सचिन कुंडलकर
kundalkar@gmail.com
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एफ. टी. आय. आय.) ही भारतातील चित्रपटकलेचे शिक्षण देणारी संस्था ६० वर्षांची होत आहे. त्यानिमित्ताने या संस्थेत चित्रपटनिर्मितीचे प्रशिक्षण घेत असताना आपण नेमके काय शिकलो, काय कमावले याचा धांडोळा घेणारे तिथल्या चित्रपटकर्मीचे लेख..
१९९९ साली मी फ्रेंच सरकारची विद्यावृत्ती मिळवून पॅरिस शहरात काही महिने सिनेमाचा अभ्यास करायला गेलो. त्याआधी पाच वर्षे मी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्याकडे उमेदवारी करत चित्रपटनिर्मितीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेत होतो. वयाच्या अठराव्या वर्षी मी सेटवर कामाला सुरुवात केली होती. सुनील सुकथनकर हा पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचा (एफ. टी. आय. आय.) पदवीधर होता. त्या संस्थेने त्याची चित्रपटविषयक जाणीव घडवली होती. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आमची चित्रपटाची जाणीव घडवण्यात सुनीलचा फार मोठा हात आहे. पर्यायाने एफ. टी. आय. आय.चासुद्धा! माझ्या फार लहान वयापासून सुनीलने आणि सुमित्रा भाव्यांनी आम्हाला जगभरातील उत्तम चित्रपट, चांगले चित्रपट दिग्दर्शक यांची नुसती ओळख करून दिली नाही, तर आपल्या संग्रहातील अनेक चित्रपट दाखवले. त्यामुळे मला एफ. टी. आय. आय. या संस्थेविषयी उमेदवारीच्या काळापासून कुतूहल होते.
पुण्यात जन्मून दिवसातून शे-पाचशे वेळा त्या संस्थेच्या दारासमोरून आम्ही ये-जा केली असली तरी आम्हाला तिथे आत काय चालते, काय शिकवतात याची शालेय आयुष्यात कुणीही ओळखसुद्धा करून दिली नव्हती. तिथे पूर्वी प्रभात स्टुडिओ होता आणि तो मराठी माणसे चालवत असत याचा पुणे शहराला खूप अभिमान होता. आमचे शहर मुख्यत: पूर्वजांची लुगडी आणि धोतरे धुणारे शहर आहे. त्यामुळे आठवणी आणि अभिमान तिथे खूप असला तरी वर्तमानाचे भान आणि जाणीव पुढील पिढीला करून देण्याची वृत्ती कमी आहे. मराठी रंगभूमीचे गोडवे गाणे आणि पु. ल. देशपांडे यांच्या टेपा ऐकून दात विचकत हसणे यापलीकडे मध्यमवर्गीय घरातील कलासक्ती जात नसे. सवाई गंधर्व महोत्सवाला गर्दी करून अनेक रुचकर खाद्यपदार्थाचा फन्ना उडवणाऱ्या आमच्या शहराने आधुनिक दृश्यकला आणि चित्रपटकला हे दोन्ही विषय पिढय़ान् पिढय़ा ऑप्शनला टाकले होते. भास्कर चंदावरकर, गिरीश कार्नाड, पी. के. नायर, मणी कौल, अरुण खोपकर, ऋत्विक घटक, अदूर गोपालकृष्णन्, जानू बरुआ, केतन मेहता, सतीश बहादूर ही आणि अशी अनेक माणसे शिक्षक आणि विद्यार्थी म्हणून त्या संस्थेच्या परिसरात वावरत असताना बाहेरील शहराला त्याची फारशी माहिती नव्हती. कधी आपल्या शाळेची सहल या संस्थेत न्यावी आणि मुलांना या जागेची ओळख करून द्यावी असे कुणालाही कधीही कसे सुचले नाही याचे मला आज राहून राहून फार आश्चर्य वाटते. सुनील सुकथनकरने फार जाणतेपणी आम्हाला आमच्या शहराच्या ओळखीपलीकडे असलेला आपल्या देशाचा आणि जगाचा सिनेमा पाहायला शिकवले. चित्रपटकलेच्या इतिहासाची आणि आधुनिक चित्रपटाच्या अस्तित्वाची जाणीव जोपासणाऱ्या दोन महत्त्वाच्या संस्था पुण्यात होत्या. एक राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (नॅशनल फिल्म अर्काइव्हज्) आणि दुसरी एफ. टी. आय. आय.! त्यापैकी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात जाऊन उत्तमोत्तम चित्रपट पाहून त्यांचे रसग्रहण करायची सवय सुनीलने आम्हा सर्वाना फार पूर्वी लावली. एफ. टी. आय. आय. आणि माझा जो त्रोटक असा संबंध आला तो १९९९ साली पॅरिसमधील चित्रपट संस्थेतून मी पहिल्यांदा चित्रपटाची कार्यशाळा पूर्ण करून आलो तेव्हा.
