सुसंस्कृत मराठी प्रांगणात हसण्यासाठी फार कारणं नव्हती त्या काळात चित्रकार शिवराम दत्तात्रेय फडणीस यांनी हास्यचित्रकलेला प्रतिष्ठा दिली. चेहऱ्यावर त्रासाचे, कधी आश्चर्याचे, संगीत, चित्रकला आणि प्रेमातही तल्लीन होण्याचे, तर कधी समाधानाचे भाव असलेल्या अडचणींमधील व्यक्ती चितारत गेली. चौऱ्याहत्तर वर्षे सलग शि. द. फडणीस आपल्या रेषांनी सर्वांना हसवत आहेत. पाठ्यपुस्तकांतील गणित सोपे करून सांगणाऱ्या त्यांच्या बोलक्या वल्लीरेखा, दिवाळी अंकांची रूपरेषा मांडणारी विनोदसंकल्पना किंवा जाहिरातींमधून दिसणारी अचाट कल्पकता पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटवतेच. रंगरेषांच्या दुनियेत आजही सक्रिय असलेल्या फडणीस यांच्या शताब्दी वर्षानिमित्त एका आकर्षक चित्रसंसारावर व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांचा दृष्टिक्षेप. त्याचबरोबर त्यांनीच घेतलेला या कलाजगताचा शंभर वर्षांचा आढावा…

मराठी म्हणण्यापेक्षा भारतीय व्यंगचित्रकलेच्या दृष्टीने १९५१ साली एक फार महत्त्वाची गोष्ट घडली. त्या वेळी मुंबईत राहात असलेले साक्षेपी संपादक अनंत अंतरकर यांनी एक धाडस केलं. त्यांच्याकडे नियमितपणे साधी हास्यचित्रं काढणाऱ्या एका नवशिक्या, तरुण चित्रकाराचं त्यानेच पूर्वी काढलेले एक हास्यचित्र रंगवून द्यायला सांगितलं. किडकिडीत देहयष्टी, मोठं सरळ नाक, मोठ्या चष्म्यातून समोरच्या व्यक्तीचे स्कॅनिंग करणारे निळसर डोळे आणि चेहऱ्यावर मिश्कील हास्य असणाऱ्या त्या तरुणाचं जून ५१ च्या ‘हंस’च्या मुखपृष्ठावर रंगीत हास्यचित्र प्रकाशित झालं. चौपाटीवर भेळ खाणाऱ्या मुलीची ओढणी वाऱ्याने उडते आणि तिच्या दुसऱ्या टोकाला एक तरुण त्यात चुरमुरे वगैरे भरून भेळ खातोय असं हे चित्र प्रकाशित झालं आणि फारच अनपेक्षितरीत्या ‘मुखपृष्ठावर हास्यचित्र’ ही कल्पना वाचक, वितरक, जाहिरातदार, लेखक, संपादक या साऱ्यांना एकदम आवडून गेली. अंतरकरांचाही हुरूप यामुळे वाढला. चित्रकार सुखावला.

Rahul Gandhi On Somnath Suryavanshi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा गंभीर आरोप, “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानेच त्याची हत्या…”
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
atrocities committed on name of religion in world are due to misconceptions says Sarsangchalak mohan bhagwat
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, “चुकीच्या समजुतीतून धर्माच्या नावाखाली अत्याचार…”
Pankaja Munde and Dhananjay Munde vs Suresh Dhas new controversy on political stage after elections
मुंडे बहीण-भाऊ विरुद्ध सुरेश धस, निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नवा वाद
who is Phangnon Konyak
Rahul Gandhi : राहुल गांधींनी प्रतिष्ठेला धक्का पोहचवाल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या महिला खासदार आहेत कोण?
Laxman Savadi
Karnataka : “मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करा”, कर्नाटकच्या आमदाराची विधानसभेत मागणी; म्हणाले, “आमचे पूर्वज…”
Beed District Sarpanch murder , Sarpanch murder,
बीड जिल्ह्यातील सरपंचाची हत्या, विधानसभेत काय घडले?
Chhagan Bhujbal, Sanjay Kute, Devendra Fadnavis cabinet,
मंत्रिपद नाकारले; भुजबळ समर्थक रस्त्यावर, कुटे समर्थकांचा समाजमाध्यमावर निषेध

