डॉ. वरुण भालेराव

गेल्या काही दिवसांत आपण अंतराळवीरांबाबत तीन वेगवेगळ्या बातम्या ऐकल्या असतील. त्यातली पहिली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात या वर्षी पहिला भारतीय भेट देईल त्याविषयीची. ‘अॅक्झिअम मिशन-४’ अंतर्गत त्याचा अंतराळात अभ्यास चालेल. दुसरी बातमी ‘गगनयान मिशन’मध्ये पुढील वर्षी भारत स्वत:च्या रॉकेटच्या साह्याने आपला अंतराळवीर अवकाशात पाठवेल, त्याबाबतची. तिसरी म्हणजे तब्बल नऊ महिने अंतराळात अडकल्यानंतर मार्च महिन्यात सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर पृथ्वीवर परत आले, त्याबाबत जगभरातील माध्यमांतून आनंद साजरा करण्यात आला त्याची. अंतराळ हे आपल्या सगळ्यांना लांबच लांब असल्याचे वाटत असले, तरी सर्वांसाठी त्याबाबतचे कुतूहल आणि जिव्हाळा सारख्याच प्रमाणात दिसतो. आकड्यांच्या भाषेत शोधले तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे पृथ्वीपासून साधारणत: चार-पाचशे किमी इतक्या अंतरावर आहे. म्हणजे साधारणत: मुंबई-नागपूूर इतक्या अंतराएवढीच ही उंची. त्यापेक्षा कमी अंतरावर जेव्हा सुनीता विल्यम्स होत्या, तेव्हासुद्धा अमेरिकेसारखा देश- जो साठच्या दशकापासून मानवासह अंतराळ कार्यक्रम राबवतोय त्यांना विल्यम्स यांच्या उतरण्यातील अडचणी सोडविण्यासाठी नऊ महिने लागले. हे इतके अवघड नेमके कशामुळे बनले होते? तर अंतराळ ही मनुष्याला ज्ञात वातावरणापेक्षा सर्वाधिक कठीण वातावरण असलेली बाब. तिथे बाहेर निर्वात अवस्था. सूर्याकडून येणाऱ्या किरणांचा जाचदेखील. पण सर्वात कठीण गोष्ट म्हणजे वेग जमवून ठेवणे आणि त्या वेगाने अंतराळातील इतर कोणत्या घटकांशी टक्कर होण्यापासून स्वत:ला वाचवणे. हे सगळे इतके किचकट असतानादेखील आपण असे म्हणत आहोत की, पुढील वर्षी भारताच्या स्वत:च्या अंतराळ मोहिमेचा आरंभ होईल. अन् त्यात भारतीय अंतराळवीराला आपण अवकाशात पाठवू. हे आपण नक्की कसे करू शकणार? तर त्यासाठी आपल्या अवकाश मोहिमेच्या विकासाच्या विविध टप्प्यांकडे पाहावे लागेल.

साठच्या दशकात आपण अंतराळ संशोधनात पाऊल ठेवले. १९६२ मध्ये ‘इन्कोस्पार’ म्हणजे भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीची स्थापना झाली. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली या समितीने काम केले. पुढे त्याचे (१९६९) ‘इस्राो’मध्ये रूपांतर झाले. साठचे दशक हे देशासाठी कठीण होते. चीन आणि पाकिस्तानशी याच काळात युद्ध झाले. अन्न-धान्य टंचाई निर्माण झाली. त्यानंतर ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा लोकप्रिय बनली. याच वेळी काही शास्त्रज्ञांचे म्हणणे होते की, देशाची प्रगती करायची असेल तर भारताला स्वत:चा ‘अंतराळ कार्यक्रम’ ठरविणे गरजेचे आहे. जगाच्या दृष्टीने भारताची बुद्धिमत्ता सिद्ध करण्याचा तो मार्ग ठरेल. या दृष्टीने विचार करून त्यांनी भारतात पहिले अवकाश संशोधन सुरू केले. त्यात कालांतराने प्रगती होत राहिली. त्यानंतर काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आपल्याला कृत्रिम उपग्रह, अंतराळयान बनवायचे आहेत हे तर ठरले होतेच, पण या सर्व संशोधनाचे ध्येय हे १०० टक्के नागरी उपयोगाकरिता ठेवण्यात आले. जगातील अनेक राष्ट्रांमध्ये संरक्षण आणि नागरी उपयोजन या दोन्ही बाबी अंतराळ संशोधन केंद्रात राबविल्या जातात. भारताने मात्र या दोन्ही गोष्टी परस्परांपासून वेगळ्या केल्या. हौस किंवा संशोधनचूष म्हणून अवकाश अभ्यास आपण स्वीकारला नाही, तर त्यातून देशाचे काही तरी भले व्हायला हवे, हा दृष्टिकोन या संशोधनाबाबत कायम ठेवला. त्या सगळ्याची चांगली फळे आपल्याला आज मिळत आहेत.