चित्रपटाचे शिक्षण वर्गात बसून घ्यायची गरज माझ्या मनात तोपर्यंत उत्पन्न झाली नव्हती. पॅरिसच्या ‘छअोएटकर’ या प्रसिद्ध संस्थेत पहिल्यांदा मला वर्गात बसून इतरांसोबत चित्रपटाचा अभ्यास आणि प्रयोग करायचा अनुभव घेता आला. मी परत आलो आणि एफ. टी. आय. आय.मध्ये शिकायला जावे असे मला वाटू लागले. समर नखाते आणि सुनील सुकथनकर या दोघांनी मला तिथे प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. आणि महत्त्वाचे म्हणजे या गोष्टीची जाणीव करून दिली, की तिथे आपले आपल्यालाच जाणीवपूर्वक शिकावे लागेल.. कुणीही काही तयार असे आणून देणार नाही. कारण चित्रपटाचा इतिहास सोडता चित्रपटाचे प्रशिक्षण हे कामातून आणि रसग्रहण- क्षमतेतून होते. इतिहास वर्गात बसून शिकता येतो. बाकी गोष्टी आपल्याला सतर्क राहून वेचाव्या लागतात.
मी आणि उमेश कुलकर्णी याने संस्थेत प्रवेश घेतला, ते साल होते सन २०००! भारताने नुकतेच आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले होते. तसेच इंटरनेट आपल्या दैनंदिन आयुष्यात हळूहळू स्थिरावत होते. या दोन्ही गोष्टींचा सखोल परिणाम अनेक महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांवर होणार होता.
मला संस्थेत आवडलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटाची अनेक उत्तम उपकरणे आणि चांगले कॅमेरे आम्हाला मोकळेपणाने हाताळायला आणि वापरायला उपलब्ध होते. नव्याने येणारी डिजिटल उपकरणे होतीच; पण आमचे मुख्य काम १६ मि. मी. आणि ३५ मि. मी.ची फिल्म घेऊन चालत असे. दोन्ही माध्यमे शिकलेली आज आम्ही शेवटची पिढी आहोत. संस्थेतील वास्तव्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चित्रपट दिग्दर्शक म्हणून आपल्याला डिग्निटी, स्व-आदर मिळतो. भारतीय चित्रपट उद्योग हा अतिशय स्पर्धात्मक आर्थिक व्यवहारांचा आणि क्रूर उद्योग आहे. या देशात कोणत्याही चित्रपट बनवणाऱ्या कलाकाराला स्वत:विषयी आणि आपल्या कामाविषयी आदर निर्माण करणारी जागा फक्त एफ. टी. आय. आय. ही आहे. त्यामुळे ही संस्था फार महत्त्वाची आहे, याची जाणीव तिथे शिकायला लागल्यावर निर्माण झाली.