१९५२ च्या ‘मोहिनी’च्या दिवाळी अंकावर त्याच चित्रकाराकडून खास काढून घेतलेलं चित्र प्रकाशित झालं. ते अर्थातच ‘तरुणीच्या साडीवर मांजराचे प्रिंट्स आणि मुलाच्या शर्टवर उंदराचे प्रिंट्स’ हे गाजलेलं चित्र. फार अनपेक्षित यश या मुखपृष्ठाला मिळालं आणि तरुण चित्रकार शिवराम दत्तात्रेय फडणीस यांच्या अभूतपूर्व अशा कालखंडाला सुरुवात झाली.

हेही वाचा – बालरहस्यकथांचा प्रयोग

हा प्रसंग मराठी दृश्यकलेच्या आणि साहित्याच्या प्रांतात अत्यंत क्रांतिकारी आणि महत्त्वाचा आहे. एखाद्या साक्षेपी, ज्येष्ठ संपादकाने एखाद्या नवोदित कलावंतामधले गुण हेरणं, त्याला प्रोत्साहन देणं, पाठपुरावा करणं आणि त्याची उमेद वाढवणं इत्यादी बाबी फार महत्त्वाच्या आहेत.
‘मोहिनी’वरचं हे पहिलं मुखपृष्ठ प्रकाशित झालं तेव्हा तरुण, नवोदित व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचं वय होतं जेमतेम सत्तावीस. यंदाच्या ‘मोहिनी’च्या दिवाळी अंकावर सलग चौऱ्याहत्तरावे (७४) मुखपृष्ठ चितारणारे चिरतरुण व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांचं वय आहे जेमतेम शंभर !!
तेव्हापासून फडणीसांची रेखीव, ठाशीव, आकर्षक, रंगीत चित्रं अनेक मासिकांवर, पुस्तकांवर, दिवाळी अंकांवर आणि जाहिरातीच्या ब्रोशर्सवर येऊ लागली आणि सुसंस्कृत मराठी माणसाला हसण्यासाठी एक सुंदर कारण मिळालं. फडणीसांच्या कारकीर्दीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी हास्यचित्रकलेला एक विलक्षण प्रतिष्ठा दिली. मराठी माणसाची अभिरुची वृद्धिंगत होईल या दर्जाचं काम ते सतत रसिकांसमोर ठेवत आले आहेत.

फडणीस यांच्या चित्रशैलीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या चित्रातील पात्रं काहीच न बोलता निमूटपणे आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत असतात. त्यातील काही अभावितपणे अडचणीत सापडतात. त्यामुळे त्यातल्या काहींच्या चेहऱ्यावर किंचित त्रासाचे, कधी आश्चर्याचे, संगीत, चित्रकला आणि प्रेमातही तल्लीन होण्याचे, तर कधी समाधानाचे भाव असतात. पण कोणीही एक चकार शब्द कधी तोंडातून काढत नाही. फडणीसांची त्यांना ही सक्त ताकीदच असते म्हणाना! म्हणजे प्रेम करायचंय, सायकल- स्कूटर चालवायची आहे, मफलर विणायचा आहे, देवदर्शनाला जायचंय, खेळ खेळायचे आहेत, चूल पेटवायचीय, इतकंच नव्हे तर गाणं म्हणायचंय, वाद्य वाजवायची आहेत, हे सगळं करायला फडणीसांची काहीच ना नाही. पण एक करायचं, त्यातून एक चकार शब्द फुटता कामा नये. डोळे मोठे करा, आश्चर्य व्यक्त करा, बिच्चारे दिसा या साऱ्याला परवानगी आहे. पण या चित्रातला ‘सायलेन्स झोन’चा नियम पाळून! मुख्य म्हणजे ही सगळी पात्रं मुद्दाम कृती काहीच करत नाहीत. सगळं काही अभावितपणे घडत असतं.

