अतुल देऊळगावकर atul.deulgaonkar@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
माधुरी पुरंदरे.. चित्रकार, गायिका, अभिनेत्री, लेखिका, अनुवादक, सामाजिक कार्यकर्ती, मराठी भाषेच्या प्रसारासाठी हिरीरीने कार्य करणारी निखळ भाषाप्रेमी अशी त्यांची असंख्य रूपं आहेत. या प्रत्येक रूपात त्यांनी अक्षरश: झोकून देऊन काम केलेलं आहे. येत्या २९ एप्रिल रोजी त्या सत्तरी पार करीत आहेत. त्यानिमित्ताने या विदुषीचं कॅलिडोस्कोपिक रूपदर्शन..
‘कुलवंतांच्या कन्या तुम्ही आपणास म्हणविता
कुलटा आम्ही बाजारातील खुल्या वारयोषिता
कधीमधी मायभगिनींनो याल आमुच्या घरी
तुमचेच पती अन पिते भेटतील, आमच्या शेजेवरी
शरीर विकता उभा राहतो, देव बनून भाकरी
सांगा आधी बात एक मज,
माणूस जगतो कशावरी?’
१९७८! ‘तीन पशाचा तमाशा’मधील झीनत तळेगावकरच्या धारदार आवाजातील हा थेट सवाल ऐकून प्रेक्षक नि:शब्द होत असत. बटरेल्ट ब्रेश्त यांच्या ‘थ्री पेनी ऑपेरा’ या संगीतकाचं पु. ल. देशपांडे यांनी केलेलं हे रूपांतर पुण्यातील थिएटर अकॅडमीने सादर केलं होतं. राजकारण, पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था व गुन्हेगारी जग हातात हात घालून वाटचाल करत असतात, हे लख्खपणे दाखवणाऱ्या या नाटकाचे दिग्दर्शक होते डॉ.जब्बार पटेल. भास्कर चंदावरकर, आनंद मोडक व नंदू भेंडे यांच्याकडून नाटय़संगीत, ठुमरी व रॉक या तीन शैलींतून हे संगीतक व्यक्त होत असे. त्यात शरीरविक्रीमुळे जर्जर झालेली झीनत तिची कैफियत मांडते..
‘तेरे नामपर नौजवानी लुटा दी,
जवानी नहीं जिंदगानी लुटा दी..’
प्रियकरासह अनेक पुरुषांकडून पिळवणूक झालेल्या झीनतवर यातनादायक लाल प्रकाश! झीनतच्या कंठातून निघणारा स्वर प्रेक्षकांचं काळीज चिरत जाई. चार गाणी व तीन प्रसंगांतील संवाद यांतून पूर्ण झीनत व्यक्त व्हायची. त्यासाठी पर्वती भागात राहणारी २६ वर्षांची तरुणी ‘बदनाम वस्ती’त जाऊन तिथल्या महिलांचं जगणं व वावरणं समजून घेते. गालिबचे शेर पेश करण्यासाठी बेगम अख्तरांपासून रफीसाहेबांपर्यंत अनेक गझला ऐकते. गायक-अभिनेत्री माधुरी पुरंदरे यांनी झीनत अशी साकारली होती. त्यांची देहबोलीतून होणारी अभिव्यक्ती पाहणारे स्तब्ध होत असत. शंभु मित्र, मृणाल सेन, गिरीश कार्नाड, हबीब तन्वीर, रतन थिय्यम यांसारख्या धुरीणांनी त्यांची प्रशंसा केली होती. तिन्ही सप्तकांमध्ये लीलया संचार करणारी लावणी, गझल व कव्वाली ऐकून वसंतराव देशपांडे, सी. रामचंद्र, बाबा आमटे, मणी कौल, श्याम बेनेगल, विजय तेंडुलकर यांसारख्या जाणकारांनी कौतुकाचा वर्षांव केला होता. शब्दांमधील भाव नेमकेपणाने पोचवताना घेतलेल्या ‘जागां’मुळे पु. ल. देशपांडे यांना त्यांचं गाणं अख्तरीबाईंच्या जातकुळीचं वाटलं होतं. त्यानंतर गोिवद निहलानी यांनी ‘आक्रोश’मधील दोन्ही गाणी पुरंदरे यांनाच दिली होती. त्यांनी ‘अर्धसत्य’ व ‘गिध’ या चित्रपटांतून छोटय़ा भूमिका केल्या आणि त्यानंतर त्या थांबल्या. नाटय़-चित्रपटांतील महनीय मंडळी त्यांना सामावून घेण्यासाठी उत्सुकतेनं आमंत्रण देत होती. अशा वेळी कोणीही सहजगत्या त्या मार्गाने गेलं असतं. परंतु कोणतीही निवड अतिशय सजगपणे करणाऱ्या माधुरीताईंनी काय स्वीकारायचं आणि काय नाही, हे मनाशी पक्कं ठरवलं होतं.
