प्रा. नीला कोर्डे

lokrang@expressindia.com

२० मार्च हा ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मराठी साहित्य आणि आपल्या भावविश्वातील चिमणीचे स्थान याविषयी..

पूर्वीच्या काळी पाळण्यातल्या बाळाला चिऊताई प्रथम भेटत असे, ती पाळण्यावर टांगलेल्या ‘चिमणाळ्या’तून! या चिमणाळ्यात रेशमी कापडाने बनवलेल्या नाजूक चिमण्यांकडे  पाहत हातपाय उडवणाऱ्या बाळाला आपोआपच व्यायामही होत असे.

पुढे बाळ मोठे झाल्यावर रांगू लागले की, अंगणातल्या दाणे टिपणाऱ्या खऱ्या चिमण्यांशी त्याची ओळख होई. नंतर दुडुदुडु धावणाऱ्या बाळाला, आई ‘एक घास चिऊचा’ म्हणून भरवीत असे.

खरंच! हा छोटासा पक्षी आपल्या भावविश्वात अगदी बालपणापासून आला आहे. इथे पक्षी म्हणण्यापेक्षा पक्षिणी म्हणणे अधिक योग्य ठरेल. कारण पक्षीजगतात चिमण्यांमध्ये नरापेक्षा मादीलाच अधिक महत्त्व आहे. तसं पाहिलं तर नृत्य करणारा मोर, गायन करणारा कोकीळ आणि वटवट करणारा पोपट हे त्यांच्या माद्यांपेक्षा अधिक भाव खाऊन जातात. याला अपवाद आहे तो मात्र चिमणीचा! कारण घरात, दारात, कथा-कहाण्यांत आणि गीतात चिमणा आपल्याला सहसा भेटत नाही. कौतुक होते ते चिवचिवणाऱ्या चिमणीचेच!

बाळाला चिमणाळ्यात आणि अंगणात भेटणारी चिमणी, बाळ थोडा मोठा झाल्यावर भेटते ती त्याच्या बालगीतांमध्ये:

उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले

डोळे तरी मिटलेले, अजूनही

– कुसुमाग्रज

या चिमण्यांनो, या गं या

अंगणी माझ्या नाचाया..

किंवा

चिव चिव चिमणी रबराची

कशी ओरडे गमतीची..

बालगीतांतल्या चिमणीप्रमाणेच तिची पिल्लेसुद्धा कवितांमध्ये आली आहेत :

पाखरांची शाळा भरे पिंपळावरती

चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती..

– ग. ह. पाटील

अहो सोनुकली सान पिले छान

जुळी भावंडे एक दोन तीन

शेवरीच्या उबदार बिछान्यात

माउलीला बिलगून झोपतात

– भवानीशंकर पंडित

बालगीतांत आणि कवितांत येणाऱ्या या चिमण्या आणि त्यांची पिल्ले मला माझ्या बालपणात घेऊन जातात. माझे बालपण मातीची जमीन असलेल्या कौलारू घरात गेले. या घराच्या वळचणींमध्ये चिमण्या निर्धास्तपणे घरटी करीत असत; इतका त्यांचा आमच्यावर विश्वास होता. या चिमण्यांना एक वाईट खोड होती, ती म्हणजे गोल गोल फिरून जमिनीत खड्डे करण्याची. मग आम्ही त्या खड्डय़ांवर चक्क पाणी टाकत असू, नाहीतर पुठ्ठे ठेवत असू. माझी आई मला म्हणायची, ‘अगं, त्या चिमण्या जमिनीत दाणे शोधतात.’ या चिमण्यांची आणखी एक सवय म्हणजे भिंतीवर टांगलेल्या आरशात दिसणाऱ्या आपल्या प्रतिबिंबावर चोच मारण्याची. त्यांच्या या सवयीचे गमतीदार स्पष्टीकरण मिळाले ते कवी भा. रा. तांबे यांच्या कवितेत.

चिव चिव चिमणी छतांऽत छतांऽत

आरसा लोंबे भिंतीला भिंतीला

चिमणी पाहे सवतीला सवतीला..

गंमत म्हणजे आम्ही जेव्हा आरसा चकचकीत करण्यासाठी त्याचा चुना लावत असू तेव्हा मात्र या चिमण्यांची पंचाईत होई.

कधी कधी वळचणींतल्या घरटय़ांमधून या चिमण्यांची अंडी पडून फुटत, तर कधी कधी तांबूस कोवळी पिल्लेही पडून मरत असत. तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटे. लहानपणी एकदा माझ्या पायाखाली एक कोवळे पिल्लू चिरडले गेले. त्यावेळी मी खूप खूप रडले. आमच्या घरात चिमण्यांप्रमाणे मांजरेही सुखाने वावरायची. त्यांच्यापासून चिमण्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आम्हा मुलांवर असे.