मिक्सर का चालत नाही तर वायरची पिन ही आरामात घोरत पडलेल्या नवऱ्याच्या नाकपुड्यात लावली आहे हे अभावितपणेच घडणार ना! टीव्ही बघताना नवऱ्याने बाटलीने दूध पिणे आणि मांडीवरच्या बाळाने बियर पिणे असो किंवा भिंतीवर विमानाच्या चित्राची फोटो फ्रेम लावताना चुकून पडली तर ट्रेनिंग दिल्याप्रमाणे वैमानिक त्यातून स्वाभाविकपणे उडी मारणारच की! घरच्या बाईची सकाळची झोपमोड होऊ नये म्हणून मांजरानेच गवळ्याकडून रतिबाचं दूध घेणं हे अगदी नैसर्गिक असतं या दुनियेत! रस्त्यावरच्या ट्रॅफिक आणि खोदकामाला कंटाळून स्कूटरवरून जाणाऱ्या आईच्या पदराने हवा भरून अलगद शाळेत पोहोचतात या दुनियेतली मुलं! कितीही अडचणी आल्या तरी संसार हा दोघांनी करायचा असतो असं फडणीसांनी इथल्या नवराबायकोला बजावलेलं असतं. म्हणून या दुनियेतील दाम्पत्य नवऱ्याचा उजवा आणि बायकोचा डावा हात फ्रॅक्चर झाला तरी संसाराची स्कूटर चालवत राहतात आणि न बोलता, स्वत:च आश्चर्य व्यक्त करत प्रवास पूर्ण करतात. इंटरनेट आणि मोबाइलच्या जमान्यात आता कोणत्याही देवाचं लाइव्ह दर्शन घेता येतं. पण या तंत्रज्ञानाचा शोध लावण्यापूर्वीच या दुनियेतले नवरा-बायको दुर्बिणीतून देवळाचं दर्शन घेतात आणि पूजाही करतात! आहे त्या परिस्थितीत मार्ग काढा असं फडणीसांनी कदाचित कठोर शब्दात त्यांना सांगितलेलं असतं. त्यामुळे स्वत:च्या आवाजाचा स्वत:लाच त्रास होऊ नये म्हणून तंबोऱ्याच्या खुंट्या काढून नवशिका गवई स्वत:च्या कानात त्या घालतो आणि मगच तान घेतो! असे अनेक प्रसंग अभावितपणे इथे घडताना दिसतात.

जाहिरातीच्या क्षेत्रातही फडणीस यांनी स्वत:चा ब्रश मिश्कीलपणाच्या शाईत बुडवून चित्रं रेखाटली. वास्तविक जाहिरातीतील चित्रांमध्ये चित्रकार सहसा ओळखू येत नाही. पण काही निवडक व्यंगचित्रकारांच्या शैलीमुळे ही चित्रं ओळखीची होतात. शि.द. फडणीस हे त्यातलंच एक प्रमुख नाव. अद्भुतता, आकर्षक रंगसंगती आणि मुख्य म्हणजे शिदंचा मिश्कीलपणा यानंतर मग वाचक हे ‘प्रॉडक्ट’कडे पाहतात. अर्थात ‘प्रॉडक्ट’ लक्षात राहतंच. उदाहरणार्थ पेंट रिमूव्हरची ही जाहिरात. ही टिपिकल फडणीस टच असलेली जाहिरात आहे. या जाहिरातीतील चित्रासाठी फडणीस यांनी जिराफ, झेब्रा, हरीण, पोपट यांच्या ऐवजी वाघ हा प्राणी मुद्दाम निवडला असेल. याचं कारण सहसा वाघाच्या नादाला कोणी लागत नाही. अशा वेळी दुपारच्या वामकुक्षीच्या दरम्यान हा कारभार (!) करणाऱ्याचं धाडस प्रथम वाचकांच्या लक्षात येतं आणि नंतर वाघाच्या! झोपमोड झाल्यामुळे चित्रातील वाघाची ‘एक्स्प्रेशन्स’ बघण्यासारखी आहेत.

