आसाराम लोमटे
एखादं गद्य शैलीदार आणि प्रतिमा-पतीकांनी युक्त असेल तर त्याला ती एक प्रकारची कविताच आहे असं म्हणण्याची पद्धत आहे. पण ‘हाडकी हाडवळा’बाबत तसे म्हणता येत नाही. एका श्रेष्ठ कवीचं हे नितांतसुंदर असं गद्यच आहे. ढसाळांच्या कवितेची विपुल चर्चा झाली. मुख्यत्वे कवी म्हणूनच ढसाळ मराठी वाचकांना परिचित आहेत. पण ‘हाडकी हाडवळा’ मात्र दुर्लक्षितच राहिली..
‘पांढरपेशा थराने दिमाखाने जपलेली अलवार घरंदाज भाषा नामदेव ढसाळ एखाद्या बटकीसारखी वाकवतो. निर्दयपणे तिची मोडतोड करतो, अथवा तिच्यात अशिष्ट भर घालून तिचे बुद्धय़ाच एक विद्रूप करतो. त्याच्या कवितेतल्या आशयासाठी हे सारे त्याला आवश्यक वाटते. जगण्यातला असह्य दाह कवितारूप होतो.. नामदेव हा अनुभवांचे हलाहल पचवलेला कवी आहे, त्याची सुंदर कवितादेखील ज्वलजहाल असू शकते. नामदेवच्या रसपूर्ण वर्णन शैलीला या कादंबरीत कारुण्य-सुंदर पदर आहेत. एरवी त्याने आपले पत्र हलाहलाच्या शाईने भरलेल्या दौतीत बुडवून कविता किंवा गद्य लिहिले असते.’
वरील संपूर्ण अवतरण हे एकाच लेखकाचे नाही. त्यातला पूर्वार्ध विजय तेंडुलकर यांचा आणि उत्तरार्ध अरुण साधू यांचा आहे. ‘गोलपिठा’ला प्रस्तावना लिहिताना तेंडुलकरांनी ढसाळांच्या विद्रोही, रोकडय़ा, रांगडय़ा आणि संतप्त अशा शब्दकळेला अधोरेखित केले होते. तर ‘हाडकी हाडवळा’ या ढसाळांच्या कादंबरीच्या तिसऱ्या आवृत्तीला प्रस्तावना लिहिताना अरुण साधू यांनी या स्फोटक आशयाची कविता लिहिणाऱ्या कवीच्या कादंबरीतील भाषिक वैशिष्टय़े सांगितली होती. ‘हाडकी हाडवळा’ वाचणाऱ्या कोणत्याही वाचकाला हा विशेष सहजपणे लक्षात येईल. एरवी कवितेत सुरुंग पेरणारी, आगीचे लोळ घेऊन येणारी ढसाळांची भाषा या कादंबरीत कधी तलम, मुलायम तर कधी मोहक भासू लागते. अर्थात हे भाषिक सामर्थ्य कवितेप्रमाणेच स्तिमित करणारं आहे. पंचवीस- तीस वर्षांपूर्वी वाचलेल्या या कादंबरीचा प्रभाव अजूनही तसाच आहे.
