|| मनोहर पारनेरकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
माझ्या तशा अनुल्लेखनीय, पण बऱ्याच आनंददायक आयुष्यात मी पुलंना निदान पाच वेळा तरी भेटलो असेन. पण त्यातल्या पहिल्या तीन भेटी माझ्यासाठी केवळ ‘पुलं-दर्शन’ अशाच स्वरूपाच्या होत्या. पुलं जेव्हा एनसीपीएचे संचालक होते त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी म्हणून पुण्याचा माझा मित्र सुरेश अलूरकर आला होता. त्याच्याबरोबर मी जेव्हा त्यांना चौथ्यांदा भेटलो तेव्हा त्यांना निश्चितच माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली असावी. मी त्यांना पाचव्यांदा भेटलो ती भेट मात्र संस्मरणीय झाली होती, कारण तेव्हा ते केवळ माझ्याच वाट्याला जवळजवळ चाळीस मिनिटं आले होते. आजच्या लेखाचा हाच विषय आहे.
या ग्रेट भेटींबद्दल काही गोष्टी…
मला नक्की साल आठवत नाही, पण ही भेट १९९० च्या सुमारास झाली होती. एखादं साल मागेपुढे. प्रसिद्ध बंगाली पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि १९८१ सालच्या मॅगसेसे पारितोषिकाचे मानकरी गौर किशोर घोष मुंबईत आले होते तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी एका छोटेखानी समारंभाचं आयोजन केलं गेलं होतं. हे आयोजन मुंबईच्या पेडर रोडवरील ‘आनंद बझार पत्रिके’च्या गेस्ट हाऊसमध्ये केलेलं होतं आणि त्याचे यजमान ‘आनंद बझार पत्रिके’चे गेल्या चार दशकांचे मुंबईतील प्रतिनिधी पद्माश्री सलील घोष हे होते. महाराष्ट्र आणि बंगालमधील काही प्रख्यात लेखक आणि पत्रकार या समारंभाला आमंत्रित केले गेले होते. महाराष्ट्रातील लेखक आणि पत्रकारांमध्ये दस्तुरखुद्द गोविंद तळवलकर, पुलं आणि अशोक शहाणे ही मंडळी होती. या सगळ्या प्रसिद्ध व्यक्तींमध्ये मी कसा घुसलो, असा प्रश्न वाचकांना पडणं स्वाभाविक आहे. प्रसिद्ध समकालीन बंगाली साहित्यिक तन्मय दत्ता हा माझा जानी दोस्त असल्याने त्याचंच बोट धरून मी या समारंभात पोहोचलो होतो.
गौर किशोर घोष (१९२३-२०००) यांचा जन्म बंगालमधील एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. हॉटेलमधील पोऱ्यापासून ते गावोगाव भटकणाऱ्या ‘डान्सिंग पार्टी’च्या मोफत जेवणाखाणावारी मॅनेजरपर्यंत अनेक नोकऱ्या करणारे गौरदा बंगालमधील एक नामवंत पत्रकार होऊन मॅगसेसे पारितोषिकाचे मानकरी कसे झाले, ही एक अद्भुत कहाणी आहे. ज्या वाचकांना गौरदांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल त्यांनी पुलंच्या ‘मैत्र’ या पुस्तकातील त्यांच्यावरील लेख वाचावा. यासंदर्भात तीन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे- (१) गौरदा हे पुलंचे फार जवळचे मित्र होते. (२) गौरदा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आपल्या अशोक शहाण्यांवर अत्यंत लोभ होता. आणि (३) गौरदांच्या जीवनात त्यांना जे अनेक पुरस्कार मिळाले, त्यात १९८१ मध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेल्या पुरस्काराचा ते नेहमी प्रेमाने उल्लेख करीत असत. आणि हो, आता सिनेप्रेमिकांसाठी : दिलीपकुमारने नायकाची भूमिका केलेल्या तपन सिन्हांच्या ‘सगीना माहातो’ या चित्रपटाची कथा गौरदांनी लिहिली होती.