संस्थेचे फार जिवंत असे ‘होस्टेल लाइफ’ होते.. जिथे भारतभरातून अनेक संवेदनशील आणि हुशार मुले-मुली शिकायला आली होती. त्यातले अनेकजण वेगळ्या विषयांत उच्च शिक्षण घेऊन आलेले होते आणि त्यांनी चित्रपटकलेचे शिक्षण घ्यायचे ठरवले होते. पूर्वीपासून पाहत आलेले अनेक जुने आणि नवे चित्रपट आणि पुस्तके यांनी तिथल्या रोजच्या संध्याकाळी उजळू लागल्या. मला पहिल्यांदा प्रत्यक्षपणे थेट डाव्या विचारसरणीचे मित्र मिळाले आणि कलेकडे आणि कलास्वादाकडे पाहायची संपूर्ण नवी विचारप्रणाली अनुभवायला मिळाली. सर्व प्रकारच्या वैचित्र्यांतील सौंदर्यस्थळे ओळखायची जाणीव या विद्यार्थी समूहासोबत राहून वाढीला लागली. त्यातून मी चित्रपट शिकण्यासोबत स्वत:ला, स्वत:च्या लैंगिकतेला, स्वत:च्या विचारांच्या दिशेला ओळखू लागलो. चित्रपटाचे शिक्षण हे साहित्य, संगीत, छायाचित्रणकला, लेखनकला आणि ध्वनिविचार या सर्वाना सोबत घेऊन जाते. आपल्यातील जाणिवेचे सर्व पलू आपल्याला जागते ठेवावे लागतात.
मी लहानपणी ज्या समाजात वाढलो, शाळा शिकलो, तो समाज संपूर्ण उजव्या विचारसरणीचा होता. उजव्या, पारंपरिक विचारसरणीत कलेची निर्मिती ही ‘रेअर वू मिरर’मध्ये पाहून गाडी हाकल्यासारखी असते. परंपरेला आणि कलास्वादाच्या पद्धतीला प्रश्न विचारायची आणि विरोध करायची सवय त्या वातावरणात नसते. मी ज्या दोन दिग्दर्शकांसोबत काम करत होतो ते दोघे आणि मी जिथे देशाबाहेर जाऊन शिकलो ती युरोपातील मित्रमंडळी कलात्मक आणि राजकीयदृष्टय़ा समाजवादी विचारसरणीची होती. त्यात एक प्रकारचे आधुनिक वैचारिक संतुलन होते. महाराष्ट्रातील शहरांमध्ये असलेल्या समाजवादी विचारसरणीत उग्रपणा आणि आग्रह नव्हता. माझे कलात्मक पोषण या संतुलित आणि आधुनिक विचारसरणीच्या कलाकारांनी केले होते. केरळ आणि बंगालमधील संपूर्ण डावी राजकीय विचारसरणी मला त्यावेळी नवीन होती. त्याची ओळख मला एफ. टी. आय. आय.च्या अंगणात झाली. रोज संध्याकाळी होणाऱ्या विद्यार्थी समितीच्या बठका, तिथे आरडाओरडा करत बोलणारे विद्यार्थी नेते हे सारे पाहण्याचा अनुभव सिनेमा पाहण्यापेक्षा कमी रोचक नव्हता. रोज असे वातावरण निर्माण केले जाई की आपल्यावर कसला तरी अन्याय होतो आहे आणि त्याविरुद्ध आपण पेटून उठायला हवे. ते सगळे आरडाओरडा करून झाले की ‘काय बरे अन्याय आपल्यावर होत असावा?’ याचा विचार करत मी मेसवर जेवायला जात असे आणि बंगाली मुलांनी बनवलेल्या माशांवर व केरळी मुलांनी बनवलेल्या जेवणावर तुटून पडत असे. त्यांच्याकडे असलेले संगीत ऐकत असे. पुस्तकांची देवघेव चालत असे. संध्याकाळी पाहिलेल्या सिनेमावर वादावादी होत असे.
एफ. टी. आय. आय.मध्ये सर्वात निराशाजनक जर काही असेल, तर ते होते तिथले शिक्षक. पूर्वीच्या पिढय़ांना लाभलेले उत्तम शिक्षक संस्थेत उरले नव्हते. संस्थेतच पूर्वी शिकलेले आणि कॅम्पस सोडून जायची आणि कामात झोकून द्यायची धमक नसलेले अनेक आळशी जुने विद्यार्थी तिथे शिक्षक म्हणून काम करत होते. कें द्र सरकारची सुरक्षित नोकरी करून त्यांच्यावर जळमटे आली होती. याला दोन-तीन अपवाद होते. संगीत शिकवणारे केदार औटी, रसास्वाद शिकवणारे सुरेश छाब्रिया आणि लेखनकला शिकवणारे महेश एलकुंचवार. या तीन अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षकांनी कॅम्पसमधील वातावरण जागते ठेवलेले होते.
