डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घुमानला साहित्य संमेलन सुरू आहे. त्या पाश्र्वभूमीवर त्यांच्या ‘उजळल्या दिशा’ या नाटकाविषयी ‘नव्वदोत्तरी नाटकं’ या सदरात लिहिणे अगत्याचे होईल, असे वाटून हा लेख लिहीत आहे. २ फेब्रुवारी २००१ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यात भरत नाटय़मंदिरात झाला. आज या नाटकाला तब्बल चौदा वर्षे उलटून गेली आहेत. या नाटकात उपस्थित केलेले अनेक प्रश्न आज खरे तर अधिक टोकदार बनलेले आहेत. आजच्या उजव्या विचारसरणीच्या आणि हिंदुत्ववादी राजकारणाशी असलेली रिपब्लिकन पक्षाची (आठवले गट) युती ही मती कुंठीत करणारी तर आहेच, पण फुले-शाहू-आंबेडकर तत्त्वांना हरताळ फासणारीच आहे. सतत कोणाच्यातरी वळचणीला उभे असलेल्या असल्या राजकारणाने स्वत:ची ‘डिग्निटी’ (प्रतिष्ठा) गमावलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित, शोषित आणि पीडित समाजाच्या उत्थानाचे भव्य स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नाचे आजच्या राजकारणातील भंग पावत असलेले स्वरूप हा ‘उजळल्या दिशा’चा विषय होता. मात्र, ते स्वप्न अभंग कसे राहावे याकरिता संत तुकारामांनी दाखवलेली दिशा- हा या नाटकाचा गाभा होता.
‘ओस झाल्या दिशा मज भिंगुळवाणे।
जिवलग नेणे मज कोणी।।
भय वाटे देखे श्वापदांचे भार।
नव्हे मज धीर पांडुरंगा।।
अंध:कारापुढे न चालवे वाट।
लागतील खुंट काटे अंगा।।
एकला नि:संग फाकती मारग।
भितो नव्हे लाग चालावया।।
तुका म्हणे वाट दावूनी सद्गुरू।
राहिला हा दुरु पांडुरंग।।
तुकारामबुवांना असे आठवताना बौद्ध तत्त्वज्ञानाला अभिप्रेत असलेल्या राजकीय मूल्यांच्या परिप्रेक्ष्यात वर्तमान राजकारणाची चिकित्सक फेरमांडणी करून त्यानुसार कृती करण्यासाठी नाटकाचा नायक प्रा. नागसेन सोनसळे ‘Society for Buddhist Political Praxis’ नावाची संस्था काढतो. त्याची Praxis ची संकल्पना मार्क्‍सवादी परंपरेतून आलेली आहे. थिअरी आणि प्रॅक्टिसचा तो समन्वय असला तरी त्याला बौद्धांच्या करुणेची जोड आहे. त्याची राजकीय प्रज्ञा अमला असल्यामुळे शत्रुनाशापेक्षा शत्रुपरिवर्तन, हे त्याचे एक ध्येय आहे. डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या राजकारणाचा नवा अर्थ लावून, तडजोडीचे आणि व्यवहारवादी राजकारण करण्यापेक्षा नैतिक राजकारण करण्यावर हे नाटक भर देत होते. हळूहळू, पण ठाम निश्चित दिशेने तत्त्वाधिष्ठित राजकारण करणे आजच्या घडीला आवश्यक आहे असे तत्त्वज्ञान ते मांडत होते.
मोरेसरांचे हे पहिलेच नाटक. अक्षर प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या नाटकाच्या संहितेत मोरेसरांनी नेमकी भूमिका मांडली आहे. प्राध्यापक नागसेन सोनसळे हा दलित असल्यामुळे; आणि त्यात विशेषत: आरक्षणाच्या प्रश्नाची बरीच चर्चा असल्याने, त्याला दलित नाटक असे म्हटले गेले आणि ते तसे होतेही. प्रा. नागसेन विद्यापीठात संस्कृत विभागात रीडर आहे. तो आंबेडकरवादी आहे, पण त्याचे दलित चळवळीतील साचेबद्ध पद्धतीने विचार व राजकारण करणाऱ्यांशी मतभेद आहेत. बौद्ध धम्माचा स्वीकार- ही तो बाबासाहेबांच्या चरित्रातील शिखर घटना मानतो. तेथून तो सर्वत्र पाहात असतो. त्याला दलितांचे राजकारण संकुचित आणि कुंठित झालेले दिसते. ते पुढे जावे, व्यापक व्हावे आणि फक्त भारतीयच नव्हे तर जागतिक पातळीवर जावे, असे त्याला वाटते. भारतीय संदर्भात जातिव्यवस्थेला विरोध करून समतेची आणि जागतिक पातळीवर सहभाव आणि शांतता यांची प्रस्थापना करण्याची जबाबदारी बाबासाहेबांच्या बौद्ध अनुयायांनी उचलली पाहिजे, असे त्याला वाटते.
