शुभदा दादरकर shubhadadadarkar07714@gmail.com

संगीत रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या कन्या कीर्ती शिलेदार यांनीही घराण्याचा वारसा यशस्वीपणे चालवीत संगीत नाटकांमध्ये आपली नाममुद्रा उमटविली. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा लेख..

Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
PM Narendra Modi On Congress
PM Narendra Modi : “काँग्रेसने गरिबी हटावचा खोटा नारा दिला, पण आता…”, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
tumsar assembly constituency
तुमसर विधानसभेत जात, पक्ष अन् चिन्ह दुय्यम स्थानी; उमेदवारच केंद्रस्थानी !
jayant patil islampur loksatta
सांगलीत जयंत पाटील यांची कसोटी
Sule indirectly attacked Ajit Pawar and his supporters during speech
“आजकाल भाषण करतांना काळजी घ्यावी लागते” सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

महाराष्ट्राची संगीत नाटकांची उज्ज्वल परंपरा अविरत चालू राहावी, संगीत नाटकांची उन्नती व्हावी, संगीत रंगभूमीवर वैविध्यपूर्ण नाटके बहरून यावीत या उद्देशाने जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी १९४९ मध्ये स्थापन केलेली संस्था म्हणजे पुणे येथील ‘मराठी रंगभूमी’! या संस्थेनेच बाळ कोल्हटकरांसारखा प्रभावी नाटककार रंगभूमीला मिळवून दिला. वि. रा. हंबर्डे, रा. ना. पवार, कमलाकांत कुलकर्णी इ. अनेक लेखक पुढे आणले. अनेक नवनवीन कलाकार घडविले. अशा या प्रयोगशील, ध्येयनिष्ठ संस्थेच्या रचलेल्या पायावर कळस चढविला तो संगीत नाटकांचे बाळकडू लाभलेल्या कीर्ती शिलेदार यांनी. अर्थातच या कार्यात कीर्तीला मोलाची साथ लाभली ती थोरली बहीण लता शिलेदार म्हणजेच दीप्ती भोगले यांची. कीर्तीच्या निधनाची बातमी ऐकली आणि गेल्या सहा दशकांचा कीर्तीचा जीवनपट, तिच्या कार्यकर्तृत्वाचा चढता आलेख सहजीच डोळ्यापुढे आला.

कीर्तीची तल्लख आणि कुशाग्र बुद्धिमत्ता, अंगभूत असलेला स्वर आणि लय, बेधडक वृत्ती, जिद्दी स्वभाव आणि सहजगत्या एखाद्याची नक्कल करण्याची हातोटी हे सर्व गुण तिच्या लहानपणीच आईवडिलांच्या नजरेतून सुटले नव्हते. पिटामध्ये तबलजीच्या जवळ बसून नाटकांचे प्रयोग पाहत असताना कुणी कलाकार चुकले, अडखळले तर घरी आल्यावर त्या कलाकाराच्या सदोष उच्चारांची, गाण्याची, तान म्हणण्याच्या पद्धतीची कीर्ती नक्कल करीत असे. हे पाहून जयरामपंतांच्या मनाने घेतले की, या मुलीची ही नाटकातली बुद्धिमत्ता असे माकडचाळे करण्यात वाया जाऊ नये, यास्तव त्यांनी १९६३ साली ‘तीन शिलेदारांचे सौभद्र’ सादर केले. या नाटकातील नारदाच्या तोंडी असलेले ‘पावना वामना’ हे पद कीर्ती अतिशय सुंदररीत्या सादर करीत असे. तसंच तिसऱ्या अंकातील सुभद्रेच्या तोंडी असलेले ‘पांडुनृपती जनक जया’ हे पद तिच्या आवाजाला फारच शोभत असे. या ‘सौभद्र’च्या निमित्ताने शुद्ध शब्दोच्चार, चेहऱ्यावरील उचित आविर्भाव, संयमित हालचाली, रंगभूमीवरचा सहज वावर याचे संस्कार लहान वयातच कीर्तीवर झाले.