खेडय़ातून शहरात दाखल होतानाचं बुजलेपण अंगी असतानाच, हातात पडेल ते नवं पुस्तक वाचण्याचा सपाटा सुरू होता. बारावीनंतर शिकत असताना नामदेव ढसाळ यांचा ‘गोलपिठा’ हाती पडला. त्यांचे मिळतील ते सर्व कवितासंग्रह वाचून काढले. या कवितेतून आलेलं भारावलेपण डोक्यात असतानाच ‘हाडकी हाडवळा’ ही अतिशय छोटय़ा आकारातली कादंबरी हाती आली. ती एकाच बैठकीत वाचून झाली. मधल्या काळात ही कादंबरी दुर्मीळ झाली होती. तिची तिसरी आवृत्ती अरुण साधू यांच्या प्रस्तावनेसह शब्द पब्लिकेशनने २०१० साली प्रकाशित केली. शंभरेक पानांच्या या कादंबरीच्या शेवटी दोन-तीन पानांचे एक निवेदन होते. त्यात ढसाळांनी या कादंबरीच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल सांगितले होते. हे एवढे छोटे लेखनसुद्धा सलग नव्हे तर हप्त्याने लिहून झाले आणि ते प्रथम ‘दीपमाळ’ या दिवाळी अंकात १९८० साली प्रसिद्ध झाले. हा तपशील त्या निवेदनातून कळतो. ‘या लेखनाची जात ‘ऑटो नॉव्हेल’ या नव्याने रूढ होत असलेल्या लेखन प्रकाराशी मिळती जुळती आहे.’ हे सांगतानाच कादंबरीच्या शीर्षकाचेही स्पष्टीकरण ढसाळांनी दिलेले आहे. ते म्हणतात ‘हाडकी हाडवळा’ म्हणजे महारांना मिळालेली सामूहिक इनामी जमीन. या इनामाची मुळे थेट निजामशाहीच्या अमलापर्यंत पोचतात.’ या निवेदनात एक इशारा वाचकाला वाचायला मिळतो तो असा.. ‘आज माझे व्यक्तिमत्त्वच दुभंगून गेले आहे. कनेरसर पूरचा नामदेव ढसाळ आज राहिलेला नाही. तो दलितांवरील अन्याय दूर करणाऱ्या एका युवक संघटनेचा संस्थापक आणि प्रमुख कार्यकर्ता आहे. एकूण प्रस्थापित समाजाविषयीच त्याच्या मनात कमालीचा कडवटपणा भरलेला आहे. प्रस्थापित समाजातील कोणाही व्यक्तीविषयी व तिने दाखवलेल्या आस्थेविषयी या नामदेवच्या मनात प्रथमदर्शनी फक्त संशयच निर्माण होतो आणि ती आपली साता जन्मांची वैरी असावी अशीच त्याची भावना होते. हा नामदेव ढसाळ या लेखनात तुम्हाला कुठेही आढळणार नाही. त्याला कोणी इथे शोधण्याचा प्रयत्न करू नये.’ आणि त्यांनी दिलेल्या या इशाऱ्याचा प्रत्यय कादंबरीत वाचकाला येतो.
कादंबरीची सुरुवात पावसाने होते. ‘अखेर भळभळत राहणाऱ्या पावसाचं प्रपातात रूपांतर झालं. दिवसावर दिवस रेटू लागले पण पाऊस काही खळेना. काळय़ाभोर ढगांनी आकाश गच्च कोंदटून आलेलं. औषधालाही वाफसा होईना. नखाला दाखवायलाही सूर्य दिसेना. सर्वत्र प्राण घुसमटून टाकणारा ओलाजर्द, सादळलेला, किर्र काळोख. मुसळा एवढय़ा धारांनी जमिनीच्या पोटात दडलेला खडा न खडा उघडा पडू लागला. जमिनीला क्षतं क्षतं पडू लागली. एखाद्या सासुरवाशिणीला अत्याचारी नवऱ्यानं चाव्हऱ्याखाली बडवून काढावं अशी जीवघेणी सडसड अधिकच गहिरी होऊ लागली. ऊनवाऱ्याचा खेळ खेळणारा, मोरासारखा पंख पिसारत जाणारा आषाढ- श्रावणी पाऊस या वेळेला मात्र क्रूर होऊन आयपांढरीतून धुमाकूळ घालत होता.’
या कादंबरीत समाजजीवनाचे अनेक पैलू दृष्टीस येतात. गावगाडय़ाबाहेर राहणारा समाज, या समाजाच्या चालीरीती, परंपरा, गावकुसाबाहेरील समाजाचे अन्य जातींशी असलेले संबंध उजागर करत ही कादंबरी एका लोकजीवनाचा आलेख मांडते. आपले बालपणाचे अनुभव निरागस अशा नजरेतून या कादंबरीत ढसाळ यांनी टिपलेले आहेत. बदलांच्या खाणाखुणा निर्माण होण्यापूर्वीचा गावगाडा कसा होता याचे दर्शन या कादंबरीतून घडते. ही एकाच वेळी बायजा आणि सावळा या मायलेकराची कहाणी आहे.