१९७४ साली मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचं शिक्षण घेऊन त्या चित्रकला व ग्राफिक आर्टचं शिक्षण घेण्यासाठी फ्रान्समध्ये पूर्णपणे अपरिचित जगाला सामोऱ्या गेल्या. १९६० ते ७० च्या दशकात फ्रान्समध्ये प्रचंड उलथापालथी होत होत्या. युद्ध, हिंसा, दमन यांचा तिटकारा आलेल्या तरुणांना सर्व काही बदलून टाकायचं होतं. चित्रकला, संगीत, नृत्य, वास्तुकला, साहित्य, नाटक, चित्रपट क्षेत्रांत जुनं टाकून नवीन अभिव्यक्ती दाखल होत होती. सामान्य माणसांपर्यंत कला नेण्यासाठी कलावंत व साहित्यिक झटू लागले होते. केवळ नकार ही बंडखोरी नव्हती. काय आणि का नाकारायचं, तसंच काय स्वीकारायचं, याची स्पष्टता त्यात होती. त्यात स्वतच्या घरापासून देशाची नेपथ्यरचना बदलण्याची आकांक्षा होती. कट्टा, हॉटेल, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी समूहजीवन फुलून येत होतं. सामूहिक कला हस्तलिखिते, भित्तीफलके, पथनाटय़, रस्त्यावर समूहसंगीत आणणारे गानवृंद, नव्या संघटना ही सगळी त्या काळाची देण आहे. म्हणूनच थिओडेर रोझॅक यांनी त्या बंडाचं ‘पर्यायी संस्कृतीची चळवळ’ असं नामकरण केलं होतं. भारावलेल्या माधुरीताई हे सगळं जवळून अनुभवत होत्या. त्यांच्यासाठी दृश्यकलेचं दालन खुलं झालं होतं. त्यांच्यापुढे एकच मोठी पंचाईत होती- भाषेची! त्यांना फ्रेंच अजिबात येत नव्हती. सभोवतालचं ऐकूनच त्या दोन महिन्यात फ्रेंच बोलू लागल्या. पुढे त्यांनी पुणे विद्यापीठातून फ्रेंच भाषेचं रीतसर अध्ययन केलं. आपल्या शिक्षणपद्धतीच्या करंटेपणाचा आणखी एक सबळ पुरावा त्यांना सापडला. ऐकणे, बोलणे व नंतर लिहिणे या क्रमाने लहान मूल भाषा शिकत जातं. हीच नसíगक पद्धत त्यांनी पुढे आपल्या लेखनात वापरली. त्या म्हणतात, ‘‘शिकत असतानाच मी भरपूर प्रवास केला. आसपासच्या देशांना भेटी दिल्या. खूप पाहिलं. जग आणि जगणं अनुभवलं. ही शिदोरी पुढील आयुष्यभर पुरली.’’ पुढे त्यांनी २० वष्रे पुण्यातील ‘अलिआँस फ्रान्सेज’ या संस्थेत फ्रेंचचं अध्यापन केलं. त्यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’, ‘कोसला’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘बलुतं’ या पुस्तकांचा फ्रेंचमध्ये अनुवाद केला. तसेच ‘वेटिंग फॉर गोदो’, ‘न भयं न लज्जा’ (मोलिएर), ‘त्वान आणि इतर कथा’ (मोपासाँ), ‘हॅनाची सूटकेस’ (कॅरन लीवाईन) व ‘झाडं लावणारा माणूस’ (जाँ जिओनो) ही महत्त्वाची पुस्तके मराठीत आणली.