व्यावसायिक रंगभूमीवर कीर्ती नायिका म्हणून उभी राहिली ती गोपीनाथ सावकारांच्या ‘कलामंदिर’ या संस्थेने सादर केलेल्या ‘शारदा’ नाटकात. शारदेची भूमिका साकारताना कीर्तीचे वय खरोखरच १४-१५ वर्षांचे होते. शारदेला अनुरूप वयाचीच कीर्ती असल्याने ही भूमिका श्रवणीय तर झालीच, पण प्रेक्षणीयही झाली. ‘मूर्तिमंत भीती उभी’, ‘बघुनी त्या भयंकर भूता’, ‘तू टाक चिरून ही मान’ ही पदे साकार करताना शारदेच्या भूमिकेतले अवघे कारुण्य कीर्तीच्या अभिनयातून आणि गायनातून व्यक्त होई. पुढे हे नाटक जेव्हा ‘मराठी रंगभूमी’तर्फे सादर होऊ लागले तेव्हा काही प्रयोगांनंतर कीर्तीने सांगितले की, ‘आता मी हे काम करणार नाही. आता काही मी शारदेच्या वयाची राहिले नाही.’ पुढे तिच्या वयाला शोभेल अशी भूमिका १६ व्या वर्षी तिला साकारता आली ती ‘ललितकलादश’निर्मित ‘रंगात रंगला श्रीरंग’ या नाटकात. या नाटकातील ‘हरिची ऐकताच मुरली, राधिका, राधिका न उरली’ या पदाची ध्वनिमुद्रिका अत्यंत लोकप्रिय झाली.

कीर्तीच्या कलाजीवनातली सर्वात महत्त्वाची भूमिका ठरली ती ‘स्वयंवर’ या नाटकातील रुक्मिणीची. ही भूमिका मुळातच अवघड. त्यातून नटसम्राट बालगंधर्वानी ही भूमिका अजरामर केलेली होती. सर्वसाधारणपणे संगीत रंगभूमीवर अन्य नाटकांतील चार-पाच नायिका रंगविल्यावर रुक्मिणीची भूमिका करण्याचे धाडस कलावती करीत असत. पण वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी ही भूमिका करायला कीर्ती पुढे सरसावली ती प्रचंड आत्मविश्वासाने. मुळातच बिचकणे, बावरणे, कचरणे, माघार घेणे या गोष्टी कीर्तीला माहीतच नव्हत्या. भीती हा शब्दच कीर्तीच्या शब्दकोशात नव्हता. रुक्मिणीची भूमिका करताना त्या भूमिकेच्या नाटय़पदांची वेगळी अशी तालीम करण्याची तिला गरजच भासली नाही. कारण जयमालाबाईंकडे गाणे शिकायला येणाऱ्या अनेक मुली ‘स्वयंवर’ नाटकातील रुक्मिणीची पदे शिकत असत. या शिकवण्या चालू असताना कीर्ती तबल्याचा ठेका धरत असे. त्यामुळे ऐकून ऐकूनच ती पदे कीर्ती गात असे. पण रुक्मिणीच्या भूमिकेचा गद्य भाग आजही तितकाच महत्त्वाचा. कीर्तीने कॉलेजमधले तिचे मराठीचे प्राध्यापक वि. वि. पटवर्धन यांच्याकडे जाऊन ही भूमिका उत्तम प्रकारे समजून घेतली. रुक्मिणीच्या भाषणांचा अर्थ समजला तरी वाक्यांची अचूक फेक होणे, अभिनयाने ती भूमिका सजविणे याकरिता तिने वसईला राहणाऱ्या मास्टर दत्ताराम यांच्याकडे मुक्काम करून त्यांच्याकडून चोख तालीम घेतली. शिवाय जयराम शिलेदारांनी रुक्मिणीची भूमिका बालगंधर्व कशी रंगवीत याच्या काही मोलाच्या खुब्या कीर्तीला सांगितल्या. आणि मग अशी जय्यत तयारी झाल्यावर ‘मराठी रंगभूमी’तर्फे हे नाटक १ डिसेंबर १९७० रोजी रंगभूमीवर साकार केले गेले. जणू ‘स्वयंवर’ नाटकाचा पुनर्जन्मच झाला.