बायजा ही गावकुसाबाहेरील स्त्री आणि सावळा हा तिचा एकुलता एक लहान मुलगा. बायजाचा नवरा सायब्या कामानिमित्त मुंबईला राहतो. लहानग्या सावळय़ासह बायजा गावकुसाबाहेरच्या वस्तीत राहते. जेव्हा सायब्या अधूनमधून गावाकडे येतो, तेव्हा या कुटुंबाची चंगळ असते. सावळाही खुश राहतो. त्याचा वेगळाच दिमाख या काळात असतो. सायब्या परत मुंबईला निघून गेल्यानंतर या मायलेकरांना अनेकदा उपासमारीत दिवस काढावे लागतात. विशेषत: जेव्हा पावसाळय़ात हाताला काम नसते, पावसाची उघडीप नसल्याने शेतातील मशागतीची कामे बंद असतात त्यावेळी पोटासाठी खूप संघर्ष करावा लागतो. गावात तशी ‘हाडकी हाडवळय़ा’ची जमीन आहे, पण एका दुष्काळात महारांनी फक्त दीड मण ज्वारीसाठी ही वतनी जमीन एका इनामदाराकडे गहाण टाकलेली असते. दुष्काळ संपल्यानंतर सर्व जण जातात आणि या जमिनीची मागणी करतात. घेतलेले दाणे परत द्यायला जातात, पण तोवर इनामदार या जमिनीवर कब्जेदार म्हणून स्वत:चे नाव लावतो. ज्यांची मूळ जमीन आहे त्यांनाच अशा पद्धतीने हाकलून लावले जाते. पोटासाठी महारांची परवड सुरू होते. बायजा या सर्व परिस्थितीला तोंड देत आपल्या सावळा या मुलासह जगत असते.
गावकीची काठी तिच्या कुटुंबात आल्यानंतर गावकीची सगळी कामे तिला करावी लागतात. नागपंचमीसाठी वारूळ सांगावे लागते. गावात कुणी मयत झाले तर त्याचा सांगावा द्यावा लागतो. होळीच्या सणाला टिपऱ्या खेळण्यासाठी गावात घरागणिक टिपऱ्यांचा जोड द्यावा लागतो. अशी सगळी कामे करताना मुलगा सावळा आणि दीर मनबा यांची या कामात तिला मदत होते. काठी आल्यामुळे तिच्या घराकडे गावकीचे काम येते. लोक शिळंपाकं पदरात घालतात. उपासमार सुरूच असते. गावगाडय़ात या समाजाला किती कामं करावी लागतात याचं वर्णन कादंबरीत येतं. ‘त्यांचं लगीन याव आलं की म्हणावं चला फाटय़ा फोडायला. कुणी मेलं-बिलं तर म्हणावं चला मर्तिकाच्या चिठ्ठय़ा पोहोचवायला. पन्नास पन्नास कोस महारांनी यांच्यासाठी उपाशी- तपाशी भटकावं, सणसूद आला तर घरचं निवद बाजूला ठेवावं. ह्यांचं सोपस्कार करीत राहावं. ह्यांच्या पिकात गुरंढोरं शिरलं तर ते महारांनीच हुसकावून कोंडवाडय़ात नेऊन कोंडावं. यांच्या दारात कुत्र मांजर पिळकलं की ते महारांनीच साफ करावं. हक्कानं काय- बाय मागितलं तर यांनी हिडीसफिडीस करावं. अजून दानंच झालं नाहीत. अजून अमुकच झालं नाही असं म्हणून महाराला वाट लावावं.’ गावकीची कामे करताना गावाकडून पदरी येणारी उपेक्षेची वागणूक किती वेगवेगळय़ा स्तरावर अनुभवायला मिळायची याचे वर्णन या कादंबरीत येते.
‘हाडकी अडवळा’ मधून आलेले लोकजीवन समृद्ध आहे. विविध प्रकारचे सण- उत्सव, परंपरा यांची जोड या जीवनाला आहे. जगताना पारंपरिक श्रद्धा जोपासत आणि पोथ्या पुराणात मन रमवत कष्टणाऱ्या समूहाचे वेगळेच दर्शन त्यातून घडते. दिवाळीनंतर गावची लक्ष्मीआई, कनेरसरची यमाई, पाबळचा पीर, केंदूरची बगाडे, गाव शिवांच्या जत्रा खेत्रा, बैलगाडय़ांच्या शर्यती, नाचगाणी, तमाशा, हजेरी कुस्त्यांचा फड अशा अनेक गोष्टींनी हे लोकजीवन समृद्ध झाले आहे. मरीआईचा गाडा आल्यानंतर हलगी-डफडी वाजू लागतात. गाणे- बजावणे चालू होते.
