अरुणा ढेरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निसर्गसंपन्न गोव्यातील कवी शंकर रामाणी यांचं जन्मशताब्दी वर्ष आज- २६ जूनला सुरू होत आहे. एकटं, एकाकीपणात रमलेल्या या कवीचं रसिक आणि सर्जनशीलांना रास्त कौतुक व अप्रूपही होतं. परंतु मुळात हा कवी स्वत:च स्वत:भोवती दु:खाचा डोह लपेटून त्याच्या तळाशी समाधिस्थ झाला होता. त्याबद्दल..

कवी शंकर रामाणींचं जन्मशताब्दी वर्ष आता सुरू होतं आहे. २६ जून १९२३ सालचा त्यांचा जन्म. आणि मृत्यू २८ नोव्हेंबर २००३ मधला. म्हणजे जन्माला शंभर वर्ष आणि मृत्यूलाही पुढल्या वर्षी वीस वर्षांचा काळ लोटेल. अनेक कारणांनी अपरिचित किंवा अल्पपरिचित राहिलेला हा कवी. आज गोव्याच्या परेश प्रभूंनी उत्तम संपादित केलेलं ‘एकटय़ाचे गाणे’ हे रामाणींचं पत्रसंचित समोर आहे. गोव्याच्याच गुणी लेखिका-कवयित्री अनुजा जोशीनं संपादित केलेली रामाणींच्या सहा कवितासंग्रहांमधली समग्र कविता समोर आहे. आणि माझ्या संग्रहात, माझ्या स्मरणात असलेल्या रामाणींच्या अनेक पत्रांमधून आणि प्रत्यक्ष भेटींमधून ज्यांचे संदर्भ उलगडले गेले अशा त्यांच्या काही कविता आस्वाद आठवणींची चव वाढवतो आहे.

१९७६-७७ सालची ती महाविद्यालयातली वर्ष होती. आवडलेल्या कविता भोवती फेर धरून असायच्या. त्या काळात सत्यकथेच्या अंकांमधून आणि मौजेच्या दिवाळी अंकामधून रामाणींच्या कविता प्रथम वाचनात आल्या. पुढे ‘पालाण’ या त्यांच्या कवितासंग्रहात त्या एकत्रित मिळाल्या. कधी कुसुमाग्रजांची आठवण करून दिली त्यांनी, कधी पु. शि. रेग्यांची, तर कधी बोरकरांची. पण काही मात्र खास त्यांच्या स्वत:च्या प्रतिभा खुणा मिरवत आलेल्या.

‘आंबा फुलेना, फळेना

मैना रुसली, बोलेना

गेला परदेशी रावा

त्याचा बोल आठवेना..’

असा कधी साधा गोडव्याचा सूर तिने लावलेला.

‘वेळ अवेळाच्या मेळी

तुझ्या डोळ्यांत डुंबावे

भरतीच्या काठावर

थोडे सुख फेसाळावे’

असे साधेसेच सुख कधी शब्दांत आणलेले. आणि कधीतरी गूढ उदासीने जीव वेढून टाकलेला..

‘शब्दांचे भरले डोळे

ते वेगळेच वनवासी

मी सजलो लेवुन त्यांच्या

हृदयातिल गूढ उदासी’

आणि ‘पालाण’मध्येच गवसलेली ती त्यांची अप्रतिम उत्कट कविता..

‘दिवे लागले रे दिवे लागले

तमाच्या तळाशी दिवे लागले

दिठीच्या दिशा खोल तेजाळताना

कुणी जागले रे, कुणी जागले’

पुढे मग ‘पालाण’नंतर कधीतरी त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू झाला. ‘दर्पणीचे दीप’ हाती आले. याच काळात कधीतरी तेरा पानांच्या प्रदीर्घ पत्रातून त्यांनी त्यांचं तोपर्यंतचं आयुष्यही समोर मांडून ठेवलं.

गोव्यातलं त्यांचं वाडी हे छोटंसं गाव. तिथे वडिलांनी एक घर बांधलं होतं, पण ते आयुष्यभर शहरातच राहिले. वडील नुसतेच नव्हेत, तर पिंडप्रकृतीनंही सरकारी नोकर होते. ते नाटक-सिनेमे पाहत. पण ‘किर्लोस्कर’च्या मुखपृष्ठावर बाबुराव पेंटरांनी काढलेल्या तरुणीच्या चित्रातलं तिच्या कपाळावरचं बारीकसं कुंकूही पार्कर पेननं मोठं करत.

