– प्रशांत इंगोले
महाराष्ट्रात नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. आंबेडकरी पक्षांचा आणि आंबेडकरी विचारांचा प्रभाव मतांच्या राजकारणात कुठेही दिसला नाही, त्यामुळे ‘दलित राजकारण संपलं’ ही महाराष्ट्रात गेल्या २० वर्षांपासून केली जाणारी चर्चा पुन्हा सुरू झाली. आंबेडकरी राजकारणाचा आणि विचारांचा आवाका निवडणुकांपुरता मर्यादित करून चालेल का? मुळात महाराष्ट्राच्या (राज्यनिर्मिती नंतरच्या) राजकारणातली ‘आंबेडकरी चळवळ’ म्हणजे ‘दलित पँथर’ किंवा ‘नामांतर चळवळ’ एवढंच आकलन पुरेसं आहे का? मतांच्या राजकारणात पीछेहाट झाली म्हणून आंबेडकरवाद संपतो का?
‘आंबेडकरवाद’ हा बिंदू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित सामाजिक, राजकीय आणि आर्थिक तत्त्वज्ञान आहे. यामध्ये समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता यावर भर दिला जातो. हा विचार दलितांच्या, शोषितांच्या आणि वंचितांच्या उद्धारासाठी तसेच समाजातील भेदभाव नष्ट करण्यासाठी प्रेरणा देतो. दलित चेतना फक्त निवडणुकीतील राजकारणावरच भर देत नाही, तर सांस्कृतिक राजकारणात समता आणि मानवी हक्कांची बाजू मांडत ‘क्रांती आणि प्रतिक्रांती’ची चिकित्सा करते.
डॉ आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘भारताचा इतिहास हा बुद्धवाद आणि ब्राह्मणवाद यांच्यातील निरंतर चालत आलेला संघर्ष आहे.’ या विषयावर सतत वेगवेगळ्या माध्यमांद्वारे आपली भूमिका मांडली जात असल्याचे दिसून येत आहे. ‘दलितस् अॅण्ड द डेमोक्रॅटिक रेव्होल्यूशन (२०१४)’ या ग्रंथात, डॉ. गेल ऑम्व्हेट यांनी आंबेडकरवादी विचारसरणीला सामाजिक आणि राजकीय क्रांतीचं मुख्य साधन म्हणून संबोधलं आहे. त्या लिहितात, आंबेडकरवाद आज भारतातील एक जिवंत शक्ती आहे, जसा मार्क्सवाद आहे. जो दलित चळवळीच्या विचारसरणी आणि मोठ्या प्रमाणात एक व्यापक जातिअंताच्या चळवळीची व्याख्या करतो. नकारात्मकदृष्ट्या न बघता आंबेडकरी चळवळीकडे सकारात्मकतेने पाहण्याची गरज आहे. २१ व्या शतकातील तंत्रज्ञानात पारंगत असलेला दलित तरुण हा जातीवर आधारित समाजरचनेवर प्रहार करीत स्वत:ची सांस्कृतिक अर्थव्यवस्था तयार करताना दिसून येत आहे. या नव्याने उभ्या होत असलेल्या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून जी काही सांस्कृतिक उत्पादनं (कल्चरल प्रोडक्ट) निर्माण होत आहेत, त्याचा मानवतावादी, समतावादी दृष्टीकोनातून सामाजिक परिणाम लोकांना अनुभवायला मिळेल. आंबेडकरी चळवळीची जी नवी अभिव्यक्ती निर्माण होत आहे ती म्हणजे, सामाजिक चळवळ आणि सांस्कृतिक संघर्षातून राजकीय सत्ता स्थापित करता येईल, या दृष्टीकोनातून होत असलेला प्रवास आहे.
१९८० नंतर आंबेडकरी चळवळीमध्ये जे काही महत्त्वाचे बदल झालेत ते दोन टप्प्यांत दिसून येतात. एक म्हणजे १९९० नंतर उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण याचा झालेला परिणाम; आणि दुसरा बदल म्हणजे २०१० नंतर समाजमाध्यमांमुळे निर्माण झालेला आभासी संघर्ष. परिणामत: स्थानिक वास्तव जागतिक करून उदासीन गटात एक नवसंघर्षाची चेतना कुठे तरी निर्माण करता आली.
