जिंदगी तेरी जुल्फों की नर्म छाँवों में

गुजम्रने पाती

तो शादाब हो भी सकती थी..

मगर यह हो न सका..’

‘तल्खियाँ’ या त्याच्या संग्रहातल्या उदास कवितांतली चिरंतन प्रेमिका होती अमृता! आणि अमृतानं साहिरपाशी पोहोचायचा केलेला असफल प्रयत्न तिला डिप्रेशनकडे घेऊन गेला. तेव्हा त्या डिप्रेशनमधून तिची कविता उतरली-

‘दुखान्त यह नहीं होता कि

आपकी किस्मत से आपके साजन का नाम, पता न पढम जाय

और आपकी उम्र की चिट्ठी सदा घूमती रहें,

दुखान्त यह होता है कि

आप अपने प्रिय को अपनी उम्र की सारी चिट्ठी लिख लें

और आपके पास से आपके प्रिय का नाम, पता खो जाय।

दुखान्त यह नहीं होता कि

जिंदगी की लंबी डगर पर समाज के बंधन अपने काँटे बिखेरते रहें

और आपके पैरों में से सारी उम्र लहू बहता रहे।

दुखान्त यह होता है कि

आप लहूलुहान पैरों से उस जगह खङे हो जाएँ

जिसके आगे कोई रास्ता आपको बुलावा न दे।’

‘रसीदी टिकट’मध्ये विवाहबंधनातून मुक्त झाल्या झाल्या साहिरला फोन करायला निघालेल्या अमृताचा प्रसंग वाचकांच्या चांगलाच लक्षात असेल. त्याचंच प्रतिबिंब तिच्या कवितेत पडलं होतं. डिप्रेशनच्या त्या अवस्थेतून तिला बाहेर काढलं ते तिच्या अक्षरांनी. १९६६ नंतरच्या या काळात त्या अक्षरांनी तिला अक्षरश:

जगाच्या सफरी घडवल्या. तिथल्या रायटर्स कॉन्फरन्सेस, ठिकठिकाणी कौतुकमिश्रित प्रेमभरानं होणारं स्वागत आणि परदेशांत भेटू लागलेल्या जुल्फिया खमनम, एलिसा वेता बागरियाना, यूलिया अग्नयालोवा, सारा

शिगुफ्ता, नुजम्हत सिद्दिकी, व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष हो चि-मिन्ह (जे कवीदेखील होते).. यांसारख्या असंख्य समानधर्मा मित्र-मैत्रिणींचा गोतावळा, तिथे भेटलेल्या अनेकांच्या विलक्षण जीवनकथा.. जिथे जिथे गेली

तिथून तिथून तिनं हळवे, सुंदर क्षण वेचून आणले. ‘सपनों की नीली-सी लकीर’ या तिच्या १९९२ साली प्रसिद्ध झालेल्या लेखसंग्रहात हे सारे क्षण आणि कण तिच्या लेखक व्यक्तिमत्त्वाच्या आकाशात तारकांसारखे चमचमताना जाणवतात. हताशा आणि उभारी अमृताच्या आयुष्यात आणि साहित्यात हातात हात घालूनच येत राहिल्या.

साहिरच्या नावे तिनं लिहिलेल्या ‘आखम्री खम्त’साठी रेखांकन करता करता चित्रकार इंद्रजित ऊर्फ इमरोज तिच्या जीवनाच्या कॅनव्हासवर उतरला. तेव्हा दिल्ली ऑल इंडिया रेडिओवरून जगाशी संवाद साधणाऱ्या, साहित्य क्षेत्रात लोकप्रियतेची घोडदौड करत निघालेल्या अमृतानं पुन्हा एक बंडखोरी केली, ती इमरोजच्या साथीनं. विवाह न करता एकत्र राहण्याचा समाजाला न रुचणारा निर्णय घेताना इमरोज म्हणाला होता, ‘‘माझा समाज तू आणि तुझा समाज मी.’’ मग दोघांचा मिळून एक समाज तयार झाला. अमृता-इमरोजच्या सहजीवनाला झाकोळून न टाकताही साहिर अमृताचं जीवन व्यापून होता. साहिरच्या आठवणींसह तिच्याबरोबर जगणाऱ्या इमरोजनंच साहिर-अमृताच्या या विरहातल्या सोबतीचं जे वर्णन केलंय त्यात दोघांच्या फुलत चाललेल्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचंही प्रतिबिंब पडलेलं दिसतं. इमरोज म्हणतो, ‘‘साहिर नज्म से बेहतरीन नज्म तक पहुँचे. अमृता कविता से बेहतरीन कविता तक पहुँची. लेकिन दोनों जिंदगी तक न पहुँचे.’

