चित्र लिलावांच्या बातम्यांमध्येच रस घेणारी प्रसारमाध्यमं, लिलावांमध्ये कोणते दोष असू शकतात याकडे पाहत नाहीत. शिवाय, या लिलावांच्या पलीकडे जे काही पर्यायी कलाविश्व आहे, त्याहीकडे माध्यमांचं सहसा लक्ष जात नाही. या पर्यायी कलाविश्वातले विचार जाणून घेण्याची सुरुवात प्रभाकर पाचपुतेंसारख्या चित्रकारांमुळे मराठीत खरं तर सहज होऊ शकते.
मुं बईतला तो क्लब ब्रिटिशकालीन. पण चौपाटीनजीक असल्यामुळे हल्ली बेपारीबांधवांची तिथे आवक अधिक. अशा त्या क्लबचे दोघे सदस्य, सात सप्टेंबरच्या रविवारी सकाळीच मरीन ड्राइव्हवर एकमेकांना भेटले..
‘आ न्यूज (उच्चार ज्य) जोईं के नथी?’
‘.. तीन करोड.. एक पेंटिंग माटे’
‘तमेपण करजो कई..’
‘एकलो सूं करवूं, अमे साथे करिये..’
.. आणि मग त्यांनी ठरवलं, चित्रांत पैसा घालायचा!
हा संवाद कपोलकल्पित असला, तरी त्यानंतर जे घडलं ते शंभर टक्के खरं आहे. त्या क्लबचे सदस्य असलेल्या त्या दोघा वणिकवृत्तीच्या, पन्नाशीपार व्यक्तींनी ठरवलंय की चित्रांमध्ये पैसा घालायचा! त्यांना त्यांचा पैसा कुठेतरी लावायची गरज आहेच हे खरं, पण चित्रंच का? याचं मोठं तात्कालिक कारण म्हणजे त्या दिवशीची बातमी. ती अशी की, दिवंगत चित्रकार जहांगीर साबावालांच्या चित्रासाठी दिल्लीत पाच सप्टेंबर रोजी झालेल्या एका लिलावात तीन कोटींची बोली मिळाली. बातमी साबावालांची झाली खरी, पण ‘भारतीय आध्यात्मिकतेचा आनंद’ वगैरे चित्रांमधून देणारे सय्यद हैदर रझा यांच्या चित्राला तर याच लिलावात आठ कोटी १७ लाख रुपये बोली मिळाली. सॅफरॉनआर्ट ही लिलावसंस्था खरे तर इंटरनेटवर चित्रविक्री करण्यासाठी अधिक प्रसिद्ध, पण त्यांनी दिल्लीत ९० ‘आधुनिक’ (म्हणजे ढोबळमानाने, १९७० सालाच्या अगोदर भारतीय चित्रकलेत कार्यरत असलेल्या, त्यामुळे ज्येष्ठही) चित्रकारांच्या चित्रांचा लिलाव एका पंचतारांकित हॉटेलच्या बॉलरूममध्ये ठेवला, तेव्हा ९० पैकी ८६ चित्रं विकली गेली आणि त्याहीपैकी ६२ चित्रांना, त्यांच्या ‘अंदाजित किमती’पेक्षा जास्त बोली मिळाली! यापैकी रझांच्या चित्रासाठी लिलावदारांनी अंदाजित केलेली किंमतच होती पाच कोटी ते सात कोटी रुपये, पण साबावालांच्या चित्राची अंदाजित किंमत होती ८० लाख ते ९० लाख रुपये.. म्हणजे त्याच्या तिपटीहून अधिक बोली मिळाली.
‘तीनशे टक्क्यांहून अधिक फायदा’ हे मराठीत ऐकायला गणिताचं उत्तर वाटतं. तेच गुजरातीत, सिंधीत, पंजाबीत म्हणून बघा मनाशी- ठसक्यात.. म्हणजे ‘अर्थ’ कळेल! हा बाजार भलताच तेजीतला दिसतोय, असा तो अर्थ.
पण तो खरा आहे का?