हेही वाचा – पडसाद: केवळ मतांसाठी लोकानुनय
शिक्षणामुळे ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ आले असा शहरी आणि स्वत:ला आंबेडकरी म्हणवणारा मध्यमवर्गीय समाज आज स्वकेंद्रित होताना दिसत आहे. एवढंच नाही तर तो भांडवलवादी व्यवस्थेत स्वत:ला कुठे ना कुठे ‘स्थिरस्थावर’ करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे… ’ हे माझंच तीन वर्षांपूर्वीचं (२०२१) ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेल्या लेखातील निरीक्षण. हे जरी खरं असलं तरी हा शहरी-आंबेडकरी समाज आज इंग्रजीमध्ये अभ्यास आणि अभिव्यक्ती (आंबेडकराइट स्कॉलरशिप/ एक्स्प्रेशन) करीत असल्यानं त्याचं आवाहन एका राज्याच्या निवडणुकीपुरतं कसं मर्यादित करता येईल! देशभरात एक नेटवर्क कार्यरत होताना गेल्या काही वर्षांत दिसलेलं आहे.
नवी अभिव्यक्ती, सांस्कृतिक अर्थव्यवस्था
जातीआधारित व्यवस्थेमध्ये मानव असून अमानवी वागणुकीच्या संघर्षातून एक जातीविरोधी फुले-आंबेडकरी प्रेरणेनं फुललेलं आणि बाबुराव बागुल, शरणकुमार लिंबाळे यांनी मांडलेल्या सौंदर्यशास्त्राचा आधार घेत नव-अभिव्यक्ती उभी राहताना दिसत आहे. दलित सिनेमा, आर्ट गॅलरीज, दलित रॅप किंवा हिपहॉप, दलित स्टॅण्डअप कॉमेडी, शॉर्ट फिल्म्स आणि गाणी आणि ‘आर्ट फेअर’मध्येही दिसणारी ‘दलित आर्ट’ (विक्रांत भिसे, सुनील अभिमान अवचार) तसेच नीरज घायवान, पा. रंजित, नागराज मंजुळे, राजश्री गुडी, संजीव सोनपिंपरे, मनजीत सरकार, विपीन तातड, सिद्धेश गौतम, मालविका राज, जय सगाठिया यांची कला काय सांगते? ही नवी अभिव्यक्ती लोकप्रिय करणाऱ्यांचं सामाजिक आणि आर्थिक बॅकग्राउंड साधारणपणे काय असतं? या अभिव्यक्तीचा वैचारिक दर्जा काय आहे? यातून आंबेडकरवाद पुढे जातोय अशी आशा आहेच. ती कशामुळे? या सगळ्या कलावंतांचं ‘इंटरनॅशनल एक्स्पोजर’सुद्धा वाढतंय. त्याला कारणं काय? हे वेगवेगळे प्रश्न उभे राहतात. शिक्षणामुळे झालेला बदल, त्यामधून आलेलं आर्थिक स्वातंत्र्य आणि आंबेडकरी विचार जे पूर्वी शाहिरी आणि जलसा या लोकमाध्यमातून प्रचारित तसेच प्रसारित होत असत, त्या माध्यमांची जागा या नव-अभिव्यक्तीनी घेतली आहे असे दिसते. त्याचबरोबर जातीत भरडल्या गेलेल्या आणि जर्जर झालेल्या माणसांना आत्मविश्वास, आंबेडकरी आशावाद निर्माण करत ‘निळ्या पहाटेचं’ स्वप्न साकार होण्यास ही नवी अभिव्यक्ती प्रेरणा देते. एवढेच नाही तर आंबेडकरवादी चळवळ फक्त भारतापुरती मर्यादित न राहता, जगभरातील शोषित वर्गांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. या सर्व कलेचं आंतरराष्ट्रीयीकरण देखील होताना दिसत आहे. त्याचं कारण असं- आंबेडकरी तरुण विदेशात उच्च-शिक्षण घेण्यासाठी जात आहे, त्यामधून एक स्वतंत्र नेतृत्व तयार होत आहे. त्याचबरोबर एक बौद्धिक वर्ग म्हणून समाजाला नवीन दिशा देण्याचं काम करीत आहे. हे तरुण शिक्षण घेत घेत आपल्या समाजातील कलाकारांना एक मंच पुरवण्याचं काम सक्षमपणे करताना दिसत आहेत.