परंतु पुलंची माझ्याबरोबर मोट कशी काय बांधली गेली, असा प्रश्न कुणालाही पडेल. कसं कोण जाणे, पण पुलं आणि मी असे दोघे त्या समारंभात दुर्लक्षित झालो होतो. बंगाली ब्रिगेड तसंच गोविंद तळवलकर- अशोक शहाणे ही मराठी दुक्कल यांचं पुलंकडे पूर्ण दुर्लक्ष झालं होतं. ही गोष्ट सलीलदांच्या लक्षात येताच त्यांनी आम्हा दोघांना एका बेडरूममध्ये नेलं आणि म्हणाले, ‘‘अरे पीएल और पेडणेकर, तुम ९.१५ को लास्ट ड्रिंक और डिनर के लिये बाहर आने का.’’ त्या खोलीत एकच खुर्ची होती आणि अर्थातच तिच्यावर पुलं विराजमान झाले. पण त्या परिस्थितीतदेखील पुलंना खूश करण्याची संधी मी शोधली. मी त्यांच्या पायाशी ‘दास मारुती’च्या अभिनिवेशात बसलो आणि त्यांना तसं सांगितलं. पण पुलं त्यांच्या शैलीत तात्काळ म्हणाले, ‘‘हनुमंता, कशाला वेळ फुकट घालवतोस? मी पुरुषोत्तम आहे. मर्यादा पुरुषोत्तम नाही.’’ तरीही नाउमेद न होता मी पुलंना म्हणालो, ‘‘मला तुमचा पूर्ण बायोडेटा पाठ आहे.’’ (त्यावेळी विकिपीडिया उपलब्ध नसल्यामुळे मी तो ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या ‘हूज हू’मधून मिळवला होता.) आणि एकही तपशील न वगळता मी तो धाडधाड त्यांना म्हणून दाखवला. ‘‘तुम्ही सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमधून एम. ए. केलंत. बेळगावच्या राणी पार्वतीबाई कॉलेजमध्ये १९४६ साली मराठीचं अध्यापन केलंत. आणि रवींद्र भारती युनिव्हर्सिटीमधून मानद डॉक्टरेट मिळवणारे तुम्ही एकमेव महाराष्ट्रीय आहात.’’ माझ्या या करामतीमुळे पुलं बरेच प्रभावित झालेले दिसले आणि तिथूनच ते ओरडले, ‘‘गोविंदराव, सांभाळून… इथे सीबीआयचा एक माणूस आलेला आहे.’’
यानंतर या महान साहित्यिकाच्या अफलातून कोट्या आणि हजरजबाबांची बरसात मला अनुभवायला मिळाली. त्यातल्या काही आजही माझ्या लक्षात आहेत. त्या अशा…
१) त्या पार्टीमध्ये सेल्फ सर्विस होती. जेव्हा आमच्या दोघांचंही दुसरं ड्रिंक संपलं तेव्हा रीफिल करण्याकरता मी उठलो. त्यांचा ग्लास घेत म्हणालो, ‘‘द्या, भरून आणतो.’’ तेव्हा ग्लास माझ्या हातात देत पुलं म्हणाले, ‘‘आणा, आणा. पण जर ग्लासात बोटं बुडवून आणणार असाल तर हे कृत्य निदान माझ्या नजरेसमोर करू नका.’’ मी ग्लास भरून घेऊन आलो. आणि येताना ‘लैता जैजो म्हारो दै सने सो’ ही कुमारजींची अल्हैया बिलावल रागातली माझी आवडती बंदिश गुणगुणत आलो. पुलंना वाटलं की, हे मी त्यांना प्रभावित करण्यासाठी करतो आहे. ते म्हणाले, ‘‘ते ठीक आहे, पण तुम्ही मला- अ) केसरबाईंच्या कुकुभ बिलावल रागातल्या ‘देवी दुर्गा’ या बंदिशीची अस्थाई गाऊन दाखवाल, आणि ब) भूप आणि शुद्ध कल्याण या दोन रागांमधला फरक सोदाहरण समजावून द्याल तर मी मानेन.’’ मी चारी मुंड्या चीत झालो.
