हृषीकेश गुप्ते

मराठी साहित्यविश्वाला कादंबरीऐवजी कथा स्पर्धाचीच परंपरा फार. त्यामुळेच या जगतावर क्ष-किरण टाकले गेले, ते मासिकांना लघुकथांची यंत्रे असल्याचे हिणवत. पण साठोत्तरीत चांगली कादंबरी शोधण्याचे प्रयत्न विविध स्पर्धा घेऊन अनेकदा झाले. मॅजेस्टिक प्रकाशनाने नुकतेच थोडे व्यापक स्वरूप असणाऱ्या मराठी कादंबरी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यासाठी ९७ नव्या-जुन्या लेखकांनी भाग घेतला. त्या स्पर्धेच्या आढाव्यानिमित्त त्यातील एक परीक्षक आणि आजच्या आघाडीच्या कादंबरीकाराने या कादंबरीशोधाच्या इथल्या मातीतील व्यवहारावर टाकलेला दृष्टिक्षेप. त्याचबरोबर अशाच कादंबरी स्पर्धेतून विजेते लेखक म्हणून पुढे आलेल्या आणि बदलत्या भारताचे चिंतन करणाऱ्या एका संपादकाने मॅजेस्टिक प्रकाशनाचे संस्थापक केशवराव कोठावळे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांच्यावर लिहिलेले स्मरणचित्र..  

Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
News About Osho
Osho : आचार्य रजनीश अर्थात ओशो कोण होते? त्यांच्या विषयीची ही रहस्यं तुम्हाला ठाऊक आहेत का?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
loksatta readers response
लोकमानस : हे केवळ चुकांवर पांघरूण
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त

संवाद हा मानवी उत्क्रांतीच्या प्रवासातील एक उत्प्रेरक टप्पा आहे. याच संवाद साधनाच्या प्रक्रियेत गवसलेला कथन- हा निव्वळ मानवीच नव्हे, तर विश्वाच्या जैविक इतिहासातील सर्वात उद्बोधक टप्पा मानायला हरकत नाही. कथनातून पुढे कथनात्म साहित्याने जन्म घेतला. आधी मौखिक स्वरूपात असलेल्या आणि मग लिपी सापडल्यावर अधिकाधिक सुदृढ बनत गेलेल्या या कथनात्म साहित्याला इतर मानवी गुणांची जोड मिळून पुढे अनेक कला-उपकला प्रसवल्या. मानवी संवादसाधन, रंजन आणि उद्बोधन हे कोणत्याही कलेचे प्राथमिक उद्देश मानले तर आजचा काळ काहीसा संदिग्धावस्थेत सापडलेला दिसून येईल. कथन हा महत्त्वाचा आधार असलेल्या नाटय़-सिनेमादी कलांना विस्तारित स्वरूपात जालीय मालिका तथा वेब-सीरीजची जोड मिळालेला हा काळ आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे या नाटय़-सिनेमादी कलांचा तसेच या कलांच्या विस्तारित अंगांचा प्रवेश घराघरांतून झालेला असल्याने प्रत्येक भाषेतून या कलांच्या विस्तारित अंगासाठीची मागणी वाढते आहे. यामुळेच कथनात्म साहित्यावरचा दाब वाढतो आहे आणि आपोआपच कथनात्म साहित्य हे आज मानवी आयुष्याच्या कलात्मक-सांस्कृतिक व्यवहाराचे एक मुख्य द्योतक बनले आहे. या कथनात्म साहित्याचे कादंबरी हे एक अविभाज्य अंग असून, अनेक समांतर कलांना-उपकलांना विस्तारित रूप देण्याच्या कामी या साहित्य प्रकाराचा हातभार लागतो. गोडसे भटजींच्या ‘माझा प्रवास’ या आत्मचरित्रात्मक कथनापासून सुरू झालेल्या मराठी कादंबरीचा प्रवास पुढे केतकरांच्या ‘ब्राह्मणकन्या’पासून फडके-खांडेकर, पेंडसे-दळवी, नेमाडे-पठारे, बागूल- ऐनापुरे, पेठे-देसाई अशा वेगवेगळय़ा स्त्री-पुरुष कादंबरीकारांनी आखला. या प्रवासात अनेक वळणे, टप्पे, थांबे होते. साहित्याच्या जातकुळीवरून उद्भवणारे वादंग होते. त्या त्या कादंबरीकारांच्या पाईकांनी हिरिरीने मांडलेले इझम तथावाद होते आणि यात तथाकथित वाद वा इझमपासून स्वत:ला वेगळं ठेवत आपली स्वतंत्र वाट शोधू पाहणारे त्या त्या काळातील नवनवीन कादंबरीकारही होते. एकुणात अशा वा तशा तऱ्हेने मराठी साहित्याच्या प्रांगणात मराठी कादंबरी ही कायमच लक्षणीयरीतीने उठून दिसत राहिली.