आपल्या अवकाश संशोधनाचे उपयोजन हे युद्धासाठी होणार नव्हते. जनसामान्यांसाठी त्याचा वापर होणार होता, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला अनेक बाजूंनी आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळाले. बऱ्याच देशांनी आपल्याला मदत केली. त्यांच्या संशोधकांनी आपल्याला तंत्रज्ञानाची माहिती पुरवली. रॉकेट्स आणि उपग्रह तयार करण्याचे ज्ञान आपल्याला या मित्रराष्ट्रांकडून विकसित करता आले. त्यामुळे १९ एप्रिल १९७५ रोजी पहिला भारतीय कृत्रिम उपग्रह ‘आर्यभट्ट-१’ भारताने रशियाच्या मदतीने अवकाशात सोडला. सोव्हियत संघराज्यातील आणि आताच्या रशियामधील ‘कापुस्टीन यार’ या अवकाश केंद्रावरून १९ एप्रिल १९७५ रोजी त्याचे उड्डाण झाले. हा भारताकडून एक खगोलशास्त्रीय प्रयोग होता. ‘क्ष’ किरणे सोडणाऱ्या विविध स्राोतांसह सूर्याचा अभ्यास त्यातून होणार होता. त्या काळात आर्यभट्टवर जे काम केले गेले, त्यातून आपल्या संशोधकांना विविध प्रकारचे उपग्रह कसे बनविण्यात येतात, त्याच्या आतील प्रणाली काय असतात, त्या कशा चालवाव्यात, अंतराळातून माहितीचा तपशील (विदा) पृथ्वीवर कसा आणावा याबद्दलचा उलगडा झाला. त्यातून आपण ‘आयआरएस’ (इंडियन रिमोट सेन्सिंग) आणि ‘इन्सॅट’ (इंडियन नॅशनल सॅटेलाइट सिस्टीम) मालिकेतील उपग्रह आणि इतर अनेक उपग्रहांची निर्मिती केली. ‘रॉकेट तंत्रज्ञान’ आपण परदेशातून आयात केले, त्यातून शिकत शिकत पुढे उपग्रह प्रक्षेपक (सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल, जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल) आपण स्वत: तयार केले. ‘जीएसएलव्ही’साठी (भू-समकालिक उपग्रह प्रक्षेपक) आपल्याला क्रायोजनिक तंत्रज्ञानाची गरज होती. ते आपल्याला जगातून कुणीच द्यायला तयार नव्हते; तेव्हा आपल्या संशोधकांनी स्वत: त्याबाबतचे पूर्ण तंत्रज्ञान भारतातच विकसित केले. आता त्याआधारे भारताचे भरपूर उपग्रह आणि रॉकेट्स वापरात आहेत.