अशाच लिलावांच्या कित्येक बातम्या आजवर आल्यात. त्यानंतर अनेकजण चित्रबाजारात उतरले, बऱ्याच जणांचं ‘गिऱ्हाईक’ झालं. काहीजण तरले, बरेचजण अद्यापही हातपाय मारताहेत आणि ते तरतीलही. पण या बाजारात काय चांगलं आणि काय वाईट, हे कोण ठरवणार?
*प्रभाकर पाचपुते यांचं ‘ डार्क क्लाउडस् ऑफ द फ्यूचर’ हे चित्र
(छायाचित्र सौजन्य : एक्स्पेरिमेंटल कलादालन, कोलकाता)
मुळात चित्रं ही दीर्घकाळचीच गुंतवणूक. जर अल्पकाळसाठी चित्रांमध्ये गुंतवणूक करूनही नफा वाढवायचा असेल, तर बाजारप्रिय ठरलेल्यांपैकी फक्त अव्वलच चित्रं घेण्यासाठी काही कोटी रुपये तुमच्यापाशी हवेच आणि तरीदेखील किमान दोन-तीन र्वष थांबून ते चित्र योग्य जागी विक्रीला सोडण्याची तुमची तयारी हवी. हे बहुतेकांकडे नसतं म्हणा, किंवा चित्रबाजारावर तेवढा विश्वास नसतो म्हणा.. म्हणून मग कंजूषगिरी केली जाते. त्या कृपणतेतूनही चित्रांचा बाजार उभा राहातोच, पण लिलावांतल्या किमतींना मिळणाऱ्या ‘बातमी’शी काही संबंध नसतो असल्या चित्रांचा.
यावर प्रत्युत्तर म्हणून, आपलं ५० हजारांचं चित्र १० लाखांना विकलं गेलंय, याची कथा एखादा मराठीभाषक चित्रकारही सांगेल. चांगलं आहे. पण ही जी ‘मार्जिन’ आहे, ती कोणत्या हिशेबानं वाढते?
त्या दोघा बेपाऱ्यांच्या कपोलकल्पित संवादानंतर अमेरिकेत आणखीही एक घटना घडली. श्रीयुत अरणी आणि श्रीमती शुमिता या बोस दाम्पत्याच्या संग्रहातल्या फक्त निवडक १६ चित्रांचा निराळा लिलाव ‘ख्रिस्टीज’नं पुकारला. त्यात वासुदेव (व्ही. एस.) गायतोंडे यांच्या चित्राला डॉलरमधली जी बोली मिळाली, ती रुपयांमध्ये पाच कोटी ८८ लाखांहून अधिक आहे. चित्राच्या मूळ किमतीपेक्षा किमान- अगदी कितीही जास्त किंमत धरली तरी- पाचपट किंमत या चित्रानं मिळवली आहे. फ्रान्सिस न्यूटन सूझा यांच्या ‘द बुचर’ या १९६२ सालच्या चित्रानं तर १० कोटी २८ लाख रुपये भरतील इतकी (१६ लाख ८५ हजार डॉलर) बोली मिळवली. म्हणजे (पुन्हा चित्राची मूळ किंमत कितीही धरली तरी) फायदा दसपट.. एक हजार टक्के!
बाजार बैलागत बेगुमान असतो, तेव्हा अशा किमती मिळतात हे खरं आहे. पण हेही खरं आहे की, इथे जी काही १६ चित्रं होती, ती सर्व अगदी निवडक, चांगली अशीच होती. म्हणून तर गायतोंडेंच्या खालोखाल भूपेन खक्कर (साधारण दोन कोटी ८० लाख रु.), मग अतुल दोडिया (सुमारे ५४ लाख ९१ हजार रु.) अशा बोली मिळाल्या. एकंदर १६ चित्रांपैकी ११ व्या क्रमांकाची बोली मिळवणारं चित्र यंदाच वयाची चाळिशी गाठत असलेल्या जितीश कलाटनं, त्याच्या तिसाव्या वर्षी केलेलं होतं. त्याला बोली मिळाली ११ लाख ४४ हजार.