ढोबळमानाने कादंबरी या साहित्य प्रकाराचे वर्णन करताना रसाळ आणि पाल्हाळीक या गुणविशेषाकडे निर्देश करणे अपरिहार्य ठरते. कादंबरी ही कायमच काळाच्या, घटितांच्या, घटनांच्या, पात्र आणि प्रसंगांच्या विस्तारित पटाची मागणी करते. त्यामुळेच आशय हा कादंबरीचा मुख्य आणि महत्त्वाचा घटक बनतो. कादंबरीतील घटना, पात्रे, प्रसंग आणि सभोवताल हे सारेच घटक आशयाच्या अंतर्गत समविष्ट होतात. अर्थात कथनकौशल्य नसेल तर ही आशयाची समृद्धीही कादंबरीला स्तराची उंची गाठण्यापासून रोखू शकते. त्यानंतर कथनकौशल्याचे परिमाण मानला जाणारा घाट वा आशयाची सरंचना हा एक महत्त्वाचा गुणविशेष येतो. यात निवेदन, कथनासाठी निवडलेली भाषाशैली इत्यादी घटकांचा समावेश होतो, पण समृद्ध आशयाचा अभाव असेल तर हा घाट वा रचना कादंबरीस तारून नेण्यास निष्प्रभ ठरू शकतात. आजच्या काळात महत्त्वाचा ठरू पाहणारा कादंबरीचा अजून एक गुणविशेष म्हणजे कादंबरीचा विषय. या विषयाचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा अनेक भागांत-उपभागांत वर्गीकरण होऊ शकते. कादंबरीचा विषय त्याच्या वेगळेपणानुसार कादंबरीला तारून नेऊ शकतो वा हाच विषय त्यातल्या ‘तोचतोचपणा’मुळे आणि आशयाच्या, घाटाच्या वा भाषेच्या अभावामुळे कादंबरीला मारकही ठरू शकतो. एकूणातच कादंबरी ही आशय, विषय, घाट यांचा तोल सावरत केलेली एक साहित्यिक तारेवरची कसरत असते, असं म्हणायला हरकत नाही. या पार्श्वभूमीवर आजच्या काळातल्या मराठी कादंबरीकडे पाहणे ही एक रोचक कृती ठरते.

नव्या कादंबरीचा, कादंबरीकारांचा शोध घेण्याची धडपड मराठी साहित्यविश्व कायमच करताना आढळते. वेगवेगळी प्रकाशने, नियतकालिके, साहित्य संस्था यांनी आजवर हे प्रयत्न केल्याचे दिसून येते. हा शोध वेगवेगळय़ा पातळय़ांवर, वेगवेगळय़ा पद्धतीने घेतला गेला. यात कादंबरीसाठी दिल्या