या अंतराळ कार्यक्रमांचा फायदा नागरी उपयोजनाच्या आपल्या भूमिकेमुळे आपल्या प्रत्येकाला होतोय. तो कसा? तर साधारणत: २५ वर्षांपूर्वी दरसाली चक्रीवादळाच्या तडाख्यांची बातमी हमखास वाचायला मिळत असे. चक्रीवादळामुळे जीवितहानी, किनाऱ्यालगतच्या घरांचे नुकसान, गावांची धूळधाण, मच्छीमारांसह बुडणाऱ्या होड्या या दुर्घटना आपल्याला रोखता येणे अशक्य होते. कारण त्यांचे अचूक भाकीत आपल्याला करता येत नव्हते. आता आपल्याला या बातम्या वाचायला मिळत नाहीत. कारण आपल्या उपग्रहांनी पाठविलेल्या माहितीद्वारे चक्रीवादळ तसेच हवामानाचा अचूक अंदाज काढता येतो. सध्या हवामान विचित्र अवतार धारण करतेय. चक्रीवादळे वाढत चालली आहेत. पण हवामान मापन करणारे आपले उपग्रह आपल्याला सजग ठेवतात, त्यामुळे नैसर्गिक आपत्तीकाळात बचावकार्य आधीपासून सक्रिय झालेले असते. त्यांतून प्राण आणि वित्तहानीचे संरक्षण करता येणे शक्य झाले आहे. दैनंदिन वापराच्या क्षेत्रातही उपग्रह वाहिन्या आपण टीव्हीवरून रोज पाहतो. त्यादेखील आपण स्वत: बनवून अवकाशात सोडलेल्या आहेत. अनेकांना कदाचित माहिती नसेल की, ‘इस्राो’चे ‘भुवन’ नावाचे एक संकेतस्थळ आहे. त्यात इस्राोच्या कार्यप्रणालीचा विदा (तपशील) डाऊनलोड करून आपल्याला वापरता येते. आपला अंतराळ कार्यक्रम नागरी उपयोगासाठी नसता तर हे केवळ अशक्य होते. आपल्या सगळ्यांच्या मोबाइलमध्ये ‘जीपीएस’ (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) असते, ती पूर्णत: परदेशी प्रणाली आहे. त्याऐवजी भारताने ‘नाविक’ आणि ‘आयआरएनएसएस’ (इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम) काही वर्षांपूर्वी विकसित केली आहे. त्यामुळे भारताचे आता यासाठी इतर देशांवरील अवलंबित्व बिलकूलच नाही. आपली स्वत:ची ‘जीपीएस’ यंत्रणादेखील आपण उभारलेली आहे.

चंद्रयान, मंगळयान या मोहिमांबद्दल आपण माध्यमांतून बरेच ऐकलेले आहे. ‘आदित्य एल-१’, ‘अॅस्ट्रोसॅट’ यांसारख्या खगोलीय उपग्रहांचीदेखील अनेकांना माहिती असते. त्यांतून येणाऱ्या माहितीचा, होणाऱ्या अभ्यासाचा विषय शास्त्रज्ञांच्या मंथनापर्यंत सीमित असला तरी त्यामुळेदेखील आपल्या शास्त्रज्ञांची आणि आपल्या खगोल विज्ञानातील जाणिवांची महत्ता जागतिक पातळीवर वाढली. उदा. चंद्रयान-३ जेव्हा चंद्रावर उतरले तेव्हा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपल्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ उतरणारी ही पहिलीच यशस्वी मोहीम होती. तिथे जाऊन चंद्रयानाच्या विविध उपकरणांनी जे मापन केले, त्यातून चंद्र कसा निर्माण झाला, त्याचा भौगोलिक इतिहास काय, याबाबतची संपूर्ण जगाची समज बदलणारी विदा-माहिती (डेटा) आपल्याला प्राप्त झाली. आपल्या सगळ्या उपग्रहांतून वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचे शोध लागतायत.

आता भारतीय अंतराळ कार्यक्रम हा जगाच्या खांद्याला खांदा भिडवत पुढे चाललेला आहे. आज परिस्थिती अशी आहे की, विविध देशांतील संशोधकांना भारतीय अंतराळ संशोधकांबरोबर काम करण्याची इच्छा आहे. कारण आपल्याकडेदेखील त्यांच्याच तोडीचे विज्ञान, तंत्रज्ञान, तंत्रज्ञ उपलब्ध आहेत. पूर्वी आपल्याला अंतराळ विज्ञानात तितके महत्त्व दिले जात नव्हते. आता आपल्याकडे जगाकडून संशोधन साहाय्यक (पार्टनर्स) म्हणून पाहिले जाते. या विज्ञान-तंत्रज्ञान सहकार्यामध्ये आपण सगळ्यांबरोबर काम करीत आहोतच, पण आपल्याला जगाच्या पुढे जायची इच्छा आहे. अंतराळ तंत्रज्ञानात आपल्याकडे गेल्या काही पिढ्यांमधील शास्त्रज्ञांनी जे काम करून ठेवलेले आहे, त्या पायावर आजची पिढी आणखी पुढे जायची स्वप्ने बघत आहे.

याचे सर्वात ताजे उदाहरण घ्यायचे झाले, तर ‘दक्ष’ नावाची खगोल दुर्बीण (स्पेस टेलिस्कोप) बनवायचा प्रस्ताव काही शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन सादर केला. त्यावर ‘इस्राो’ सध्या विचार करीत आहे. खगोल दुर्बीण म्हणजे काय, तर साध्या दुर्बिणीचा आपण विचार करतो, तेव्हा सहसा दृश्य प्रकाशात (ऑप्टिकल लाइट) काम करणारी हा तिचा साधारण अर्थ. त्या बहुतांश जमिनीवरच्याच अभिप्रेत असतात. मात्र खगोलीय स्राोतांचा विचार करताना दृश्य प्रकारांबरोबरच अवरक्त किरण (इन्फ्रारेड रेज), अतिनील किरण (अल्ट्राव्हायोलेट) रेडिओ, एक्स-रे, गॅमा रेच्या विविध तरंगलांबीच्या प्रकाशाचे उत्सर्जन होते. यातील एक्स-रे, गॅमा रे प्रकाश हा पृथ्वीच्या वातावरणात पूर्णपणे शोषला जातो. जमिनीपर्यंत पूर्ण पोहोचत नाही. त्यामुळे त्या तरंगलांबींमध्ये स्राोतांचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला अंतराळात जाणे अनिवार्य असते. त्यासाठी वेगवेगळ्या देशांनी विविध प्रकारच्या खगोल दुर्बिणी अंतराळात सोडल्या आहेत. साधारण दहा वर्षांपूर्वी भारताकडून सोडण्यात आलेली ‘अॅस्ट्रोसॅट’ ही दुर्बीण याच प्रकारातील. त्यातून अनेक महत्त्वपूर्ण शोध लागले आहेत. आता, आयआयटी मुंबई, पीआरएल अहमदाबाद, आयुका पुणे आणि बेंगळूरुचे रमण रिसर्च इन्स्टिट्यूट या चार संस्थांनी इस्राोच्या साह्याने ‘दक्ष’ नावाच्या एक्स-रे आणि गॅमा रे यांच्यावर काम करणाऱ्या दोन खगोल दुर्बिणी या अंतराळात प्रक्षेपित करण्याचे प्रस्तावित आहे. जगात कुठल्याही देशाने बनविलेल्या दुर्बिणींपेक्षा या दुर्बिणींचे तंत्रज्ञान हे दहा पटींनी सक्षम असेल. ‘इस्राो’ने इतकी दशके जे कष्ट केले आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाला जगात ज्या उंचीवर नेले, त्यामुळे आपण जगाच्या बरोबरीनेच नाही, तर पुढेच जायचे स्वप्न पाहत आहोत.

हे सारे झाले इस्राोचे कार्य. आता यापुढे काय असेल?