इमरोजच्या पाठीवर बोटानं ‘साहिर.. साहिर’ लिहिणारी अमृता, दिल्लीत भरलेल्या पहिल्या एशियन रायटर्स कॉन्फरन्समध्ये प्रतिनिधींच्या कोटावर लावण्यात आलेल्या नावांच्या बिल्ल्यांची अदलाबदल करून स्वत:च्या कोटावर ‘अमृता’ आणि अमृताच्या कोटावर ‘साहिर’ नावाचा बिल्ला लावणारा साहिर, साहिरनं ओढलेल्या सिगरेटची कपाटात जपून ठेवलेली थोटकं आणि मग कधीतरी ती काढून, पेटवून स्वत:च्या बोटात धरताना साहिरच्या बोटांचा स्पर्श अनुभवणारी अमृता.. या प्रतिमा एखाद्या काल्पनिक प्रेमकथेत शोभणाऱ्या वाटतील. आजच्या इन्स्टंट प्रेमाच्या आणि ब्रेकअपच्या काळात ही भावविव्हलता कदाचित फक्त कवितेत वापरायची चीज वाटेल. पण अमृता प्रीतम नावाचं एक अख्खं शतक ती भावविव्हलता प्रत्यक्ष जगलं आहे आणि इमरोज त्याचा साक्षीदार आहे. आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’वर चर्चाचे रिअ‍ॅलिटी शोज् रंगवणाऱ्या एकविसाव्या शतकापुढे तिनं आणि त्या साक्षीदारानं आपल्या सहजीवनातून सामाजिक बंडखोरीबरोबरच विशुद्ध निष्ठेचा अनोखा दस्तावेजही पेश केलाय..

‘अंबर की इक पाक सुराही, बादल का इक जाम उठाकर

घूँट चाँदनी पी है हमने, बात कुफ्र  की

की है हमने।’

तिच्या जाणिवा आणि तिची स्वप्नं एकमेकांत गुंफली जाऊन तिच्या साहित्यिक अभिव्यक्तीचा गोफ विणत राहतात. तिची पात्रं तिला कधी भेटलेली आहेत, तर कधी तिच्या स्वप्नांत आलेली आहेत. तिच्या जाणिवांत ती विरघळली आहेत आणि मगच तिच्या कथा-कादंबऱ्यांत उतरली आहेत. ‘काव्य असो की गद्य; अक्षरांचं नातं जेव्हा दूर कुठेतरी खोलवर चालू असलेल्या चिंतनाशी जुळलेलं असतं, तेव्हाच त्याचे अंतर्नाद ऐकू येतात,’ असा तिचा अनुभव आहे. ‘दो औरतें’मधली जमीनदारीण आणि वेश्या तिला लाहोरमध्ये भेटल्या होत्या, तर ‘काला गुलाब’ तिला स्वप्नात दिसला होता. १९७० साली बडोदा विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या आपल्या मुलाच्या काळजीनं तिच्यातली आई व्याकुळली होती. संपर्क होता होत नव्हता. एक दिवस मध्यरात्री फोन आला. रात्री झोपताना अमृता फारसे कपडे अंगावर ठेवत नसे. त्या अवस्थेतच तिनं फोन घेतला. मुलाचा आवाज ऐकताना तिला जे वाटलं होतं त्या जाणिवेचं नातं तिला गुरू नानकांना जन्म देणाऱ्या माता तृप्ताच्या जाणिवेशी जुळल्यासारखं वाटलं. ते वर्ष गुरू नानकांच्या ५०० व्या जयंतीचं होतं. तिनं कविता लिहिली- ‘गर्भवती’! पंजाबी वृत्तपत्रांना त्यात गुरूंचा अधिक्षेप वाटला. पुन्हा अमृता टीकेला सामोरी गेली. आईपणाच्या जाणिवेचं निखळपण मांडतानाही धाडसच करावं लागलं होतं तिला.

