अशोकची आणि माझी ओळख माझा कॉलेजमधला मित्र सुभाष गोडबोलेमुळे झाली. त्या दिवशी मी नि सुभाष नेहमीप्रमाणे बादशाहीत चहा पीत बसलो होतो. तर अशोक तिथं आला नि आमच्या टेबलावर येऊन बसला. मग गप्पांच्या ओघात ‘सत्यकथे’चा विषय निघाला. तर अशोक म्हणाला, ‘‘तुम्ही ‘सत्यकथा’ का वाचता?’’ मी म्हणालो, ‘‘मी मास्तर आहे आणि ‘सत्यकथे’तला मजकूर पुढे पाठय़पुस्तकांतून धडा म्हणून येतो. तर आधीच ते वाचलेलं असलं म्हणजे शिकवायला सोपं जातं. परत मी ग्रामीण भागात काम करतो. त्यामुळे मला खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यांना शहरी धडे समजत नाहीत.’’ मग अशोक खवचटपणे म्हणाला, ‘‘तुमचा ‘सत्यकथा’ वाचण्याचा वारही ठरलेला असेल!’’
मी ग्रामीण भागात काम करत असल्याने अशा खवचटपणे बोलणाऱ्याची मला सवय होती. मी काही त्याचं बोलणं मनावर घेतलं नाही. अशोकची नि माझी त्या दिवसापासून दोस्ती जमली, ती आजतागायत टिकून आहे. ५९-६० साली अशोक पुण्यात टिळक रोडवर चौदा इंच बॉटम असलेली नॅरो पँट, वर लाल रंगाचा शर्ट आणि पायात पुणेरी जोडा अशा वेशात हिंडत असे. टिळक रोड ते जिमखान्यापर्यंत सगळे लोक त्याच्याकडे बघत राहायचे. पण त्याला त्याचं काही देणं-घेणं नव्हतं.
मला अशोक पहिल्यांदा भेटला त्यापूर्वी तो दोनएक र्वष खरं तर सत्यकथेत बंगाली अनुवादित कथांचा रतीब घालत होता. श्री. पु. भागवत त्याच्या अनुवादावर खूश होते. इतकंच नाही, तर अशोकनं मोती नंदीची ‘नक्षत्रांची रात्र’ ही कादंबरी मौज प्रकाशनाला दिली होती. ही कादंबरी विरामचिन्हं नसलेली होती. ती एकदम सलग लिहिलेली होती. तर भागवतांनी नेहमीप्रमाणे आपली संपादकीय तलवार त्यावर चालवली आणि विरामचिन्हं घालून, काही संपादकीय संस्कार करून त्यांनी अशोकला बोलावून घेतलं. तेव्हा अशोकनं स्क्रिप्ट पाहिलं तर सगळीकडे विरामचिन्हं घातलेली. भागवतांच्या समजुतीप्रमाणे काही कलात्मक बदलांसाठी परिच्छेद पण बदललेले. अशोक खूप अस्वस्थ झाला. तो भागवतांना म्हणाला, ‘‘तुम्हाला हे बदल करायची परवानगी कोणी दिली? बदल करण्यापूर्वी मला विचारायचं तरी! ही कादंबरी मी दिली त्या स्वरूपातच तुम्ही छापायला हवी. नाही तर स्क्रिप्ट परत द्या.’’ त्यावर भागवत पण रागावले. म्हणाले, ‘‘या कादंबरीवर मी खूप कष्ट घेतले आहेत. तेव्हा तुम्हाला मी ती परत देणार नाही.’’ त्यावर अशोक म्हणाला, ‘‘माझ्या परवानगीशिवाय तुम्हाला ती छापता येणार नाही.’’ अशोक निघून आला. मग बारा वर्षांनी ती कादंबरी अशोकला मौजेनं परत केली. पुढे ती कधी छापलीच गेली नाही. आता तर अशोकजवळ त्याचं स्क्रिप्ट पण नाही.
६०-६१ ला अशोक मुंबईला राहायला गेला. त्याचवेळी अशोकनं ‘अथर्व’चा पहिला अनियतकालिक अंक काढला. त्याची मुंबईच्या साहित्यवर्तुळात खूप चर्चा झाली. काहींना तर वाटलं, हा ‘सत्यकथे’ला पर्यायदेखील असू शकेल. त्यातली रघू दंडवतेची ‘मावशी’ ही कथा आणि अशोकची ‘एका गांडूचे गाऱ्हाणे’ ही कविता खूप गाजली. ‘अथर्व’चा फक्त पहिलाच अंक निघाला. मग अशोक परत पुण्याला आला. चौसष्टच्या सुरुवातीला ‘असो’चा पहिला अंक निघाला. ‘असो’चे पुढे तीनेक वर्षांत सतरा अंक निघाले.