‘ढवळय़ा नंदीचं देऊळ.. ढवळय़ा नंदीचं देऊळ’ अशी गाणी म्हणणारा एखाद्या महिलेचा स्वर आणि पुन्हा कोरसद्वारे मिळणारी साथ यामधून अनेक कथा- काव्य सादर केली जातात. घटना आणि प्रसंगांच्या साखळीमधून एखादी कथा उलगडली जाते. यात पुराणातील काही कथा लोकलयीत गुंफल्या जातात. या कादंबरीत श्रीयाळ चांगुना आणि चिलया बाळाची कथा आहे. पारंपरिक अशा कथनपरंपरेचा आधार यातल्या निवेदनाला दिसून येतो. आषाढात मरीआईचा गाडा आल्यानंतर कडाडणारी हलगी डफडी, पोतराज आणि लक्ष्मीच्या भक्तीने यांच्या मिरवणुकीतील स्वरमेळातून गायली जाणारी गाणी, देवीसमोर सादर केली जाणारी धुपारती अशा वेगवेगळय़ा माध्यमातून हे पारंपरिक भाषावैभव ‘हाडकी हाडवळा’मधून दिसते. खेडय़ातले सामाजिक व्यवहार, स्त्रियांना रमवणारी गाणी, निसर्ग आणि निसर्गाचा कोप अशा किती तरी गोष्टींचे कारुण्यपूर्ण असे वर्णन या कादंबरीत वाचायला मिळते. संसाराच्या रगाडय़ात आंबून गेलेल्या बायका लोकगीताच्या माध्यमातून मोकळय़ा होऊ लागतात. बोटात बोटं गुंतत जातात, पावलं तालावर पडू लागतात आणि सुखदु:खाच्या ओव्यांना सूर सापडू लागतो. अंगण वर्तुळाकार होत जातं. जगण्यातले सर्व उन्हाळे, पावसाळे, वंचना, हर्ष- खेद असे सारे काही त्या फेरात वितळून जाऊ लागतात.
होळीला घरागणिक टिपरे दिल्यानंतर जेव्हा तालासुरात सगळे गाव टिपऱ्या खेळते तेव्हा सावळा बायजाला ‘आयेव मलाबी टिपरी खेळायचीय’ असं म्हणतो. ही बाब बायजाच्या मनाला दु:खाच्या डागण्या देणारी असते. तिला हा खेळच उधळून लावावा वाटतो. त्याला होळीच्या जाळासारखी धडा धडा आग लावावी वाटते. खेळाचा सगळा खटाटोप महारा- मांगांनी करावा, पण त्याचा आनंद लुटायची परवानगी मात्र त्यांना नाही. गावकऱ्यांनी महारा मांगांना बाराव्या- तेराव्याचे, लग्नाचे, टिळय़ाचे जेवण घालावे, पण सगळे सोयरे जेवल्यानंतर कुत्र्यामांजरांना वाढतात तसे वाढावे याचे शल्य बायजाला छळत असते. बदलाचा कोणताही वारा गावापर्यंत पोहोचला नव्हता त्या काळाचे हे वर्णन आहे. ते कमालीच्या संयतपणे व्यक्त होत असले तरी जातीसंस्थेने चालवलेले परंपरागत शोषण वाचकाच्या नजरेला जागोजागी दिसू लागते. बदलाआधीच्या शोषणव्यवस्थेचे एक विक्राळ पण थंड असे अजगरासारखे स्वरूप या कादंबरीत जाणवते.