अमेरिकेत एकदा एका दिवाळी उत्सवासाठी फडणीसांनी खूप विचारपूर्वक एक पोस्टर तयार केलं. दिवाळीला भारतीय किंवा हिंदू सण इथपर्यंत मर्यादित न ठेवता त्याला ‘प्रकाश उत्सव’ असं जागतिक स्वरूप देताना त्यांनी पोस्टरमध्ये विविध वंशीयांची चित्रं काढून ते सर्वसमावेशक केलं.
शि. द. फडणीस म्हणजे प्रामुख्याने हास्यचित्रकार हे जरी सर्वमान्य असलं तरी त्यांनी एकदा ‘मार्मिक’ या बाळासाहेब ठाकरेंच्या साप्ताहिकाचं मुखपृष्ठही रंगवलं होतं. बाळासाहेबांचा ७५ वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांनी हे आगळंवेगळं मुखपृष्ठ रंगवलं होतं. ‘माणूस’ या साप्ताहिकातसुद्धा त्यांनी अनेक वर्षं राजकीय, सामाजिक विषयांवरती व्यंगचित्रं काढली. इतकंच नव्हे तर यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी इत्यादींची अर्कचित्रंही रेखाटली याचं आज कित्येकांना नवल वाटेल.

वास्तविक पाहता प्राथमिक गणित शिकणं शिकवणं हे पदव्युत्तर गणित शिकणं शिकवण्यापेक्षा ‘अधिक’ कठीण आहे. फडणीस यांना याचा चांगलाच अनुभव आला. प्राथमिक गणिताची पुस्तकं तयार करताना त्यांचा अगदी कस लागला. संपूर्ण घरदार त्यासाठी कामाला लागलं. अखेरीस महाराष्ट्रातील विद्यार्थी नशीबवान ठरले आणि त्यांना सचित्र गणित पाहता येऊ लागले.

१९५०-६० या कालखंडातील अनेक नामवंत लेखकांच्या पुस्तकांसाठी फडणीस यांनी मुखपृष्ठं केली, आतील रेखाटनं केली. काही विनोदी तर काही गंभीर आशयाची. पु. ल. देशपांडे यांच्या अपूर्वाई या प्रवासवर्णनाला फडणीसांची रेखाचित्रं आहेत. ती अर्थातच ‘व्हॅल्यू एडिशन’ करणारी आहेत. त्यातल्या एका प्रसंगाचं पुलंनी केलेलं वर्णन आणि त्यासंबंधात फडणीस यांनी काढलेलं चित्र फार मजेशीर आहे. फ्रान्समध्ये पु.ल. एकदा दूध आणायला दुकानात गेले. पण आयत्या वेळी ते दुधाला फ्रेंचमध्ये काय म्हणतात तेच विसरले. आणि मग काय, कसं मागायचं तेच कळेना. शेवटी त्यांनी एका कागदावर गाईचं चित्र काढलं. पुल म्हणतात, ‘ड्रॉइंग मास्तरांचं स्मरण करून मी गाय काढली. पण गाय कसली, गोहत्याच ती!!’ शेवटी कशीबशी त्यांनी दुधाची बाटली मिळवली. या प्रसंगावरचं फडणीस यांचं चित्र खूप बोलकं आहे. फडणीस यांच्या चित्रातील फॅन्टसी इथे दिसते. (या चित्रामुळे पुलंनी तथाकथितरीत्या मारलेल्या गायीला फडणीस यांनी पुनर्जन्म दिला असं म्हणता येईल!)

हेही वाचा – अद्भुतरस गेला कुठे?