गेलेल्या शिष्यवृत्ती असो, दिवाळी अंकांचे उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ असो, वा त्या त्या काळातल्या प्रकाशकांनी केलेले आपापले स्वतंत्र प्रयत्न असो.. मराठी कादंबरी ही कायमच इतर साहित्यप्रकारांपेक्षा अंमळ जास्तच प्रकाशझोतात राहिली. या शोधाचा ‘कादंबरी स्पर्धा’ हा आजवरचा एक प्रमुख स्रोत असल्याचे दिसून येते. स्पर्धेतून प्रकाशझोतात आलेल्या कादंबऱ्यांचा विचार करता मराठीतल्या ज्या मातब्बर कादंबऱ्यांची नावे चटकन् डोळय़ांसमोर येतात त्यात जयवंत दळवींची ‘चक्र’, मधु मंगेश कर्णिकांची ‘देवकी’, मनोहर तल्हारांची ‘माणूस’ आणि भानू काळेंची ‘तिसरी चांदणी’ यांचा समावेश होतो. त्याकाळात म्हणजे साधारण १९६३ आणि १९७६ सालादरम्यान या स्पर्धा प्रामुख्याने ‘मॅजेस्टिक’ प्रकाशनाने घेतल्या होत्या. ‘धनंजय’,‘चंद्रकांत’ही वार्षिके प्रकाशित करणाऱ्या राजेंद्र प्रकाशनानेही नारायण  धारपांची त्यांच्या मृत्यूपश्चात अर्धवट राहिलेली कादंबरी पूर्ण करण्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती. त्यांच्याच अंक काही वर्षे पुण्यातील सदानंद प्रकाशनाकडे गेल्यानंतर घेण्यात आलेल्या स्पर्धेमधून गुरुनाथ नाईक, दिवाकर नेमाडे, शरदचंद्र वाळिंबे, सुभाष शहा ही रहस्यकथाकारांची नवी पिढी १९७० साली अवतरली. त्यांनी रहस्यकथा खपाची सगळी गणितंच बदलली. पुढे पुन्हा ‘धनंजय’-‘चंद्रकांत’ हे अंक राजेंद्र प्रकाशनाकडे आल्यानंतर प्रभाकर पेंढारकर लिखित ‘रारंगढांग’चा पुढील भाग कादंबरीरूपात लिहिण्यासाठी लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी एका स्वतंत्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अगदी अलीकडे रहस्य कादंबरीलेखनास उत्तेजन मिळावे यासाठी ‘राजहंस प्रकाशना’सारख्या मातब्बर प्रकाशनाने रहस्य कादंबरी स्पर्धा आयोजित केली. ‘स्टोरीटेल’ या आंतरराष्ट्रीय ऑडियो बुकसंस्थेनेही मराठीतील सुहास शिरवळकर या लोकप्रिय लेखकाच्या स्मृतीप्रीत्यर्थ महाराष्ट्रभरातून कादंबरी लेखनासाठी लेखकांना आवाहन केले आहे.

नुकतेच ‘मॅजेस्टिक प्रकाशना’कडून प्रकाशनाचे संस्थापक ज्येष्ठ प्रकाशक केशवराव कोठावळे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त थोडे व्यापक स्वरूप असणाऱ्या मराठी कादंबरी स्पर्धेचे आयोजन केले गेले. किमान पन्नास हजार शब्दांची अट असणाऱ्या या स्पर्धेसाठी तब्बल सत्त्याण्णव कादंबऱ्या आल्या. या सत्त्याण्णव कादंबऱ्यांचे वाचन प्राथमिक तपासणी फेरीत वेगवेगळय़ा अनुभवी लेखक आणि समीक्षकांनी केले. त्यातून बारा कादंबऱ्या अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या. स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून माझ्यासह ज्येष्ठ अभ्यासक-समीक्षक रेखा इनामदार-साने आणि वंदना बोकील- कुलकर्णी अशा तिघांनी काम पाहिले. यानिमित्ताने लक्षात आलेल्या आणि घेतल्या गेलेल्या काही नोंदींचा हा ऊहापोह.

