मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com
गोष्ट एका विलक्षण प्रतिभेच्या लालभाई मोशायांची! हे लालभाई मोशाय म्हणजे अशोक मित्रा (१९२८- २०१८).. ज्यांचा उल्लेख यानंतर मी ‘ए. एम.’ असा करणार आहे. ए. एम. यांचा जन्म भारताच्या फाळणीच्या अगोदर ढाका (सध्या बांगलादेशची राजधानी) या शहरात झाला. ते भारतीय कीर्तीचे एक प्रखर मार्क्सवादी अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी असून, त्यांच्या काळातले एक प्रख्यात पब्लिक इंटेलक्च्युअल म्हणून गणले जायचे. एखाद्या धर्मनिष्ठ ख्रिश्चन माणसाला गुड फ्रायडेच्या दिवशी मरण यावं तसं दोन वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू १ मे या आंतरराष्ट्रीय कामगारदिनी व्हावा, हे त्यांच्या पाश्र्वभूमीशी अतिशय उचित आणि साजेसंच वाटतं.
अशोक मित्रा यांच्यावर लेख लिहायचं ठरवलं तेव्हा त्यास ‘मला उमगलेले अशोकदा’ असं काहीतरी आकर्षक शीर्षक द्यावं असं वाटलं होतं. पण ते फारच अतिशयोक्तीपूर्ण झालं असतं हे माझ्या ध्यानी आलं. कारण मला जरी त्यांचा वर्षभर सहवास लाभला असला तरीही मी काही त्यांना तितकंसं जवळून ओळखत नव्हतो.
अशा या ख्यातनाम व्यक्तीशी माझी ओळख कशी झाली? तर.. १९६५ साली मी हिंदुस्थान स्टील लिमिटेड (१९७२ मध्ये या कंपनीचे नाव ‘सेल’ किंवा ‘स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ असं बदललं गेलं.) राऊरकेला- ओरिसा या सार्वजनिक क्षेत्रातल्या प्रमुख कंपनीत नोकरीला होतो. कंपनीने मला ‘ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्राम’ या उपक्रमांतर्गत आय. आय. एम., कोलकाता (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाता) या संस्थेमध्ये एक वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी स्पॉन्सर केलं होतं. मी त्या वर्षांच्या ऑगस्टमध्ये तिथे रुजू झालो. तिथे ए. एम. हे आमचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांच्याशी माझा आलेला संबंध जेमतेम वर्षभराचा असला तरी तो खूपच अनौपचारिक स्वरूपाचा होता. कधी कधी आम्ही हास्यविनोद करत असू आणि गप्पादेखील मारत असू. (कधी या गप्पा गॉसिप स्वरूपाच्याही असायच्या.)
ए. एम. यांची माझी पहिली भेट मे १९६५ मध्ये आय. आय. एम.च्या प्रवेशासाठी झालेल्या मुलाखतीच्या वेळी झाली. माझ्या कधीच नेत्रदीपक नसलेल्या व्यवस्थापकीय कारकीर्दीतली कदाचित ही पहिली आणि शेवटची मुलाखत होती, की जी मी नुसती लीलयाच नाही, तर अगदी ‘फ्लाइंग कलर्स’नी पास झालो. (अर्थात नंतर बऱ्याच वर्षांनी मला कळलं, की माझी ही जी निवड झाली होती, त्याचं कारण म्हणजे माझी नुसती गुणवत्ता नसून, मी ‘पब्लिक सेक्टर स्पॉन्सर्ड’ उमेदवार होतो म्हणूनही झाली होती.) मुलाखतीत मला ए. एम. यांनी एकच महत्त्वाचा प्रश्न विचारला, तो असा : ‘‘अशोक बॅनर्जी यांचं राऊरकेलामध्ये कसं काय चाललंय?’’ त्यांना कदाचित या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षादेखील नसावी. कारण अशोक बॅनर्जी हे एक अतिशय कुशल आय. ए. एस. ऑफिसर होते आणि पुढे ते कर्नाटकचे राज्यपाल झाले. मात्र, त्यावेळी ते आमच्या कंपनीचे जनरल मॅनेजर होते. आणि भारतीय सैन्यात आर्मी कमांडर आणि ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर यांच्यात जेवढं अंतर असतं, तेवढं अंतर आमच्यात होतं.