त्या १९७५ साली पुण्यात परतल्या तेव्हा ‘थिएटर अकॅडमी’ नाटय़क्षेत्रात नवे सूर घेऊन आली होती. त्यावेळी सतीश आळेकर यांच्या ‘महापूर’ची तयारी सुरू होती. मोहन गोखले यांनी माधुरीताईंवर नेपथ्यरचनेची जबाबदारी सोपवली. १९८५ मध्ये ‘घाशीराम कोतवाल’ विदेश दौऱ्यावर निघालं तेव्हा त्यांनी त्यातली वेशभूषा सजवण्यासाठी अख्खं पुणं पालथं घातलं होतं. ‘पडघम’ नाटकासाठी त्यांनी टिळक स्मारक मंदिरात पूर्ण सेट हातानं रंगवून काढला होता. प्रयोगशील कलाकारांसाठी ‘सु-दर्शन’चा रंगमंच उपलब्ध करून देणे, तिथे साहित्य-नाटय़-चित्रकलांवर विविध उपक्रम घडवून आणणे, ‘सकल कला केंद्रा’त बालकांमध्ये पेन्सिल, कोळसा, पीठ, कागद, माती, यांच्यासह खेळत खेळत इतिहास ते विज्ञान समजून घेण्याची आवड निर्माण करणे, त्यात वेगवेगळ्या तज्ज्ञांना ओढून आणणे, अशी कामं त्या अथकपणे करत आहेत.
१९७७ ते ८० या काळात समर नखाते यांच्याकडे पथनाटय़ चळवळीचं लोण महाराष्ट्रात आणण्याचं श्रेय जातं. माधुरीताईही त्यात सहभागी होत्या. त्यांच्यासोबत भरत अवचट, अनिल झणकर, दीपक देवधर, कामोद देशपांडे, अश्विनीकुमार धर्माधिकारी, अनिल शिदोरे, मिलिंद देशमुख, प्रस्तुत लेखक, रोहिणी टांकसाळे, आसावरी घोटीकर, सुजाता देशमुख, स्वाती चव्हाण, संजीवनी कुलकर्णी आदी मंडळी होती. सर्वाच्या सहभागाने नाटकाची कल्पना व त्यावरून दृश्यं ठरवायची. काहीही लिखित स्वरूपात नाही. ऐनवेळी जसं सुचेल तसं नाटय़ फुलत जाई. त्यासाठी चित्रं, फलक व कळसूत्री बाहुल्या तयार करून त्यांचा वापर करणे, मुख्य म्हणजे गाणी लिहिणे, चाल देऊन बेसूर साथीदारांकडून ती बसवून घेणे अशा अनेक जबाबदाऱ्या माधुरीताईंवर होत्या. लोकांनी कोणालाही कोणताही प्रश्न विचारला तर चोख उत्तर देता आलं पाहिजे, यासाठी ‘भरपूर वाचा, पाहा आणि त्याविषयी स्वतचं मत बनवा’ हीदेखील तयारी करावी लागत असे. त्या सहा वर्षांत लोकांच्या समस्यांपासून फारकत घेतलेलं राजकारण, महागाई, हुंडाबळी, महिला आणि दलित अत्याचार, असंघटित कामगार, धार्मिक उन्माद आदी समस्यांवर ‘माध्यम’ने सुमारे २०० पथनाटय़ं सादर केली. या पथनाटय़ांमधून ‘अल्ला तेरो नाम,’ ‘तू हिंदू बनेगा, न मुसलमान बनेगा’ अशी गाणी, बा. सी. मर्ढेकर, नामदेव ढसाळ, हेमंत जोगळेकर आदींच्या कवितांचं अभिवाचन त्या करायच्या. रस्ते, झोपडपट्टी, कारखाने, वस्त्यांमध्ये जाऊन कष्टकऱ्यांच्या सोयीच्या वेळेत पथनाटय़ आणि नाटय़गृहातील नाटक या दोन्हींमध्ये माधुरीताई तेवढय़ाच आत्मीयतेनं सहभागी होत असत.