सम्राट अशोक हा त्याचा राजकीय आदर्श आहे, तर कौटिल्य आर्य चाणक्यापेक्षा राजकारणाची वेगळी संकल्पना मांडणारा महाकवी क्षेमेंद्र त्याला आकर्षित करतो. राजनीती म्हणजे अमला प्रज्ञा आणि अमलत्व म्हणजे स्वपरहितत्व. आपले आणि प्रतिपक्षाचे हित सांभाळणारी करुणेने नियंत्रित झालेली प्रज्ञा ही त्याची ‘पॉलिटिकल रिझन’ आहे. अशा राजकारणाशी सुसंगत आणि पूरक साहित्यकारण करायचे म्हणजे बौद्ध परंपरेत विकसित झालेल्या शांतरसाची साहित्यशास्त्रात पुन:स्थापना प्रा. नागसेनला करायची आहे. त्याने संस्कृतचा विशेष अभ्यास करून त्या भाषेत बाबासाहेबांवर ‘भीमभारतम्’ नावाचे महाकाव्यही लिहिलेले आहे. नागसेन संस्कृत भाषेमध्ये निर्मिती करून, तिचा अभ्यास करून ती समृद्ध करणे हीदेखील दलितांची जबाबदारी मानतो. कारण बौद्ध तत्त्वज्ञानाचा मोठा ठेवा संस्कृत भाषेत आहे आणि ‘इंडॉलॉजी’ करायची असेल, भारताचे प्राचीन धार्मिक सामाजिक वास्तव समजावून घ्यायचे असेल तर संस्कृतला पर्याय नाही, याची बाबासाहेबांना प्रखर जाणीव होती.
नागसेनचा या नाटकातील विद्रोह हा असा वेगळ्या पद्धतीचा आहे. त्याला स्वत:च्या गुणवत्तेविषयी प्रचंड आत्मविश्वास असून, कोणत्याही सवर्णाशी स्पर्धा करून खुली जागा पटकविण्याची त्याची तयारी आहे. पण सामाजिक समतेसाठी राखीव जागांचे तत्त्व आवश्यकच आहे, अशी त्याची ठाम धारणाही आहे. त्यासाठी तो व्यवस्थेला आव्हान देतो. ब्राह्मणी चौकटीची प्रखरपणे चिरफाड करतो आणि दलित चळवळीचेही कठोर मूल्यमापन करतो.
ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ डॉ. अशोक केळकर यांच्याशी चर्चा करत असताना मोरेसरांना या नाटकाचे बीज गवसले. चर्चेत त्यांना एका दलित विद्यार्थ्यांची माहिती मिळाली. त्याने लेक्चरर पदासाठी खुल्या जागेवर अर्ज केला होता. मुलाखतीमध्ये त्याची कामगिरी चांगली होती. पण तरीही निवड समितीत त्याला खुल्या जागेवर घ्यायचे की नाही, यावर वाद झालाच. ही सारी हकिगत या नाटकात येते. आजूबाजूच्या कोसळत असलेल्या परिस्थितीत प्रा. नागसेन सोनसळेंचे पारदर्शक नैतिक दर्शन सतत घडत रहाते.