दुसरीकडे, इंग्रजी पुस्तकांमध्ये एक नवी क्रांतीच गेल्या सुमारे १५ वर्षांत दिसली. नवयाना पब्लिकेशन, शेअर्ड मरर पब्लिशिग हाऊस या पर्यायी प्रकाशनसंस्था सुरू झाल्या. त्या ‘अल्टरनेटिव्ह पब्लिशिंग हाऊस’नं जशी पुस्तकं काढली तशीच आता ‘पेन्ग्विन’, ‘ब्लूम्सबरी’ यांसारख्या संस्था प्रकाशित करू लागल्या आहेत. अनेक नव-लेखकांचा उदय झाला. ‘बुक लाँच’ कार्यक्रम विविध महानगरांत होऊ लागले. शैलजा पाईक यांना ‘दलित स्त्रियांचं आंबेडकरी योगदान आणि त्यांच्या जागृतीचा इतिहास’ या संशोधनासाठी जॉन डी. आणि कॅथरिन टी. मॅकआर्थर फाऊंडेशनकडून ‘मॅकआर्थर फेलोज् प्रोग्राम’ची ‘जिनियस ग्रांट’ ही फेलोशिप मिळाली. जी अमेरिकेतील विविध क्षेत्रांतील विद्वानांना दरवर्षी दिली जाते. हे एक आंबेडकरी चळवळीचं जागतिक पातळीवरचं यश म्हणावं लागेल. सोबतच नॉन-दलित स्कॉलर्सही आंबेडकरांच्या योगदानावर इंग्रजीत पुस्तकं लिहू लागले. आजच्या घडीला जर बघितलं तर आंबेडकरांचा एक करन्सी (चलन) आणि कॅपिटल (भांडवल) म्हणूनसुद्धा काही लोक वापर करताना दिसत आहेत. पण त्या लोकांनी स्वत:ला किती प्रमाणात निजात (डीकास्ट) केलं आहे, हा चर्चेचा विषय आहे. मुख्य म्हणजे, विद्यापीठांमध्ये ‘दलित स्टडीज्’, ‘क्रिटिकल कास्ट स्टडीज्’ यांबद्दल जाग येऊ लागली आहे. अनेक ‘आंबेडकर स्कॉलर्स’ आज निरनिराळ्या प्रकारे संशोधन करत आहेत. त्यांच्या अभ्यासाचा उपयोग आजवरच्या अभ्यासांपेक्षा भिन्न पद्धतीनं होताना दिसेल. हे तेव्हाच होईल जेव्हा सामाजिक क्रांतीसाठी आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाजातील बुद्धिजीवी वर्ग विचारपरिवर्तनाचे कार्य करीत राहील.
हेही वाचा – बालमैफल : चमक लाडू
प्रेरणा सूर्याची…
जे लोक दलित राजकारण संपलं असं म्हणतात त्यांना प्रश्न पडायला पाहिजे की, आजघडीला ज्या काही निवडणुका होत आहेत किंवा होऊ घातल्यात त्यामध्ये जातिअंताचा मुद्दा पूर्णपणे दिसेनासा झाला आहे. कोणताही राजकीय पक्ष सामाजिक लोकशाही, आर्थिक समानता, जाती-संस्थेचं उच्चाटन यांवर भाष्य करताना दिसत नाही, तर जातीचं राजकारण दृढ करून आपला आणि आपल्या जातबांधवांचा फायदा कसा होईल, यावर भर देताना दिसत आहे. आजघडीला राजकीय पक्ष धर्माचा आधार घेऊन राजकारण करताना दिसतात आणि ही नीती समाज-विघातक ठरू शकते, हा इशारा डॉ. आंबेडकरांनी संविधानसभेत दिलेला होता. इतर जातीआधारित पक्ष जर सोडून दिले तर स्वत:ला आंबेडकरी म्हणवणारे पक्ष निजात होऊन एक जातिअंताच्या दिशेने लढा उभारायला तयार आहेत का? याबाबत विचारमंथन होणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकरांना सूर्य म्हटलं जातं. ज्यांनी दलितांच्या, शोषितांच्या जीवनात एक नवीन पहाट निर्माण केली आणि त्या सूर्याची प्रेरणा घेऊन सत्तेच्या राजकारणात यश मिळालं नाही, तरीसुद्धा धोरण-निर्मितीत प्रभाव वाढवणं, हे आंबेडकरवादाचं नवं ध्येय असू शकतं. चळवळ म्हणजे फक्त मोर्चे काढणं नसेल, तर नव्या अभिव्यक्तीतून अन्यायाला वाचा फोडता येईल. सामाजिक चळवळ आणि सांस्कृतिक संघर्षातून राजकीय सत्ता स्थापित करता येईल. विपीन तातडच्या शब्दांत या नवीन अभिव्यक्तीची ‘झुंड’ आहे.
‘‘अठरा पगड़ लगते जिगर
हार्ड हीटर पट्टी पीटर…
गली के गटर से
उभर के चमक के
आयेला झुंड’’
prashantingole23@gmail.com
(लेखक ह्युमॅनिटीज् अॅण्ड सोशल सायन्स, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च मोहाली IISER- M- येथे व्याख्याता आहेत.)