१९८१ साली निर्मलाताई पुरंदरे यांनी ग्रामीण भागात उत्तम बालशिक्षण रुजविण्यासाठी वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राची स्थापना केली आणि खेडोपाडय़ांतील सुमारे ११ हजार महिलांना सहा महिन्यांचं प्रशिक्षण व सुविधा पुरवून २५० बालवाडय़ा चालू केल्या. निर्मलाताईंनी या शिक्षिकांकरता शिबिरं आयोजित केली. तसंच त्यांना बाहेरच्या जगाची ओळख करून देण्यासाठी ‘वनस्थळी वार्ता’ हे द्वैमासिक चालू केलं. संपादक होत्या- माधुरीताई! जगाकडे पाहण्याची खुली व उदार नजर देणारी ती एक खिडकी होती. त्यात जगातील, देशातील महत्त्वाच्या घडामोडी, लेख, कथा, कविता, उत्तम चित्रे व विनोद ‘सब कुछ’ त्या एकहाती करत असत. त्यांचं संपादकीय वाचकाला समृद्ध करणारं असायचं. त्यांना उपदेशाचा मनस्वी तिटकारा आहे. त्यांच्या बोलण्यात वा लेखनात कधीही आव वा आविर्भाव नसतो. त्या सहज संवाद साधत लिहीत असत. तब्बल २० वष्रे ही जबाबदारी सांभाळून त्या संस्थेतून बाजूला झाल्या.
१९८५ च्या सुमारास त्यांनी ज्याँ कोक्तो यांचं ‘द ुमन व्हॉइस’ मराठीत आणलं आणि ‘अब्द अब्द’ ही एकपात्री एकांकिका सादर केली. दिग्दर्शक होते समर नखाते. मराठीत समीप रंगमंचाची ही पहिली अनुभूती होती. नाटक व प्रेक्षक यांच्यातील अंतर पुसून टाकण्यासाठी घरांमध्ये प्रयोग! यात प्रियकराने झिडकारलेल्या तरुणीचं त्याच्याशी सलग ४० मिनिटं दूरध्वनीवरील संभाषण होतं. आयुष्य संपवून टाकण्याचा प्रयत्न फसल्यानंतर जाग येताच ती जीवाच्या आकांताने त्याच्याशी संवाद साधतेय. रम्य व क्रूर आठवणींमुळे तिच्यात भावनांचा कल्लोळ उठला आहे. अस्थिरता, एकटेपणा व भीती यांनी ती ग्रासून गेली आहे. सोबतीस आहे फक्त टेलिफोन! माधुरीताईंच्या आवाजातील आरोह-अवरोह, संवादाची लय व देहबोली पाहून प्रेक्षक अवाक् होत. पलंगावर एका जागी बसून केलेला हा प्रदीर्घ संवाद पाहताच पुष्पाबाई भावे म्हणाल्या, ‘‘थांबव बाई, फार आतून येतेय हे. थकून जाशील.’ ‘डेबोनेर’ नियतकालिकात समीक्षक सलिल त्रिपाठी यांनी ‘मराठी रंगभूमीचा हरवलेला आवाज पुन्हा गवसला’ असं या प्रयोगाबद्दल म्हटलं होतं. याच काळात या एकांकिकेचा इंग्रजी प्रयोग अलकनंदा समर्थ यांनी केला होता. त्रिपाठी यांनी मराठी व इंग्रजी दोन्ही प्रयोगांची तुलना करून ‘अब्द अब्द’च्या श्रेष्ठत्वाचा गौरव केला होता.