तर जगभरात अंतराळ विज्ञान हा झपाट्याने वाढणारा आणि प्रगतीचा विषय ठरतोय. ‘स्पेस एक्स’ कंपनीच्या ‘स्टारलिंक’ उपग्रहाबद्दलची चर्चा गेल्या काही वर्षांत जोरात सुरू आहे. गेल्या पन्नास वर्षांत काही देशांनी मिळून जिथे आजपर्यंत काही हजार उपग्रह सोडले, तिथेच आता खासगी कंपन्या हजारो उपग्रह सोडण्याची स्वप्ने बघत आहेत. उपग्रह आणि रॉकेट बनविण्याची जबाबदारी पूर्वी देशाची आणि सरकारी यंत्रणांची असे, त्या क्षेत्रात आज खासगी कंपन्यांची गुंतवणूक घडत आहे. याच गोष्टीचा भारतीय खासगी कंपन्यांना लाभ घेता यावा म्हणून सरकारने ‘इनस्पेस’ म्हणजेच इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अॅण्ड ऑथरायझेशन सेंटर’ अशी नवी संस्था उभारली. ज्याद्वारे भारतातील वेगवेगळ्या कंपन्या आणि नवउद्यामी (स्टार्टअप्स) यांना उपग्रह, रॉकेट्स यांच्यासाठी काम करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. सध्या भारतात चारशेहून अधिक स्टार्टअप्स कंपन्या अंतराळ आणि त्यासंबंधित तंत्रज्ञानावर काम करीत आहेत. रॉकेट बनविण्यापासून ते उपग्रहांपासून मिळणाऱ्या विदांचा अभ्यास करणे, पर्यावरण भाकितांवर काम करण्यापासून भूमापनासंबंधित बाबींचा तपशील एकत्र करणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप आहे. बिघाड झालेल्या उपग्रहांना अवकाशातच दुरुस्त करता येईल का, जे उपग्रह बंद पडलेत त्यांना बाजूला करता येईल का, यावरही ही स्टार्टअप्स काम करीत आहेत. हे सगळे मिळूनच आपल्या भारतीय अंतराळ तंत्रज्ञानाला आणखी पुढे पोहोचवतील यात जराही शंका नाही.

अवकाश विज्ञान विकासाचे टप्पे…

– ‘इस्रो’ची निर्मिती

‘इन्कोस्पार’ म्हणजे भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीची १९६२ मध्ये स्थापना झाली. तिचे १५ ऑगस्ट १९६९ रोजी ‘इस्रो’मध्ये म्हणजेच ‘इंडियान स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’मध्ये रुपांतर झाले. विविध राष्ट्रीय गरजांसाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा विकास तसेच उपयोग हे ‘इस्रो’चे मुख्य ध्येय

– उपग्रह कार्यक्रम

भारताच्या उपग्रह कार्यक्रमाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने १९ एप्रिल १९७५ रोजी झाली. रशियाच्या मदतीने आपण इतिहासात पहिल्यांदा ‘आर्यभट्ट’ हा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला. उपग्रह निर्मिती तसेच प्रक्षेपण क्षमता दाखवून देण्यासाठी भारताने केलेला हा प्रयोग. ‘क्ष’ किरणे उत्सर्जित करणाऱ्या विविध स्रोतांसह सूर्याचा अभ्यास या उपग्रहाद्वारे झाला. भारतीय शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास यातून दुणावला आणि अंतराळ कार्यक्रमाच्या प्रगतीची दारे उघडली गेली.

– आयआरएस आणि इन्सॅट

‘इंडियन रिमोट सेन्सिंग’ उपग्रह किंवा ‘आयआरएस’ ही इस्रोद्वारे अवकाशात सोडण्यात आलेली उपग्रहांची मालिका. त्यांचा आरंभ १९८८ पासून झाला आणि २०१९ पर्यंत भारतातील नैसर्गिक संपदेचे निरीक्षण या उपग्रहांमार्फत झाले. जल व्यवस्थापन, शहरी विकास, पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापनाकरिता त्याचा वापर झाला. ‘इन्सॅट’ म्हणजे ‘इंडियन नॅशनल सॅटेलाईट सिस्टिम’ त्यांचे प्रक्षेपण १९८३ पासून सुरू झाले. दूरसंचार सेवा सक्षम करण्यासाठी, हवामानशास्त्रात अधिक प्रगती करण्यासाठी आणि आपत्तींमधील बचावकार्यात या उपग्रहांचा उपयोग झाला.

– ‘पीएसएलव्ही’ प्रक्षेपक…

‘ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन’ म्हणजेच ‘पीएसएलव्ही’ हे ‘लिक्विड स्टेज’ (तरल टप्पे) असलेले पहिले भारतीय उपग्रह प्रक्षेपक मानले जाते. १९९४ पासून त्याचा आरंभ झाला. पीएसएलव्हीद्वारे भारतीय तसेच परदेशी उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले. चंद्रयान – १ आणि ‘मार्स ऑर्बिटर’ हे त्याद्वारेच अवकाशात सोडले गेले.