अनियतकालिकांची चळवळ बंद पडल्यावर अशोकनं ठरवलं, की अशी मासिकं वगैरे काढून काहीही उपयोग होत नाही, तर आपण आता स्वत: प्रकाशन संस्था काढून स्वत:ची पुस्तकं प्रकाशित करायची. १९७६ च्या शिमग्याला अशोकनं अरुण कोलटकरचं ‘अरुण कोलटकरची कविता’ या नावाचं पुस्तक काढून प्रास प्रकाशन सुरू केलं. प्रासची पुस्तकं पुण्यात लाटकरांच्या कल्पना प्रेसमध्ये छापायची असं त्यानं ठरवलं. नंतर लगेचच मनोहर ओक याची ‘अंतर्वेधी’ ही कादंबरी प्रकाशित केली. त्या कादंबरीत इंटय़ूएशन असणाऱ्या माणसाची गोष्ट होती. आता पुस्तक वितरणाची काही सोय करायला हवी होती. सर्वात प्रथम अशोकनं कोठावळेशेठना विचारलं. तर ते म्हणाले, ‘‘आम्ही एका वेळेला दोनशे प्रती घेऊ.’’ मग पुण्यात डेक्कनवरील इंटरनॅशनल बुक डेपो, पॉप्युलर लायब्ररी, फग्र्युसन लायब्ररी, फग्र्युसन रोडवरील अभिनव पुस्तक मंदिर, उत्कर्ष अशा दुकानांतून पुस्तक विक्रीला ठेवायचं ठरवलं.
पुस्तकं ‘ऑन सेल’ कुणाकडेच ठेवायची नाहीत, ते जेवढी पुस्तकं घेतील तेवढय़ाचं बिल कमिशन वजा जाता दिलंच पाहिजे, असं पक्कं झालं. मुंबईत बॉम्बे बुक डेपोत नि नेरूरकरशेठच्या दादरच्या दुकानात पुस्तकं विक्रीसाठी द्यायची असं ठरलं. पुण्यातली विक्रीव्यवस्था अशोकनं माझ्यावर सोपवली. २५ टक्क्य़ांपेक्षा जास्त कमिशन कोणालाच द्यायचं नाही असं अशोकचं धोरणं होतं. अशोक पुण्याला आला की बिलं वसुली करायचा. मनोहर ओकला कायमच कडकी असायची. त्याला पैशाची खूप गरज आहे हे समजून अशोकनं मॅजेस्टिकवाल्यांना ६५ टक्के कमिशन देऊन ओकच्या कादंबरीच्या सर्वच्या सर्व हजार प्रती देऊन टाकल्या नि रोख पैसे घेऊन ते पैसे मनोहर ओकला देऊन टाकले.
७८-७९ च्या सुमारास जनता पक्षाचं राज्य महाराष्ट्रात आलं नि अनु वर्दे शिक्षणमंत्री झाले. त्याच वर्षी नेहमीच्या प्रथेप्रमाणे महाराष्ट्र टाइम्समध्ये मोठय़ा साहित्यिकांकडून त्या वर्षांत वाचलेल्या पुस्तकांपैकी तुम्हाला सर्वात आवडलेल्या पुस्तकाबद्दल लिहा, असं आवाहन केलं गेलं. पु. ल. देशपांडे यांनी ‘लेटर टु अ टीचर’ या इटलीतील एका खेडय़ातल्या मुलांनी आपल्या बाईंना लिहिलेल्या पुस्तकाबद्दल लिहिलं होतं. अशोकला ते पुस्तक मिळवून छापावंसं वाटलं. तो त्या पुस्तकाचा शोध घ्यायला लागला तर त्याला कळलं, की ते पुस्तक बाजारात मिळत नाही. मग काही दिवसांनी पुलंकडून कळलं, की ते पुस्तक कुमुदबेन मेहता यांच्याकडे आहे. अशोक त्यांना जाऊन भेटला. त्या म्हणाल्या, ‘‘माझ्याजवळ ही एकच प्रत आहे. जपून वापर नि मला परत कर.’’ अशोकनं मग इटलीतील बार्बियाना या खेडय़ातील त्या मुलांचा पत्ता काढला. त्यांना पत्र लिहून मराठीत अनुवाद करण्यासाठी परवानगी मागितली. त्यांच्या मानधनाचा आकडा कळवा असं लिहिलं. तर पोरांनी, ‘आम्हाला महात्मा गांधींचं समग्र वाङ्मय पाठवा,’ असं उत्तर दिलं. अशोक एकदम खूश झाला. त्यानं ती पुस्तकं त्यांना पाठवून दिली. आता याचं भाषांतर कुणी करायचं? सुधा कुलकर्णीनी ती जबाबदारी स्वीकारली. पुस्तकाच्या प्रती किती काढायच्या? तर तीन हजार प्रती काढाव्यात असं त्यानं ठरवलं. ग्रंथालीवाल्यांनाही हे पुस्तक काढायचं होतं. पण अशोकला परवानगी मिळाल्यामुळे त्यांचा नाइलाज झाला. मग त्यांनी अशोकबरोबर असा करार केला की, पुस्तकाच्या तीन हजार प्रती आम्ही घेणार नि निम्मा खर्च पण देणार. प्रास आणि ग्रंथाली यांच्या सहयोगाने हे पुस्तक काढावं. अशोक म्हणाला, ‘‘ठीक आहे. एकूण सहा हजार प्रती काढू या.’’ शिक्षणमंत्री वर्दे यांनी सरकारी कागद दिला. त्यामुळे पुस्तकाची किंमत फक्त सहा रुपये ठेवण्यात आली आणि व्यक्तीला फक्त पाच रुपयांत पुस्तक द्यायचं असं ठरलं. दुकानदारांनी मात्र १०० पेक्षा अधिक प्रती घेतल्यास ३३ टक्के कमिशन द्यावं असं अशोकनं ठरवलं. पण पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर ग्रंथालीने तीन हजार प्रती उचलण्याऐवजी फक्त एक हजार प्रतीच उचलल्या. तर अशोकनं त्यांना ३३ टक्के कमिशननेच त्या दिल्या. त्यांनी आपला शब्द पाळला नाही. आता या पाच हजार प्रतींचं काय करायचं? नि झालेला खर्च कसा भरून निघणार? अशोक खूप अडचणीत आला. रघू दंडवते म्हणाला, ‘‘पुस्तक चांगलं आहे नि आपण लोकांना फक्त पाच रुपयांत ते देणार आहोत. पुस्तक दोन-तीन वर्षांत खपेल. काळजी करू नकोस.’’ पुस्तक अपेक्षेपेक्षा खूपच लवकर संपले. कदाचित हा पुलंच्या लफ्फेदार सहीचा परिणाम असावा.
त्यानंतर अशोकनं प्रास प्रकाशनतर्फे ‘दहा बाय दहा’ (दिलीप चित्रे), ‘साक्षात्’ (सतीश काळसेकर), ‘समुद्र’ (वसंत गुर्जर), ‘खेळ’ (नामदेव ढसाळ), ‘मेलडी’ (भालचंद्र नेमाडे) असे महत्त्वाचे संग्रह काढले. दिलीप चित्रेचं ‘चाव्या’ हे पुस्तक व ‘घरदार’ (मधू साबणे), ‘वसेचि ना’ (रघू दंडवते) अशा कादंबऱ्या काढल्या. ‘फोटो’ आणि ‘दुष्टचक्र’ अशा दोन एकांकिका (वृंदावन दंडवते). ही पुस्तकं लागोपाठ काढली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अरुण कोलटकरच्या ‘जेजुरी’ या इंग्रजी कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती काढली. सलमान रश्दी या प्रख्यात कादंबरीकारालाही खूप आवडलेलं हे पुस्तक आहे. त्यानंतर मधल्या काळात प्रास प्रकाशन ठप्पच झालं होतं. ते परत २००१ साली पुन्हा सुरू झालं. या वर्षांत अरुण कोलटकर मृत्यूच्या छायेत असताना त्याचे ‘चिरीमिरी’, ‘द्रोण’ आणि सर्वात शेवटी ‘भिजकी वही’ असे तीन कवितासंग्रह लागोपाठ दोन वर्षांत अशोकने काढले. अरुण गेल्यावर त्याला मरणोत्तर साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला, याचं अशोकला खूप वाईट वाटतं.