साहित्य, चित्र, संगीत, नृत्य, शिल्प वा वास्तुकला असो- या कलांचा वारंवार आस्वाद घेत त्यांना समजून घ्यावं लागतं. ‘आपल्याला चित्रं काही कळत नाही’ ही लोकांची सबब सतत ऐकून माधुरीताईंना वीट आला होता. त्यांनी १९८६ साली ‘पिकासो’च्या चरित्रातून चित्रकला समजावून सांगत विसाव्या शतकाचं दर्शन घडवलं होतं. चित्रनिर्मिती कशी होते? चित्रकलेतील विविध प्रवाह कसे निर्माण झाले? त्याचा इतर कलांवर कसा परिणाम झाला? अशा बहुविध दिशांनी कलावंत व कला यांच्याकडे पाहण्याची दृष्टी त्यातून त्यांनी दिली. चित्रं, विश्लेषण, पिकासोच्या मुलाखती, टीकाकारांची मते यांमुळे ‘पिकासो’ वाचन हा एक प्रगल्भ अनुभव होत असे.
१९८८ साली चंद्रकांत काळे यांनी ‘शब्दवेध’ संस्थेची स्थापना केली. त्यांनी लोकसंगीतावर आधारलेल्या संतरचनांवरील ‘अमृतगाथा’ हा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर प्रेमकवितांवरील ‘प्रीतरंग’, ग्रेस यांचा कवितानुभव ‘साजणवेळा’, लोकगीतांवरील ‘शेवंतीचं बन’, ‘आख्यान तुकोबाराय’, ‘आज या देशामध्ये’ अशी नक्षत्रे सादर केली. कसून संशोधन करून कविता, गीतं, उतारे निवडून त्यातून एकसंध आशय निर्माण करणं हे चंद्रकांत काळे यांचं वैशिष्टय़. आनंद मोडक यांच्या कल्पक संगीतामुळे तो आशय थेट भिडत असे. त्यामधील जागा हेरून त्यातील सौंदर्यस्थळं खुलवण्याचं कार्य माधुरीताईंचं! त्यांचा ‘हमामा’तील नाद, ‘गहिवर फुटतसे’ ही व्याकुळता, ‘निळेपणे सम आकारले’मधील शांत रस आणि ‘शरीर ज्याचे त्यांसि समíपले’चं वैराग्य आजही नव्यानं अर्थ दाखवू शकतात. त्यांचं गायन ऐकून साक्षात् लताबाईंनी ‘तुमच्या बहिणीचं गाणं अप्रतिम आहे’ असं प्रसाद पुरंदरे यांना आवर्जून कळवलं होतं. ‘शब्दवेध’च्या दशकपूर्ती समारंभात किशोरीताईंनी शाबासकी दिली होती. मात्र, काही वर्षांपूर्वी स्वतचं गाणं काळजीपूर्वक ऐकणाऱ्या माधुरीताईंचं त्यांच्या स्वरांनी समाधान होईना. तपासणी केली असता त्यांच्या स्वरयंत्रात बिघाड झाल्यामुळे त्यांना अध्यापन व गायन थांबविण्याचा सल्ला दिला गेला आणि एक अभिजात गायन स्वतहून थांबलं.
मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे हे पाहून माधुरीताईंनी १९९६ साली ‘वाचू आनंदे’ची निर्मितीप्रक्रिया सुरू केली. त्यातून त्यांनी व नंदिता वागळे यांनी बाल गट व कुमार गटासाठी दोन- दोन अशा एकंदरीत चार पुस्तकांतून संपूर्ण मराठी साहित्यविश्वाचा आवाका उलगडून दाखवला आहे. त्यात परंपरेने चालत आलेल्या कहाण्या, लोकगीतं, कविता आहेत. संतकाव्य ते आधुनिक काळातील साहित्य असं सर्व काही येतं. दोन्ही गटांचा प्रवास निसर्ग, प्राणिसृष्टी, बालपण, कुटुंब, घर-गाव-प्रदेश, रस्ते-प्रवास, शिक्षण, समाजजीवन, कला व भाषा या मार्गाने होतो. अतिशय नेमके उतारे, वेचे व त्यांच्या सोबतीला त्याअनुरूप विविध शैलीतील चित्रं दिली आहेत. त्यात त्यांची स्वतची पेन्सिल रेखाचित्रंही आहेत. चित्रं व मजकूर एकमेकांत सहजगत्या गुंफले आहेत. कोणताही विचार सुटा नसतो. समग्र विचार कसा असतो हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतं. ‘माणूस व निसर्ग यांचा आदर’ हे त्यांच्या सर्व लेखनाचं सूत्र आहे. तात्पर्य, भारतीय चित्र परंपरा + मराठी भाषेतील ऐवज = ‘वाचू आनंदे’! असा अमोल खजिना उपलब्ध झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्र त्यावर तुटून पडला. ‘वाचू आनंदे’ संचाच्या सुमारे १५ हजार प्रती राज्यभर गेल्या आहेत. नंतर त्यांनी मराठी लेखनाची गोडी वाढवण्यासाठी ‘लिहावे नेटके’चे तीन भाग तयार केले. व्याकरणाच्या नियमांचा रटाळ रुक्षपणाचा बाऊ न करता हसतखेळत, कोडी घालत व सोडवत, त्याचे खेळ करत व्याकरण समजून घेता येतं.. ते कसं, याचा कित्ता ‘लिहावे नेटके’ने दिला. कित्येक शाळांमधून ‘वाचू आनंदे’ व ‘लिहावे नेटके’ अभ्यासक्रमाचा भागच मानले आहेत.
या काळातच त्या ‘शाम्याची गंमत आणि इतर कथा’, ‘राधाचं घर’, ‘आमची शाळा’, ‘खजिना’, ‘यशच्या गोष्टी, ‘मासोळी आणि चिमुकलं फुलपाखरू’, ‘परी, मी आणि हिप्पोपोटॅमस’, ‘लाल बोक्याच्या गोष्टी’, ‘पाचवी गल्ली ’, ‘सख्खे शेजारी’, ‘त्या दिवशी’ अशी पुस्तकांमागून पुस्तकं लिहीत गेल्या. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी झटणाऱ्या ‘प्रथम’ संस्थेसाठी त्यांनी ‘आनंदाचे रोप’, ‘ठिपके’, ‘रेषा’, ‘घोटाळा’, ‘नदीवर’, ‘आता का’ ही पुस्तके लिहिली. या पुस्तकांचे िहदी, इंग्रजी, फ्रेंच, कोरकू, उर्दू, कन्नड, तेलुगु व बंगाली भाषांत अनुवाद झाले आहेत. मुलांची कथा ऐकण्याची भूक भागावी, ऐपत नसणाऱ्यांनाही हा ऐवज मिळावा यासाठी ‘प्रथम’ने विविध भाषांमधील कथा त्यांच्या संकेतस्थळावर सर्वासाठी खुल्या केल्या आहेत. (https://storyweaver.org.in/search?query=Marathi%20first) तसंच साक्षर होऊ इच्छिणाऱ्यांच्या भाषेचा पाया पक्का करण्यासाठी ‘प्रथम मराठी’ पुस्तक निर्मिती प्रकल्पाच्या त्या पाहुण्या संपादक होत्या. त्यातून केवळ चित्रं पाहून मुलांनी पुस्तक हाती घ्यावे अशी योजना करणारी अनेक पुस्तके निघत आहेत. त्यांची रेखाचित्रं आदिवासी भाषांच्या पुस्तकांत गेली आहेत. त्यांचं लेखन हे केवळ बालकांसाठीच आहे असा गरसमज करून घेतला जातो. उलट, पालकांसाठीची ती ‘पालकनीती’ आहे. दोघांनी एकत्र वाचावं, वाचन वाढवावं हा त्यामागचा त्यांचा उद्देश आहे. मुलं या पुस्तकांत रममाण होतात. स्वतला, आजूबाजूच्या व्यक्तींना व त्यांच्या नात्यांना न्याहाळू लागतात. केवळ चित्रांतून संवाद साधणाऱ्या ‘चित्रवाचना’त दंग होतात. ताई कमीत कमी शब्दांत, चित्रांच्या सहाय्यानं घटना व प्रसंगातून ‘मूल्यं’ वगरे परिभाषा न आणता, ती एक जगण्याची पद्धत असल्याचं सुचवतात. तिथं श्रम, स्वावलंबन, सहकार्य, कृतज्ञता व काटकसर हे गुण सहज दिसून येतात. त्यामुळे ही पुस्तकं मुलांच्या आयुष्याचा भाग होऊन त्यांच्या सोबत राहतात. सततच्या मागणीमुळे ‘ज्योत्स्ना’, ‘राजहंस’ व ‘पुरंदरे’ प्रकाशनाला आजवर त्यांच्या पुस्तकांच्या सुमारे ३.५ लाख प्रती काढाव्या लागल्या आहेत.