अंतिम फेरीत निवडलेल्या बारा कादंबऱ्यांपैकी पाच कादंबऱ्यांनाच पुरस्कारप्राप्त ठरवण्यात आले असले तरी आशय-विषयाच्या दृष्टीने या सर्व कादंबऱ्यांमधील वैविध्य आणि वेगळेपण लक्षणीय होते. लेखकाची ओळख परीक्षकांस कळू न देण्याचा दंडक आयोजकांकडून कसोशीने पाळला गेल्यामुळे हस्तलिखित वाचताना लेखकाचे नाव, गाव, वय याविषयी कोणताही अंदाज बांधता येत नव्हता. परिणामवश कादंबरीत त्या त्या लेखकांनी हाताळलेला विषय, उभा केलेला आशय हा अनुभवजन्य (Firsthand experience) होता का उसन्या अनुभवातून (secondhand experience) घडला होता याविषयी आराखडे बांधता येत नव्हते. यामुळे वाचनाच्या आनंदात एक आव्हानात्मक भर पडत होती. या स्पर्धेदरम्यान वाचनात आलेल्या कादंबऱ्यांतील विविधांगी आशयांचा विचार करता -स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या तगमगीपासून ते संत्री विक्रीच्या मंडीपर्यंत आणि कॉलेजच्या स्टाफरूममधील वातावरणापासून ते विद्यापीठीय राजकारणापर्यंत अशा अनेक विषयांचा समावेश होता. कादंबऱ्यांतील बहुतांश आशय हा वास्तववादी वर्णनांकडे झुकणारा असून, त्यात कल्पनाप्रवणता कमी आणि अनुभवजन्यता जास्त हे स्पष्ट कळून येत होते. घटनांचा प्रवाहीपणा, पात्रांचा ओघवता वावर सर्वच कादंबऱ्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात साधला गेला होता. या पार्श्वभूमीवर कथानकातील काळ, घटितं आणि पात्रं यांच्यावरची तांत्रिक पकड ढिली न होऊ देणाऱ्या कादंबऱ्या विजेत्या म्हणून पुढे आल्या. प्रथम क्रमांकाची म्हणून निवड झालेली माधव सावरगावकर या लेखकाची ‘सारीपाट’ ही कादंबरी रासायनिक उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध पात्रांचा अत्यंत रसाळ पट उलगडते. लेखकाच्या शैलीत गोष्टीवेल्हाळपणा पुरेपूर आढळतो. आशयातील अनुभवजन्यता पात्रांचे चित्रण बारीक तपशिलांसह उभे करण्यात मदत करते. वेगवेगळय़ा पात्रांना केंद्रीभूत ठेवणारी कादंबरीतील वेगवेगळी प्रकरणे रचनात्मक घाटाचे बांधकाम उत्तमरीत्या साकारतात. राजन खान या प्रतिथयश लेखकाची द्वितीय क्रमांक प्राप्त ‘गोधडी’ ही कादंबरी आशय, भाषा, घाट यांच्या लवचीकतेने अक्षरश: अवाक्करते. अखंडित संज्ञाप्रवाही निवेदनाचे इतके उत्तम उदाहरण मराठीत अपवादाने सापडावे. बहुपदरी आशयाची कौशल्यपूर्ण अभिव्यक्ती कादंबरी वाचताना भान हरपायला लावते. प्रमोद मनोहर कोपर्डे या ज्येष्ठ कवी-लेखकाची ‘खोंबारा’ ही कादंबरी एका छोटय़ा गावातील पत्रकाराच्या प्रवासाची कहाणी सांगते. या प्रवासादरम्यान प्रमुख पात्राच्या वैयक्तिक, सामाजिक आणि सांस्कृतिक भावना परिपोषावर येणारे विविधांगी ताण ही कादंबरी उलगडते. लक्षणीय म्हणून निवडल्या गेलेल्या-वासुदेव डहाके यांची ‘मंडी’ आणि योगिनी वेंगुर्लेकर यांची ‘अस्वस्थ अर्थभान’ या दोन कादंबऱ्याही आशयातील वेगळेपणामुळे विशेष नजरेत भरतात. ‘मंडी’मध्ये संत्र्याच्या व्यापारामागची सामान्य माणसास माहीत नसलेली उलाढाल, ठेकेदारी, शोषण यांचे अत्यंत वास्तवदर्शी चित्रण घडते, तर ‘अस्वस्थ अर्थभान’ मध्ये गेल्या काही वर्षांत भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये घडत असलेल्या घोटाळय़ांचे, बंद पडणाऱ्या सहकारी बँकांचे आजवर मराठी साहित्यात फारसे न आढळलेले चित्रण घडून येते.

काही प्रथितयश तर काही अजिबातच माहिती नसलेली या कादंबरी लेखकांची नावे आहेत. त्यांच्याकडून भविष्यातील उत्तम कथनात्मक लेखन येण्याची शक्यता आहे. अशा कादंबरी स्पर्धाचे फलित म्हणजे नवे लेखक घडणे. १९६० च्या दशकात जयवंत दळवी, मनोहर तल्हार, मधु मंगेश कर्णिक ही नावे लखलखली. पुढल्या दशकात या स्पर्धाचे स्वरूप कमी झाले तरी कादंबरीचा शोध संपला नाही. अशा स्पर्धेतून नव्या सकस लेखनाला प्रोत्साहन आणि साहित्यात काही सक्रिय चर्चा घडण्याची शक्यता तयार होते. त्यामुळे उत्तम कादंबरीसाठीचा असा स्पर्धात्मक शोध पुढल्या काळात अधिकाधिक वाढायला हवा. कारण आजच्या व्यामिश्र झालेल्या जगण्याला पकडण्याचे सामर्थ्य कथन साहित्यात पुरेपूर आहे.

मासिक कादंबऱ्यांची परंपरा..