अशोकनं मुंबईत कृष्णा कारवार यांच्या मेव्हण्याच्या प्रेसमध्ये काम केलं आहे. त्यांचं नाव मोहनशेठ. त्यांचा मोहन मुद्रणालय नावाचा इंग्रजी प्रेस होता. ते मुख्यत: इंग्रजी पुस्तकं छापायचे. मराठी टाइप त्यांच्याकडे अगदी थोडा होता. अशोक पुण्यात असताना साबय्या भंडारींच्या कंपोज रूममध्ये तो खिळेजुळणी शिकला. छपाईसाठी फ्रेम कशी लावायची, हेही शिकला. या सगळ्याचा फायदा अशोकला मोहन मुद्रणालयात काम करताना झाला आणि त्यानं छपाई व्यवसायात खूप प्रावीण्य मिळवलं. इतकं, की पुढे प्रास प्रकाशन सुरू केल्यावर प्रत्येक पुस्तकाची मांडणी करताना त्याला खूप सोपं गेलं. त्यामुळे प्रत्येक पुस्तकाचा आकार आणि मांडणी यांत त्याला वैविध्य आणता आलं. वाद्यमहर्षि अल्लाउद्दीन खॉं यांच्या बंगालीतून अनुवाद केलेल्या चरित्राचा- ‘माझी कहाणी’चा उभट चौकोनी आकार आहे. तो छापताना कल्पना प्रेसचे लाटकर हतबल झाले. त्यांना या पुस्तकाच्या आकाराची फ्रेम अॅडजस्ट करता येईना. म्हणून त्यांनी अशोकला बोलावून घेतलं. अशोक स्वत: पुण्यात आला. लाटकरांच्या थोरल्या भावाचा भोसरी इथं प्रेस होता. तिथं रोज महिनाभर जाऊन स्वत: उभं राहून अशोकनं ते देखणं पुस्तक छापून घेतलं.
‘घरदार’चा आकार लाटकरांकडे इतका लोकप्रिय झाला, की इतर प्रकाशकही म्हणायला लागले की, आम्हाला ‘घरदार’ साइज पुस्तक करून द्या. कारण तो एक बाय दहा डेमीचा आकार आहे. त्यामुळे कागद खूप वाचतो. १९८२ साली ‘घरदार’च्या छपाईसाठी अशोकला राष्ट्रपतींच्या हस्ते ताम्रपट मिळाला. मुद्रण सौष्ठव पुरस्कार असं त्याचं नाव आहे. अशोकला प्रास प्रकाशनासाठी वि. पु. भागवत पुरस्कारही मिळाला आहे.
आता या वयातही पुण्यातल्या संगम प्रेसचे सुजित पटवर्धन हे इंग्लंडमधून प्रिंटिंग शिकून आलेले तरुण गृहस्थ काही अडचण आली की अशोकला प्रिंटिंगचा सल्ला विचारतात. ते नेहमी म्हणतात, ‘निदान दोन महिन्यांनी तुम्ही आमच्याकडे पुण्याला येत जा. कारण तुमच्यामुळे आम्हाला आणि कामगारांना नवीन नवीन शिकायला मिळतं.’ अशोक प्रिंटिंगमधला दादा आहे. त्यानं खरं तर प्रिंटिंगचं कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेतलेलं नाही. तो भयंकर स्वयंभू आहे. स्वत: खिळे जुळवत जुळवत शिकला. अशोकला हे कसं जमलं, असा अनेकांना अचंबा वाटतो. आजही तो मुंबईत अनेकांना प्रिंटिंगचा सल्ला द्यायला जातो. अशोकची प्रतिभा सर्व क्षेत्रांत चालते. तो श्री. पु. भागवतांना एकदा म्हणाला होता, ‘‘अहो भागवत, मी तुमचा विद्यार्थी नाही.’’