मुंबई विद्यापीठातील जर्मन विभाग प्रमुख प्रो. विभा सुराणा यांना आपल्याला मराठी येत नसल्याची खंत होती. परभाषकांना सहजगत्या जर्मन, फ्रेंच शिकता यावी अशी सुंदर पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यांना मराठी शिकण्यासाठी तसं पुस्तक मिळालं नाही. दरम्यान त्या ‘वाचू आनंदे’ पाहून बेहद्द खूश झाल्या. मराठी ही मातृभाषा नसणाऱ्यांसाठी ‘ट८ मराठी’ प्रकल्प त्यांनी सुरू केला. त्यासाठी राज्य मराठी विकास संस्था मदतीस तयार झाली. डॉ. आनंद काटीकर, सुहास लिमये, जयवंत चुनेकर, सोनाली गुजर, ज्योत्स्ना भिडे आणि जमीर कांबळे यांनी आठ वर्षांत चार पातळ्यांच्या या अभ्यासक्रमासाठी १९ पुस्तकं तयार केली. त्यातील संकल्पना, लेखन व संपादनात ताई सहभागी आहेत. मराठी भाषेच्या विकासासाठी सर्व साधनांनी सुसज्ज असणाऱ्या संस्था व विद्यापीठे यांना जे शक्य झालं नाही असे प्रकल्प त्या सातत्याने करत आहेत.
या बाई म्हणजे स्वविषयक यित्कचितही न बोलण्याचा केलेला वज्र निर्धारच आहे. त्या ‘मी’ सर्वनामाला कटाक्षानं बाजूला ठेवत आल्या आहेत. भिडस्त, अंतर्मुख, काटेकोर, स्पष्टोक्त व विनोदप्रिय असणाऱ्या या विदुषींना तक्रारखोरांचं वावडं आहे. आपल्याला अडचणींचा पाढा व दुखाचं प्रदर्शन मांडून बसलेले जागोजागी भेटतात. त्यापकी काही जण त्यांना सांगतात, ‘‘तुमचं काय बरं आहे! तुम्हाला सगळं जमतं. आम्हाला नाही जमत.’’ तेव्हा त्या म्हणतात, ‘‘प्रत्येक टप्प्यावर आपल्याला निवड स्वातंत्र्य असतं. तुमच्या निवडीवरून तुम्ही ठरत जाता.’’ ‘झाडं लावणारा माणूस’च्या प्रास्ताविकात त्या म्हणतात,‘‘एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वातले खरोखरीचे असामान्य गुण स्पष्ट दिसायला हवे असतील तर अनेक वर्ष त्या व्यक्तीच्या कामाचं निरीक्षण करण्याचं सौभाग्य लाभावं लागतं. जर त्या व्यक्तीचं काम कसल्याही अहंकारापासून मुक्त असेल, त्या कामामागील कल्पना अतुलनीय अशा औदार्यभावनेतून स्फुरलेली असेल, कसल्याही परतफेडीची तिथे अपेक्षा नसेल तर आपण एका अविस्मरणीय व्यक्तीसमोर आहोत याबद्दल जराही संदेह बाळगण्याचं कारण नाही.’’ हे त्यांच्याबाबतीतही तंतोतंत लागू पडतं. २९ एप्रिल रोजी सत्तर वर्षे पूर्ण करणाऱ्या माधुरीताई अशाच असंख्य बिया लावत पुढे जात आहेत.