जहाल डाव्या विचारसरणीचा एफ. टी. आय. आय.च्या विद्यार्थी-प्रशासन संबंधांत फार पूर्वीपासून प्रभाव होता. आर्थिक उदारीकरणाच्या नव्या लाटेत प्रशासनाने अनेक निर्णय आक्रस्ताळेपणे घेतले. त्यातला सर्वात घातक असा निर्णय होता तो म्हणजे तीन वर्षांचा सलग बांधलेला अभ्यासक्रम सोडून एक-एक वर्षांचे तीन तुकडे असलेला विचित्र अभ्यासक्रम आणला गेला. त्यावेळी संस्थेत संचालक म्हणून आलेले अभिनेते मोहन आगाशे या नव्या बदलांबाबत आग्रही होते.
एफ. टी. आय. आय.मध्ये शिकण्याचा सर्वात मोठा फायदा हा असतो, की तुम्ही स्वत:ला चांगला रिकामा वेळ देता. चित्रपट बनवण्याच्या व्यावसायिक गणितांपासून लांब राहून स्वत:ची दृष्टी जोपासून स्वत:ला विकसित करता. चांगले गाणे शिकताना जसा आपल्याला वेळ द्यावा लागतो तसा हा वेळ आहे. एफ. टी. आय. आय.चे शांत, सुंदर आवार, तिथली उत्तम उपकरणे, पाहायला उपलब्ध असलेले उत्तम चित्रपट या सगळ्यातून तुमची जाणीव घडत असते. हा जो आवश्यक वेळ आहे तो नव्या अभ्यासक्रमात नाकारला गेला होता. अमेरिकन पद्धतीप्रमाणे अभ्यासक्रम स्पर्धात्मक बनवला गेला होता. पहिल्या वर्षांत दिग्दर्शन, ध्वनी, संकलन, छायाचित्रण या चारही विषयांचा अभ्यास असतो. तो झाला की जो एक खास अभ्यासक्रम चार पर्यायांमधून निवडायचा आहे, त्याची निवड विद्यार्थ्यांच्या हातात ठेवली नव्हती. संस्था सांगेल तो अभ्यासक्रम आपण करायचा. साहजिकच या नव्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा विरोध होता आणि त्यावरून संचालकांविरुद्ध वातावरण सावकाश तापू लागले होते.
मी सहा-सात वर्षे उमेदवारी करून तिथे शिकायला आलो होतो. त्यामुळे मला वेळेचे भान आणि किंमत होती. मला नाराजी, भांडणे आणि तक्रारी करायला वेळ नव्हता. ती माझी प्रवृत्तीसुद्धा नाही. मी पहिल्या वर्षांचा काळ फार चांगल्या ऊर्जेमध्ये घालवला. जगातील आणि भारतातील कलात्मक चित्रपटांचा अभ्यास करताना मी कधीही मला वाटणारी मुख्य प्रवाहातील करमणूकप्रधान चित्रपटांची आसक्ती लपवून ठेवली नाही. त्यामुळे मी शिक्षकांचा फार लाडका झालो नाही. मी कधीही जड भाषेत चित्रपटाचे रसग्रहण केले नाही आणि कुणी जर केले, तर ते ऐकून घेतले नाही. मात्र, मी मन मोकळे ठेवून सर्व काही जे नवीन होते ते अनुभवू लागलो आणि शिकू लागलो. मला मणी कौल आणि कुमार शहानी यांच्या शैलीचा सिनेमा अजिबात आवडत नाही, हे मी धाडस करून तिथे म्हणू लागलो. विद्यार्थी समितीच्या उग्र सभांना जायचे मी टाळू लागलो. याचे कारण मला वेळेची किंमत बाहेर काम करून समजलेली होती. मला शिकायचे होते. आणि ते शिक्षण बाहेर जाऊन भरपूर काम करण्यासाठी वापरायचे होते. मी एफ. टी. आय. आय.मध्ये जितका सिनेमा शिकलो त्यापेक्षा जास्त जाणीव मला राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने दिली. भारत, युरोप, रशिया आणि जपानमधील उत्तमोत्तम चित्रपटांचा ठेवा मला तिथे अनुभवता आला. तो ठेवा हे माझे आजवरच्या जाणिवेचे संचित आहे.