या आकडय़ांचा कंटाळा आला असेल, तर पुढली गोष्ट.. ज्या बोस दाम्पत्याच्या मालकीची ही १६ चित्रं होती, त्यांनी अमेरिकेत १९९३ सालापासून ‘फक्त भारतीय आधुनिक आणि समकालीन चित्रकलेचं दालन’ म्हणून बोस पेसिया नावाची गॅलरी उघडली होती. तरुण भारतीय समकालीन दृश्यकलावंतांना अमेरिकेत प्रदर्शनाची संधी देणारा एक पुरस्कारही त्यांनी सुरू केला होता. जितीशचंही प्रदर्शन त्या गॅलरीत झालं होतं आणि त्याच्या आजच्या एकंदर यशात या गॅलरीचाही वाटा आहे. पाचपट, दसपट वगैरे फायदे कमावण्यासाठी वीसवीस र्वष वाट पाहिलीय या जोडप्यानं.
*सूझा यांचं ‘द बुचर’ (व गायतोंडे यांचे
छायाचित्र ‘ख्रिस्टीज’च्या सौजन्याने)
आपल्या चौपाटीवरल्या व्यापारीमित्रांची तशी तयारी आहे? अजिबात नाही. त्यांना फारतर पाच र्वष थांबायचंय. ‘हल्ली काय चालतं’ हे जाणून घेण्यासाठी त्या दोघा बेपाऱ्यांनी, चौपाटीवरल्या त्या क्लबमध्ये एक दृश्यकला-समीक्षक आणि चौघे चित्रकार अशा पाचजणांना बोलावलं होतं.. ते पाचहीजण, सुमारे दोन तासांच्या चर्चेनंतर हसावं की रडावं अशा हतोत्साह अवस्थेत बाहेर आले! असो.
लिलावांमधल्या बोली या काही वेळा ‘आतून ठरवलेल्या’ (फिक्स्ड) असतात, बऱ्याचदा त्या बोलींमध्ये ‘वातावरणनिर्मिती’चा भाग असतो आणि ‘शँडेलियर बिडिंग’ (म्हणजे कुणीही चढी बोली लावत नसताना, लिलाव पुकारणाऱ्यानं चढय़ा बोलीचे आकडे पुकारणं.. जणूकाय त्या दालनातलं झुंबरच बोली लावतंय!) सारखा हलकटपणाही लिलावनीतीत खपून जातो, हे सारं खरं. शिवाय, लिलावाच्या पुस्तिकेत- कॅटलॉगमध्ये- चित्रांच्या ‘अंदाजित किमान-कमाल किमती’ फार कमी ठेवायच्या आणि मग अंदाजित कमाल किमतींच्या कित्ती कित्ती पुढं गेली हो आमची चित्रं.. म्हणून पाठ थोपटून घ्यायची, असला प्रकारही हल्ली भारतातल्या लिलावांत फार चालतो. इतकं सगळं दोषदिग्दर्शन झाल्यानंतर सुद्धा एक निष्कर्ष मात्र बावनकशी खरा ठरतो आणि तो म्हणजे, लिलावांमध्ये विकली जाणारी कलाकृती तरी किंवा तिचे कर्ते तरी.. यांपैकी किमान एक कुणीतरी ‘कालजयी’ ठरवलं जातं तेव्हा किमती वाढतात. कालजयी ठरण्यासाठी काळाला कोणकोणत्या प्रकारे, कुठकुठल्या निकषांवर जिंकता यावं, हे अत्यंत धूसर आहे. पण ‘कालजयी’पणाचा माहौल तयार व्हावा, त्याचा सुवास दरवळावा (आणि भल्याभल्यांना त्या सुवासानं धुंदी यावी) अशाच प्रकारे लिलावातल्या कलावंत व कलाकृतींची निवड असते, लिलावपुस्तिका तसंच हल्ली वेबसाइटवरल्या कॅटलॉगमध्ये ज्या ‘लॉट नोट्स’ (कलाकृतीबद्दलच्या नोंदी) असतात त्याही ‘तशाच’ काळजीपूर्वक लिहिलेल्या असतात. *गायतोंडे यांचं १९७१ सालचं अमूर्त चित्र
कलेची भरभराट अशाच पद्धतीनं होते का? याचं उत्तर मात्र ठामपणे ‘नाही’ असंच राहातं.