या नाटकाचा प्रयोग पाहत असताना नाटकात वर्णन केल्याप्रमाणे खरोखरच विवाहयोग्य वयाची नायिका कीर्तीच्या रूपाने पाहताना रसिकांना भरभरून आनंद मिळाला. रुक्मिणीच्या भारदस्त पदांनी रसिकांचे कान तृप्त झाले. गायन आणि अभिनय या दोन्ही दृष्टींनी कीर्तीने ही भूमिका विलोभनीय केली. कीर्तीच्या रुक्मिणीची कीर्ती सर्वदूर पसरली.

‘स्वयंवर’नंतर सुभद्रा, भामिनी, देवयानी, रेवती अशा अनेक नायिकांच्या भूमिका कीर्तीने केल्या. वि. वा. शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’ नाटकातली शर्मिष्ठाही कीर्तीने रंगवली. हा सर्व नाटय़प्रवास चालू असताना ‘स्वयंवर’मधील तिचे रुक्मिणीचे काम पाहून प्रभावित झालेल्या माझ्या वडिलांनी- नाटककार विद्याधर गोखले यांनी खास कीर्तीसाठी नाटक लिहिले, ते म्हणजे ‘स्वरसम्राज्ञी’!

या नाटकाच्या निमित्ताने शिलेदार आणि गोखले घरातील घरोबा वाढीस लागला. माझी लता आणि कीर्ती दोघींशी मैत्री झाली. ‘स्वरसम्राज्ञी’च्या वाचनापासून ते या नाटकाचे संगीत कोणी करावे याबाबतच्या चर्चा कानावर पडू लागल्या. इतकंच काय, अभ्यंकरबुवांनी नाटय़पदांच्या केलेल्या चाली ऐकताना, ती पदे बुवा कीर्तीला शिकवीत असताना ऐकण्याचाही योग आला. पुढे दोन्ही घरांचे गोत्र एकच असल्याने- ते म्हणजे ‘संगीत रंगभूमी’- आमची कुंडली एकदम जुळली. स्नेहबंध जुळले. मला दोन वेळा कीर्तीची मुलाखत घेण्याचे भाग्य लाभले.

खरेच, ‘स्वरसम्राज्ञी’ हा कीर्तीच्या कलाजीवनातला एक महत्त्वाचा टप्पा ठरला. कारण अभिजात संगीत नाटकांतील प्रतिष्ठित युवतींच्या दर्जेदार भूमिका आणि ‘स्वरसम्राज्ञी’मधील अडाणी मैना या दोन्हींमध्ये मुळातच मोठा फरक होता. मैना ही अशुद्ध बोलणारी तमासगीर तरुणी. ही भूमिका करतानाही कीर्तीला फारशी अडचण भासली नव्हती, कारण कीर्तीची उत्तम निरीक्षण आणि आकलनशक्ती. जयरामपंतांच्या ‘रामजोशी’ नाटकातली रांगडी भाषा, बेळगावकडच्या बायकांचे ‘मी जातो, मी करतो’ असे बोलणे, ‘गाढवाचं लग्न’ या लोकनाटय़ात काम करणाऱ्या शशिकला शिवणेकरांचे बोलण्यातले विशिष्ट हेल, त्यांच्या बोलण्यातला झणझणीत ठसका हे सारे कीर्तीने आत्मसात केले. अडाणी मैनेचे काम कीर्ती इतके चांगले करू शकेल याची त्यावेळी अनेकांना कल्पनाच नव्हती.

या नाटकाच्या निमित्ताने कीर्तीच्या सांगीतिक कारकीर्दीला उत्तम वळण लावणारे पं. नीळकंठबुवा अभ्यंकर- ज्यांनी ‘स्वरसम्राज्ञी’ नाटकाला संगीत दिले- ते कीर्तीला गुरू म्हणून लाभले. अभ्यंकरबुवांनी कीर्तीला गाण्यावर विचार करण्याची दृष्टी दिली. केवळ अनुकरण न करता विचारपूर्वक पद कसे रंगवावे याचे ज्ञान दिले. गाण्यासाठी गाणे असता कामा नये, त्यातील भावना महत्त्वाची. पद गाताना दम कुठे घ्यायचा, गद्याइतकेच गाण्यातही पॉझेस किती महत्त्वाचे आहेत, हे बुवांनी तिला सांगितले. बालगंधर्वाच्या लयकारीचा विचार कसा करावा हे बुवांनी कीर्तीला शिकवले. एकूणच नीळकंठबुवांमुळे कीर्तीचे गाणे अधिक प्रगल्भ झाले.