हे नाटक करणे हे माझ्याकरिता आव्हान होते. विषय अत्यंत स्फोटक आणि ज्वालाग्रही होता. पण मांडणी अर्थातच खास डॉ. सदानंद मोरे पद्धतीची होती. ठाम, समन्वयवादी आणि शांत रसाचा पुरस्कार करणारी अशी! या नाटकाचे आम्ही साठ प्रयोग केले. त्यात कुठेही दंगाधोपा झाला नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दलित संघटनांनी याचे प्रयोग घेतले. बौद्धिक चर्चा झडल्या. वादविवाद झाले. कौतुक झाले. टीकाही झाली. तसेच अनेक पारितोषिकेही या नाटकाला मिळाली. ‘कोण म्हणतो टक्का दिला’, ‘वाटा-पळवाटा’ आणि ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ या नाटय़ परंपरेतील हे नाटक वैचारिक आणि चर्चानाटय़ म्हणून अतिशय गाजले. गजानन परांजपे या गुणी नटाचा अभिनय यामुळेही ते ओळखले गेलेले आहे. या जोडीलाच अश्विनी गिरी, धीरेश जोशी, अभिजीत मोने, जितेंद्र आफळे, अनिरुद्ध ठुसे, नितीन श्रोत्री आणि मीही त्या नाटकात होतो. संत तुकाराम, चक्रधरस्वामी, सॉक्रेटिस, गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही ‘सत्त्व आणि स्वत्व जपणारी परंपरा’ मानणाऱ्या या नाटकाला आम्ही सामोरे गेलो.
‘उजळल्या दिशा’ या नाटकाचे मूळ नाव ‘पासंग’ होते. तेही फार सुंदर होते. नाटकात एके ठिकाणी नागसेन म्हणतो की, ‘‘असे आपले तुकडे पडत जाणे हे सर्वस्वी परावलंबित्वाचे लक्षण नाही वाटत त्यांना? आपला पक्ष अल्पसंख्याकांचा आहे, पण तो अभेद्य राहिला तर त्याची भूमिका निर्णायक ठरू शकते; विशेषत: अशा ऐन क्षणी. बाबासाहेब म्हणत, तुम्ही पासंग व्हा. पासंग म्हणजे सगळ्यात लहान परंतु परिणामकारक आणि म्हणूनच निर्णायक ठरणारं वजन. पासंग जिकडं तेवढं त्याचं पारडं जड. पण हा पासंगच फुटला. त्याचे तुकडे झाले तर त्याची परिणामकारकताच नष्ट होणार. त्याला कोणी मोजणार नाही. त्याची दखलही घेणार नाही.’’ आज या वाक्यांचा अर्थ विशेष लागत आहे. धर्माध शक्तींचे प्राबल्य वाढलेले असताना तर बौद्ध करुणेचे तत्त्वज्ञान आवश्यक वाटते आहे. बामियानची बुद्धमूर्ती तोडणारे, बाबरी मशीद उद्ध्वस्त करणारे, भांडारकर तोडणारे, दाभोलकर-पानसरेंचा खून करणारे आणि चर्चवर हल्ला करणारे सारे अंध झालेले असताना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि करुणा या बौद्ध विचारांचा दीप उजळवणे गरजेचे झालेले आहे. ‘अत्त दीप भव’ ही व्यक्तिगत जबाबदारी मानायला हवी आहे.
प्रसिद्ध विचारवंत प्रा. राम बापट यांनी पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिलेले नेमके विचार इथे अखेरीस उद्धृत करतो. ते म्हणतात, ‘‘उत्तम दर्जाची विश्लेषक शक्ती आणि नवनिर्मितीचे सामथ्र्य एकमेकांना छेदणारे नसतात. याचा सुखद प्रत्यय मोरे यांच्या ‘उजळल्या दिशा’ या पहिल्याच नाटकाने मिळवून दिला आहे. त्यांच्या वर्तमानकालीन दलित चळवळीच्या विश्लेषणातून एक श्रेष्ठ दर्जाची कलाकृती नाटक म्हणून आपल्यापुढे आलेली आहे. कुठलेही मूल्य, विचार, परंपरा आणि आंदोलन यांचे कालानुरूप स्वरूप व मर्म अंत:समीक्षेतूनच साकार होऊ शकते. पण ही गोष्ट नाटकासारख्या सर्जनशील प्रभावी माध्यमातून प्रकट करणे सोपे नाही. पण ही गोष्ट प्रा. मोरे यांनी साध्य केली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या जिवंत नाटकामुळे परिवर्तनाच्या चळवळीत रस असणारे सर्वच जण अंतर्मुख होतील आणि आंबेडकरप्रणित धम्माचा मार्ग डोळसपणे रुजवण्याचे व्रत अंगीकारतील. एवढे सामथ्र्य या नाटकात सामावले आहे.’    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा