गिरीश पांडुरंग कुलकर्णी girishkulkarni1@gmail.com
मराठी नाटय़-चित्रपटसृष्टीतील सामाजिक भान असलेले संवेदनशील कलावंत गिरीश कुलकर्णी यांचे मनमुक्त पाक्षिक सदर..
दृश्य पहिलं
वेळ : सकाळ
स्थळ : शहरातलं प्रेक्षणीय स्थळ
दोन्ही हात विस्तारत, पाऊल पुढे टाकून जणू मानवता कवेत घेऊ पाहणारा नेल्सन मंडेलांचा भव्य पुतळा नजर उंचावत पाहात असतानाच मंडेला म्हणाला, ‘‘आएम मंडेला टू!’’
घ्ॉरघ्ॉरघुळखॅक करीत चेनस्मोकिंगने जमा केलेला घुंगुरुवाळा खर्ज लावीत सकाळी भेटल्यापासून तासाभरात दोस्त झालेला माझा काळुराम गाइड स्वच्छ दंतपंक्ती विचकीत म्हणाला. त्याचंही नाव मंडेलाच होतं आणि त्यावरून तो वारंवार पांचट विनोद करत होता. ‘युनियन बिल्डिंग’ नावाचं देखणं वास्तुशिल्प आणि पुढे अंगणात हे बाहू फैलावून उभे हसरे मंडेला! या मांडणीबद्दलचं कुतूहल आकार घेत असतानाच मंडेला बोलला. त्या भव्य आकृतीच्या गुडघ्याएवढेही आम्ही नव्हतो. अन् पठ्ठय़ा म्हणतोय, मला बघा! मग मी त्याचाही एक फोटो काढला. तशी लगेच घ्ॉरघ्ॉरघुळखॅक!
हा तर बोलूनचालून गाइड, त्यामुळे भरपूर माहिती अन् अखंड बडबड. भारताच्या वाटेवर असताना डच कसे केपला वळसा घालून विश्रांतीला थांबले आणि पॉल क्रूगरनं कशी पहिली डच वसाहत उभी केली, मग इंग्रज कसे आले, त्यांनी डचांना कसं किनारपट्टीवरून आत पिटाळलं आणि स्थानिक जमातींनी कसं त्यांना पराभूत करून डोंगरावर पिटाळलं.. सगळं. अव्याहत घुंगरं वाजतायत घशात. एक मात्र नवलाचं वाटलं. पराभवाचा, मानहानीचा इतिहास सांगतानाही निरपेक्षता ढळत नव्हती. शत्रूचं योग्य कारणांकरिता कौतुक करताना वृथा अस्मिता आड येत नव्हती. इतिहासातल्या गोष्टी सांगताना मध्येच, ‘‘आज आम्हाला का सुचत नाही असं काही भव्य उभारायला?’’ असा वर्तमानाला प्रश्न. डचांनी बांधलेलं ‘फोरट्रेकर्स मॉन्यूमेंट’ हा वास्तुकलेचा अनवट अन् देखणा आविष्कार. त्याच्या अंगणात चालला होता हा संवाद.
कुठल्या तरी साली १६ डिसेंबर रोजी अखेर डचांनी एतद्देशीय जमातींचा पराभव करून सूड उगवला. त्या विजयाप्रीत्यर्थ बांधलेलं हे स्मृतिस्थळ. युद्धातल्या हुतात्म्यांच्या कबरीवर बरोबर १६ डिसेंबरला थेट सूर्यप्रकाश पडेल असा एक झरोका त्या गगनचुंबी छतात त्यांनी पाडला.
‘‘वॉट मास्टरी! वॉट थिंकिंग! दे डिडन्ट फॉगेट देअ डेड!’’ आपल्या पूर्वजांच्या शत्रूच्या अचाट कामगिरीचं कौतुक करणारा मंडेला त्या उंच छतावरून खाली दूरवर पसरलेलं प्रिटोरिया शहर दाखवीत म्हणाला.
‘‘आय एम डिवोर्सड् थ्राइस. आय स्टील डोन्ट नो हाऊ टू स्टॉपे अ फाइट. माझ्या सगळ्या बायका उगाचच भांडायच्या माझ्याशी. का तर, मला बायका आवडतात.’’ मी मंडेलामुख पाहत राहिलो, तोच त्यानं दूर बोट दाखवीत म्हटलं, ‘‘दॅट साइड इज क्रूगर’’ मी अभावित नजर फिरवली. दक्षिणपूर्वेला फक्त झाडी होती.