एखाद्या चतुरस्र आणि प्रतिभावान व्यक्तीचं वर्णन आपण सर्रासपणे बऱ्याचदा फारसा खोल विचार न करता ‘द रेनासान्स मॅन’ किंवा ‘पॉलिमॅथ’ असं करून मोकळे होतो. पण ए. एम. यांना ही दोन्ही नामं अत्यंत चपखलपणे लागू होती. जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ यान टिनबर्गन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच. डी. ही पदवी मिळवली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिनबर्गन यांना १९६९ मध्ये अर्थशास्त्रातलं पहिलं नोबेल मिळालं होतं. ए. एम. यांनी प्रथम युनायटेड नेशन्स आणि त्यानंतर वर्ल्ड बँकेमध्ये काही काळ नोकरी केली आणि १९६० च्या सुरुवातीच्या दशकात नव्याने सुरू झालेल्या आय. आय. एम. (कोलकाता) इथे अर्थशास्त्र शिकवण्यासाठी ते भारतात परतले. शेतमाल उत्पादनाच्या किमती ठरवणाऱ्या आयोगाचे ते काही काळ अध्यक्ष होते. १९७० च्या प्रारंभी ते इंदिरा गांधी यांच्या सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार झाले. पुढे ज्योती बासू यांच्या डाव्या आघाडीच्या सरकारमध्ये एक दशकभर ते अर्थमंत्री होते. पार्टीच्या नेत्यांशी झालेल्या धोरणात्मक मतभेदांमुळे त्यांनी पुढे आपल्या पदाचा राजीनामा दिला.
ए. एम. हे त्यांच्या काळातले भारतातले नावाजलेले द्विभाषिक लेखक होते. इंग्रजी आणि बंगाली या दोन्ही भाषांतील त्यांचे लिखाण मर्मदृष्टी, चमकदारपणा, लालित्य आणि सुसंस्कृत विनोदाने भरलेलं असे. ‘इकॉनॉमिक अॅन्ड पोलिटिकल वीकली’ या अतिशय प्रतिष्ठित नियतकालिकात ते ‘कलकत्ता डायरी’ या नावाचं सदर बरीच र्वष लिहायचे. या सदरात राजकारण, अर्थकारण, चालू घडामोडी, इतिहास, साहित्य, संगीत, कला, रंगभूमी, क्रिकेट आणि रहस्यकथा इतक्या विविध विषयांवर ते आपल्या खुमासदार शैलीत लिखाण करायचे. त्यांचं हे सदर वाचकांसाठी अतिशय आनंददायी होतं आणि त्याची ते अत्यंत उत्सुकतेनं आणि अक्षरश: भक्तिभावानं वाट बघायचे. या साप्ताहिकाच्या इतिहासात इतकी लोकप्रियता क्वचितच दुसऱ्या एखाद्या सदराला मिळाली असेल.
धारदार बुद्धी आणि अफाट स्मरणशक्तीची ए. एम. यांना देणगी होती. ते एक असामान्य शिक्षक होते. (माझ्यासारख्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मते, दहा हजारांत एक!) मी त्यांच्या एकूण स्वभावाचं वर्णन दोनच वाक्यांत असं करेन.. He was a very difficult man And he didn’t suffer fools gladly नेहमी ऑक्सब्रिज/ लिंकनस्-इन शिक्षित, स्कॉच पिणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या बुद्धिवंतांच्या गराडय़ात असणाऱ्या ए. एम.च्या इंग्रजी उच्चारांत मात्र थोडीशी बंगाली झाक होती. सर्वसामान्य बंगाली मध्यमवर्गीय भद्रलोकांसारखे ते दिसायचे आणि त्यांचा वेशही तसाच असायचा. बऱ्याच वेळा त्यांना मी धुती आणि पंजाबीत पाहिलं होतं. (बंगालीत कुर्ता किंवा नेहरूशर्टाला ‘पंजाबी’ का म्हणतात, हा एक संशोधनाचा विषय आहे.) बोलताना ते तोंड सतत वेडंवाकडं करत आणि डोळ्यांवरचा चष्मा सारखा सावरत असत. त्यामुळे अनोळखी माणसाला ते जरा ‘अनफ्रेंडली’च वाटत. पण ओळखीच्या लोकांनाही त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती वाटावी असंच त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं.