२) ‘सुगंध’ मासिकाच्या १९७६ सालच्या अंकात त्यांनी लिहिलेल्या ‘स्थानबद्ध वूडहाऊस’ हा लेख वाचून मला त्यांचं ‘वूडहाऊसप्रेम’ माहिती झालं होतं. एकदा मुंबई-पुणे प्रवासात माझी प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी अचानक भेट झाली होती आणि आपल्यासारखेच तेदेखील वूडहाऊसप्रेमी आहेत, इतकेच नाही तर ते त्यांच्याविषयी अधिकाराने बोलू शकतात, हे मला त्यांच्याशी बोलताना कळलं. हे जेव्हा मी पुलंना सांगितलं तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. अनेक दिवस सतावत असलेला एक प्रश्न मी त्यांना विचारला होता. ‘‘अॅगाथा ही बर्टी वूूस्टरची आत्या आहे की मावशी?’’ तेव्हा डॉक्टरसाहेब उत्तरले होते की, ‘‘गर्विष्ठ आणि घमेंडखोर अॅगाथा ही बर्टी वूस्टरची मावशीच आहे; आत्या नाही. हे पात्र वूडहाऊस यांनी त्यांच्या आईच्या मोठ्या बहिणीवर बेतलेलं आहे.’’ यावर पुलं उद्गारले, ‘‘‘माय मरो, पण मावशी जगो’ हे वैश्विक वास्तव आहे असं वाटतं.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘तरीच बंगाली माणसं मावशीला ‘माशीमाँ’ म्हणतात.’’
३) गुरुनाथ भट या आमच्या सामायिक मित्राकडून मला कळलं होतं की, स्कॉच व्हिस्कीचा ‘डिम्पल’ हा ब्रॅन्ड पुलंचा अतिशय आवडीचा आहे. पार्टीमध्ये जी व्हिस्की मंडळी पीत होती ती देशी होती. मी जरा गमतीत पुलंना म्हटलं, ‘‘तुम्हाला डिम्पलची आठवण येत असेल ना?’’ तर ते पटकन् म्हणाले, ‘‘पारनेरकर, तुम्हाला माझ्या सुखी वैवाहिक जीवनात वादळ उत्पन्न करायचं नसेल तर लोकांना हे नेहमी स्पष्ट करा, की तुम्ही एका हिंदी चित्रपटांतील स्त्री-फिल्म स्टारबद्दल बोलत नसून, व्हिस्कीच्या ब्रॅन्डबद्दल बोलताहात.’’
४) आणि हा प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकलेला एक विनोदी किस्सा : पुलं एकदा कुमारजींकडे देवासला राहायला गेले होते. तेव्हा कुमारजी पुलंना म्हणाले की, तुम्हाला माझ्यासोबत एका चित्रकाराला भेटायला यावं लागणार आहे. कारण तो बरेच दिवस ‘पुलंना घेऊन या’ म्हणून माझ्या मागे लागला आहे. कुमारजींनी पुलंना आधीच सावध करत सांगितलं की, त्या चित्रकाराचं इंग्लिश काही तितकंसं चांगलं नाहीये. त्यामुळे बऱ्याचदा खतरनाक विनोद घडतात. दुसऱ्या दिवशी सकाळीच कुमारजी आणि पुलं त्या चित्रकाराच्या स्टुडियोत त्याला भेटायला गेले. नुकतंच पूर्ण केलेलं त्याचं चित्र त्याने पुलंना समजावून सांगितलं… PL
Saheb, what you see here is a beautiful Lake, a rising Sun behind a hill and all the rest is dysentery.’’ (त्यांना Scenery असं म्हणायचं होतं.) I only hope you won’t forget any of these details when you write about the artwork. पुलं तात्काळ म्हणाले, No,Iwon’t, because I have carefully noted them down in my diarrhoea.