गावकीची कामे करून बायजाचा जीव वैतागून जातो. मुंबईत असलेल्या नवऱ्याची ओढ तिला वाटू लागते. गावशिव सोडून मुंबईला जावंसं वाटू लागतं, पण घरदार सांभाळण्यासाठी तिच्या नवऱ्याने- सायब्यानेच अशी ताटातूट करून तिला इथं ठेवलेलं असतं. त्याच्यापुढे तिला जाता येत नाही. मनातल्या मनात तिला हा मार्ग सोसावा लागत होता. ती कुणाला बोलून दाखवत नाही. मुंबईला जाण्याचा तिचा इरादा आणखी दृढ करणारी आणि तिला अत्यंत भोवंडून टाकणारी एक घटना बायजाच्या आयुष्यात घडते. या प्रसंगानंतरचं तिचं हादरणं, तिचा संताप, तळतळाट, उद्वेग कळसाला पोहोचतो.
एखादं गद्य शैलीदार आणि प्रतिमा-प्रतिकांनी युक्त असेल तर त्याला ती एक प्रकारची कविताच आहे असं म्हणण्याची पद्धत आहे. पण ‘हाडकी हाडवळा’बाबत तसे म्हणता येत नाही. एका श्रेष्ठ कवीचं हे नितांत सुंदर असं गद्यच आहे. किशोरवयीन सावळाच्या निरागस नजरेतून आलेलं, बायजाच्या जगण्याच्या संघर्षांतून रसरसलेलं. कुठल्याही अभिनिवेशाशिवाय केलेलं हे वेदना आणि कारुण्य याचं हे विणकाम. त्याचा पोत विलक्षण सुंदर आहे. ढसाळांच्या कवितेची विपुल चर्चा झाली. अनुवादाच्या माध्यमातून ती विविध भारतीय आणि परदेशी भाषांमध्येही गेली. मुख्यत्वे कवी म्हणूनच ढसाळ मराठी वाचकांना परिचित आहेत. ‘हाडकी हाडवळा’ची चर्चा मात्र फारशी झाली नाही. या कादंबरीचे यथायोग्य मूल्यमापन चांगल्या समीक्षकाकडून झाले नाही अशी खंत अरुण साधू यांनी तिच्या प्रस्तावनेतही व्यक्त केली आहे. १९७०-८० च्या दशकात ढसाळ कवी म्हणून एखाद्या तप्त ज्वालामुखीप्रमाणे दीप्तीमान होत गेले. त्यांची कविता वणव्यासारखी पसरत गेली. तिजोरीत प्रकाश लॉक करणाऱ्या सामंतशहांना ती खडसावत राहिली. शहरा- शहराला आग लावीत चला, असे आवाहन या कवितेने रक्तात पेटलेल्या अगणित सूर्याना केले. ‘स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे,’
असा प्रश्न विचारून या कवितेने व्यवस्थेला नागडे केले. ‘निमित्त १५ ऑगस्ट ७१’
ही गोलपिठा कवितासंग्रहातील शेवटची कविता आहे. स्वातंत्र्याची अवकळा अनेक मितींनी न्याहाळत कवी ती एका आवेगात सांगत राहतो. या कवितेच्या शेवटी अशी ओळ येते..
‘ ..हाडकी हाडवळा पुन्हा हाक मारतोय तुला
तू ये आणि हा उरातला गहिवर
ज्याच्या चांदण्या तुझ्या मार्गात पसरलेल्या..’
‘गोलपिठा’च्या शेवटच्या पानावर आलेला ‘हाडकी हाडवळा’चा संदर्भ पुढे दहा वर्षांनी एका लोभस अशा गद्यात ढसाळांनी विस्तृत केला आणि तो एका ‘निष्पाप करुण सुंदर’ अशा कादंबरीच्या रूपाने अक्षरऐवजात अवतरला.
नव्वदोत्तरी ग्रामीण जगण्याचे वास्तव आसाराम लोमटे यांच्या कथांमधून समोर येते. पत्रकारिता आणि कथालेखन या दोन्ही क्षेत्रात सारख्याच प्रमाणात कार्यरत असलेल्या लोमटे यांच्या दुष्काळावरील लेखमालिका प्रचंड गाजल्या. ‘आलोक’, ‘इडा पिडा टळो’ हे दोन दीर्घकथांचे संग्रह आणि ‘धूळपेर’ हा लेखसंग्रह प्रकाशित. ‘आलोक’ संग्रह साहित्य अकादमीने सन्मानित. ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ तसेच अनेक पारितोषिकांनी कथालेखनाचा गौरव.aasaramlomte@gmail.com