०
दृश्य दुसरे
वेळ : माध्यान्ह
स्थळ : शहरातल्या झाडाखाली
‘‘ट्टॉक्स्वॉ, ट्टॉक्स्वॉ, माझ्झुवे हॅहॅहॅ’’
‘ट्टॉक्’ असा जीभ वेटोळी करीत आवाज काढून त्याला पुढची जोडाक्षरे जोडीत त्या उंच्यापुऱ्या देहानं हसत आपलं नाव सांगितलं. मग माझे विस्फारलेले डोळे पाहून आणिक तीन-चारदा नाव घेत मला ते उच्चारून दाखवायचा उखाणा घातला. मी ‘ट्टॉक्’ असा आवाज काढून ‘स्वा’ स्वतंत्र करीत प्रयत्न केले, तर तो हॅहॅहॅ करीत नकारार्थी मान हलवीत राहिला. ‘ट्टॉक्’ आणि ‘स्वा’ हे एकत्र म्हणता यायला आफ्रिकेत जन्मायला हवं असं मनात येत असतानाच स्वारी म्हणाली, ‘‘यू आर फ्रॉम लँड ऑफ गँड्धी. दॅट्स वॉय आय वुईल फोऽऽऽगीव्ह यू.’’
आतिच्याआयला, मी चमकलोच. आजवर एकदाही या स्वतच्या विशेषत्वाची जाणीव झाली नव्हती. आज मात्र केवळ लँड ऑफ गांधीमध्ये जन्मलो म्हणून एका दिव्यातून अभय मिळालं होतं. इतक्यात ‘‘अॅक्च्युली आएम ऑल्सो फ्रोम लँड औफ गँड्धी.’’ हे असं परत ‘आ’ वासवणारं वाक्य साडेसहा फुटांवरून आलं. माझ्झुवे साडेसहा फूट, काळाकभिन्न, डबलहाडी ओठांच्या जाड लाटय़ा ऊतू घालत हसणारा आफ्रिकन माणूस. भेट अन् संवादाचं स्थळ प्रिटोरिया हे दक्षिण आफ्रिका देशाचं राजधानीचं ठिकाण. आता गांधीजी काही काळ आफ्रिकेत होते, पण म्हणून..?
‘‘आएम फ्रौम झुलुनाटाल, आएम अ झुलु. गँड्धी वॉस इन झुलुनाटाल. ही फर्स्ट टॉक्ड अबाऊट अस, अवर राइट्स.’’
‘‘अच्छाऽऽऽ, आय मीन ओके, वुई से अच्छा फॉर ओके.’’
‘‘अच्चा हॅहॅहॅ’’
मग टॉक टॉकनं मला गांधींचं आफ्रिकी माणसाच्या मनात असलेलं आदराचं स्थान, ते मंडेलांचे गुरू असणं याबद्दल, त्यांच्या अन् मंडेलांच्या लढय़ाबद्दल अत्यंत नाटय़पूर्ण विवेचन ऐकवलं. आणि अचानक ‘‘डू यू रिस्फेक्ट गँड्धी?’’ असं सिगरेट देत विचारलं. मी गडबडलो. नुकतंच बालमित्रांच्या व्हॉट्सअॅप गटातल्या एकानं नथुरामची जयंती साजरी केली होती. मी काहीच बोललो नव्हतो त्यावर. शाळेपासूनच गांधी, त्यांची माकडं हे सारे हसण्या- हसवण्याचेच विषय राहिले. मग नंतर कधीतरी वाचन वगैरे, प्रवास वगैरे केल्यावर ते बंद झालं. पण आमच्या ‘लँड औफ गँड्धी’मध्ये अहिंसेची हेटाळणी होते हे सत्य काही सांगवेना. त्यातच ज्या गोष्टीच्या चित्रीकरणासाठी आलो होतो, त्यातली सगळी माणसं सरसकट हिंसा करतात आणि ‘लँड औफ गँड्धी’तल्या लोकांना तो खूनखराबा बेतहाशा आवडतो हे जर मी सांगितलं, तर गडी मला जंगलापर्यंत न्यायचाच नाही कदाचित.