चिमण्यांच्या संदर्भात एक गमतीदार गोष्ट आठवून आजही मला त्याचे हसू येते. लहानपणी आम्ही मेंदीची तजेलदार पाने पाटय़ावर वाटून, तो वाटलेला गोळा हातांवर आणि नखांवर थापत असू. मेंदी चांगली रंगावी म्हणून आम्ही चिमण्यांनी खिडकीवर टाकलेली विष्ठा गोळा करून ती मेंदीत मिसळत असू.

पुढे मोठेपणी मला या चिमण्यांविषयी वेगवेगळे संदर्भ शोधण्याचा छंद लागला. लोकव्यवहारात या चिमण्या आपल्याला कितीतरी वेळा भेटतात. पूर्वी लहान मुले एकमेकांना ‘चिमणीच्या दातांनी’ खाऊ देत. परीक्षेच्या आधी दगडी पाटी कोळशाने घासताना, ‘चिमणे चिमणे पाणी दे, कावळ्या कावळ्या वारा घाल’ असे शब्द मुलांच्या तोंडी आपोआप येत. तेव्हा मुलांसाठीच्या बिस्किटांचे आकारसुद्धा कावळा, चिमणीचे असत.

नाजूक, गोंडस आणि लहान गोष्टीसाठी तर ‘चिमणे’ हा शब्द सर्रास वापरला जातो. ‘चिमणसाळ’ नावाची अत्यंत बारीक दाणे असलेली तांदळाची एक चविष्ट जात आहे. ‘चिमणीचे पोहे’ नावाचे एक प्रकारच्या गवतातील चपटे बी चिमण्या चवीने खातात.

लहान मुलांना तर ‘चिमण्यांनो’ ‘चिमण्या बाळांनो’ अशी साद घालतात. ‘चिमणी पाखरे’ हा गाजलेला चित्रपट आजच्या ज्येष्ठांना अजूनही आठवत असेल. लहान मुलांच्या खाऊलाही ‘चिमणचारा’ म्हणण्याची पद्धत आहे. किंबहुना, इथे ‘चिमणी’ हे नाम न राहता विशेषणच झाले आहे.

एक वेगळाच, पण विशेष उल्लेखनीय शब्द म्हणजे ‘चिमणचेटुक’! सुप्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री शांता शेळके यांनी या शब्दांचे स्पष्टीकरण दिले आहे- पहाटेच्या वेळी चांदण्यांच्या प्रकाशाला सूर्यप्रकाश समजून चिमण्या जाग्या होतात आणि चिवचिव करतात. एकप्रकारे हे त्यांच्यावर झालेले चेटुकच असते आणि त्याचा प्रभाव आपल्यावरही पडतो.

चिमण्यांविषयीचे असे सर्व संदर्भ शोधताना गीतांमध्ये आणि कवितांमध्ये आलेल्या चिमण्यांनीही मला आकर्षित केले. ग. दि. माडगूळकर यांच्या एका गीतात, श्रावणात नागपंचमीच्या सणाला प्राणनाथ न आल्यामुळे व्याकुळ झालेली नवविवाहिता आहे. या गीतात पावसाने भिजलेली चिमणीही आली आहे :

‘भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले’..

‘श्यामची आई’ या चित्रपटात कवी यशवंत यांची ‘आई’ ही कविता आहे. या कवितेत, कवीला पक्ष्यांमधील मातृत्व चिमणीच्या रूपातच दिसले आहे.

‘चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई..’

तर ‘मृत्यूला म्हणतो सबूर’ या कवी यशवंताच्याच कवितेत, कवीने ‘टाळाया मरणा प्रलोभन’ आहे तरी कोणते? असा प्रश्न स्वत:लाच विचारला आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर कवीलाच मिळाले ते अत्यंत हृदयस्पर्शी असे. कवी म्हणतो :

‘पाहोनी चिमणी पिलां भरविते आणून चारा मुखी

आपोआप मनात बोल उठले ‘मृत्यो नको येऊं की’..

‘सिकंदर-ए-आझम’ या चित्रपटातील गीतात तर सोन्याची चिमणी आली आहे, ती ‘वो भारत देश है मेरा’ या गीतात.

‘जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा

वो भारत देश है मेरा..’

‘सोने की चिडियाँ’ या नावाचा एक चित्रपटही होता.

सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांनी, आपल्या ‘शांतता, कोर्ट चालू आहे’ या नाटकात बालकवींच्या ‘चिमणीचा घरटा चोरीस गेला’ या कवितेचा अत्यंत अर्थपूर्ण असा प्रतीकात्मक उपयोग केला आहे. बालपणी पाठय़पुस्तकात असलेली ही कविता नाटकात ज्या प्रकारे नवे परिमाण घेऊन येते, तेव्हा मन सुन्न होते.