गेल्या सुमारे पन्नास ते साठ वर्षांत चित्रकलेला ‘बाजारा’च्या खेरीज संस्थात्मक आधारही मिळू लागला. भारत सरकारचं आंतरराष्ट्रीय त्रवार्षिक (त्रिनाले) प्रदर्शन काय किंवा अन्य देशांतली द्वैवार्षिक (बिएनाले) प्रदर्शनं काय.. या सर्वातून ‘आजची कला अशी आहे’ हे दिसण्याची सोय झाली आणि त्यातून कलावंतांना आंतरराष्ट्रीय मान्यतेची दारं खुली झाली. गेल्या ३० ते २५ वर्षांत ‘आर्टिस्ट्स रेसिडेन्सी’ किंवा ‘फेलोशिप’ या स्वरूपाचं साह्य अनेक कलाशिक्षण संस्थांनीही देऊ केलं. आपला जितीश कलाट काय किंवा आपली शिल्पा गुप्ता काय, लिलाव आणि अशा प्रकारचं पर्यायी साह्य (आणि त्यातून अधिमान्यता) हे दोन्ही त्यांनी मिळवलेलं आहे. पण दोन्हीकडे असलात तरच तुम्ही मोठे, असं हल्ली अजिबात मानलं जात नाही (म्हणूनच जितीश किंवा शिल्पा आजही जमिनीवर असू शकतात).
लिलावांखेरीजचं जे कलाविश्व आहे, त्यामध्येही दोष आहेत; पण आजतरी हे दोष दाखवणाऱ्यांचा सूर एकतर खुसपटं काढल्यासारखा किंवा मग आत्मपरीक्षणाचा, एवढय़ाच मर्यादित रंगपटात मोडणारा आहे. मात्र हे खरं की, लिलावांच्या ‘ग्लॅमरस’ आकडेमोडीपेक्षाही अद्भुत असं काहीतरी इथे, या खुल्या पर्यायांमुळे घडतं आहे. या पर्यायी कलाविश्वाचा पाया विचार हा असल्याचं मानलं जात असल्यामुळे काही विचारी कलावंतांना याचा लाभ होतो आहे.
उदाहरणार्थ प्रभाकर पाचपुते. या मजकुरासोबत त्याचं जे (तीन मजली!) चित्र छापलंय तो मूळचा चंद्रपूरचा, खरागड आणि बडोद्यात शिकलेला नि मग मुंबईत आलेला, २८ वर्षे वयाचा एक चित्रकार आज काय करू शकतो, याचं निदर्शक ठरावं. ब्राझीलच्या ‘साओ पावलो बिएनाले’नं पाचारण केल्यामुळे प्रभाकर तिथं गेला, चंद्रपूरचे भूमिहीन मजूर/ खाणकामगार आणि ब्राझीलचे मजूर यांचं नातं जोडणारा विचार त्यानं इथं चित्रबद्ध केला. चित्रातलं वठलेलं झाड हे ब्राझीलमध्ये १९९६ साली झालेल्या नरसंहाराचं प्रतीक असलं, तरी व्यापक अर्थाच्या दृष्टीनं वठलेल्या झाडाची प्रतिमा किंवा ‘डोंगरांचे डोळे’ ही प्रतिमा सर्वच नैसर्गिक साधन‘संपत्ती’च्या ऱ्हासाची साक्ष देणाऱ्या आहेत.
अस्वस्थ करणारी, काहीतरी सांगणारी कला अद्याप जिवंत आहे!
.. फक्त, चौपाटीवरल्या त्या क्लबमध्ये हे सारं कुणालाच त्या दोघा बेपाऱ्यांशी बोलता आलं नाही. या अ-संवादाचे दुष्परिणाम दिसतीलच. ‘याच्या किमती वाढतील’ अशा लोभीपणानं भिंतींवर वर्षांनुर्वष चित्रं लोंबकळत ठेवणाऱ्या ‘गिऱ्हाइकां’ची संख्या आज वाढतेय, उदय़ाही वाढेल. त्यातून भारतीय चित्रांच्या बोली फुगतील, नफा वाढेल.
पण या लोंबकळण्याच्या पल्याडही कला आहे. आजच्या प्रसारमाध्यमांना यात काही ‘ग्लॅमर’ नाही दिसलं, तरी या पर्यायी कलाविश्वाचं बरं चाललंय!