या नाटकाखेरीज चिं. त्र्यं. खानोलकरांचे ‘अभोगी’, गो. नी. दांडेकरांचे ‘सं. मंदोदरी’, विद्याधर गोखल्यांचे ‘राणी रूपमती’ ही नवीन नाटके रंगभूमीवर सादर करून त्यातील भूमिका कीर्तीने परिश्रमपूर्वक आणि मन:पूर्वक सादर केल्या. तसंच जुन्या अभिजात संगीत नाटकांतील सिंधू, वसुंधरा अशा गायनाभिनयाच्या दृष्टीने दमदार अशा भूमिकाही तिने प्रभावीरीत्या सादर केल्या. मात्र ‘कान्होपात्रा’ नाटकातील कान्होपात्रेची भूमिका कीर्ती इतकी समरसून करत असे की तिच्या देहाचा कण आणि कण जणू भक्तिमय होत असे. त्या भूमिकेतील भक्तिभाव प्रेक्षकांच्या अंत:करणाला जाऊन भिडत असे. या नाटकात स्वत: टाळ वाजवून तिने गायलेली पदे तर अवर्णनीयच. कान्होपात्रेची भूमिका कीर्ती अक्षरश: जगली होती.

स्वत:ची नाटय़ाभिनयाची कारकीर्द भरभरून जगत असतानाच आई-वडिलांकडून लाभलेला संगीत आणि नाटय़ाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्कार्य तिने बहीण लताच्या साहाय्याने केले. राज्य नाटय़स्पर्धेत लता शिलेदारने लिहिलेल्या नाटकाला तिने संगीत तर दिलेच, पण तबलासाथही केली. युवा कलाकारांचे ‘सौभद्र’ तसेच ‘सुवर्णतुला’ ही नाटके तयार करून त्याचे ठिकठिकाणी प्रयोगही केले. संगीत नाटकाचे जतन आणि संवर्धन करण्याचे कार्य एका ध्येयाने कीर्तीने केले. ‘स्वर-ताल-शब्दसंगती’ हा संगीतातील शब्दार्थाचे आणि काव्यार्थाचे विवेचन करणारा शोधनिबंध तिने लिहिला. एनएसडीमधील विविधभाषिक विद्यार्थ्यांकडून तिने हिंदूी भाषेतून नाटय़गीते गाऊन घेतली. देशात आणि परदेशात संगीत नाटकांतील नाटय़पदांच्या मैफली तसेच सप्रयोग व्याख्यानेही दिली. नाटय़संगीताची शिबिरे आयोजित केली. एकूणच संगीत रंगभूमीवरील तिची अढळ श्रद्धा, संगीत रंगभूमी हाच जणू ध्यास आणि श्वास होता म्हणूनच इतके मोठे कार्य तिच्या हातून घडले. आणि त्यामुळेच राज्य सरकारचा आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा विशेष पुरस्कार, नाटय़दर्पण रजनीचा नाटय़व्रती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी तिला गौरविले गेले. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘मराठी रंगभूमी’च्या माध्यमातून संगीत रंगभूमीची तिने केलेली सेवा आणि कीर्तीची रंगभूमीवर गाजलेली कारकीर्द लक्षात घेता २०१८ मध्ये अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या मिळालेल्या अध्यक्षपदामुळे कीर्तीच्या कार्यकीर्तीचा डंका सर्वत्र दुमदुमला. त्यामुळे एक कृतार्थ आयुष्य जगल्याचे समाधान कीर्तीला मिळाले असेल यात शंका नाही. म्हणूनच म्हणावंसं वाटतं,

‘असीम भक्ती संगीतावरी, अलोट प्रिती नाटय़कलेप्रती।

स्व-कलागुणे घडविली जिने नाटय़शारदा मूर्ती।

स्वरसम्राज्ञी रंगभूमीची शिलेदार कीर्ती।’