वयाच्या साधारण पंधराव्या वर्षी रामाणींच्याच शब्दांत सांगायचं तर- त्यांना कवितेचं दुखणं लागलं आणि आई-वडिलांकडून मार खाल्ला तरी ते हटलं नाही. एका बाजूला अभ्यासाकडे दुर्लक्ष, मॅट्रिकच्या परीक्षेतलं अपयश, कधी एखाद्या शिक्षकाकडून आणि मुलामुलींकडून होणारी थट्टा आणि दुसरीकडे ‘गोल्डन मेमरीज्’मधले कवी माधव जूलियन, पोवळे, अनिल आणि बोरकरही..

मात्र, त्यांना स्वत:चा आतला सूर सापडला तो पुष्कळ उशिरा. ‘कातरवेळ’ आणि ‘आभाळवाटा’ असे दोन संग्रह तोवर खर्ची पडले होते. ‘पालाण’ हा त्यांचा सूर गवसलेला संग्रह. मग ‘दर्पणीचे दीप’, ‘गर्भागार’ यांसारखे दोन मराठी कवितांचे संग्रह आले आणि ‘जोगलांचे झाड’, ‘निळे निळे ब्रह्म’, ‘ब्रह्मकमळ’ आणि ‘निरंजन’सारखे कोकणी संग्रहही आले.

रामाणींना कोकणी कवितेसाठी साहित्य अकादमीपासून गोव्याच्या कला अकादमीपर्यंत अनेक संस्थांनी गौरवलं. मराठीसाठी मराठी शासनाकडून केशवसुत आणि बालकवी या दोघांच्या नावाचे पुरस्कार मिळाले. पण या पुरस्कारांनी रामाणी सुखावले, मोकळे, आश्वस्त आणि तृप्त झाले असं मात्र झालं नाही. ‘माझा स्वभाव आतल्या आत धुमसणारा, कुढणारा. मी लोकविन्मुख, एकाकी झालो..’ असं त्यांनी एका पत्रात लिहिलं होतं. त्या वस्तुस्थितीत फरक पडला नाही.

खरं तर गोव्यातलं वास्तव्य संपवून ते कायमचे बेळगावसारख्या सुरेख गावात स्थायिक झाले होते. पत्नीची- लीलाबाईंची साथ होती. बेळगावला येणारी मित्रमंडळी आवर्जून भेटत होती. फुटबॉल आणि क्रिकेटची मॅच पाहण्याचा छंद तर होताच. विडंबन कविता ते सुरेख लिहीत. अधूनमधून तुकाराम महाराज त्यांच्या स्वप्नात येऊन दृष्टान्त देत आणि मग हे बेळगावच्या अळवण गल्लीत राहणारे नवे तुकाराम महाराज अळवणकर मराठी वाङ्मय जगतातल्या घडामोडींवर विडंबनाचा शाब्दिक हल्ला चढवीत.

पत्र लिहायला त्यांना फार आवडे. नव्या लिहित्या कवींना ते आवर्जून पत्र लिहून दाद देत आणि त्यांच्या आवडत्या स्नेह्यांना आपल्या कविता पाठवून त्यांची दाद मिळेतो ते अधीर आणि अस्वस्थ होत. त्यांचं अक्षर फार खराब होतं. पत्रांमधली बरीच अक्षरं वाचणाऱ्याला लावून घ्यावी लागत असत. ‘अक्षर खराब आहे. सावकाशीने वाचा,’ असं ते पत्रातून लिहीत खरे, पण पत्राचं उत्तर त्यांना अगदी उलटटपाली हवं असे. ते मिळेतो त्यांना धीरच नसे.

हा सगळा बाहेर चाललेला खेळ. आत मात्र एक एकटा माणूस आपलं आपलं गाणं गात बसलेला होता. ‘तंद्रीला अनाहत झरे फुटल्यासारखं’ गाणं.

‘एकल्याने गावे एकटय़ाचे गाणे

परक्याचे नाणे खरे खोटे

खरी आहे फक्त नागवली काया

हंबरते माया एकटय़ाची

एकटय़ाच्या तेथे उधळल्या वाटा

चढणीच्या घाटा अंत नाही’

चढणीच्या घाटाला अंत नसल्याची एक खोल जाणीव घेऊन जगत गेलेला हा कवी चढणीवरच्या काळोखाची कविता अखेपर्यंत लिहीत राहिला. हा काळोख आतला.. अगदी नेणिवेतून वर आलेला काळोख होता. कविता त्याच काळोखातून येत राहिली होती.