माझ्या बालपणी आणि तरुणपणीही माझे भावविश्व व्यापून टाकणारा हा पक्षी किती प्राचीन आहे, हे मला संस्कृत साहित्याचा अभ्यास करताना समजले. अमरकोशात या पक्ष्यातील नराला ‘चटक:’ आणि ‘कलविङक’ असे दोन शब्द दिलेले आहेत. तर मादीला (चिमणीला) चटका म्हटले आहे. मादी पिल्लालाही चटका म्हटले आहे, तर नर पिल्लाला (चिमणा) ‘चाटकैर’ असा शब्द आहे. महाभारताच्या ‘शान्तिपर्वात’ चिमणीचा ‘कुलिङ्ग’ या नावाने उल्लेख आहे. (शान्तिपर्व – अध्यय २६१ श्लोक क्र. २०)

‘पंचतंत्रातील’ चटकवानरकथेत, वानराला घर बांधण्याचा उपदेश करणारी चिमणी आहे. दुर्जनाला केलेला उपदेश कसा व्यर्थ असतो, ते त्यातून दर्शविले आहे. ‘श श – कपिङ्जल’ नावाच्या दुसऱ्या एका कथेत, कपिङ्जल नावाचा चिमणा आणि ‘शीघ्रग’ नावाचा ससा या दोघांनी, धर्मोपदेश करणाऱ्या ‘तीक्ष्ण दंष्ट’ नावाच्या ढोंगी रानमांजराचा आश्रय घेतल्यामुळे त्यांना प्राणास कसे मुकावे लागले ते सांगितले आहे.

अभिजात संस्कृत वाङ्मयात मात्र बाणभट्टाच्या ‘कादम्बरी’चा अपवाद सोडल्यास अन्यत्र चिमणीचा उल्लेख नाही. ‘कादम्बरी’तील शिवमंदिराभोवती असलेल्या अरण्याच्या वर्णनात, फळभाराने लवलेल्या डाळिंबाच्या झाडांत चिमण्यांनी घरटी करून त्यात पिल्ले घातल्याचा उल्लेख आहे.

प्राचीन काळी हंसदेव याने रचलेल्या ‘मृगपक्षिशास्त्र’ या पशुपक्षीविज्ञानावरील ग्रंथात वनवासी आणि ग्रामवासी अशा दोन प्रकारच्या चिमण्यांची माहिती आली आहे. विशेष म्हणजे हंसदेवाने वनवासी चिमण्यांना ‘चटक’ तर ग्रामवासी चिमण्यांना ‘कलविङ्क’ म्हटले आहे.

पक्षीजगतातील ‘चिमणी’ हा सुद्धा स्त्रीशक्तीचाच आविष्कार आहे. आपल्या पिल्लांवर प्रेम करणारी, त्यांच्या चोचीत चारा भरवणारी चिमणी!

कावळा-चिमणीच्या कथेतील शेणाचं घर वाहून गेलेल्या कावळ्याला, पटकन् दार उघडत नाही. कारण चिमणीला बाळाला अंघोळ घालायची असते, दूध पाजायचे असते. पण शेवटी मात्र ती गृहिणीधर्म म्हणून कावळ्याला घरात घेते. पावसात सुरक्षित राहणारे चिमणीचे मेणाचे घर उन्हात मात्र वितळू शकते. त्यावेळी आपल्याला कोण आधार देणार याचा विचार चिमणी करीत नाही. मानवी स्त्री आणि पक्षीजगतातील मादी यांच्यातील हे साम्य विलक्षण आहे.

पूर्वी आपल्या नित्य परिचयाची असणारी चिमणी आजकाल मात्र दुर्मीळ होत चालली आहे. याचे कारण अर्थातच यंत्रयुगामुळे धोक्यात आलेले पर्यावरण! मोबाइल टॉवर्समुळे चिमण्यांची संख्या कमी झाली आहे. आजच्या बाळांना चिमण्या फक्त खेळण्यांमध्ये पाहायला मिळतात. पूर्वीच्या रेशमी कापडाच्या चिमणाळ्याची जागा आज प्लास्टिकच्या, पाळण्यावर टांगलेला ‘खेळणा’ घेतो आहे. काचांनी मढवलेले टोलेजंग टॉवर्स चिमण्यांना आश्रय देऊ शकत नाहीत. चिमण्यांच्या घरटय़ांसाठी तिथे वळचणच नाही. वृक्षतोडीमुळे, वृक्षांवर घर बांधणेही दूरच राहिले आहे.

‘जिव्हाळा’ चित्रपटात लता मंगेशकर यांनी आर्त स्वरात गायलेल्या गाण्याची आठवण अपरिहार्यपणे होते :

‘या चिमण्यांनो, परत फिरा रे

घराकडे अपुल्या, जाहल्या तिन्ही सांजा.. जाहल्या’..

आज घरातील चिमणी पिल्ले, त्यांना पंख फुटून भुर्रकन परदेशी उडून गेल्यामुळे आयुष्याच्या तिन्ही सांजेला चिमणा-चिमणी त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले आहेत..

पर्यावरणाशी समतोल राखणारे आणि मायेची डूब देणारे कौलारू घरच अंगणासह नाहीसे झाले आहे. तरीसुद्धा वेडय़ा मनाला म्हणावेसे वाटते:

‘या चिमण्यांनो या गं या

अंगणी माझ्या नाचाया..