अलकनंदा पाध्ये
दरवर्षी सुट्टीत जय कोकणात मामाकडे राहायला जायचा. पण यावेळी मात्र त्याची मामेभावंडे मल्हार आणि नेहा कोकणातून त्याच्याकडे आली होती. आई-बाबांनी त्यांच्यासाठी खास वेगवेगळे कार्यक्रम आखून ठेवले होते. पैकी एक दिवस त्याच्या बाबांनी तिघा मुलांना गेटवे ऑफ इंडिया, म्युझियम, फोर्ट.. थोडक्यात मूळ मुंबईची सफर करायचे ठरवले होते. त्यासाठी ठाण्याहून ते लोकल गाडीतून एकेकाळच्या व्ही. टी.आणि सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरले. ते भव्य आणि खूप मोठ्ठं स्टेशन जय, मल्हार आणि नेहा प्रथमच बघत होते. तिथली धावपळ, गडबड पाहून ते भांबावूनच गेले. तिथून वाट काढत बाबाने त्यांना गेटवे ऑफ इंडिया परिसरात नेले. तिथल्या लॉंचमधून सफर करताना आजूबाजूच्या भव्य इमारती, पाण्यात तरंगणाऱ्या मोठ्ठय़ा बोटी बघून नेहाचा तर जीवच दडपला. ताजमहाल हॉटेल, मुंबई विद्यापीठ अशा फोर्ट भागातल्या बऱ्याच जुन्या वास्तूंची माहिती देत बाबाने त्यांना अखेर तो काम करत असलेल्या रिझव्‍‌र्ह बॅंकेपर्यंत आणले.

‘काय जय, आता पाय दुखायला लागलेत की नाही?’ असं बाबांनी सगळ्यांच्या मनातलं ओळखून विचारताक्षणी सगळ्यांनी माना डोलावल्या. तेव्हा ‘चला, आता एका आजोबांची भेट राहिलीय.. ती झाली की आपण घरी जायला मोकळे!’ असे म्हणत त्याने जवळच्याच खूप पायऱ्या असलेल्या पांढऱ्याशुभ्र वास्तूकडे- म्हणजे एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीकडे मोर्चा वळवला.

Work begins on Shirsodi Kugaon bridge in the catchment area of ​​Ujani Dam Pune news
इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
zee marathi satvya mulichi satavi mulgi serial off air
‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘शेवटचा दिवस’ म्हणत कलाकारांनी शेअर केले सेटवरचे फोटो
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
insurance scheme mango, cashew insurance,
विमा योजनेत जाचक अटी घालून कोकणातील आंबा – काजू बागायतदारांवर अन्याय
भूगोलाचा इतिहास : प्रतिभेचा कालजयी आविष्कार – आर्यभटीय
Saleel Kulkarni Share Special Post For Devendra Fadnavis of New Chief Minister Of Maharashtra
“एखाद्याने स्वप्न पाहावे आणि पूर्ण करावे तर असे”, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानिमित्ताने सलील कुलकर्णींची खास पोस्ट, म्हणाले…

‘बाबा, इथे कुठले आजोबा राहतात?’ जयचा प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच त्याने तिघांना एका संगमरवरी पुतळ्यासमोर नेऊन म्हटलं, ‘हे बघा आजोबा. यांचं नाव जगन्नाथ शंकरशेट. पण सगळेजण त्यांना नाना शंकरशेट म्हणूनच ओळखायचे.’ एका संगमरवरी चौथऱ्यावर खूप मोठ्ठी पगडी घातलेल्या त्या रुबाबदार आजोबांच्या दर्शनाने सगळे भारावून गेले आणि नकळत सर्वानी हात जोडले.

‘पण बाबा, यांचा पुतळा इथे का बसवलाय? ते कुणी इथले मुख्य होते का?’

बाबा हसत म्हणाला, ‘चला, थोडा वेळ आपण या पायऱ्यांवर बसू या, मग सांगतो.’ त्याप्रमाणे बसल्यावर बाबाने विचारले, ‘मल्हार, तुमच्या आजोबांना सगळेजण संस्कृत पंडित म्हणायचे हे माहिती असेलच ना तुम्हाला?’

‘हो. आणि त्यांना म्हणे संस्कृतसाठी जगन्नाथ शंकरशेट स्कॉलरशिपपण मिळाली होती.’ मल्हारचे तत्पर उत्तर.