‘वणवण फिरणारे कोण दारात आले

गहन नभ मनाचे पूर्ण आषाढलेले’

अशी अवस्था अखंडच होती. कधी झाड, कधी आषाढ, कधी संध्याकाळ.. नवनव्या प्रतिमा पुन्हा पुन्हा येत होत्या. पण या एकाकी कवीचं मराठी जगातल्या कितीतरी जाणत्या, रसज्ञ वाचक, लेखक व चित्रकारांना मनापासून कौतुक होतं. द. ग. गोडसे, वसंत सरवटे यांच्याशी त्यांचा स्नेह होता. सरवटे तर त्यांच्या कवितांमधून अनेकदा चित्रंच उमटलेली पाहायचे. क्लॉड मोनेची इम्प्रेशनिस्ट चित्रं!

त्यांच्या अंतर्लीन आणि गूढ-सुंदर कवितांची भूल पडलेले अनेक जण होते. महेश एलकुंचवार, त्र्यं. वि. सरदेशमुख, आनंद अंतरकर, श्रीनिवास कुलकर्णी, म. सु. पाटील यांच्यासारखे वेगळ्या वाटांवरचे साहित्यिक, श्री. पु. भागवत, पुरुषोत्तम पाटील यांच्यासारखे कवितास्नेही संपादक आणि पु. शि. रेगे, शांता शेळके, शंकर वैद्य, नागनाथ कोत्तापल्ले, आनंद यादव यांच्यासारखे कवी-लेखक अगत्याने त्यांच्याशी स्नेहपूर्ण पत्रव्यवहार करत होते. नरेश कवडी, प्रल्हाद वडेर, वि. ज. बोरकर, रामकृष्ण नायक यांच्यासारखे समीक्षक, कवी, लेखक, मित्र त्यांच्याशी स्नेहाचा बंध जोडून होते. विश्राम गुप्ते त्यांची खरी ओळख त्यांच्या आध्यात्मिक सौंदर्यदृष्टीत असल्याचं त्यांना सांगत राहिले होते.

हा माणूस दीर्घकाळ रोमँटिसिझमचा एक प्रगल्भ आणि निखळ आविष्कार कवितेतून घडवत राहिला होता. व्यथासन घालून आपल्या नेणिवेच्या काठावर बसून राहणं आणि तमाच्या तळाशी झळकलेलं दिव्यांचं गाव पाहणं हीच त्यांच्या कवितेची रीत. पण ती सोपी नव्हे. एकीकडे उल्हासाचं गाणं गात गात जगण्याची उत्सवी आरास मांडून बसलेले बा. भ. बोरकर आणि दुसरीकडे मर्मस्पर्शी दु:खातून उंच उठलेली कविता घेऊन आलेल्या इंदिरा संत- रामाणी अविचलपणे आपली एकटय़ाची दु:खसमाधी लावून बसले. हळूहळू ‘मोर नाचले नाचले अर्थआशयाच्या पैल’ अशा जाणिवेपर्यंत पोचले.

विजय तेंडुलकर त्यांचे चाहते होते. तेंडुलकरांनी त्यांच्या कवितेचं फार नेमकं वर्णन त्यांना पाठवलेल्या एका पत्रात केलं आहे. रामाणींच्या जन्मशताब्दी वर्षांच्या प्रारंभापाशी त्यांच्या कवितेच्या अभिभावकांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया म्हणून त्या नेमक्या मर्मज्ञ वाक्यांची ओंजळ ठेवावीशी वाटते..

‘तुमच्या कवितेसारखी कुलीन, स्वच्छ चारित्र्याची, एकनिष्ठ आणि वर अलोट देखणी कविता क्वचित भेटते. त्यात ती विचाराने खोल आणि शहाणी आहे. मध्येच तिच्या अंगात पिसे संचारते आणि ती कुणाची राहत नाही. स्वैर उधळते. हेही तिचे रूप थक्क करणारे. थोडक्यात, तुमच्या कवितेसारखी कविता विरळा. मी सवड सापडली की तिला भेटतो आणि नव्याने चकित होतो. भारावून जातो.’ आज ज्येष्ठाच्या कृष्णपक्षातली त्रयोदशी. चारच दिवसांनी आषाढ येईल आणि धारांनी कोसळणाऱ्या पावसात ‘प्रकाशाचा ओला वास’ भरून राहिलेल्या रामाणींच्या पुष्कळ कवितांच्या ओळी मनात वाजत राहतील..