‘‘ऑफकोर्स!’’ असं रेटून खोटं बोललो. पुढच्या जंगलापर्यंतच्या प्रवासात मी टॉक टॉकची नजर टाळत राहिलो. त्यानं मात्र प्रेमानं त्यांनी कशी गांधींची दीडशेवी जयंती साजरी केली, किती मोठा अन् आनंदाचा उत्सव साजरा केला वगैरे कथन मांडलं. तो म्हणाला, ‘‘आज जे मी तुझ्याबरोबर मुक्तपणे बोलू शकतोय, सिगरेट पिऊ शकतोय त्याचं कारण गांधी. मी ऋणी आहे त्यांचा. आम्ही जंगलातल्या प्राण्यांसारखेच होतो. अजूनही आमच्याकडे विपुल प्राणी आहेत.. हॅहॅहॅ’’ त्यानं विनोदही केला. ‘‘आजही गोरे भिंतीआड विद्युतभारित तारांच्या कुंपणापलीकडे राहतात. त्यांच्या संकुलात आम्ही राहू शकत नाही. माणसाला प्राण्यासारखं वागवलं जातच आहे. अजून लढाई बाकी आहे.’’ दोन पोरांचा बाप असलेला टॉक टॉक सभ्य गृहस्थाश्रमी चाकरमानी होता. पर्यटन व्यवसायात त्याची उमेद सरली होती. पाहुण्यांना रिझवण्याचं कसब नित्य सरावातून घडवलेलं जाणवत होतं. सफाईदार इंग्रजीतून तो मला नवनवे पेच घालत होता. धावत्या रस्त्याभोवती झाडं दाटी करू लागली होती. दृष्टीभर हिरवं जंगल पसरत होतं.
०
दृश्य तिसरे
वेळ : तिन्हीसांजा
स्थळ : झाडी
क्विडीरट्रीट, श्युँयूँ, कीईंर्र.. अशा लिपीबद्ध न होणाऱ्या हाका ऐकीत मी त्या नदीकाठच्या घरी पोहोचलो. उंचवटय़ावर सात-आठ टुमदार शाकारल्या, उतरत्या छपरांची घरं. झाडं वानरांसवे अंगणात उतरलेली. पलीकडे खाली खळाळती नदी. पात्र विस्तीर्ण. प्रवाह जोमदार. पाण्यात तरंगत्या नाकपुडय़ांचे पाणघोडे. पुढय़ातली वानरे चुकवीत मी ओसरीतल्या बैठक व्यवस्थेत स्थानापन्न झालो. एक कृष्णसुंदरी हातात आफ्रिकी पेयाचा ग्लास अन् कसलासा फॉर्म घेऊन उभी. ती मला पेय देत म्हणाली, की हा फॉर्म भरून घेऊ. मी कोण कुठला ते लिहून घेतल्यावर म्हणाली, ‘‘हे वाचून सही कर.’’ वाचले- ‘ही खाजगी जागा जंगलात असून इथे वन्य श्वापदांचा वावर आहे. आपण आपल्या जबाबदारीवर इथं राहणार असून आपल्या जिवास बरेवाईट झाल्यास व्यवस्थापन जबाबदार नाही. अपघात टाळण्याविषयीच्या खबरदारीच्या सूचना.. वगैरे वगैरे.’ मी घाबरलोच. तिला अपेक्षित होतं. ती हसून म्हणाली, ‘‘डोण्ट वरी, दे आ ब्यूटीफुल पीपल. दे वोण्ट डिस्टर्ब यूव प्रायवसी.’’ भय जरासं निमालं त्या आश्वासनानं.
मला दिलेल्या घरात गेलो. पाश्चात्त्य अत्याधुनिक सजावट अन् रखरखाव. अर्थात सर्व गोष्टी घर जंगलात आहे हे सांगणाऱ्या. घरकुलाच्या किल्लीला जोडलेली एक शिट्टी. जर प्रसंग गुदरला तर वाजवायची. पण कुठे सापच दिसले, भिंतीपलीकडे बिबटय़ाच दिसला म्हणून उगाच वाजवू नका अशी प्रेमळ तंबीही.
