हृषीकेश गुप्ते याची ‘दंशकाल’ ही कादंबरी कुठल्याही एका रकान्यात बसवता येत नाही. प्रचंड भयनिर्मिती करणारी वर्णनं इथे आहेत; पण तिला फक्त भयकथा म्हणून सोडून देता येत नाही, कारण इथे भयनिर्मितीला अद्भुतावर सोडून दिलेलं नाही. इथलं भय निवेदनामधून येतं. कादंबरीत मानसिक भावनाविचारांचं भरपूर आणि विस्ताराने केलेली वर्णनं आहेत; पण म्हणून कादंबरी मानसिक आंदोलनं सांगणारी कादंबरीही ठरत नाही.
एका प्रतिष्ठित सायंदैनिकामध्ये मी बराच काळ पुस्तक परीक्षण लिहिलं. ललित कथा-कादंबऱ्या, वैचारिक, मराठी, इंग्रजी, सर्व प्रकारची पुस्तकं परीक्षणासाठी माझ्याकडे येत आणि ती वाचून मी त्यावर लिहीत असे. परीक्षणं लिहायला सुरुवात करण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून जरी मी पुस्तकं वाचत असलो; तरी परीक्षणं लिहायला लागल्यावर माझ्या वाचनात फरक पडला.
‘उभं’ वाचणं जवळजवळ बंद झालं आणि वाचनाचा वेग खूप कमी झाला. वाचनात आलेल्या प्रत्येक पुस्तकाने माझ्यावर संस्कार केले. पुस्तकात मजकूर असतो, मजकुराला शैली असते, मजकूर आकर्षक करण्यासाठी लेखक विविध मार्ग वापरत असतो. ते मार्ग म्हणजे केवळ अलंकार नसतात, त्यात खूप वैविध्य असतं. पुस्तकाचा, मजकुराचा काही तरी हेतू असतो आणि तो हेतू प्रक्षेपित करण्यासाठी लेखक एकेक क्लृप्ती वापरत असतो. .. असा मी शिकत गेलो. पुढे माझ्या डोक्यात प्रकाश पडला, की लेखकाने अमुक करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप करू नये; तर वाचन करताना अमुक अभिप्रेत होत जातं, असं म्हणावं. म्हणजे एका बाजूने लेखकावर भलत्या आरोपांचं बालंट येत नाही आणि दुसरीकडून साहित्यकृती – किंवा कोणतीही कलाकृती – एकदा कलावंतापासून वेगळी झाली, की तिचा आस्वाद हे चक्क एक सर्जनच पार पाडणं शक्य होतं. आस्वादकाला त्याच्या मर्यादेत, त्याच्या परिप्रेक्ष्यात जे काही अपील होईल; त्याच्या प्रकाशात कलाकृतीचा अर्थ – आशय ठरवण्याची त्याला पूर्ण मुभा असते, ती घेता येते.
हेही वाचा : ‘बीबी’चा मकबरा!
सायंदैनिकातील ती माझी परीक्षणं कधीच थांबली; पण मनाला लागलेलं हे वळण तसंच आहे. त्यानंतर कधीही मला कुठलंही पुस्तक पूर्वीसारख्या वेगाने वाचता आलं नाही. लिखाण चांगलं की वाईट, श्रेष्ठ की सामान्य असा भेद करण्याबरोबर साहित्यकृतीचा जो हेतू जाणवतो आहे, तो कितपत साध्य होतो आहे हे बघणं; म्हणजेच साहित्यकृतीची स्वत:ची अशी जी संगती आहे, (तिचा थांग लागल्यास) ती स्वीकारून ती साहित्यकृती आपल्याला कुठवर नेते हे चौकसबुद्धीने तपासणं, हेच सजग वाचकाचं काम आहे अशी माझी धारणा बनली; आणि अर्थात अंतर्गत सुसंगती हा साहित्यकृतीचा प्राथमिक गुणधर्म होय, असंही माझं ठाम मत झालं.