अमेरिकी-ब्रिटिश लगदा साहित्य (पल्प फिक्शन) पुरविणाऱ्या मासिकांनी दरमहा कादंबऱ्या छापण्याची आणि वाचकांना ती आवडीने स्वीकारण्याची सवय लावली. आर्गसी, ब्ल्यू बुक, डाईम डिटेक्टिव्ह, न्यू डिटेक्टिव्ह मॅगझिन, थ्रिलिंग डिटेक्टिव्ह, विअर्ड टेल्स, वेस्टर्न अ‍ॅडव्हेंचर, रँच रोमान्स, अ‍ॅडव्हेंचर, एलरी क्वीन, द मास्क डिटेक्टिव्ह, ऑल-अमेरिकन फिक्शन यांसारख्या मासिकांनी १८९० ते १९६०च्या दशकात जगभर रहस्य- भय कादंबऱ्यांचा वाचक तयार केला. मास्क ऑफ झोरो, टारझन आणि कित्येक अभिजात साहित्य या लगदा मासिकांतून पहिल्यांदा प्रसिद्ध झाले. आपल्याकडे भा. रा.भागवत, जी. ए. कुलकर्णी, व्यंकटेश माडगूळकर आणि नारायण धारप हे दिग्गज लेखक या मासिकांचे मोठे वाचक असल्याचे संदर्भ त्यांनी केलेल्या टिपण आणि नोंदींतून सापडतात.

मराठीसाठी थोडा इतिहास..

मराठी मासिके ही लघुकथांवर चालणारी यंत्रे असल्याची टीका क्ष-किरणकार अशोक शहाणे यांनी केली, त्याच्या दोनच वर्षे आधी ऑक्टोबर १९६१मध्ये ‘धनंजय’ या रहस्यकथा मासिकाची निर्मिती झाली. चंद्रकांत काकोडकर, यशवंत रांजणकर, अण्णा भाऊ साठे, एस. एम. काशीकर यांच्या संपूर्ण कादंबऱ्या एकाच मासिक अंकांतून वाचायची सवय मराठी वाचकांना या मासिकांनी लावली. त्यापूर्वी कादंबरी मासिकांमध्ये प्रकरणांमधून सादर होत असे. १९६३मध्ये मॅजेस्टिकने घेतलेल्या कादंबरी स्पर्धेनंतर पु. वि. बेहेऱ्यांच्या ‘मेनका’ मासिकाने १९६४ साली उत्कृष्ट कादंबरीस १००० रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. त्यात मधुकर या लेखकाची ‘रिंगण’, लीला श्रीवास्तव यांची ‘अंधाराचं दु:ख’ आणि श्याम नारायण कुलकर्णी यांची ‘प्रीतीची वाट’ या कादंबरीची स्वीकृती झाल्याचा तपशील सापडतो. पुढे ‘धनंजय’ मासिकाच्या कादंबरी स्पर्धेमुळे गुरुनाथ नाईक, अरुण ताम्हणकर, अनिल  टी. कुलकर्णी हे रहस्य कादंबरीकार नावारूपाला आले.

वाट रुळल्यानंतरचा तपशील..

‘धनंजय’ आणि ‘चंद्रकांत’च्या यशानंतर पुढल्या दीड दशकात दरमहा कादंबऱ्या देणाऱ्या मराठी मासिकांचा उदयही झाला. आधीपासून असलेल्या ‘हंस-नवल’, ‘शेरलॉक’, ‘रम्यकथा’ आदी मासिकांमधून कुमुदिनी रांगणेकरांपासून राजा पारगावकर यांच्यापर्यंत दरमहा कादंबऱ्या लिहिणारे कित्येक लोकप्रिय लेखक-लेखिका घडल्या. ‘धग’ लिहिणारे उद्धव शेळके यांनी रहस्यकथांच्या आकाराच्या कित्येक कादंबऱ्या ‘रम्यकथा’मधून लिहिल्या. सत्तरच्या दशकात राष्ट्रीय बाल कादंबरी स्पर्धेत नारायण धारप यांच्या ‘गोग्रॅमचा चितार’, ‘गोग्रॅमचे पुनरागमन’ या कादंबऱ्यांना पारितोषिक मिळाले. तोवर त्यांचे भयकथा लेखक म्हणून नाव लोकप्रिय झाले होते. मधुकाका कुलकर्णी यांच्या श्रीविद्या प्रकाशनाने ऐंशीच्या दशकात सलग काही वर्षे कादंबरी स्पर्धा घेतल्या. त्यातील पहिले तीन विजेते आणि उल्लेखनीय कादंबऱ्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

gupterk@yahoo.in

Story img Loader