महाराष्ट्र कनेक्शन..
एकदा ए. एम. मला म्हणाल, ‘‘डी. डी. कोसंबी आणि अहिल्या रांगणेकर यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. मी जेव्हा जेव्हा मुंबईत येतो तेव्हा रांगणेकरांना नक्की भेटतो.’’ या प्रसिद्ध व्यक्ती कोण, हे मला त्यावेळी माहीत नव्हतं. पण मला ते नक्कीच माहीत असणार असा त्यांचा समज. डी. डी. कोसंबी हे मार्क्सवादी इतिहासकार असून, अनेक विषयांचे तज्ज्ञ व गाढे विद्वान आहेत, तसंच अहिल्या रांगणेकर या एक महत्त्वाच्या कम्युनिस्ट नेत्या असून, त्या प्रख्यात कॉम्रेड बी. टी. रणदिवे यांच्या भगिनी आहेत हे मला नंतर कळलं. ख्यातनाम मराठी नाटककार (त्यांचं ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ हे नाटक आठवतंय का?), राजकीय विचारवंत, चीनविषयीचे विशेषज्ञ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक गो. पु. देशपांडे आणि ए. एम. हे दोघे चांगले मित्र आणि एकमेकांचे प्रशंसक होते. डॉ. अश्विनी देशपांडे या गो. पुं.च्या मुलीने लिहिलेला ए. एम. यांना श्रद्धांजली वाहणारा भावपूर्ण लेख मी वाचल्याचं आठवतंय. त्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक होत्या. सध्या त्या अशोका युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. दीना खटखटे हे आणखी एक ए. एम. यांचे बऱ्यापैकी मराठी मित्र. तेदेखील एक नामवंत अर्थशास्त्रज्ञ असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (International Monetary Fund) अनेक र्वष महत्त्वाच्या हुद्दय़ांवर काम करून नंतर ते वॉशिंग्टन डी. सी. येथे स्थायिक झाले. गमतीची गोष्ट म्हणजे ए. एम., गो. पु. आणि दीना हे तिघेही नियमितपणे ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’साठी सदर लिहीत असत. दीनांच्या सदराचं नाव- ‘पोटोमॅक म्युझिंग्स.’
आता जरा गंमत..
मी जेव्हा आय. आय. एम. (कोलकाता) ला होतो तेव्हा तिथे एक वार्षिक कार्यक्रम व्हायचा. या कार्यक्रमासाठी मी आयोजकांना प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक कीर्तीचे ब्रिटिश-भारतीय वैज्ञानिक जे. बी. एस. हाल्डेन यांचं नाव सुचवलं. आणि हे मी अतिशय स्मार्ट काम केलं अशा आनंदात ही गोष्ट मी ए. एम. यांना सांगितली तेव्हा आम्हा दोघांत जो संवाद घडला तो असा..
ए. एम. : पारनेरकर, मला यात थोडा प्रॉब्लेम वाटतोय.
मी : म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला प्रोफेसर?
ए. एम. : काय आहे की, प्रोफेसर हाल्डेन यांचा सध्याचा पत्ता कोणालाच माहीत नसणार.
मी : का बरं? ते भुवनेश्वरमध्येच (ओरिसा) स्थायिक झालेत ना?
ए. एम. : हो, ते बरोबर आहे. पण काय आहे की, साधारण वर्षांपूर्वी ते हे जग सोडून निघून गेले.
क्रिकेट समीक्षक..