हृषीकेश गुप्ते याची ‘दंशकाल’सारखी कादंबरी या दृष्टीने माझ्यासारख्या वाचकाला पंचपक्वान्नासारखी आहे. तिला कुठल्या एका रकान्यात घालून बघता येत नाही. नारायण धारप यांच्या धर्तीची भयनिर्मिती करणारी वर्णनं इथे आहेत; पण ‘दंशकाल’ला एक भयकथा म्हणून सोडून देता येत नाही, कारण इथे भयनिर्मितीला अद्भुतावर सोडून दिलेलं नाही. इथलं भय निवेदनामधून येतं. कादंबरीत मानसिक भावनाविचारांचं भरपूर आणि विस्ताराने केलेली वर्णनं आहेत. पण म्हणून कादंबरी मानसिक आंदोलनं सांगणारी कादंबरी ठरत नाही, कारण इथे घटनांची, पात्रांची रेलचेल आहे. कादंबरीचा अर्धा भाग गावात घडतो. ती देशमुख कुटुंबातले संबंध, देशमुखांचे गावाशी असलेले संबंध यांचं तपशीलवार वर्णन करते. पण म्हणून ती ग्रामीण कादंबरी होत नाही, कारण सामाजिक संबंध आशयाच्या दृष्टीने मध्यवर्ती नाहीत. कादंबरीत सेक्स आणि हिंसा- दोन्हींचं प्रमाण मोठं आहे, तरी तिला त्या रकान्यातही टाकता येत नाही; कारण यातलं सेक्स प्रत्यक्षापेक्षा मनात जास्त आहे. सेक्सचे मनावरचे पडसाद इथे कृतीपेक्षा किती तरी जास्त महत्त्वाचे आहेत. तसंच यातली हिंसा घटनेचा परिणाम म्हणून येते, घटनेमागचं कारण म्हणून येत नाही. यातलं देशमुखांचं घर हेसुद्धा एक पात्रच म्हणावं लागेल. घराचं वर्णन इतकं बारीक आहे की ते वाचून घराचा त्रिमित नकाशा काढता यावा. घरातल्या खोल्या, त्यांच्या खिडक्या, घरभर पडणाऱ्या सावल्या, घरातल्या अंधाऱ्या जागा या सगळय़ातून कादंबरी घडत जाते. पुढे नायक-निवेदक डोंबिवलीला राहायला आल्यावरदेखील घर या वास्तूचा प्रभाव असाच राहतो.
हेही वाचा : आदले । आत्ताचे : नखललेलं काळीज..
ही कादंबरी एका बिंदूवरून सुरू होऊन काळात, अवकाशात पुढे पुढे सरकत असताना अधल्यामधल्या सूक्ष्म अवकाशातली ‘इन्फिनिटी’ न्याहाळते. तिथे अनंत शक्यता आहेत, असं वाचकाला पटवून देत राहते. कधी घडून गेलेल्या एखाद्या घटनेचे धागेदोरे खूप नंतर उलगडतात आणि एक वेगळा पैलू समोर ठेवतात. मग मागच्या घटनांचा अर्थ बदलतो आणि मागे जाऊन त्या अर्थासह पुन्हा सगळं जाणून घ्यावंसं वाटतं. म्हणजेच ही कादंबरी अनेकदा वाचण्याची, अनेकदा वाचून नव्याने आस्वाद घेण्याची कादंबरी आहे.
कादंबरीचं निवेदन प्रथमपुरुषी आहे. हा निवेदक एका बाजूने जणू तर्कापलीकडचे वाटावेत असे भीतीदायक अनुभव घेतो; आणि दुसऱ्या बाजूने एक मनोविकारतज्ज्ञ म्हणून तशा अनुभवांचं तार्किक विश्लेषण करतो! इतरांच्या नेणिवेच्या प्रदेशात पोचणं ही एक अशक्यप्राय गोष्ट असते. कितीही बुद्धिमान आणि प्रसरणशील प्रतिभेचा माणूस असला, तरी त्याला स्वत:च्या नेणिवेत डोकावता येत नाही. दुसऱ्याच्या नेणिवेत डोकावणं ही तर अजूनच दूरची बात, अशी भूमिका घेत हा निवेदक वाचकाला अद्भुत आणि वास्तव यांच्यात गिरक्या घ्यायला भाग पाडतो. तो घटना जोखताना त्या घटनांचे पडसाद आणि पूर्वसाद जोखायला मला आवडतात, असंही म्हणतो. यातून कादंबरी तर्क आणि अद्भुत यांचा तोल सांभाळते. काही तरी घडतं आणि निवेदक त्या घटनेचे ‘पडसाद आणि पूर्वसाद’ तपासत असताना वाचकासमोर किती तरी वेगवेगळे पैलू येत राहतात. त्यातून कादंबरी घटनांवरून उडय़ा मारत पुढे न जाता वारंवार भोवरे निर्माण करत, त्या भोवऱ्यांशी खेळत राहते. त्यातून कधी अद्भुत खुलतं, कधी वास्तवातले आधार स्पष्ट होतात. या प्रकारचं दुहेरी निवेदन हे या कादंबरीचं वैशिष्टय़ आहे आणि या दोन पातळय़ा सतत एकमेकांना खो देत राहतात. त्यातून वाचकाला अस्वस्थ करत राहतात.