‘‘तू लगेच जंगलात जाऊ इच्छितोस?’’ कृष्णसुंदरीचा प्रश्न.
‘‘होय तर.’’
मी उत्साहात तयार होऊन अंगणात. तिथे दोन गृहस्थ उभे.
‘‘हॅलो, मी लॉरेन्स.’’
‘‘हॅल्लोऽऽऽ, आएम जीजस क्राइस्ट हाहाहाहाहाहा.’’
‘‘हा सेड्रिक.’’ कृष्णसुंदरी.
‘‘वा सेड्रिक! प्रत्यक्ष ख्राइस्टबरोबर असता मला कशाची भीती? बहुधा मला बिग फाइव्ह दिसणार.’’
सिंह, हत्ती, रानम्हशी किंवा गवे (बफेलो), बिबटय़ा आणि गेंडा असे पाच पांडव. त्यांना म्हणायचं बिग फाइव्ह. त्यांच्यातलं कुणी दिसलं तर म्हणे भाग्ययोग. मग एका हिरव्याकंच रेंजरोव्हरमध्ये मागे मी, बॉनेटच्या पुढे बंपरवर बसवलेल्या खुर्चीत जीजस् आणि मध्ये स्टेअिरगवर लॉरेन्स. गुरगुरत गाडीने चालू आवाजांशी सूर मिळवला अन् वाट धरली. त्या हिरव्या रानात वाटा पुढे पळत हरवत होत्या. माझ्या नजरेचं भिरभिरं कानी पडणाऱ्या आवाजाबरहुकूम फिरत होतं. नवी माणसं भेटल्यावर आपसूक सुरू होणाऱ्या टकळीतून तू कोण? कुठला? प्रश्नांची झड लागली होती. लॉरेन्स अन् सुंदरी बहीण-भाऊ होते. लॉरेन्सनं दोन लग्नं केली होती आणि त्याला दोन पोरं होती. गेली बारा वर्ष तो येणाऱ्या हर पाहुण्याला हा झाडोरा अन् त्यातली ब्यूटीफुल पीपलची गर्दी दाखवीत फिरवीत होता. मी त्याला वाटेत दिसलेल्या विस्तीर्ण अन् सुबक शेतजमिनींबद्दल विचारलं. ‘‘तुला जमीन नाही का?’’ असंही विचारलं. तर तो म्हणाला, ‘‘शेतं, जमिनी, जंगलं सगळं या गोऱ्यांच्या मालकीचंय. आमची जमात खरं तर ‘बुश पीपल’ म्हणून ओळखली जाते. पण आम्ही इथे फक्त चाकरी करतो..’’ इथे जीजस म्हटला, ‘‘जंगलात शांततेच्या भाषेत बोला. हाहाहाहाहाऽऽ’’ वाचवलं त्यानं. प्रश्नांच्या रानातून मन परत हिरवाईत रमलं. मग त्यानं चालीत बेफिकिरी मिरवणारी एक लायनेस दाखवली. अन् मग पुढे हत्ती, जिराफ, डुकरं, झेब्रे, गेंडे, बिबटय़ा. सग्गळी प्राणीसृष्टी.
सांगतेला भर रानातल्या एका मचाणावर नेलं. चहुबाजूला गर्द झाडी. आभाळ रंगवीत सूर्य क्षितिजापार. अन् वाइनचा ग्लास हाती देत जीजस म्हणाला, ‘‘हॅव यू एन्जॉइड सीइंग दीज ब्यूटीफुल पीपल? तुला-मला त्यांच्यासारखं निसर्गाशी ‘बॅलन्स’ साधून राहता येत नाही. पण ते दु:ख तू या वाइनबरोबर पिऊन टाक वा त्या मावळत्या सूर्याला सांग.’’ रानातला आडमाप मनुष्य हे बोलत होता.
मी विचारात पडलो. टॉक टॉकच्या मनातली लढाई करून माणूस बनावं अजून? की माणसं का भांडतात, हे न कळलेल्या मंडेलाला जंगलात आणावं या जीजसपाशी? अंधार माजला तसा झाडीतून अगम्य लिपीबा आवाजांचा संगीतमेळ सजला. कानात अन् मनातही!