– ‘जीएसएलव्ही’ प्रक्षेपक

‘जीएसएलव्ही’ म्हणजे भू-समकालिक उपग्रह प्रक्षेपक. इस्रोने केलेले हे स्वदेशी तंत्रक्षान. उपग्रहांना पृथ्वीच्या बाह्य कक्षेत (geosynchronous orbit) पोहोचवण्यासाठी ते मदत करते. दूरदर्शन, संचार आणि हवामान अंदाज यांसारख्या कामांसाठी सोडल्या जाणाऱ्या उपग्रहांना हे उपयुक्त ठरले. १८ एप्रिल २००१ रोजी त्याची पहिल्यांदा यशस्वी चाचणी झाली.

– क्रायोजेनिक तंत्रज्ञान

क्रायोजेनिक तंत्रज्ञान म्हणजे कमी तापमान. हा शब्द स्वत: शून्यापेक्षा कमी तापमानाच्या तंत्रज्ञानाबाबत वापरला जातो. अंतराळ कार्यक्रमाच्या प्रगतीसाठी याची आपल्याला आवश्यकता होती. फक्त अमेरिका, जपान, फ्रान्स, रशिया आणि चीनकडेच हे तंत्रज्ञान होते. आपल्याला या तंत्रज्ञानाची मदत नाकारण्यात आली. भारतीय शास्त्रज्ञांनी २००३ मध्ये पहिली यशस्वी क्रायोजेनिक इंजिन चाचणी करून हे तंत्रज्ञान स्वत:च विकसित केले.

– चंद्रयान – ३ चे यश

ऑगस्ट २०२३ मध्ये चंद्रयान -३ मोहीम यशस्वी झाली. या मोहिमेमुळे भारत चंद्राच्या दक्षिणी ध्रुवीय भागात यशस्वीरीत्या उतरणारा पहिला देश बनला. या मोहिमेत ‘विक्रम लॅण्डर’ आणि ‘प्रज्ञान रोवर’ चंद्रावर उतरले आणि त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावरील माहिती गोळा केली. चंद्र कसा निर्माण झाला, त्याचा भौगोलिक इतिहास याबाबतची संपूर्ण जगाची समज बदलणारी माहिती या मोहिमेतून मिळाली.

– आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात….

या वर्षी शुभांशू शुक्ला ‘अॅक्झिअम मिशन – ४’ अंतर्गत आंतराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचतील. आतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे भारताचे ते पहिले अंतराळवीर ठरतील, इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांपैकी एक म्हणून ते भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण प्रयत्नाचा भाग असणार आहेत.

– प्रस्तावित ‘दक्ष’ दुर्बीण…

आयआयटी मुंबई, पीआरएल अहमदाबाद, आयुका पुणे आणि बेंगळुरुचे रमण रिसर्च इन्स्टिट्यूट या चार संस्थांकडून इस्रोच्या साह्याने ‘दक्ष’ नावाच्या एक्स-रे आणि गॅमा रे यांच्यावर काम करणाऱ्या दोन खगोल दुर्बिणी या अंतराळात प्रक्षेपित करण्याचे प्रस्तावित आहे. जगातील परमोच्च शक्तीची ही दुर्बीण ठरेल.

– महत्त्वाचे दुवे….

‘इस्रो’चे ‘भुवन’ नावाचे संकेतस्थळ. त्याला भेट दिल्यास आपण अंतराळ विज्ञानात किती सक्षम झालो आहोत, याचा दाखला मिळू शकेल. दुसरा दुवा जगातील परमोच्च क्षमतेच्या भारतीय बनावटीच्या (प्रस्तावित असलेल्या) ‘दक्ष’ दुर्बिणीबाबतचा. त्याविषयीचा अधिक तपशील तेथे पाहता येईल –

https://bhuvan.nrsc.gov.in/home/index.php
https://www.dakshasat.in/

(लेखक ‘आयआयटी बॉम्बे’ येथील खगोलभौतिकशास्त्रज्ञ आहेत.)

varunb@iitb.ac.in