जेवणाआधीच्या गमतीजमती
सगळी मंडळी जेवणाआधी हॉलमध्ये जमा झाली. गौरदा आणि सलीलदा जुन्या आठवणी सांगण्याच्या मूडमध्ये आले होते. सलीलदा म्हणाले की, ‘‘१९४९ साली माणिकदा (सत्यजित रे) आणि बिजोया यांचं लग्न कलकत्त्यात नाही, तर मुंबईत झालं.’’ त्यावर गौरदा हे त्यांच्या इंग्रजीमिश्रित बंगालीत म्हणाले, ‘‘त्याच साली फ्रेंच दिग्दर्शक ज्यॉ रेन्वा हे त्यांच्या ‘River’ या अनुबोधपटाच्या चित्रीकरणासाठी कलकत्त्याच्या गे्रट ईस्टर्न हॉटेलमध्ये मुक्काम ठोकून होते. त्यावेळी रे आणि त्यांची भेट झाली होती.’’ त्याचवेळी माझ्यात काय संचारलं काही कल्पना नाही; कदाचित सर्वांचं माझ्याकडे लक्ष वेधून घ्यावं असंही मला वाटलं असेल, पण मी गौरदांना मध्येच तोडत म्हणालो, ‘‘मित्रांनो, एक गमतीदार योगायोग असा आहे की ज्या साली प्रसिद्ध चित्रकार पियरे ऑगस्ट रेन्वा- ज्यॉ रेन्वा यांचे वडील- यांचं निधन झालं (१९१९ साली), त्याच साली पुलंचा जन्म झाला.’’
यावर पुलं शांतपणे म्हणाले, ‘‘एक लक्षात घ्या, पेडणेकर (माझ्याकडे बघून त्यांनी माझं आडनाव सहेतुक चुकीचं उच्चारल्याबद्दल मिश्कीलपणे डोळा मारला.) यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली नाही, आणि ती म्हणजे या दोन्ही सारख्याच दुर्दैवी घटना आहेत.’’ नंतर माझ्याकडे वळून ते म्हणाले, ‘‘पारनेरकर, अहो, तुम्ही कोणाच्या टीममधून खेळत आहात? बंगाली की मराठी?’’
जेवणाआधी पंधरा मिनिटं पुलंनी त्या मैफिलीचा ताबा घेतला आणि त्यांची खासियत असलेला आणि हमखास रंगणारा एकपात्री प्रयोग उत्स्फूर्तपणे सादर केला. १९५० च्या दशकातील अखेरच्या वर्षातील त्यांच्या दिल्लीतल्या वास्तव्यातील एक प्रसंग त्यांनी मूकाभिनयाने जिवंत केला. (नवी दिल्लीत तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या भारतीय टीव्ही स्टेशनचे ते पहिले संचालक होते.)
एकदा त्यांना दिल्लीहून मुंबईला रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करायचा होता. तेव्हा ते हमालाला म्हणाले, ‘‘कृपया, आप मुझे वातानुकूलित डिब्बे में ले चलिये.’’ तर हमाल त्यांना जरा खेकसूनच म्हणाला, ‘‘अरे साब, सीधा थंडा या गरम ये बताइये ना!’’ पुलंना प्रथमच अधिकृत आणि व्यवहारात बोलल्या जाणाऱ्या हिंदी भाषेत असणाऱ्या इतक्या मोठ्या तफावतीची जाणीव झाली.
जाता जाता : १) एकदा सदाशिव पेठेत राहणाऱ्या माझ्या एका मित्राने मला विचारलं, ‘‘पुलंना मराठी भाषेतील आर. के. लक्ष्मण म्हणतात, याबद्दल तुझं काय मत आहे?’’
मी त्याला म्हणालो, ‘‘पुलं हे मराठी भाषेचे पी. जी. वूडहाऊस आहेत, हे त्यांचं केलेलं मूल्यांकन मला जास्त योग्य वाटतं.’’ पण पुणे म्हणजे ‘पूर्वेचं ऑक्सफर्ड’ अशी ठाम धारणा असलेल्या माझ्या या मित्राने तर कमालच केली. तो म्हणाला, ‘‘वसाहतवादाच्या पगड्यातून तुम्ही लोक कधी बाहेर येणार? मी तर ‘पी. जी. वूडहाऊस इंग्रजीचे पु. ल. देशपांडे आहेत’ असं दिमाखानं म्हणेन.’’
२) सोपानने मला विचारलं, ‘‘महेश मांजरेकरांच्या ‘भाई- व्यक्ती की वल्ली?’ या चरित्रपटातील पुलंची व्यक्तिरेखा वास्तवाला कितपत धरून आहे?’’ मी त्याला म्हणालो, ‘‘मला या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही, कारण मी तो चित्रपट बघितलेला नाही. आणि तो मी कधी बघेन असं मला वाटत नाही.’’
शब्दांकन : आनंद थत्ते
samdhun12@gmail.com