हेही वाचा : चौसष्ट घरांच्या गोष्टी: महाविक्षिप्त प्रतिभावंत
एक गाव. त्या गावातले हे देशमुख. तीन भाऊ. त्यांच्या तीन तऱ्हा. घरावर भूतकाळातल्या कुठल्याशा घटनेची सावली. घरातल्या पुरुषांसमोर पड न खाणाऱ्या धीट बायका. कादंबरी सुरू होते तीच एक भाऊ वेड लागल्यागत वागू लागतो इथून. तो घरी येतो आणि सगळय़ांच्या जगण्याला विचित्र वळण मिळतं. हे देशमुख वेडसर म्हणावेत का? याचं उत्तर निवेदक देतो, ते असं- एसटी वेळेवर आली म्हणून बाबा महाराजांचे आभार मानणारे लोक, तशा घटनांना रोजच्या वर्तमानपत्रात पत्र पाठवून प्रसिद्धी मिळवून देणारे लोक, वेळेला रोजच्या कामांना फाटा देऊन दिवसदिवसभर देवळासमोर रांगा लावून उभे राहणारे लोक. ही सारी वेडसरपणाची लक्षणं नव्हेत काय?
ही कादंबरी लोकांच्या अतार्किक वर्तनाचं वैज्ञानिक विश्लेषण करत नाही. त्यापेक्षा वेगळा रस्ता ती पकडते. यातल्या पात्रांचा निर्वाणीच्या क्षणी प्रक्षोभ होतो. हा प्रक्षोभ त्या पात्राच्या जगण्याशी विसंगत नसतो, उलट जास्त सुसंगत असतो. या अतिसुसंगतीतून जरी घटना भडक होत असल्या, तरी माणसाच्या मनोव्यापारांचा, माणसामाणसांतल्या संबंधांचा अर्थ लावण्याच्या त्या जास्त जवळ जातात. यात काय नाही? यात समलिंगी संबंध आहेत; पण तसे संबंध असणाऱ्या पात्रांना तेवढा एकच पैलू नाही. त्या संबंधांतून आणखीही काही घडतं. यात हत्या आहे. पुन्हा ही हत्या करणारा कुणी क्रूरकर्मा नाही. यात जाळपोळ आहे; पण तो उद्रेक आहे, कारस्थान नाही. यात बुवाबाजी आहे; पण हा बुवा स्वत: शोषक नाही, उलट बळीच आहे. यात अनैतिक संबंध आहेत आणि त्यांची कठोर किंमत चुकती करणंसुद्धा आहे.
हेही वाचा : जान.. जिंदगी.. आझादी..
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, यातला निवेदक हा एकाच वेळी देशमुखांपैकीच एक, म्हणजे मनोव्यापारांना आवरू न शकणारा आहे. इतकंच नाही, बऱ्याचदा त्याची निवेदनशैली हीच भयनिर्मितीचं कारण असू शकते; पण हाच निवेदक व्यावसायिक मनोविकारतज्ज्ञ म्हणून सगळय़ा ‘भडक’ घटनांचा अन्वयार्थ उलगडून दाखवणारासुद्धा आहे. म्हणजे कसं, तर तो एकेका प्रसंगात इतका गुंतला आहे की निवेदनातून तोच वाचकाला भयाची सूचना करतो. म्हणतो, आता घरातला उजेड हलू लागला होता. उजेड का कधी हलतो? पण त्या क्षणी घरातला उजेड हलत होता. मागं-पुढं सरकत होता. किंवा त्या रात्री का कुणास ठाऊक, पण सभोवताल असुरक्षित वाटत होता. माझं स्वत:चंच घर मला परकं वाटत होतं. जणू जागचा हललो असतो, तर कुणी तरी माझ्यावर झडपच घालणार होतं. आणि या भयाचा आणि देवधर्माचा, भुताखेतांचा काही संबंध नाही. देवघराच्या दाराचा समईनं उजळलेला उभा आयत जसजसा जवळ येऊ लागला तसतशी माझ्या पायाला मणामणानं वजनं चिकटू लागली. पाय जडावले. पायच काय, सारं शरीरच जडावलं. सर्व जाणिवा विझल्या. उरली ती फक्त भीती. संहत आणि हृदयाला डागण्या देणारी क्रूर भीती.