‘मी कम्युनिस्ट आहे, मी भद्रलोक (Gentlemen) नाही,’ असं अभिमानाने सांगणाऱ्या या माणसाने सभ्य माणसांच्या खेळाबद्दल (Gentleman’s game) भरभरून लिहिलं. त्यांच्या लिखाणात नेव्हिल कार्डस्ची गहनता आणि मर्मदृष्टी नसली तरी ते अतिशय आत्मीयतेने आणि आकर्षक शैलीत लिहीत असत. काय कारण माहीत नाही (यात ‘बंगाली बायस’ असावा असा मला संशय येतो.), पण सचिन तेंडुलकर हा काही त्यांचा क्रिकेट हिरो नव्हता. (तो कोण होता, हे ओळखणाऱ्याला कुठलंही बक्षीस मिळणार नाही.) ‘सचिन नेहमी स्वत:साठी खेळतो, संघासाठी नाही,’ असा तर्क असणाऱ्या टीकाकारांच्या पंक्तीतले ते होते असं मला वाटतं. पण त्यांना या मास्टर ब्लास्टरच्या आडनावाचं वावडं होतं असं म्हणता येणार नाही. कारण हार्वर्ड विद्यापीठात शिकलेले त्यांचे सहकारी अर्थतज्ज्ञ आणि ‘दारिद्र्यरेषा’ या संकल्पनेसाठी प्रसिद्ध असलेले सुरेश तेंडुलकर यांच्याबद्दल त्यांना आदर होता. आणि त्यांचे वडीलबंधू व प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर हे स्वतंत्र भारतातील पहिले प्रभावी नाटककार आहेत असं एकदा त्यांनी म्हटलं होतं.
ममतादीदींबद्दलची भविष्यवाणी
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेण्यापूर्वी चार र्वष आधी- म्हणजे २००७ साली ए. एम. यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला धोक्याची सूचना देताना म्हटलं होतं की, ‘या बाई पश्चिम बंगालला फॅसिझमच्या खाईत लोटतील.’ सक्रि य राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर खूप वर्षांनी त्यांनी ममता बॅनर्जीबद्दल केलेलं हे विधान राजकारणातल्या भविष्याचा वेध घेण्याची त्यांची क्षमता दाखवतं. अर्थात डाव्या आघाडीच्या सरकारनं त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत काय दिवे लावले, हे सर्वश्रुत आहे. पण तो वेगळा विषय आहे.
एक दु:खद घटना
१९७२ मध्ये ए. एम. यांच्या राजकीय जीवनात एक अतिशय वाईट घटना घडली. इंदिरा गांधी पंतप्रधान असलेल्या केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार या पदाचा त्यांनी राजीनामा दिला. (काहींच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं.) त्याचं असं झालं : FICCI या संस्थेमध्ये इंदिरा गांधी यांनी जे भाषण केलं त्यातला एक अतिशय महत्त्वाचा परिच्छेद पाकिस्तानचे अर्थतज्ज्ञ महबूब अल हक यांनी ‘फार ईस्टर्न इकॉनॉमिक रिवू’ या नियतकालिकात लिहिलेल्या एका लेखातून जसाच्या तसा उचलला होता. आणि पंतप्रधानांच्या या भाषणाचे लेखक ए. एम.च असले पाहिजेत असं सर्वत्र बोललं जाऊ लागलं. यावर ए. एम. यांचा बचाव असा होता की, ‘‘मी पंतप्रधानांचा सल्लागार आहे. भाषण लिहिणं हे माझं कामच नाही.’’ पण बहुतेक लोकांचा त्यावर विश्वास बसला नाही. संशय असल्याप्रमाणे ए. एम. समजा खरंच दोषी आहेत असं मानलं तर एक विचार मनात येतो की, अशी हुशार आणि एरवी समंजस माणसं कधी कधी अशी मूर्खासारखी कशी काय वागतात? (या संबंधात फरीद झकारिया या मुंबईत जन्मलेल्या प्रसिद्ध अमेरिकन पत्रकाराची आठवण होते.) मला असं वाटतं, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ हेच खरं असावं कदाचित.
शब्दांकन : आनंद थत्ते