१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात राज्यसभेचं सदस्यत्व चालून आलं तेव्हा तिनं राजकारणात आपल्याला रस नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आणि सदस्यत्व स्वीकारल्यानंतर ते केवळ शोभेचं न करता किंवा राज्यसभेत कायम अनुपस्थित राहण्याचा विक्रम वगैरे न करता अमृता प्रीतम यांनी तिथे प्रश्न मांडले : साहित्य आणि संस्कृतीचं जे व्यापारीकरण सुरू झालं आहे त्यावर आपण काही करणार आहोत की नाही? आसाममधल्या वैष्णव मठात स्त्रियांना जाण्याची मनाई होती. तो अनुभव त्यांनी आसाम भेटीत स्वत: घेतला आणि पुजाऱ्याला आपल्या खास शैलीत विचारलं, ‘राधा तर कृष्णाची महाचेतना. तिच्याशिवाय कृष्ण एकटा काय करणार?’ महिलांनी मठावर नेलेल्या शिष्टमंडळाच्या बातम्यांची कात्रणं त्यांनी जमा केली. इंदिरा गोस्वामींच्या मदतीनं मनाई हुकूमाच्या पाटीचा फोटो घेतला आणि ८ मार्चच्या निमित्तानं राज्यसभेत ठराव मांडला- ‘महिला दिवस हा केवळ एक औपचारिकता ठरू नये. स्त्रियांना अशा प्रकारे प्रवेशाची मनाई करणं हे आपल्या लोकशाहीला शोभणारं नाही.’ न्यायपालिकेकडून सामान्य माणसाला न्याय मिळण्यात होणाऱ्या अन्याय्य विलंबाचा मुद्दाही त्यांनी राज्यसभेत आणला..

अमृता गेल्या शंभर वर्षांच्या काळातल्या प्रत्येक तुकडय़ात आधीइतकीच नवी भासत राहिली आहे, त्याचं हेही एक कारण आहे. प्रगल्भ विचार आणि भावनेची कोवळीक लेवून आलेली तिची कविता सतत नव्या पालवीसारखी भासते. तर तिच्या कथा-कादंबऱ्यांमधून स्त्रीच्या आणि माणसाच्या सन्मानासाठी, स्वतंत्र अस्तित्वासाठी जो लढा आहे त्याची गरज आजही तेवढीच ताजी आहे. कारण आजही, किंबहुना आज पहिल्यापेक्षाही त्याची गरज जास्त भासते आहे. अमृता प्रीतमच्या शैलीचं वैशिष्टय़ हे की, तिचा तो लढा आक्रस्ताळा झालेला नाही.. तो कळकळीचा झालाय.

ज्या आजीच्या आचार-विचारांशी तिनं लहानपणी बंडखोरी केली होती ती आजीच तिला म्हणाली होती, ‘‘तेरी आग की उम्र इन अक्षरमें को लगे।’’ विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात जन्मलेली अमृता एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकाचीदेखील असते, ती त्या आगीमुळे. आगीतून तावूनसुलाखून निघतं सोनं. सोनं कधी जुनं होत नाही. अमृताच्या जन्माची शताब्दी साजरी करायची ती जगरहाटी म्हणून. अमृता तर नित्य नवीच आहे. तिनं इमरोजच्या नावे कविता लिहून ठेवलीय..

‘मैं तुम्हें फिर मिलूँगी,

शायद तुम्हारे खम्यालों की चिनगारी बनकर,

तुम्हारे कैनवास पर उतरूँगी।’

१९७४ साली- स्वत:च्या अस्ताच्या पाचच दिवस आधी- प्रसिद्ध हिंदी कवी रामधारीसिंह ‘दिनकर’ अमृताला म्हणाले होते, ‘‘देखो, मरना नहीं। तू मर गई तो देश की हरियाली सूख जाएगी।’’ अमृता मेली नाही. अक्षरांत आग आणि शब्दांत दंवबिंदू घेऊन स्वत:च शतक व्यापून उरलीय.

.. आणि हिरवळ आज जर सुकूच लागलेली असेल, तर मग मात्र म्हणावं लागेल-

‘ती आज असती तर शंभर वर्षांची युवती असती!’

deshrekha@yahoo.com

Story img Loader