हा निवेदक जरी अत्यंत संवेदनशील असला तरी भावनाप्रधान नाही. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरचं वर्णन पाहता त्यात बाप मेल्याचं दु:ख, देशमुखांचा वारस आता आपण झाल्याचं ओझं, असं काही नाही. खांद्याला जाणवणारं वजन, पायाला टोचणारे दगड याचं वर्णन आहे. यावरून त्या नायकाला शारीरिक वेदना, जाणिवा या मानसिक भावनांपेक्षा जास्त वजनदार वाटतात, असं म्हणावंसं वाटतं. तो जेव्हा स्वत:च अडकलेला नसतो, तेव्हा मात्र वाचकाला काय बघायचं आणि त्यातून काय अर्थ काढायचा, हे सांगत असतो. उदा. इतरांच्या नेणिवेच्या प्रदेशात पोचणं ही एक अशक्यप्राय गोष्ट असते. कितीही बुद्धिमान आणि प्रसरणशील प्रतिभेचा माणूस असला, तरी त्याला स्वत:च्या नेणिवेत डोकावता येत नाही. दुसऱ्याच्या नेणिवेत डोकावणं ही तर अजूनच दूरची बात. याबरोबर निवेदकाची काही प्रश्नांची उत्तरं कायम आपल्याला हुलकावणी देऊन जातात. किंवा सापडतील, सापडतील करत अगदी जवळून गवसणी घालत कायमची अनुत्तरित होऊन जातात.
हेही वाचा : भारतीय विरागिनींची प्रवासगाथा
या प्रकारची विधानं कथानक आणि वाचक यांच्यात अंतर निर्माण करतात. एक प्रकारे त्या गूढ, भयभोवळ आणणाऱ्या वातावरणामधून थोडी उसंत देतात. शिवाय ही कादंबरी ‘जुन्या’, ‘रोमँटिक’ काळातली नाही; एकविसाव्या शतकातली, आधुनिकतेचे संस्कार घडलेल्या काळातली आहे, याचं भान देत राहतात. कादंबरीभर लेखकाने एक तोल सांभाळण्याचा प्रयत्न सतत केला आहे. तो म्हणजे निवेदकाचं कथानकात एक पात्र असणे आणि त्याच वेळी त्याने वाचकाला विश्वासात घेणाऱ्या निवेदकाची भूमिका बजावणे. हा ‘नाना’ पुढे जाऊन मानसोपचारतज्ज्ञ होतो. म्हणजे तो माणसांचे मनोव्यवहार ‘बाहेरून’ न्याहाळणे, त्यांचा अर्थ लावणे, त्यांना काल-अवकाशाच्या चौकटीत बसवणे अशा गोष्टी करायला सक्षम ठरतो; पण लेखक आपल्याला (निवेदकाच्याच तोंडून, पण हा इथे हा लेखक बोलतो आहे, हे भान सजगपणे घ्यायला हवं) सांगत राहतो की एक मानसोपचारतज्ज्ञ म्हणून मी कदाचित व्यावसायिकरीत्या फार यशस्वी झालो नसेन. समोरच्याशी जोडून घेण्याचा माझा स्वभाव मुळातच नाही, जो एका मानसोपचारतज्ज्ञाकडे असणं फार आवश्यक असतं. मी नंतर नंतर माझ्या पेशाची गरज म्हणून स्वत:त बाणवत नेला; पण ती एक कृत्रिम गोष्ट होती. जिचा पट काळ आणि अवकाश, दोन्हींमध्ये दूरवर पसरलेला आहे, जिची पात्रसंख्या मोठी आहे आणि त्या पात्रांचे आपापसातले संबंध अतिशय गुंतागुंतीचे आहेत अशी ही एक अस्सल रसरशीत कादंबरी आहे.
तीन दशकांहून अधिक काळ वैचारिक आणि सामाजिक विषयांवरील लेखन, अनुवाद आणि संपादनात सक्रिय. ‘अबब हत्ती’ आणि ‘आजचा चार्वाक’ या नियतकालिकांचे सहसंपादन. पत्रकार पी. साईनाथ यांच्या पुस्तकाचा ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ हा मराठी अनुवाद लोकप्रिय. गेल्या दीड दशकापासून ‘अक्षर’ या दिवाळी अंकाचे सहसंपादक. hemant.karnik@gmail.com