एक दिवस पुण्याच्या ‘कलोपासक’ नाटय़संस्थेचे सेक्रेटरी राजाभाऊ नातू अशोककडे आले. तर अशोक समोर धरून एक पुस्तक वाचत होता. त्यानं नातूंना बसायला सांगितलं नि लगेच म्हणाला, ‘‘राजा, हे मस्त पुस्तक तुला थोडंसं वाचून दाखवतो.’’ राजाभाऊ म्हणाले ‘‘वाच.’’ अशोकनं भरभर दहा-वीस पानं त्यांना वाचून दाखवली. ते पुस्तक खरंच ग्रेट होतं. राजाभाऊ तल्लीन होऊन ऐकत होते. थोडय़ा वेळानं अशोकनं वाचन थांबवून पुस्तक खाली ठेवलं. राजाभाऊंनी कुतूहल म्हणून ते पुस्तक चाळलं तर ते बंगाली भाषेत छापलेलं होतं आणि अशोक त्यांना ते चक्क मराठीत वाचून दाखवत होता. राजाभाऊ चक्रावले. अशोकनं बंगालीवर इतकं प्रचंड प्रभुत्व मिळवलं आहे. तो इंटरसायन्स झाल्यावर कॉलेज सोडून देहू रोड डेपोत नोकरी करत होता. जवळजवळ दोन र्वष अशोक त्या ऑफिसात होता. तिथं एक बंगाली साहेब होता. त्याच्या मदतीनं अशोक प्रथम बंगाली शिकला. मग त्यानं बंगाली मासिकं, पुस्तकं वाचायचा सपाटाच लावला. आणि ओळखदेख नसताना सरळ बंगाली लेखकांशी पत्रव्यवहार सुरू केला. त्याला खूप बंगाली लेखक मित्र म्हणून मिळाले. त्याची गौरकिशोर घोष या ‘आनंदबझार पत्रिके’च्या सहसंपादकाशी खूप गट्टी जमली. अशोक दरवर्षी जानेवारीत कोलकात्याला जायचा नि गौरकिशोरकडेच उतरायचा. आणीबाणीमध्ये गौरकिशोर घोषला अटक करून स्थानबद्ध करण्यात आलं तेव्हा अशोक त्याच्यासाठी गुप्तपणे निधी घेऊन कोलकात्याला गेला. त्याच्या घरी देखभाल करण्यासाठी तीन महिने राहिला. या गौरकिशोरची ‘इसम’ नावाची कादंबरी अशोकनं मराठीत अनुवाद करून प्रासतर्फे प्रकाशित केली. ‘सीमाबद्ध’ आणि ‘जनअरण्य’ या शंकर या बंगालीतील लोकप्रिय लेखकाच्या कादंबऱ्या त्यानं मराठीत अनुवादित केल्या. या दोन कादंबऱ्यांवर सत्यजित राय यांनी बंगालीत सिनेमे काढले आहेत. ते जगभर खूप गाजले. ‘लज्जा’ आणि ‘फेरा’ (तस्लीमा नासरीन), ‘साईखडय़ांच्या खेळाची गोष्ट’ (माणिक बंदोपाध्याय), ‘घरंदाज गोष्टी’ (मोती नंदी), अमिताभ यांचं बंगाली चरित्र, ‘काके बोल नाटय़कला’ (शंभू मित्र) अशी पुस्तकं अशोकनं बंगालीतून मराठीत अनुवादित केली आहेत. इब्सेनच्या ‘एनिमी ऑफ द पीपल’ या नाटकाचा शंभू मित्र यांनी बंगालीमध्ये अनुवाद केला आहे. त्या अनुवादाचं मराठी भाषांतर अशोकनं केलं आहे.
गोविंद तळवलकर यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘मराठी अनुवादक’ या शीर्षकाचा लेख काही वर्षांपूर्वी लिहिला होता. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, ‘‘मराठीमध्ये चांगले अनुवादक एका हाताच्या बोटांएवढेच आहेत. आणि त्यात पहिलं नाव अशोक शहाणे यांचं आहे.’’ पु. ल. देशपांडे यांनाही अशोकबद्दल खूप आपुलकी होती. त्यांनी टागोरांच्या आत्मचरित्रातील ‘बालपण’ या भागाचा मराठी अनुवाद करताना अशोकचं ९० टक्के साहाय्य घेतलं. दुर्गा भागवत तर अशोकला पुत्रवत मानत. त्याच्या बौद्धिक क्षमतेचा दुर्गाबाईंना प्रचंड अभिमान होता. त्याच्या बंगाली वाङ्मयाच्या ज्ञानाचा त्यांनी फायदा करून घेतला.
..थोडक्यात काय, तर अशोक ग्रेट आहे! निदान मराठी साहित्यापुरता तरी!!
अशोक – द ग्रेट!
येत्या ७ फेब्रुवारी रोजी मराठीतील पहिल्या अनियतकालिकाचे संस्थापक-संपादक, ‘प्रास प्रकाशन’ या आगळ्यावेगळ्या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक, बंगाली भाषेचे उत्तम जाणकार आणि सतत नवनव्या...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-02-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok shahane of pras prakashan