असो, तर गेल्या सत्तर-पंचाहत्तर वर्षात फडणीसांनी निर्माण केलेल्या या दुनियेमध्ये सगळंच विलक्षण आहे. इथली सर्व माणसं अत्यंत गोड लोभस वाटावीत अशी आहेत. मोठे डोळे आणि उंचावणाऱ्या भुवयांनी सदैव आश्चर्ययुक्त नजरेने सगळीकडे बघणारी आहेत. यातील बहुतेक महिलावर्ग हा तरुण आहे. आकर्षक रंगांच्या साड्या नेसणारा, शेलाट्या बांध्याचा आहे. पूर्वी मोठा अंबाडा, दोन वेण्या, एक वेणी अशा केशरचना असणाऱ्या सुंदर व सभ्य मध्यमवर्गीय महिलांना अलीकडे पंजाबी ड्रेस, बॉबकट, शोल्डर कट अशा फॅशन करायला फडणीस यांनी मंजुरी दिली आहे. या दुनियेतली लहान मुलं तर फारच गोड व आज्ञाधारक आहेत. त्यातल्या एकाला त्याच्या आईने लक्ष्मी रोडवरची साडी खरेदी होईपर्यंत चक्क सायकलच्या कॅरिअरला अडकवलं तरी फारशी कुरकुर न करता तो को-ऑपरेट करतोय. चाळीस- पन्नास वर्षांपूर्वी सफाईदारपणे सायकल चालवणाऱ्या या समस्त मुलींना फडणीसांनी आता स्कूटर चालवायचं लायसन्स दिलंय. काही गोड मुलं तर आई गात असेल तर तिच्या आविर्भावाला घाबरून तिला चॉकलेट ऑफर करतात!

फडणीसांच्या या दुनियेत पुरुषमंडळी मात्र बऱ्याचदा व्हिक्टिम झालेली दिसतात. कधी त्यांच्या डोक्यावर बायको चुकून नारळ फोडते, कधी फिरकी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचा हातच पिळला जातो, तर कधी हातात प्रचंड सामान असणाऱ्या पोलिसाला, साहेबाला पायाने सॅल्यूट ठोकावा लागतो. पण हे सगळे बिचारे पुरुष फारशी तक्रार न करता फडणीसांच्या आदेशानुसार सगळं निरागसपणे सहन करत असतात. चित्राच्या बॅकग्राऊंडला फिकट निळ्या किंवा पिवळ्या रेषांनी फडणीसांनी या सगळ्या पात्रांना प्रसंगाचं नेपथ्य दिलेलं असतं. अशा या प्रसन्न रंगसंगतीत शांतता मात्र विलक्षण असते. शब्दच फुटत नसतात तर आवाज कुठून येणार! देऊळ, मार्केट, रस्ता, ट्रेन, क्रिकेट स्टेडियम, बसस्टॉप कुठेही आवाज नाही! ज्या काही आश्चर्ययुक्त आनंदाच्या लहरी असतात त्या सगळ्या त्या दुनियेच्या बाहेर असतात, वाचकांच्या मनात! वाचक हसत असतो, हसत राहतो, मनमुराद! फडणीसांनी फुलवलेली ही स्मितरेषा वाचकांच्या चेहऱ्यावर उमटतेच. हीच फडणीसांच्या रेषेची किमया आहे.

आपल्या अवतीभोवतीच्या रूक्ष, बिनरंगी, बेचव दुनियेतल्या दुर्मुखलेल्या माणसातून आणि मुख्य म्हणजे प्रचंड कोलाहलातून थोडा वेळ बाहेर पडावं आणि या पात्रांच्या दुनियेत जाऊन फेरफटका मारून यावं. मोठ्या डोळ्यांच्या आणि आश्चर्य व्यक्त करणाऱ्या, गोड दिसणाऱ्या लोकांना पाहावं असा मोह अनेकांना पडेल. कारण फडणीसांच्या या ‘‘सुंदर ती दुसरी दुनिया’’चे आकर्षण आहेच तसे!!

prashantcartoonist@gmail.com

Story img Loader