इतक्या भारलेल्या वातावरणात एक वर्ष सरायला फार वेळ लागत नाही. आमचे उत्तम चालू असलेले शैक्षणिक वर्ष संपत असतानाच नव्या अभ्यासक्रमाबाबत नाराजी वाढत गेली आणि सर्व विद्यार्थ्यांनी संचालक आणि प्रशासनाविरुद्ध संप पुकारला. त्या संपाला भारतभरातून मोठा पाठिंबा मिळत गेला आणि संस्थेचे दैनंदिन काम संपूर्णपणे थांबले. आपण संपात भाग घ्यायचा नाही, हा निर्णय घ्यायला मला फार विचार करावा लागला नाही. मी जर चित्रपटाची उमेदवारी केली नसती आणि नवा, ताजा विद्यार्थी म्हणून संस्थेत गेलो असतो तर कदाचित भारावून जाऊन मी संपात भाग घेतला असता. पण मी अनेक वर्षे प्रत्यक्ष काम केले असल्याने मला तसे करावे असे वाटले नाही. ज्या सहा विद्यार्थ्यांनी संपात भाग घेणे नाकारले त्यांच्यासोबत रोजचे वर्ग आणि काम चालू ठेवून आम्ही अभ्यासक्रम पूर्ण केला. या संपूर्ण काळात मी डाव्या विचारसरणीच्या शिक्षकांची आणि मित्रांची खूप नाराजी ओढवून घेतली. अनेकांशी माझे वैचारिक संबंध त्या काळात संपले.
वर्ष संपताना अभ्यासक्रमावर पुनर्वचिार करायची आश्वासने देऊन संप मागे घेण्यात आला. आमच्या परीक्षा झाल्या तेव्हा मला दिग्दर्शनात पुढे काम करायचे असताना संस्थेने मला संकलनाचा अभ्यासक्रम निवडायचा पर्याय दिला. त्यामुळे मी संस्थेतून बाहेर पडलो आणि माझे काम करायला मुंबईत निघून गेलो. संस्थेत शिकवणारे बहुतेक शिक्षक हे दयनीय असल्याने त्यांच्यावर नाराज व्हायचा प्रश्नच नव्हता. शिवाय प्रशासनाला चेहरा नसतो. आक्रस्ताळा विरोध आणि नाराजी व्यक्त करायला आपल्याला वेळ नाही, आपल्याला आपली पटकथा लिहून, पैसे उभारून सिनेमा बनवायला हवा.. हा अभ्यासक्रम प्रमाणाबाहेर लांबला तर आपले नुकसान होईल याची जाणीव मला झाली. मी बाहेर पडून काही वर्षे गेली तसे मी गमावलेले माझे मित्र परत जोडले गेले. कारण आपल्यापेक्षा संपूर्ण वेगळा विचार करणाऱ्या माणसाला स्वीकारायची वैचारिक सवय माझ्या सर्व डाव्या विचारसरणीच्या मित्रांमध्ये होती. ती सर्व माणसे आज आपल्या देशातील मोठे कलाकार आणि तंत्रज्ञ आहेत आणि माझा आजही त्या सर्वाशी फार चांगला संवाद आहे.
मी त्या एका वर्षांच्या त्रोटक वास्तव्यात घेतलेले अनेक अनुभव हे माझी राजकीय आणि सामाजिक विचारसरणी काय आहे याची मलाच ओळख करून द्यायला उपयोगी पडले. कोणत्याही टोकाच्या राजकीय विचारसरणीच्या आहारी न जाता आणि तरीही परंपरा आणि भूतकाळ यांचा उदोउदो करणाऱ्या लोकांना कायमच लांब ठेवून आपण आपल्या कथेचा आणि चित्रपटाचा शोध घ्यायला हवा, याची जाणीव मला त्या फार सुंदर, शांत आणि संपन्न कॅम्पसने करून दिली.