‘अगदी बरोबर मल्हार. तर, ज्यांच्या नावाने ही स्कॉलरशिप दिली जायची, तेच हे जगन्नाथ शंकरशेट आजोबा. मुद्दामच मी तुम्हाला इथे घेऊन आलोय. नाना अत्यंत श्रीमंत घराण्यातले होते. पण संपत्तीचा उपयोग त्यांनी अनेक समाजोपयोगी कामांसाठी केला. नाना त्यांच्या दानशूरपणासाठीसुद्धा खूप प्रसिद्ध होते. तेव्हा आपल्यावर इंग्रजांचे राज्य होते. आणि तुम्हाला हेही माहितीच असेल की सुरुवातीला सात वेगवेगळी बेटं एकत्र करून हे मुंबई शहर निर्माण झालेलं आहे. पण आज तुम्हाला दिसतेय ती मुंबई आणि तेव्हाच्या मुंबईमध्ये जमीन-अस्मानाचा फरक होता बरं का! तेव्हाची मुंबई आतासारखी अस्ताव्यस्त वाढलेली नव्हती. आज जगातील अनेक मोठय़ा आणि भरभराटीला आलेल्या शहरांमध्ये मुंबईची गणना होते. या मुंबई शहराला नावारूपाला आणण्यात नानांनी खूपच प्रयत्न केले आहेत. म्हणूनच त्यांना ‘मुंबईचे शिल्पकार’ असंही म्हणतात. नाना फक्त दानशूरच होते असं नाही हं; समाजसेवा, समाजसुधारणा आणि शिक्षण क्षेत्रातही त्यांनी खूप मोठं कार्य केलं आहे. आज आपण लोकल गाडीने इथवर आलो, ती मुंबईत चालू व्हावी, मुंबईकरांना प्रवास सोयीचा व्हावा म्हणून नाना शंकरशेट तसेच जमशेटजी टाटांसारख्या उद्योगपतींचं मोठं योगदान आहे. त्या दोघांनी ब्रिटिश सरकारकडे सतत पाठपुरावा केला आणि अखेर १६ एप्रिल १८५३ रोजी आपण ज्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला उतरलो तिथून ठाण्यासाठी पहिली लोकल गाडी सुरू झाली. इंग्रज इथे येण्यापूर्वी आपल्या मुलांसाठी विशिष्ट असा अभ्यासक्रम तयार केला गेला नव्हता. मुंबईत त्यादृष्टीने शाळाही नव्हत्या. परंतु आपल्या भारतीय मुलांनाही इंग्रजांप्रमाणे आधुनिक- म्हणजे फक्त शाळेपर्यंत नाही, तर पदवीपर्यंतचे.. कायद्याचे तसेच पाश्चात्त्य वैद्यकीय म्हणजे अ‍ॅलोपॅथीचे शिक्षणही मिळावे, हा नानांचा ध्यास  होता. नेहाबाई, आज तुम्हा मुलींना शिकण्यासाठी भरपूर शाळा आहेत. पण त्याकाळी मुलींच्या शिक्षणासाठी ना शाळा होत्या, ना त्यांना शिकण्याची परवानगी होती. पण मुलींनाही शिक्षणाची संधी मिळायला हवी, हा नानांचा आग्रह होता. तेव्हा त्यांच्या पुढाकाराने मुलींसाठी कन्याशाळा सुरू झाल्या. मुलींना प्रोत्साहन म्हणून शिक्षण आणि शिक्षणाचे साहित्यही मोफत दिले जायचे. विशेष म्हणजे, पास झालेल्या मुलींचा त्यांनी स्वत:च्या घरी सत्कारही केला. अर्थात हे सर्व करताना त्यांना त्यावेळच्या कर्मठ समाजाकडून विरोधही भरपूर झाला. शिक्षण समितीमध्ये एक सभासद या नात्याने त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. समितीतील काही इंग्रज विद्वानांनी संस्कृतला प्राचीन भाषा ठरवून अभ्यासक्रमातून काढायचा विचार केला तेव्हा नानांनी त्याला ठाम विरोध केला. ‘संस्कृत ही आमच्या सर्व भारतीय भाषांची माता आहे,’ असे सांगून अभ्यासक्रमात ती असलीच पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. पुढे मॅट्रिकला संस्कृतमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला त्यांच्याच नावाने जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती सुरू झाली; जी तुमच्या आजोबांना मिळाली होती. त्यांनी संस्कृत विद्यालय आणि संस्कृत वाचनालयही सुरू केले होते. आपण एल्फिन्स्टन कॉलेज बघितले ना, त्याच्या उभारणीतही नानांचा सहभाग होता बरं का! आज तुम्ही सहजपणे ज्या विविध विषयांच्या शाखांतून शिक्षण घेत आहात, त्या आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्या नानांनी रोवली ती थोर व्यक्ती दाखवायला मुद्दाम मी तुम्हाला इथे आणलं.

ब्रिटिश सरकारलासुद्धा नानांच्या औदार्यामुळे, कार्यामुळे, हुशारीमुळे त्यांच्याबद्दल आदर वाटत असे. आता आपण जिथे बसलोत ना, त्या एशियाटिक सोसायटीच्या कार्यकारी मंडळात तोपर्यंत कुणा भारतीयांना प्रवेश नव्हता. परंतु आपल्या नानांना मात्र इंग्रजांनी पहिले भारतीय सदस्य करून घेतले, हा मोठाच बहुमान होता. अर्थात नानांनी या पदाचा उपयोग स्वत:साठी नाही, तर समाजोपयोगी कामांसाठीच केला. त्यांच्याप्रति आदर म्हणून एशियाटिक सोसायटीच्या आवारात साकारलेला त्यांचा हा  पुतळा आपल्याला त्यांच्या महान कार्याची कायम आठवण करून देत असतो. नानांबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल अजून खूप काही सांगता येईल; पण आता निघायला हवं,’ असं म्हणत बाबा मुलांसोबत पायऱ्या उतरायला लागला.

alaknanda263@yahoo.com

Story img Loader